फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकांत मॅक्रॉन पुन्हा विजयी

फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकांत मॅक्रॉन पुन्हा विजयी

फ्रान्सच्या रविवारी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांत सत्ताधारी इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरिन ली पेन यांच्यावर मात करून प

शेतकरी वाचवला तर अन्नपुरवठा शक्य
भारत पेट्रोलियम रिलायन्सच्या ताब्यात जाण्याची शक्यता
असामान्य राजकीय परिस्थितीवर विरोधकांची सामान्य प्रतिक्रिया

फ्रान्सच्या रविवारी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांत सत्ताधारी इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरिन ली पेन यांच्यावर मात करून पुन्हा सत्ता राखण्यात यश मिळवले. मॅक्रॉन यांनी ५८.५ तर पेन यांना ४१.५ टक्के मते मिळाली. २००२मध्ये जॅक शिराक यांनी सलग दोन वेळा अध्यक्षीय निवडणूक जिंकून विक्रम केला होता, त्या विक्रमाची बरोबरी मॅक्रॉन यांनी रविवारी केली.

आपल्या विजयानंतर मॅक्रॉन यांनी पॅरिसमधील ऐतिहासिक आयफेल टॉवरनजीक एक जंगी सभा घेत आपण सर्वच फ्रेंच जनतेचे अध्यक्ष असल्याचे सांगितले, आपला हा विजय म्हणजे पहिल्या विजयाची पुनरावृत्ती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०१७च्या अध्यक्षीय निवडणुकांत मॅक्रॉन यांना ६६ टक्के मते मिळाली होती.

मॅक्रॉन हे युरोपिय बाजारव्यवस्थेचे व उदारमतवादाचे समर्थक म्हणून ओळखले जातात. कोविड-१९च्या काळात व युक्रेन-रशिया युद्धात मॅक्रॉन यांची कारकीर्द पणाला लागली होती. या काळात त्यांची लोकप्रियता घसरली होती. पण मॅक्रॉन यांनी दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यश मिळवले. त्याला अनेक कारणे आहेत, त्या पैकी महत्त्वाचे कारण मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या निवृत्ती योजनेत अनेक सुधारणा आणल्या. तसेच फ्रान्सच्या सेक्युलरवादावर त्यांनी अधिक भर दिला. २०१८मध्ये मॅक्रॉन यांच्या श्रीमंतांवरील कर कमी करण्याच्या व उद्योजकांना साह्य करणाऱ्या आर्थिक धोरणाविरोधात देशव्यापी लाट निर्माण झाली होती पण मॅक्रॉन यांनी ती लाट यशस्वीपणे थोपवली.

२०२२च्या अध्यक्षीय निवडणुकांत मॅक्रॉन यांना कट्टर उजव्या विचारसरणीच्या पेन यांच्याकडून कडवे आव्हान उभे होते. दोघांची लोकप्रियता जवळपास एकाच निर्देशांकावर आली होती. फ्रान्सच्या काही वृत्तपत्रांनी पेन यांचा विजय नाकारला नव्हता. पेन निवडून आल्यास फ्रान्ससमोर एकता व समतेचे मोठे आव्हान उभे राहील असे या वर्तमानपत्रांचे म्हणणे होते. फ्रान्समध्ये पेन यांनी इस्लाम-ज्यू विरोधी व वंशद्वेषी राजकारण गेल्या निवडणुकांपासून उभे केले होते. या निवडणुकांत त्यांनी पुन्हा हिजाब बंदीसारखे मुद्दे उपस्थित केले. फ्रान्सची अस्मिता, सामान्य माणसाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती यावर त्यांनी भर दिला होता. पेन यांनी युरोपिय संघाविरोधातील आपली कट्टरवादी भूमिका मवाळ केली होती, त्याचे स्वागत अनेकांकडून झाले होते. त्यांनी युक्रेन मुद्द्यावर नेटोवर टीकाही केली होती.

दरम्यान मॅक्रॉन यांच्या विजयावर युरोपमधील अनेक देशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शुल्झ यांनी मॅक्रॉन यांचा विजय फ्रान्सचे युरोपसोबतचे असलेले संबंध अधिक घट्ट करेल व युरोपीय संघाशी फ्रान्सचे सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल असा विश्वास व्यक्त केला. युरोपिय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला लेयेन यांनीही युरोपिय कमिशन व फ्रान्स युरोपच्या समृद्धीसाठी एकत्र काम करतील असे ट्विट केले. ब्रिटन व डचच्या अध्यक्षांनीही मॅक्रॉन यांच्या विजयावर आनंद व्यक्त करत युरोपमध्ये सहकार्य व समृद्धीचे नवे मार्ग तयार होतील असा विश्वास व्यक्त केला. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनीही मॅक्रॉन यांच्या विजयामुळे अमेरिका-फ्रान्स यांच्यातील संबंध अधिक सदृढ होतील. युक्रेन युद्ध, लोकशाहीला समर्थन व हवामान बदलाविषयी मुद्द्यांवर फ्रान्सची मदत यापुढे महत्त्वाची राहील असे उद्गगार बायडन यांनी काढले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0