‘जागतिक मानसिक आरोग्य दिवस’ हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आजकाल अंधार करून काजवा बघण्याचा निखळ आनंद घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे.
छोट्या छोट्या गोष्टी? लहानसहान क्षण
छे, छे! ते कधीच लहानसहान वा क्षुल्लक नसतात.
-ज्योन कँबट – झिन
‘लंच बॉक्स’ चित्रपटातील दोन दृश्य.
दृश्य – १
क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा बॉल साजन फर्नांडिसच्या गच्चीत पडलेला असतो तेव्हा साजन मागणाऱ्या मुलांना इथे खेळायचे नाही, असे बजावून बॉल न देताच त्यांना तिथून हाकलून देतो. रात्री आपल्या बाल्कनीत सिगरेट ओढत उभ्या असलेल्या एकाकी साजनचे लक्ष घरासमोरील एका फ्लॅटकडे जाते. डायनिंग टेबलावर घरातील सदस्य आनंदाने एकत्र जेवण करत असतात. त्यातील एका छोट्या मुलीची नजर आपल्या घराकडे बघणाऱ्या साजनकडे जाते. मगाशी बॉल मागायला आलेल्या मुलांपैकी ती एक असते. ती मुलगी उठते. साजनकडे बघत जोरात आपल्या घराची खिडकी बंद करून टाकते.
दृश्य – २
मधल्या काही काळात साजन फर्नाडिसमध्ये भावनिक ओलावा निर्माण झालेला असतो. परत एकदा जेव्हा त्या मुलांचा बॉल देण्याची वेळ येते तेव्हा बॉल परत करतांना तो त्यांच्याशी थोडं जिव्हाळ्याने बोलतो. परत नेहमीसारखा रात्री गच्चीत उभा असतांना समोरच्या फ्लॅटमध्ये सर्व जेवणासाठी एकत्र जमलेले तेव्हा त्या मुलीचे लक्ष साजनकडे जाते. या वेळी खिडकी बंद न करता ती हात हालवून त्याला हसून छान प्रतिसाद देते.
छोटासा बदल… अगदी छोटासा… या बदलाने साजन फर्नांडिसला त्या मुलीकडून गोड प्रतिसाद मिळतो व एक दिलखुलास स्मितरेखा त्याच्या चेहऱ्यावर येते. आपल्या प्रतिसादावर जग आहे. म्हणतात ना! जग हे आरसा आहे. या आरशात तुम्ही जसे बघाल त्यांचेच प्रतिबिंबचं तुम्हाला दिसेल.
१० ऑक्टोबर हा ‘जागतिक मानसिक आरोग्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाकडे गांभीर्याने बघण्याची वेळ आली आहे. चटकन आपण झटकून टाकू की आम्हांला काहीच प्रॉब्लेम नाही. आमचे मानसिक आरोग्य एकदम ठीकठाक आहे. असं असेल तर फार चांगली गोष्ट आहे. पण मग जगाच्या आरशात आपला चेहरा वैतागलेला, तणावग्रस्त, चिंताग्रस्त असा का दिसतोय? कुठला अनामिक ताण मनावर राज्य करतोय? काही तरी बिनसलं नक्की असतं पण नेमकं काय ते सांगता येत नाही..
त्याचे खरं कारण असे आहे की आपला मूळ चेहरा आपल्या जवळ राहिला कुठे आहे? आपला मूळ स्वभावधर्म ठिकाणावर नाहीये. आपण जे खरेखुरे, नैसर्गिक आहोत ते आणि जगण्यासाठी कृत्रिम गुणांनी तयार झालेलो ते यात अंतर पडत जातं. आणि या दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याची कसरत सुरू होते. त्यातून मानसिक तणाव निर्माण होतो. हाच मानसिक ताण सर्व काही बिघडून टाकतो..
न्यूटनची कथा सर्वाना माहिती आहे. त्याने मांजरींच्या येण्याजाण्यासाठी दोन छिद्रे केली होती. आईसाठी मोठं आणि पिल्लांची छोटं. न्यूटनच्या या वेडगळ चुकीबद्दल खूपदा आश्चर्य व्यक्त केलं जातं. इतकी साधी गोष्ट त्याच्यासारख्या बुद्धिमान माणूसाच्या लक्षात कशी आली नाही? पण आता आपण या प्रसंगाकडे जरा वेगळ्या दृष्टीने बघूया. जगतांना आपण मोठ्या अक्कल हुशारीने एकच मोठं भगदाड ठेवतो. न्यूटनसारखा मूर्खपणा अजिबात करत नाही. त्यामुळे निश्चिंतपणे आपल्याला वाटत की मोठ्या, मोठ्या गोष्टी करत असतांना त्याबरोबर छोट्या गोष्टी सहज सोबत येतील. पण तसं होत नाही. मोठ्या भगदाडातून यायला खूपशा छोट्या गोष्टींनी सपशेल नकार दिलेला असतो. मग त्या मागे राहून जातात…
आपल्याला नेमकं काय हवे हे न उमगल्याचा परिणाम असतो तो…
देनीसची ही छोटी गोष्ट.
एकदा देनीस शाळेतून घरी आलेला तर दाराला कुलुप असते. देनीस घराच्या अंगणातील वाळूच्या ढिगाऱ्यावर बसून आईची वाट पाहत असतो. बाहेर अंधार दाटायला लागतो. इतर घरात दिवे लुकलुकायला लागलेले असतात. बाहेर गेलेली आई अजून परतलेली नसते. तितक्यात त्याचा मित्र मीश्का तिथे येतो आणि देनीसचा वाळूत पडलेला खेळण्याला डंपर घेतो. देनीसच्या बाबांनी तो डंपर गावाला जाण्यापूर्वी त्याला भेट दिलेला असतो. मीश्का त्याला तो डंपर खेळायला देण्याच्या बदल्यात अनेक गोष्टीचे आमिष दाखवतो. पण देनीस त्याला बधत नाही. मीश्का शेवटी एक काडेपेटी काढतो. त्यात एक लहानशी हिरवी चमकती गोष्ट असते. जणू पिटुकली चांदणी. तो एक काजवा असतो. देनीस त्याला या काजव्याच्या बदल्यात तो डंपर कायमस्वरूपी देऊन टाकतो. मीश्का आनंदाने घरी निघून जातो. देनीस खूप वेळ त्या काजव्याकडे बघत असतो. काळ्याकुट्ट अंधारात तो एखाद्या जादुई ताऱ्यासारखा त्याला भासत असतो. थोड्यावेळाने आई येते. खाणं-पिणं झाल्यावर देनीस अंधार करून आईला तो चमकता काजवा दाखवतो. आई त्याला विचारते, “या किड्यासाठी तू तुझा महागडा डंपर दिलास?” त्यावेळी देनीस म्हणतो, “तुझी वाट बघत मला खूप कंटाळा आला होता. हा काजवा जगातल्या कुठल्याही ट्रेकपेक्षा चांगला वाटला.” त्याच्याकडे एकटक बघत आई विचारते, “का बरं असं वाटलं तुला?” त्यावर देनीस उत्तर देतो,” कसं गं कळत नाही आई तुला? तो जिवंत आहे! आणि चमकतोय!”
देनीसची ही गोष्ट थांबून विचार करायला लावणारी आहे ना? देनीसच्या बालमनाला कृत्रिम खेळण्यापेक्षा त्या काळ्याकुट्ट अंधारात सोबत करणाऱ्या, दिलासा देणाऱ्या एका जिवंत छोट्याशा जीवाचे महत्त्व समजलं ते आपल्याला समजत आहे का? मनाला प्रसन्न वाटण्यासाठी नेमकं काय लागत? आपल्याकडे ही असा जिवंत चमकणारा काजवा असतो. फक्त प्रश्न निर्माण होतो की आपण तो देऊन डंपरसारखी निर्जीव गोष्ट घेतो का डंपर देऊन काजवा घेणाऱ्यामध्ये मोडतो?
‘जागतिक मानसिक आरोग्य दिवस’ हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आजकाल अंधार करून काजवा बघण्याचा निखळ आनंद घेण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. दिवसरात्र झगमगाट आणि केवळ झगमगाट नजरेसमोर नाचत असतो. त्यामुळे दिपलेल्या डोळ्यांना स्वप्नं देखील तशीच पडतात. झगमगीत स्वप्नं व वास्तव यातील अंतर कमी करण्याच्या नादात मनस्वास्थ्य नावाची गोष्ट गायब होत चाललेली आहे. त्यामुळे जगण्यासाठी मानसिक सुदृढता ही ऑक्सिजन इतकी महत्त्वाची झाली आहे. कारण मानसिक सुदृढतेवर आपल्या जगण्याचा सुर अवलंबून आहे. अंतर्मनातून आलेल्या सुरांचा नादमेळ आपल्या व्यक्तिमत्वाशी जवळीक साधणारा असेल तितका तो सच्चा स्वर ओठावर येईल आणि तितकी जगण्याची मैफिल रंगतदार, बहारदार होईल.
भौतिकवादी जगणे म्हणजे सुख किंवा आयुष्याची परिपूर्णता असा समज झाला आहे. त्यासाठी मग स्पर्धा लागते. तुलना सुरू होते. हॅरी हेल्सन या मानसशास्त्रज्ञ याला ‘सुखाची ट्रेडमिल’ असे संबोधतो. एखाद्या पातळीवरचं सुख मिळाल्यानंतर आपल्याला त्या पातळीची सवय होऊन जाते. याला ‘ॲडॅप्टेशन लेव्हल’ असे म्हटले आहे. मग त्या पातळीवर राहून आपलं समाधान होत नाही. मग आपण अजून वेगळ्या आणि जास्त सुखाच्या मागे लागतो.
धावून दमल्यावर जाणवत आपण आहोत तिथेच आहोत..
एरिक एरिकसन याने याबद्दल मार्मिक विश्लेषण केले आहे. तुमचं शरीर आणि मन तुम्हाला काय करू देतं आणि समाज त्याचवेळी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवतो यात तफावत पडल्यानं मानसिक द्वंद्व तयार होत. तज्ज्ञांकडून मनस्वास्थ्यासाठी प्रवृतीनुसार उपाय सुचविले जातात. सरसकट एक उपाय लागू होत नाही. तरी सर्वात महत्त्वाचे आणि गरजेचे म्हणजे स्वतःला ओळखणे. स्वतःची कुवत ओळखणे. बैलांशी बरोबरी करण्याच्या नादात आकार फुगविणाऱ्या बेडकासारखी स्वतःची गत न होऊ देणे. मनस्वास्थ्याबाबत स्वतःशी थांबून विचार करणे. सर्वसंमत सत्य आहे की शारीरिक कष्टापेक्षा भावनिक दृष्टिकोन थकव्याला जास्त कारणीभूत ठरतो. आपल्याला शांती हवी असेल आणि काळजीमुक्त व्हायचे असेल तर तसा सुदृढ मानसिक दृष्टिकोन ठेवायला हवा. त्यासाठी खूप काही करायची गरज नसते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला आहे, तसे स्वीकारा. छोटे, छोटे बदल आपल्या आयुष्यात करा. त्यासाठी कायझेन नावाची एक विचारप्रणाली आहे. जास्त करून ती कॉर्पोरेट फिल्डमध्ये वापरली जाते. ही पद्धत आता मानसशास्त्रीय उपचारांसाठी देखील वापरला जाऊ लागली आहे. ‘काय’ म्हणजे बदल आणि ‘झेन’ म्हणजे चांगला. कायझेन म्हणजे चांगला बदल. कायझेन पद्धत वापरायची म्हणजे मोठे बदल न करता अगदी छोटे, छोटे बदल करत जाणे. सुरवातीला हे हास्यास्पद किंवा क्षुल्लक वाटू शकतात. पण त्याचा येणारा रिझल्ट अफलातून आहे. जेव्हा आपण आपल्यात मोठे बदल करायचा ठरवतो, त्यावेळी खूप ऊर्जा, उत्साह निर्माण होतो. जसे आपण नवीन वर्षात काही संकल्प ठरवतो तेव्हा अशी ऊर्जा निर्माण होते. अगदी मोठं मोठी पाऊले घ्यायची तयारी करतो. थोडे दिवसांनी ही ऊर्जा कमी व्हायला लागते. परत मूळ पदावर आपली गाडी येते. त्याचं कारण हे आहे की आपल्या मेंदूला इतका मोठा बदल नकोसा असतो. सवयीची चौकट मोडायला तो नकार देतो. त्यामुळे एका डॉक्टरांनी कायझेन प्रणाली वापरून एक प्रयोग केला. लोकांना एकदम ३० मिनिटं व्यायाम करायला सांगायच्या ऐवजी अगदी एक मिनिट जागेवर व्यायाम करायला सांगितले. लोक तो सहज हसत करायचे. थोडे दिवसांनी मग एकावरून दोन मिनिटं, दोनाचे तीन… असे करत मेंदूला सवय लावत, लावत तो व्यायाम वाढवत नेला.
अशा बेबी स्टेप करून छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबत सुधारणा केल्या जातात. एकावेळी एकच छोटा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे एकाच विचारावर लक्ष केंद्रीत करायला सोपं जातं. एका वेळी एकाच मुद्यावर कृती करायला सांगतात, एकाच अडचणीतून मार्ग काढायचा सल्ला देतात. अशा जमत गेलेल्या छोट्या यशाची छोटी शाबासकी स्वतःला देऊन, पुढील आव्हानांसाठी आपले मनोबल आपोआप वाढवता येते.या पद्धतीने काही सवय सोडता येतात. एका व्यक्तीला तू कोक पिऊ नको, असे न सांगता त्यांनी पिताना एक घोट कमी पी असे सांगितले. हळूहळू ही छोटीशी गोष्ट एका मोठ्या बदलात रुपांतरीत होते. कायझेन ही पद्धत आपल्यासाठी उत्तमरित्या वापरू शकतो. आपल्या मूळ आवडीकडे, छंदाकडे, नैसर्गिक जगण्याकडे वळण्यासाठी यांचा उपयोग होतो.
खूप सोपं आहे स्वतःकडे वळण. त्यासाठी कोणता कोर्स, शिबिरं करायची गरज नाही. कारण परत तेच होतं. अशा मनोउत्साह वाढवणाऱ्या गोष्टीं सुरवातीला जोशात केल्या जातात. कालांतराने त्या करण्यात ढिलाई येते. त्यापेक्षा छोटे, छोटे बदल करा. एका पावलांपुरता प्रकाश अगदी त्या तत्वांप्रमाणे…
कवी गटे म्हणतो तसं – ‘प्रत्येकाने रोज एखादे सुंदर गाणे ऐकावे. एखादी उत्तम कविता वाचावी. एखादे सुरेख चित्र पाहावे आणि जमल्यास इतरांशी दोन शब्द गोड बोलावेत. या लहानशा गोष्टींमुळे आनंदाची खाण सापडेल.’
रवींद्रनाथ टागोर यांनी सत्यजित राय हे सात-आठ वर्षाचे असताना त्यांच्या संदेशवहीत एक संदेश लिहिला व त्यांना म्हणाले, “आज तुला तो अर्थ समजणार नाही पण जेव्हा तू मोठा होशील, तेव्हा यांचा अर्थ तुला समजेल.”
तो संदेश असा होता-
‘मी जगभर प्रवास केला.
नद्या आणि पर्वत पाहण्यासाठी दूरवर भटकलो.
आणि सारे काही पाहिले,
पण माझ्या घरासमोरच्या, एका गवताच्या पात्यावरील दवबिंदू पाहण्याचे मात्र मी विसरलो.
एक दवबिंदू…. ज्याच्या इवल्याशा परिघात
भोवतालचे सारे जग प्रतिबिंबित झाले होते.’
देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म दिग्दर्शक आहेत.
COMMENTS