कथा दहशतवाद्यांची

कथा दहशतवाद्यांची

खरं तर ही कथा नाही, एक चीड आणणारी वास्तविक घटना आहे, पण ती एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशीच आहे. यात तारुण्य आहे, अजोड प्रेम आहे, रोमांच आहे, शौर्य, देशभक्ती, मानवता, अट्टाहास आणि एक संघर्ष देखील!

कोविडची दुसरी लस न घेतलेले १० कोटी नागरिक
फ्रान्सकडून ४०० पुरातन वस्तू पाकिस्तानला परत
बिदाल आणि गोंदवले गावांनी निवडला कोरोनामुक्त मार्ग!

९ फेब्रु.२००६ ची ती दुपार. फेब्रुवारी महिन्यातील थंडीत गारठून बसलेली दिल्ली. दुपार असली तरी दिल्लीच ती! नेहमीप्रमाणे दिल्लीच्या त्या बस स्थानकाजवळ असणाऱ्या रस्त्यावर वर्दळ होती. कुणी शेकोटी करून वेळ घालवत होतं, तर कुणी काम संपवून घरी जाण्याच्या लगबगीत होतं, कुणी ऑटो चालक प्रवासी शोधत होतं तर कुणी एकावर एक पान लावून त्यावर चुना लावण्यात तल्लीन होता. अत्यंत सामान्य वाटणाऱ्या दृश्यामध्ये, कुणालाच मागमूस न लागू देता एक विशेष शाखेचा धाडसी पोलिस चमू, सापळा रचून, घात लावून निपचीत पडून होता. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकावर करडी नजर टाकत, एकमेकांना खुणावत, ते संयम पाळून होते. त्यांची तपश्चर्या लवकरच संपणार होती.

दीड तासांपूर्वी विशेष शाखेतील फोन खणखणला होता. विशेष पोलीस दलाचे उपनिरीक्षक विनय त्यागी, त्या दिवशी कर्तव्यावर होते. त्यांच्या एका खबऱ्याने जुजबी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती. दीपक आणि त्याचा सहकारी मोहम्मद मुरिफ्फ कमर, राहणार भजनपुरा, दिल्ली हे दोघे सरकारी बसने स्फोटके, शस्त्रे आणि दारुगोळा घेवून दिल्लीमध्ये घातपात करण्याचे उद्देशाने जम्मूवरून निघाले आहेत. ते मुकर्बा चौक, कर्नाल बायपास येथे उतरतील. खबऱ्याने गाडीचा नंबर व इतर आवश्यक माहिती दिली आणि या माहितीवर कारवाई करण्यासाठी तत्काळ १५ जणांची एक टीम स्थापन केली गेली. त्यात १ निरीक्षक, ६ उपनिरीक्षक, २ सहाय्यक उपनिरीक्षक, ४ कॉन्स्टेबल घेण्यात आले.

देशभक्तीने ओतप्रोत असलेले, धमन्यातून उष्ण रक्ताने सळसळत्या रक्ताच्या वेगाने, क्षणाचा देखील विचार न करता, झटपट हे शूर मोहिमेवर निघाले. अगदी शस्त्रास्त्रे, गोळ्या आहेत किंवा नाही, सोबत असलेली सर्विस रिव्हॉल्वर चालते किंवा नाही, कुमक पुरेशी होईल किंवा कशी याची किंचितशी काळजी न करता, हे १५ वीर पोलिस अधिकारी थेट या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिवाची पर्वा न करता कर्तव्यावर निघाले. हाती पडेल ते वाहन त्यांनी वापरले, ३ खाजगी गाड्या आणि दोन दुचाकी वापरत ते पोहोचले आणि गर्दीच्या ठिकाणी सापळा रचून, निपचित घात लावून बसले.

टीममधील विनय त्यागी असो अथवा अनिल त्यागी असो, किंवा मग रविंदर त्यागी असो, कुणीही जीवाची परवा केली नाही. त्या दोघांची वाट बघत, डोळ्यात तेल टाकून, जीव मुठीत घेवून, घर परिवार या सर्वांपेक्षा देश मोठा, कर्तव्य मोठं, जननीपेक्षा आज जन्मभूमीला माझी गरज आहे या भावनेने पेटून उठलेले ते सर्व १५ वीर, दोन खतरनाक दहशतवाद्यांना असल्या नसल्या शस्त्राच्या भरवश्यावर, कुठलाही हिंसाचार न होऊ देता ही कामगिरी फत्ते करण्यास कटीबद्ध होते. संध्याकाळी बरोबर ७:३५ वाजता दोघे दहशतवादी राजरोसपणे बसमधून उतरले, तत्काळ खबऱ्याने त्यांना टिपले. दोघांच्या उजव्या खांद्यावर निळी-हिरवी आणि लाल रंगाची चौकडी असलेली एअरबॅग बघितली आणि घात लावून बसलेल्या टीमला त्याने इशारा केला. हे दोघे आउटर रिंग रोड ओलांडून रोहिणीकडे निघणार तितक्यात त्यांच्यावर झडप घातली गेली आणि त्यांच्या मुसक्या अत्यंत चपळाईने आवळल्या गेल्या.

तिथेच तत्काळ त्यांची झडती घेतली गेली. मुरेफकडे पांढऱ्या लखोट्यात तीन नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, दोन  टायमर एक हिरव्या आणि एक क्रीम कलरचे होते. तिथेच तीन नॉन इलेक्ट्रोनिक डिटोनेटर एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये कापसाच्या साहायाने सुरक्षित ठेवून, सील लावून जप्त करण्यात आले. दुसऱ्या एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये टायमर देवून सील केले आणि जप्त केले. दीपक नावाच्या दहशतवाद्याकडे .३० बोरची चिनी बनावटीची बंदूक त्यात ८ जिवंत काडतूसे, त्यांचे तिथेच मोजमाप करून रेखाटन घेण्यात आले. त्यांना एका लखोट्यात टाकून, जागीच सील करून जप्त करण्यात आले. तसेच त्या बॅगेमध्ये काळ्या थैलीमध्ये पांढरे तेलयुक्त विस्फोटक ठेवलेले आढळले. त्याला वजन काट्याने मोजले असता ते दोन किलो भरले. त्याचे प्रत्येकी १० ग्रॅम नमुना घेवून, त्याला व्यवस्थित सील करून जप्त केले. उरलेले स्फोटक त्याच बॅगमध्ये ठेवून त्याला देखील जागेवरच सील करून जप्त केले. साहजिकच एवढे सगळे करण्यात पोलीस अधिकार्यांना पहाटेचे २ वाजले.

कोठडीमध्ये पोलिसांनी २ दहशतवाद्यांची ‘कसून’ चौकशी केली. या दहशतवाद्यांनी जम्मू-कश्मीरमधील त्यांच्या हस्तकांच्या सांगण्यानुसार तो दारूगोळा दिल्लीमध्ये साठवून ठेवण्यासाठी व आदेश येतील तेव्हा योग्य वेळी वापरण्यासाठी आणल्याचे कबूल केले.

दुसऱ्या दिवसाच्या वृतपत्रांमध्ये, अल-बदर या दहशतवादी संघटनेचे सशस्त्र दहशतवादी मोठ्या धाडसाने पकडल्याचे ठळक मथळे छापले गेले. असे कर्तव्यदक्ष अधिकारी आपला जीव पणाला लावतात म्हणूनच तर दिल्ली, या देशाची राजधानी सुरक्षित आहे. अशा अधिकार्‍यांचे मनोबल वाढवणे ही समाजाची जबाबदारी आहे. त्यांना पुरस्कार दिले पाहिजे, बढती दिली पाहिजे, अशा लोकांना आदर्श म्हणून समाजाने पुढे आणले पाहिजे, हेच खरे देशभक्त. अशा गप्पा चौका चौकात सुरू झाल्या नसतील तर नवलच.

ही झाली एक कथा, आता समांतर दुसरी कथा!

एक मुस्लिम युवक, त्याचं नाव इर्शाद, ६ बहिणी, एक खुनाच्या आरोपात शिक्षा भोगणारा मोठा भाऊ, आई-वडील, आणि अठराविश्वे दारिद्र्य. मिळेल ते काम करून संसाराचा गाडा हाकायचा. आला दिवस येईल तसा काढायचा. दरम्यानच्या काळात मोठ्या भावाने उपद्व्याप केला, तुरुंगातून मिळालेल्या सुट्टीवर बाहेर पडला आणि फरार झाला. काही काळानंतर त्याला अटक झाली आणि या वेळेला आणि एक खून आणि दहशतवादी कटकारस्थानाची एक केस अंगावर पडली. त्यात तो निर्दोष सुटला पण यात इर्शाद आणि त्याचे वडील पुरते अटकले. फरारी बंदीच्या शोध तपास यामध्ये सहकार्य करण्यासाठी म्हणून त्यांना ठाण्यात जावे लागे. एकदा गेले, म्हणजे साधारणतः रोजच समजा, की दिवसभर बसवून ठेवायचं, जीव मेटाकुटीला आणायचा वगैरे प्रकार सुरू झाले. तसाही आपल्या देशात ते साहजिकच आहे म्हणा. लेकानं केलेलं बापानं नाही फेडायचं तर कुणी?

त्यांना होत असलेला रोजचा ससेमिरा सोडवण्यासाठी, शेवटी त्यांची तडजोड झाली. मोठ्या लेकाने तुरुंगात कैद असलेल्या दहशतवाद्यांची हेरगिरी करायची आणि गुप्त माहिती मिळवून ती विशेष शाखेला छोट्या भावाकरवी द्यायची. त्यासाठी मग कधी थोडी थोडकी बक्षिसी पण मिळायला लागली. बीगारी काम केल्यापेक्षा हेच काम पूर्णवेळ केले तर काय हरकत आहे म्हणत इर्शाद स्वतः हेर म्हणून काम करायला लागला. पोटाची आग शमायला लागली. खिशात दोन पैसे राहू लागले. रोज काम शोधण्याची गरज राहिली नाही. या मुलभूत गरजा तर पूर्ण झाल्याच सोबत मलिदा पण मिळायला लागला. महिना पगार, मोबाईल फोन, सिनेमात असतं तसं रोमांचक अनुभव, पेहराव बदलणे, नाव बदलणे, गुप्त माहिती काढणे, दहशतवाद्यांवर नजर ठेवणे, जेम्स बाँडच अगदी!

इर्शादचा सूत्रधार ‘माजिद’ थेट मंत्रालयातून त्याच्या मोबाईलवर फोन करायचा. साहेबांचा फोन आला म्हणून पत्नी, आई, वडील चिडीचूप बसायचे. इर्शाद देशसेवा करतोय याची त्यांना पुरेपूर माहिती होती. त्याने पत्करलेले काम धोकादायक जरी असलं तरी तीच काय ते देशसेवेत आपली समिधा म्हणून ते मनाची समजूत काढायचे.

हळू हळू इर्शादची जवाबदारी वाढायला लागली. मन लावून काम करतोय पाहून ‘साहेबांनी’ त्याला जोखीमीची कामं पण सोपवणे सुरू केले. आपण पोटापाण्याला लागलो खरे पण आपला मित्र नवाब हा देखील पोटापाण्याला लागला पाहिजे म्हणून इर्शादने स्वतः शिफारस करून त्याला पण सोबत जोडून घेतलं. दोघे मित्र मिळून मोहिमा राबवत होते. अनेकांना तुरुंग दाखवण्यात तपास यंत्रणेला ते मोलाची मदत करत होते.

इर्शाद एका मागोमाग एक कारवायामध्ये आयबी आणि इतर गुप्तचर संघटनांच्या खास कामात आला. एके दिवशी माजिद साहेबांनी त्याला एक नवीन महत्त्वाकांशी मोहीम सांगितली. सीमेपलीकडे जायचं, दहशतवाद्यांच्या संघटनेत सामील व्हायचं त्यांच्याकडून प्रशिक्षण घायचं, आणि त्यांच्यातला एक बनून राहायचं. त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यांचे मनसुबे, हरकती याची चोख माहिती ठेवायची, मिळेल ती गुप्त माहिती दस्तावेज जमा करत राहायचे आणि आमच्या आदेशाची वाट पाहायची.

दरम्यानच्या काळात इर्शाद बाप बनला होता, त्याची चिमुरडी आईफा आता त्याचे पाय घराबाहेर इतक्या सहज पडू देत नव्हती. तिचे बालहट्ट पुरवण्यात त्याच बापपण बाळसं धरायला लागलं होतं. जबाबदाऱ्या वाढल्या होत्या.  संसारात त्याचा जीव अटकून पडला होता. आईवडील उतार वयाला लागलेले, जीवावर बेतणारा धोका पत्करणे आता त्याला नको होता. इथेच राहून काय जोखीम उचलायची ती उचलता येईल. सीमेपलीकडे गेल्यानंतर परत येवू, नाही येवू याची काय खात्री. नवाब देखील याच मताचा होता. सरते शेवटी पूर्ण विचारांती त्यांनी नकार कळवला. साहेब मात्र रुसले.

माजिद साहेबांनी त्याचे मन वळवायचे अनेक प्रयत्न केले, येनकेन प्रलोभने दिली, धमक्या दिल्या, मोठ्या आधींकाऱ्यांकरवी त्याला समजावले, पण इर्शाद काही बदला नाही. तो ठाम होता. काय करायचं ते इथे या देशातच सांगा, सीमेपार जाणे मला जमणार नाही असा ठाम निर्धार त्याने बेमालूमपणे दिला सांगून, पुढ्यात काय वाढून आहे याची त्याने कधी कल्पना देखील केली नव्हती.

१२ डिसेंबर २००५ रोजी माजिद साहेबांचा फोन आला. इर्शाद घरीच होता. साहेबांनी त्याला तत्काळ धौला कुँवाला बोलवलंय असं सांगून तो घरून बाहेर पडला. नवाब देखील त्याच दिवशी घराबाहेर पडला. त्यानंतर मात्र दोघांचा काही एक पत्ता लागला नाही.

कित्येक दिवस शोध घेवून देखील सापडत नाही म्हणून नवाबाच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. इकडे इर्शादची आई, पत्नी आणि वडील, माजिदला फोन करून करून थकले. पर्याय नाही म्हणून पोलिसांना त्यांनी माजिदचा नंबर देवून तक्रार दाखल केली. इकडे नवाबचा भाऊ, जागो जागी भावाच्या शोधासाठी धावपळ करत होता. त्यांनी अनेक अधिकारी आणि नेत्यांना टेलिग्रामदेखील केले. सरते शेवटी पोलिसांनी नवाबच्या शोधासाठी वॉरंट काढले आणि वृत्तपत्रात हरवला असल्याच्या मथळ्यात जाहिरात दिली. जाहिरात आली ती तारीख होती ९ फेब्रु.२००६.

आता पहिल्या कथेचा आणि दुसऱ्या कथेचा पुढचा भाग

दोन खुखाँर दहशतवादी टाडाखाली अटक करून विशेष शाखेने न्यायालयासमोर हजर केले गेले. त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली. ‘सखोल’ व ‘कसून’ चौकशी करण्यात आली तेव्हा कुठे त्या दोन दहशतवाद्यांची खरी ओळख पटली ते म्हणजे दीपक उर्फ ‘इर्शाद’ अली आणि मुरेफ कमर उर्फ ‘नवाब’. हो तेच इर्शाद आणि नवाब.

अचानक गायब झालेले इर्शाद आणि नवाब, दहशतवादी म्हणून २०-२२ दिवसांत बाहेर पडले आणि पोलिसांनी त्यांना लीलया पकडलं.

माझा पोरगा निर्दोष आहे असं म्हणतं इर्शादची आई, न्यायालय, तुरुंग, पोलिस ठाणे, विशेष शाखा यांच्या येरझाऱ्या मारून, अपमानित होऊन मेली. तिच्या मयतीला देखील इर्शादला जाता आले नाही. सुकून काठी झालेला बाप, असली नसली सगळी पुंजी त्याच्या कर्तबगार लेकराला सोडवण्यात लावत होता. इर्शादची बायको आता काळाच्या खुणा ओळखून खानावळ चालवून गरजा पूर्ण करण्याचे यत्न करत होती.

दुसरीकडे नवाबचा भाऊ थेट उच्च न्यायालयात पोहोचला. त्यांनी या  दोघांच्या अटकेला आणि संपूर्ण कथानकालाच आवाहन दिले आणि तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याची मागणी केली. ‘त्या काळातील’ न्यायाधीशांना नवाबाच्या भावाच्या कैफियतीमध्ये विश्वास वाटला. त्यांनी चालू तपासाला स्थगिती न देता, विशेष शाखेला सविस्तर उत्तर मागितलं. विशेष शाखेने दाखल केलेल्या  उत्तरात नमूद केलेल्या बहुतांश बाबी या तर्काच्या कसोटीवर संशयास्पद वाटल्याचे म्हणत उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला प्रकरणात तपास करून निष्पक्ष भूमिका मांडण्याचे आदेश दिले.

त्या काळात केंद्रीय अन्वेषण विभाग पोपट बनायचा होता म्हणतात. त्यांनी केलेल्या तपासानुसार प्रथम दर्शनी, विशेष शाखा खोटं बोलत असल्याचे स्पष्ट मत न्यायालयाला कळवलं, परंतु त्याला पुराव्यासोबत मांडण्यासाठी सखोल तपास करणे गरजेचे असल्याने त्यास यथायोग्य वेळ द्यावा, असा अर्जच केंद्रीय अन्वेषण विभागाने केला. न्यायालयाने त्यांना वेळ दिला देखील. तब्बल तीन वर्ष चाललेल्या या सखोल तपासाअंती केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या अहवालानुसार, इर्शाद व नवाब हे खरोखरच आयबी आणि विशेष शाखेचे गुप्तहेर होते असे स्पष्ट केले. त्यांच्यावर दाखल केलेली केस ही पूर्णपणे खोटी व बनावट असून विशेष शाखेने ९ फेब्रु.२००६ रोजी केलेली कारवाई ही कपोलकल्पित असून प्रत्यक्ष असे काही घडलेच नाही. ना त्यांना अशी कुठली अटक झाली, ना त्यांच्याकडे काही शस्त्रास्त्रे सापडली. हा सर्व बनाव निर्माण करणारे यातील जबाबदार अधिकारी हे शिक्षेस पात्र असून त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी शिफारस देखील त्यांनी केली. महत्त्वाचे म्हणजे इर्शाद व नवाब विरोधातील प्रकरणात त्यांनी खटला बंद करावे अशी विनंती देखील उच्च न्यायालयात केली.

या दरम्यानच्या काळात दोघे तुरुंगात खितपत पडले होते. त्यांनी वेळोवेळी केलेले जामीन अर्ज मुख्यत्वे, आरोप ‘दहशतवादाचे व गंभीर’ असल्याचे कारण देवून फेटाळले गेले. केंद्रीय अन्वेषण विभागाने त्यांना तपासांती निर्दोष म्हटले असताना देखील, ते दहशतवादीच समजले गेले. इर्शाद व नवाब यांना जामीन मिळाला तो १७ जुलै २००९ रोजी. तो देखील उच्च न्यायालयातून. १२ डिसेंबर २००५ ते १७ जुलै २००९ असे एकूण जवळ जवळ ४ वर्ष न केलेल्या आरोपासाठी तुरुंगात खितपत पडलेले. हे दोघे, केवळ तुरुंगाच्या बाहेर पडले, त्यांचा खटला पुढे ७ वर्ष आणखी चालणार होता.

(लेखाचे छायाचित्र केवळ प्रतिनिधीक स्वरूपाचे)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0