स्टॉकहोमः स्वीडनमध्ये सोशल डेमोक्रेट्स पक्षाला पराभवाचा सामना करावा लागत असून म़ॉडरेट पार्टी, स्वीडन डेमोक्रॅट्स, ख्रिश्चन डेमोक्रॅट्स व उदारमतवादी अश
स्टॉकहोमः स्वीडनमध्ये सोशल डेमोक्रेट्स पक्षाला पराभवाचा सामना करावा लागत असून म़ॉडरेट पार्टी, स्वीडन डेमोक्रॅट्स, ख्रिश्चन डेमोक्रॅट्स व उदारमतवादी अशा सगळ्या पक्षांची मोट तयार होत आहे. तसे संकेत मॉडरेट पार्टीचे अध्यक्ष उल्फ क्रिस्टरसन यांनी गुरुवारी दिले. हे सर्व पक्ष उजव्या विचारसरणीच्या राजकारणाकडे जात असल्याचे दिसत आहे.
३४९ जागांच्या स्वीडन संसदेतील १७६ हून अधिक जागा म़ॉडरेट पार्टी, स्वीडन डेमोक्रॅट्स, ख्रिश्चन डेमोक्रॅट्स व उदारमतवादी पक्षांनी काबीज केल्या आहेत तर सत्ताधारी मध्यम-डाव्या विचारसरणीच्या पक्षाला १७३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निसटत्या बहुमतावर स्वीडनमध्ये उजव्या मताचे सरकार येण्याची शक्यताही बळावली आहे.
काही ठिकाणचे निकाल हाती आलेले नाहीत पण त्याने आकड्यात फारसा बदल होणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्वीडनच्या पंतप्रधान मॅग्डेल्ना अँडरसन यांनी पराभव मान्य केला आहे.
यंदाची सार्वत्रिक निवडणूक स्वीडनच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण या निवडणुकीत स्थलांतरितांच्या विरोधात स्वीडन डेमोक्रेट्सने आक्रमक भूमिका घेतली होती. या पक्षामध्ये कट्टर गोऱ्यावंशीय नेत्यांचे वर्चस्व आहे. या नव्या बदलामुळे स्वीडनच्या राजकारणातील सहिष्णु व सर्वसमावेशक वातावरण बदलेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. सत्ता निकट दिसत असल्यानंतर मॉडरेट पार्टीचे अध्यक्ष उल्फ क्रिस्टरसन यांनी स्वीडन सर्व नागरिकांचा असून समाजात वाढता असंतोष, अस्थिरता व ध्रुवीकरण असले तरी समाजाने एकसंघ राहावे असे आवाहन केले आहे.
क्रिस्टरसन यांच्या मॉडरेट पार्टीचा प्रभाव अत्यल्प असला तरी ते ख्रिश्चन डेमोक्रॅट्स, स्वीडन डेमोक्रॅट्स व लिबरल्सच्या मदतीने सरकार स्थापन करण्यासाठी आग्रही आहेत.
नव्या सत्तासमीकरणाचे संभाव्य धोके
स्वीडनच्या नव्या सत्तासमीकरणामुळे स्थलांतरितांचा मुद्दा चिघळण्याची भीती आहे. स्वीडन डेमोक्रॅट्सना एलजीबीटीक्यू व धर्माच्या आधारावर स्वीडनमध्ये स्थलांतरितांना प्रवेश देऊ नये असे ठाम वाटते. त्यांचा कल खंबीर स्थलांतरविरोधी धोरण असावे याकडे आहे. या पक्षाला स्थलांतरितांवर होणारा खर्चही कमी करायचा आहे. तसेच स्थलांतरण रोखण्यासाठी पोलिसांना विशेष अधिकार द्यावेत व ज्या ठिकाणी स्थलांतरितांकडून गुन्हेगारी समस्या उद्भवल्या आहेत तेथे पोलिसांना अधिक अधिकार द्यायचे आहेत.
स्वीडन डेमोक्रॅट्सने एकूण मतदानापैकी २०.६ टक्के मते मिळवली आहेत तर मॉडरेट्सनी १९.१ टक्के व सोशल डेमोक्रॅट्सनी ३०.४ टक्के मते मिळवली आहेत.
मूळ वृत्त
COMMENTS