इंग्लंडमध्ये सांप्रदायिक संघर्ष: ४७ जणांना अटक

इंग्लंडमध्ये सांप्रदायिक संघर्ष: ४७ जणांना अटक

लंडन: इंग्लंडच्या पूर्व भागातील लायसेस्टर शहरात, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून, झालेल्या संघर्षासंदर्भात यूके पोलिसांनी ४७ जणांना अटक केली आहे. श

नुपूर शर्मा, नवीन जिंदालमुळे परराष्ट्र खाते अडचणीत
ट्रोलिंगपुढे गुडघे टेकून लष्कराने दिला दीर्घ परंपरेचा बळी
भारतातल्या वाढत्या असहिष्णुतेला यूट्यूबचे बळ

लंडन: इंग्लंडच्या पूर्व भागातील लायसेस्टर शहरात, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून, झालेल्या संघर्षासंदर्भात यूके पोलिसांनी ४७ जणांना अटक केली आहे. शहरात आणखी गोंधळ होऊ नये म्हणून चाललेल्या कारवाईचा भाग म्हणून ४७ जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारतीय समुदायाच्या विरोधातील हिंसाचारावर कडक शब्दांत टीका करणारे निवेदन लंडनमधील भारतीय आयुक्तालयाने प्रसिद्ध केले असून, पीडितांना संरक्षण पुरवण्याची विनंतीही यात केली आहे.

लायसेस्टरमधील संघर्षादरम्यान शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्याची कबुली देणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला १० महिने कारावासाची शिक्षा दिल्याचे लायसेस्टरशायर पोलिस विभागातील कर्मचारी रॉब निक्सन यांनी सांगितले.

“आम्ही शहरात गोंधळ चालवून घेणार नाही. सध्या शहरात विस्तृत पोलीस कारवाई सुरू आहे, घटनेबद्दल माहिती गोळा केली जात आहे आणि समुदायाला सुरक्षिततेची ग्वाही दिली जात आहे. समाजातील शांततेला धोका पोहोचवणाऱ्यांना कायद्यापुढे नक्की आणले जाईल,” असे ते म्हणाले.

दुबईमध्ये काही दिवसांपूर्वी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यावरून लायसेस्टरमधील हिंदू-मुस्लिम गटांमध्ये संघर्ष झाला. यामुळे कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाली तसेच यात चांगलीच आक्रमकता होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलिसांनी आतापर्यंत ४७ जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांपैकी काही लायसेस्टर शहराबाहेरील आहेत, काही बर्मिंगहॅमहून आलेले आहेत, असेही पोलिसांनी नमूद केले. मंदिराचे ध्वज खाली खेतल्याचे तसेच काचेच्या बाटल्या फेकल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून प्रसृत केले जात होते. भारतीय उच्चायुक्तालयाने यावर टीका केली आहे आणि हिंदू धर्माच्या प्रतिकांची मोडतोड झाल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण उच्चायुक्तालयाने यूकेतील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे. पीडितांना यंत्रणेने संरक्षण द्यावे, अशी मागणीही उच्चायुक्तालयाने केली आहे.

सोशल मीडियावरून प्रसृत चुकीच्या माहितीमुळे व खोट्या बातम्यांमुळे हा संघर्ष झाल्याचा ग्रेट ब्रिटनचा दावा आहे. सोशल मीडियावरून फारच विपर्यस्त माहिती पसरवली जात होती, असे लायसेस्टरचे सिटी मेयर पीटर सोल्सबाय म्हणाले.

हिंदू मंदिरांची नासधूस झाल्याचा आम्ही निषेध करतो. प्रार्थनास्थळांचा निरादर होता कामा नये, अशी प्रतिक्रिया हिंदू कौन्सिल यूकेने एका पत्रकाद्वारे दिली आहे. लायसेस्टर हे सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण तसेच एकात्मतेसाठी ओळखले जाणारे शहर आहे, त्यामुळे हिंदू समुदायाने यंत्रणेसोबत काम करावे, असे आवाहनही या संघटनेने केले आहे. इंग्लंडच्या ईस्ट मिडलॅण्ड्स भागातील लायसेस्टर या शहरात दक्षिण आशियाई वंशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील बेलग्रेव्ह रोडवर भारतीय उपखंडातील दागिने, अन्नपदार्थांच्या दुकानांची रेलचेल आहे तसेच महात्मा गांधी यांचा पुतळाही आहे.

या शहरातील भारतीय वंशाचे माजी खासदार कीथ वाझ यांनी सोशल मीडियावरून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. लायसेस्टरमध्ये वेगवेगळ्या धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत, असे त्यांनी सांगितले. वाझ १९८७ ते २०१९ एवढा दीर्घकाळ लायसेस्टर ईस्टचे खासदार होते.

“आम्ही दिवाळी, ईद व बैसाखी हे सण एका कुटुंबाप्रमाणे साजरे करतो. मूठभर लोक शहराच्या सौहार्दाला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे हे बघून दु:ख वाटते,” असे ते म्हणाले.

मूळ बातमी:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0