लविवः रशियाच्या सैन्याने शुक्रवारी युक्रेनमधील झेप्रोझिया आण्विक प्रकल्प ताब्यात घेतला. हा अणुप्रकल्प युरोपमधील सर्वात मोठा असून युक्रेनच्या एक पंचमां
लविवः रशियाच्या सैन्याने शुक्रवारी युक्रेनमधील झेप्रोझिया आण्विक प्रकल्प ताब्यात घेतला. हा अणुप्रकल्प युरोपमधील सर्वात मोठा असून युक्रेनच्या एक पंचमांश लोकसंख्येला यातून ऊर्जा पुरवली जाते. हा प्रकल्प रशिया-युक्रेन लढाईत उध्वस्त होईल व किरणोत्सार होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. रशिया-युक्रेनच्या संघर्षात या प्रकल्पाला आग लागली होती, ती आग आटोक्यात आल्याचे युक्रेनच्या प्रशासनाने सांगितले. हा प्रकल्प सुरळीतपणे कार्यान्वित असल्याचेही युक्रेनचे म्हणणे आहे.
दोन दिवसांपूर्वी रशियन सैन्याकडून झालेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात आग लागली होती. रॉयटरने या आगीची पुष्टताही केली होती. त्यावर युक्रेनेचे अध्यक्ष झेलिन्स्की यांनी रशियाच्या सैन्याकडून अणुप्रकल्प उध्वस्त केला जात असून युरोपीय देशांना जागे व्हावे असा इशारा दिला होता.
झेप्रोझिया अणुप्रकल्पातून किरणोत्सार होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. पण सध्या तरी किरणोत्सार आढळला नाही असे अमेरिकेचे ऊर्जा सचिव जेनिफर ग्रॅनहोम यांनी सांगितले आहे.
दरम्यान रशियाच्या सैन्याने काही दिवसांपूर्वीच युक्रेनची राजधानी किव्हपासून १०० किमी उत्तरेकडील चेर्नोबिल अणुप्रकल्प ताब्यात घेतला होता. झेप्रोझिया अणुप्रकल्प हा चेर्नोबिलच्या तुलनेत अद्ययावत असून प्रकल्पाची सुरक्षा यंत्रणा अधिक चांगली आहे.
रशियाच्या सैन्याने झेप्रोझिया अणुप्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन व ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व अणुप्रकल्पासंबंधी माहिती जाणून घेतली.
मूळ बातमी
COMMENTS