कोरोना महासाथीच्या काळातील सर्वांत वाईट नेतृत्व

कोरोना महासाथीच्या काळातील सर्वांत वाईट नेतृत्व

कोविड-१९ साथ आटोक्यात आणण्यास अत्यंत कठीण आहे आणि राजकीय नेते साथ व्यवस्थापनाचा केवळ एक भाग असतात. मात्र, काही राष्ट्रांतील आजीमाजी नेत्यांनी साथीच्या उद्रेकाला हातभार लावला आहे. साथीची तीव्रता लक्षात न घेणे, विज्ञानाची कदर न ठेवणे किंवा सोशल डिस्टन्सिंग व मास्कसारख्या उपायांकडे दुर्लक्ष करणे यांतील एक तरी चूक खालील यादीतील नेत्यांनी केली आहे आणि त्याचे परिणाम अत्यंत विघातक ठरले आहेत.  

कोरोना आणि औषधशास्त्र
कोरोना – डॉक्टरांना घरे खाली करण्यास घरमालकांचा दबाव
कोरोना व जगाचे बदलले जाणारे अर्थकारण : भाग १

कोविड-१९ साथ आटोक्यात आणण्यास अत्यंत कठीण आहे आणि राजकीय नेते साथ व्यवस्थापनाचा केवळ एक भाग असतात. मात्र, काही राष्ट्रांतील आजीमाजी नेत्यांनी साथीच्या उद्रेकाला हातभार लावला आहे. साथीची तीव्रता लक्षात न घेणे, विज्ञानाची कदर न ठेवणे किंवा सोशल डिस्टन्सिंग व मास्कसारख्या उपायांकडे दुर्लक्ष करणे यांतील एक तरी चूक खालील यादीतील नेत्यांनी केली आहे आणि त्याचे परिणाम अत्यंत विघातक ठरले आहेत. याबद्दल झालेल्या संभाषणाचे काही अंश पुढे दिले आहेत:

नरेंद्र मोदी, भारत

सुमित गांगुली, इंडियाना युनिव्हर्सिटी

मे २०२१ मध्ये दैनंदिन रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडल्यामुळे भारत कोविड साथीचे केंद्र ठरले आहे. अर्थात कोविड साथीने देशात निर्माण केलेल्या हाहाकाराची कल्पना या आकडेवारीतून येणार नाही. ऑक्सिजन व रेमडिसिविरसारख्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कोविड-१९चे रुग्ण रुग्णालयांमध्ये दगावत आहेत. रुग्णालयातील सर्व जागा भरलेल्या असल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळत नाही आहेत. अनेक भारतीय या शोकांतिकेसाठी एकाच व्यक्तीला जबाबदार धरत आहेत: पंतप्रधान नरेंद्र मोदी.

कोरोनाचा प्रसार प्रभावीरित्या आटोक्यात आणून भारताने मानवतेचे रक्षण केल्याच्या वल्गना मोदी यांनी जानेवारी २०२१ मध्ये जागतिक मंचावरून केली होत्या. मार्च २०२१ मध्ये भारतात कोविडची दुसरी लाट जोम धरत असतानाच, साथ समाप्त झाल्याचा दावा मोदी सरकारमधील आरोग्यमंत्र्यांनी केला होता. दुसऱ्या लाटेसाठी सरकारने कोणतीही तयारी केली नाही.

देशाच्या काही भागांत कोविडचा उद्रेक झालेला असताना, मोदी व त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकांच्या प्रचारात व्यग्र होते. या सभांना हजारो लोक मास्कही न घालता उपस्थित होते. मोदी यांनी जानेवारी ते मार्च या काळात कुंभमेळ्यासारख्या धार्मिक संमेलनाला परवानगी दिली. कुंभमेळा सुपरस्प्रेडर ठरला असून तो आयोजित करणे ही भीषण चूक होती, असे सार्वजनिक आरोग्य अधिकारी आता मान्य करत आहेत.

भारत जगातील सर्वांत मोठे लस उत्पादक राष्ट्र असल्याच्या बढाया मारत मोदी यांनी शेजारच्या देशांमध्ये १ कोटींहून अधिक लशी निर्यात केल्या. वस्तुस्थिती अशी आहे की, मेच्या सुरुवातीला भारताच्या १.३ अब्ज लोकसंख्येपैकी केवळ १.९ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे.

जेर बोल्सोनारो, ब्राझिल

– एलिझ मसार्द दा फोन्सेका, फंदाकाओ गेट्युलिओ आणि स्कॉट एल. ग्रीर, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन

ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.

ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.

ब्राझिलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांनी कोविडचा उल्लेख “लिट्ल फ्लू” असा करून साथीचा प्रसार वाढवण्यात हातभार लावला. आरोग्य मंत्रालयाच्या अनेक बाबींत त्यांनी हस्तक्षेप केला. प्रार्थनास्थळांवर मास्क लावण्याची सक्ती करण्यास त्यांनी नकार दिला. आपले विशेषाधिकार वापरून व्यवसाय सुरू ठेवण्यात परवानगी दिली. गुणवत्ता सिद्ध न केलेल्या औषधांचे आक्रमक प्रमोशन केले. ब्राझिलमधील राज्य सरकारे, चीन व डब्ल्यूएचओवर कोविड साथीचे खापर फोडून त्यांनी आपली जबाबदारी साफ नाकारली. साइड इफेक्ट्सचे कारण देऊन बोल्सोनारो यांनी डिसेंबरमध्ये स्वत: लस घेण्यास नकार दिला.

अलेक्झांडर ल्युकाशेंको, बेलारूस

– एलिझाबेथ जे. किंग आणि स्कॉट एल ग्रीर, युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन

बेलारुसमधील हुकूमशाही राज्यकर्ते अलेक्झांडर ल्युकाशेंको

बेलारुसमधील हुकूमशाही राज्यकर्ते अलेक्झांडर ल्युकाशेंको

बेलारुसमधील हुकूमशाही राज्यकर्ते अलेक्झांडर ल्युकाशेंको यांनी कोविडचा प्रसार रोखण्यासाठी कोणतेही निर्बंध घालण्यास नकार दिला. व्होडका पिऊन, सॉना घेऊन आणि शेतात काम करून कोरोनाचा प्रतिबंध करता येतो, असे तारेही तोडले. ल्युकाशेंको यांना स्वत:ला गेल्या वर्षी लक्षणरहित कोविड-१९ झाला होता. मात्र, आपल्याला काहीच झाले नाही याचा अर्थ हा आजार तेवढा गंभीर नाही असा पवित्रा त्यांनी घेतला.

डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका

– डोरोथी चिन, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस

आता ट्रम्प यांची सत्ता गेली असली, तरी त्यांनी गेल्या वर्षी सत्तेत असताना साथीचे व्यवस्थापन करताना ज्या चुका केल्या, त्यांचे परिणाम आजही अमेरिकी जनतेला भोगावे लागत आहेत. सुरुवातीला साथीचा उद्रेकच नाकारणे, मास्क वापरण्याबद्दल चुकीची माहिती पसरवत राहणे याचा

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

परिणाम देशातील एका विशिष्ट वर्गाला अधिक भोगावा लागत आहे. आफ्रिकी अमेरिकी आणि लॅटिनोजचे प्रमाण अमेरिकी लोकसंख्येच्या ३१ टक्के असताना कोविड-१९ रुग्णांमधील त्यांचे प्रमाण मात्र ५५ टक्के आहे. श्वेतवर्णीयांच्या तुलनेत अमेरिकेतील मूळ रहिवाशांमध्ये कोविडमुळे रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण ३.५ पट अधिक आहे, तर मृत्यूदर २.४ टक्के अधिक आहे.

कोविडमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीचे दरही समान नाहीत. अमेरिकेत साथीने कळस गाठलेला असताना लॅटिनो अमेरिकींमध्ये बेरोजगारीचे प्रमाण १७.६ टक्के, आफ्रिकी अमेरिकींमध्ये १६.८ टक्के, तर आशियाई अमेरिकींमध्ये १५ टक्के होते. श्वेतवर्णीय अमेरिकींमध्ये मात्र हे प्रमाण १२.४ टक्के होते.

हे परिणाम दीर्घकाळ जाणवत राहणार आहेत. उदाहरणार्थ, आता अमेरिकेतील एकंदर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना, अल्पसंख्याक गटांनी समान प्रगती केलेली नाही.

ट्रम्प यांनी कोविड-१९ साथीचा दोष चीनला देताना विषाणूचा उल्लेख “कुंग फ्लू” असा करून वर्णद्वेषी विधाने केली. त्याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षभरात आशियाई अमेरिकी तसेच पॅसिफिक आयलॅण्डर्सवर होणाऱ्या हल्ल्यांत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.

लशीच्या प्रारंभिक विकासाला ट्रम्प प्रशासनाने सहाय्य केले आणि हे काम निश्चित मोठे आहे. मात्र, ट्रम्प यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना जे गैरसमज पसरवले आणि विज्ञानविरोधी विधाने केली त्यामुळे अमेरिकेत साथीविरोधात चाललेला लढा अधिक कठीण झाला. अलीकडेच झालेल्या सर्वक्षणानुसार, २४ टक्के अमेरिकी जनता व रिपब्लिकन पक्षाचे ४१ टक्के कार्यकर्ते लस घेणार नाही असे म्हणत आहेत.

अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, मेक्सिको

– साल्वाडोर वँकेझ डेल मेर्काडो, सेंत्रो दी इन्वेस्तिगेसियाँ वाय दोसेन्सिया इकोनोमिकाज

मेक्सिकोमध्ये कोविड-१९ आजार झालेल्या रुग्णांपैकी ९.२ टक्क्यांचा मृत्यू होत असून, हा जगातील सर्वोच्च मृत्यूदर आहे. मेक्सिकोमध्ये कोविडने ६१७,००० जण दगावले असून, अमेरिका व भारत

मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर

मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर

यांसारख्या मेक्सिकोच्या तुलनेत खूप अधिक लोकसंख्या असलेल्या देशांतील मृत्यूच्या आकड्यांशी हे आकडे बरोबरी करणारे आहेत.

मेक्सिकोत कोविड-१९ साथीचा उद्रेक तीव्र स्वरूपाचा आणि दीर्घकालीन ठरला यामागे अनेक कारणे असली, तरी अपात्र राष्ट्रीय नेतृत्व हे यातील महत्त्वाचे कारण आहे.

साथीच्या संपूर्ण कालखंडात मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर परिस्थितीचे गांभीर्य कमी करून सांगत राहिले. सुरुवातीच्या काळात राष्ट्रव्यापी लॉकडाउन लावण्याच्या मागण्या त्यांनी फेटाळल्या व राष्ट्रव्यापी मेळावे घेत राहिले. अखेरीस २३ मार्च, २०२० रोजी मेक्सिकोत दोन महिन्यांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला. ओब्रोडोर मास्क लावण्यास कायम नकार देत राहिले.

मेक्सिकोमध्ये आरोग्यसेवेसाठी अत्यंत अपुऱ्या तरतुदी ठेवण्याचा इतिहास आहे. २०१८ मध्ये सत्तेवर आलेले लोपेझ ओब्राडोर यांनी साथीच्या काळातही या खर्चात अगदीच किंचित वाढ केली.

साथीचा उद्रेक झाल्यानंतरही त्यांनी आरोग्यसेवेवर खर्च करताना हात आखडता घेणे सुरूच ठेवल्यामुळे संकट अधिक गहिरे झाले. त्यामुळे मेक्सिकोच्या अर्थव्यवस्थेला साथीमुळे बसलेला फटकाही अधिक तीव्र झाला आणि गेले वर्षभर अर्थव्यवस्था खुली ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. त्याच काळात मेक्सिकोमध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली होती. अखेरीस दुसरा लॉकडाउन अपरिहार्य ठरला आणि डिसेंबर २०२० मध्ये तो जाहीर करण्यात आला.

आज मेक्सिकोत मास्क वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. तब्बल १० टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे (शेजारील ग्वाटेमालामध्ये हे प्रमाण केवळ १ टक्का आहे). मात्र, तरीही साथीच्या परिणामातून बाहेर पडण्यासाठी मेक्सिकोला अद्याप लांबचा पल्ला गाठायचा आहे.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0