गर्दीत हरवलेला गीतकार

गर्दीत हरवलेला गीतकार

‘‘मै यही, इसी जगह खडा था, इसी तरह शाम का वक्त था.. इसी तरह सूरज डूब रहा था और मन में गीत जनम ले रहा था..’’

उत्तर-दक्षिणेतील वैर व संपर्काचा अभाव
मी आणि गांधीजी – ६
मुस्लीम धर्मांंतराविषयीचे सिद्धांत

१९९५-९६चा तो काळ होता. गीतकार योगेश यांची भेट कुठे नि कधी झाली, हे आता स्पष्टपणे आठवत नाही. आठवते इतकेच की, त्या भेटीचे श्रेय चित्रपट अभ्यासक- संग्राहक विश्वास नेरुरकर यांचे होते. बहुधा विश्वासच मला त्यांच्या कामानिमित्त योगेश यांच्याकडे घेऊन गेले होते.

जेव्हा योगेश यांना भेटलो, तेव्हा ‘गीतकार योगेश’ ही त्यांची जनमानसातील ओळख धूसर होऊ लागली होती. ज्या चित्रपटांमुळे त्यांना प्रसिद्धीचे वलय लाभले होते, ते ‘आनंद’, ‘मिली’, ‘मंझिल’, ‘छोटी सी बात’, ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों में’ यासारखे चित्रपट येऊनही वीसहून अधिक वर्षे उलटून गेली होती. एकीकडे ‘झंकार बिट्स’वाले संगीतकार धुमाकूळ घालत होते, तर दुसरीकडे ए. आर. रहमानसारख्या संगीताची परिभाषा बदलत सळसळत्या धूनांची निर्मिती करणाऱ्या संगीतकाराचे युग आकार घेऊ पाहात होते. नव्या जगाची, नव्या समाजाची, या समाजाच्या मनोवस्थेची भाषा बोलणारे गीतकार चित्रपटसृष्टीत आपापले झेंडे फडकावू पाहात होते. शब्द, ध्वनी आणि तंत्राच्या या परिवर्तनाच्या कालखंडात योगेशसारखा गीतकार स्वतःची ओळख जपण्यासाठी धडपडताना दिसत होता. ही धडपड त्यांच्या देहबोलीतून, त्यांच्या सार्वजनिक वावरातून सहजपणे नजर पडत होती. त्यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या गुलजार किंवा एका वयाच्या असलेल्या जावेद अख्तर आदींनी काळाची पावले ओळखून नव्या प्रतीक-प्रतिमांसह नव्या पिढीची भाषा आत्मसात केली होती. कारकीर्दीतला त्यांच्या दुसऱ्या यशाचा टप्पा सुरू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर योगेश यांचे प्रवाहापासून तुटत जाणे अस्वस्थ करणारे होते.

अर्थात, असे असले तरीही योगेश यांचे एकूण व्यक्तिमत्व सदा हसतमुख, प्रसन्नचित्त असेच होते. रेकॉर्डिंग वा सार्वजनिक कार्यक्रमाप्रसंगी नव्या पिढीतले गीतकार-संगीतकार आदराने ‘पाय लागू’ करत त्यावेळी योगेश यांच्या चेहऱ्यावरचे समाधान लपता-लपत नव्हते. होतकरू मंडळींकडून असा होणारा मान-सन्मान त्यांना सुखावत असल्याचेही दिसत होते. त्याच सुमारास कधीतरी मुंबईतल्या विले-पार्ले इथल्या दीनानाथ नाट्यगृहात लता मंगेशकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीत आणि चित्रपटसृष्टीतले बडे बडे दिग्गज यात सहभागी झालेले होते. याच कार्यक्रमात थोडेसे हरवलेले, थोडेसे हरखलेले, पण नवागतांच्या आदर सन्मानाने सुखावलेले योगेश मी अनुभवले होते.

एकदोनदा सार्वजनिक कार्यक्रमातली भेट, फोनवरचा संवाद, वर्तमानपत्रासाठी प्रतिक्रिया-प्रतिसाद अशी ओळखदेख वाढल्यानंतर योगेश यांच्या घरी जाण्याचाही योग आला होता. गोरेगावच्या ‘फिल्मीस्तान’ स्टुडिओ समोरच्या एका चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट होता. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे असावे, असे ते सर्वसाधारण घर होते. दोन-चार पुरस्कारस्वरुप मिळालेल्या ट्रॉफीज आणि काही संगीतकार-कलावंतांसोबतचे फोटो एवढेच काय, ते त्यांच्या कार्यक्षेत्राची कल्पना देणाऱ्या चिजा त्या घरात होत्या. त्याच भेटीत योगेश यांनी ‘आनंद’ चित्रपटातले ‘कही दूर जब दिन ढल जाए’ हे गीत कसे जन्माला आले, संगीतकार सलील चौधरींशी त्यांचा कसा सामना-संवाद झाला, याचे काही किस्सेही  रंगवून-रंगवून सांगितले.

किस्से सांगताना त्यांचे डोळे लकाकले होते, त्यांचा चेहरा उजळून निघाला होता, हे आता लख्खपणे आठवते. हृषिकेश मुखर्जींच्या आग्रहाखातर रेकॉर्ड कंपन्या आणि निर्मात्याचा विरोध डावलून नव्या दमाचा म्हणून सलीलदांनी योगेश यांच्यावर ‘आनंद’मधल्या एका गाण्याची जबाबदारी सोपवली होती. पण गाणे लिहून सलील चौधरींकडे सोपवण्याची वेळ आली, तरीही सांगितलेल्या सिच्युएशनवर त्यांच्याकडून गाणे लिहून होत नव्हते. डोक्यात असंख्य कल्पना, प्रतिमांचा गोंधळ माजलेला होता, पण सलीलदांच्या ट्यूनला साजेसे शब्द कागदावर उतरत नव्हते. मनावर उदासी होती, निराशा होती… योगेश सांगत होते, ती अशीच एक उदास संध्याकाळ होती. ते अस्वस्थपणे घराच्या खिडकीपाशी येऊन उभे होते, दूरवर सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. मनात उदासी, अधीरपणा दाटलेला आणि समोर दिवस मावळून संध्याकाळ हलकेच डोकावत होती. आणि याच क्षणात डोक्यात प्रतिमा-प्रतिमांचा योग्य मेळ जुळला आणि त्यातून ‘कही दूर जब दिन ढल जाए, सांज की दुल्हन बदन चुराए, छुपके से आए’ हे शब्द झरझर कागदावर उतरले आणि पुढच्या काही क्षणात रसिकांच्या हृदयाला भिडणारे गीत जन्माला आले…

‘‘मै यही, इसी जगह खडा था, इसी तरह शाम का वक्त था.. इसी तरह सूरज डूब रहा था और मन में गीत जनम ले रहा था..’’

हे त्यावेळचे त्यांचे शब्द. आजही योगेश यांचा तो चेहरा असाच डोळ्यांपुढे आहे.

अर्थात, गाणे तर लिहून झाले. पण ते सलीलदांना ऐकण्यासाठीसुद्धा त्यांना प्रचंड हिंमत गोळा करावी लागली. ही सुद्धा आठवण त्यांनी या भेटीत सांगितली. सलील चौधरी राहायचे दक्षिण मुंबईत. बहुधा नेपियन सी रोडवर त्यांचे घर होते. योगेश लिहिलेले गाणे ऐकवण्यासाठी म्हणून बसने त्यांच्या घराजवळ पोहोचले. बसमधून उतरून सलीलदांच्या घराच्या दिशेने जाऊ लागले, तसे त्यांना दरदरून घाम फुटला. आपण लिहिलेय ते त्यांना पसंत पडेल का, गीत ऐकून सलीलदा आपल्याला घरातून हाकलून तर देणार नाही ना, या भीतीने ते गारठले, आणि आलो तसे परत जावे म्हणून माघारीही वळले. म्हणजे, जे गाणे पुढे जाऊन अजरामर झाले, ते संगीतकाराला ऐकवायचीदेखील या गीतकाराची हिंमत त्या वेळी होत नव्हती. पण तोही क्षण मागे पडला. योगेश यांनी लिहिलेल्या गाण्याला सलीलदासारख्या प्रतिभावंताने अमरत्व दिले.

हे खरेच, ‘आनंद’ हा गीतकार योगेश यांच्या प्रतिभेचा सर्वोच्च आविष्कार होता, त्यानंतरही त्यांची अनेक गाणी गाजली, पण ‘आनंद’ची सर त्यांना आली नाही. योगेश यांची ओळख, लोकप्रियता ‘आनंद’च्याही पुढे फारशी गेली नाही. गंमत म्हणजे, रुढार्थाने ते साहित्य विश्व गाजवणारे कवी नव्हते. पण ‘आनंद’ आणि इतर गीतांच्या दर्जाने त्यांना कवी ही ओळखही मोठ्या सन्मानाने लाभली. एवढे घडूनही, त्यांची गुणवत्ता समजून घेण्यात चित्रपटसृष्टी कमी पडली की खुद्द योगेश बदलत्या दुनियेशी जुळवून घेण्यात कमी पडले, पण काही तरी बिनसले खरे. त्यात गीतकार योगेश आणि कवी योगेश या दोन ओळखी एका विशिष्ट टप्प्यानंतर उजळून आल्या नाहीत. कदाचित, व्यावसायिक ओळख मनातल्या इच्छा- आकांक्षा पूर्ण करत नाही, म्हटल्यावर ‘कवी योगेश’या ओळखीमधून बहुधा ते आपले अस्तित्व ठसवू पाहात होते. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा वेगळ्या मार्गाने आपला मुलगा पूर्ण करेल, असे म्हणत होते.

त्यांच्या घरी झालेल्या भेटीत त्यांनी मोठ्या उत्साहाने मुलाचा ‘पोर्टफोलिओ’ दाखवला होता. आपला मुलगा हिरो व्हावा, ही बहुदा त्यांची त्यावेळची इच्छा होती. एकीकडे बडेबडे निर्माता-दिग्दर्शक त्यांची दखल न घेता इतर गीतकारांना अधिक पसंत करू लागले होते. योगेश यांच्या वाट्याला त्या काळात फुटकळ कामे येत होती. उदरनिर्वाहासाठी ते शेवटी शेवटी भजने, अल्बममधली प्रेक्षकानुनयी गाणी असे कायकाय लिहू लागले होते. असेच एकदा त्यांनी लिहिलेल्या एका भजनाचे खार स्टेशनजवळच्या स्टुडिओत रेकॉर्डिंग होते.  संगीतकार आठवत नाही. पण, माइकवर सुरेश वाडकर त्यांचे भजन गात होते. ‘योगुदा सही गा रहा हूँ ना मैं..’, ‘योगुदा क्या लिखा है वाह’.. असा त्यावेळचा वाडकरांचा प्रतिसाद त्यांना सुखावून टाकत असल्याचे नजरेतून सुटले नव्हते.

भेटी जशा वाढत गेल्या, योगेश अधिक मोकळेपणाने बोलू लागले होते, अनेकदा मनातली निराशा त्यांच्या ओठावर येत असल्याचे मला जाणवत होते. चित्रपटसृष्टीने आपली कदर केली नाही, हा सूर त्यांच्या बोलण्यातून डोकावू लागला होता. गुलजार, जावेद अख्तर यांच्याबद्दलचा सौम्य पातळीवरचा कडवटपणा त्यांच्यात दिसू लागला होता. ‘यह महेश भट को हिंदी की समझ तक नही थी, मैंने उसको समझाया, गीत क्या होता हैं’, असे काहीसे अहंकाराला स्पर्श करणारे बोल, ते ऐकवू लागले होते.

योगेश आणि माझ्यातल्या संवाद जेमतेम तीन-चार वर्षांचाच राहिला. अखेरचे आम्ही भेटलो, ते दादरला. दादर पश्चिमेला काही वर्षांपूर्वी ‘बॉम्बे फिल्म लॅब’ होती, तिथे काही कामानिमित्त योगेश येणार होते, मोकळा वेळ असेल तर भेटूया असे ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांचा मान राखत ठरल्या वेळेत दादरला त्यांना भेटलो. जवळच्याच एका हॉटेलात आम्ही काही खाल्ले. चहा घेतला. रस्त्यावर आलो. समोरून गोरेगावकडे जाणारी बस आली, तसे झटापटीत योगेश म्हणाले, ‘’चलो फिर मिलते हैं..’’

मुंबईत, अनेकदा बसगाडीमध्ये प्रवाशांची खूप गर्दी असेल तर ती, ठरलेल्या स्टॉपवर थांबल्यासारखी करते आणि वेगातच पुढे निघून जाते. तसेच त्यावेळी घडले. समोरून आलेली बस वेग कमी करत थोडी आत वळली, पण न थांबताच पुढे जाऊ लागली, तसे खांद्याला पोतडीसारखी बॅग लटकावलेले सडपातळ बांध्याचे, भूरभरत्या काळ्या-पांढऱ्या केसांचे, हसऱ्या चेहऱ्याचे गीतकार योगेश बस पकडण्यासाठी धावले. धावताधावताच त्यांनी ती बस पकडली आणि गर्दीत जणू ते क्षणार्धात हरवून गेले…

‘आनंद’मधले अजरामर गीत लिहिणारा एक गीतकार पाठमोरा मुंबईच्या गर्दीत विरून गेला. त्याप्रसंगी मुंबईने, मुंबईतल्या गर्दीने त्यांची साधी दखलही घेतली नाही.पण तो प्रसंग माझ्या मनावर कायमस्वरुपी कोरला गेला. आज गीतकार योगेश शरीराने या जगातून निघून गेले आहेत, पण माझ्या नजरेसमोरून ते नव्वदच्या दशकातच अदृश्य झाले होते…

शेखर देशमुख, हे पत्रकार, लेखक आणि ग्रंथ-संपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0