वुहानमध्ये मृतांच्या संख्येत दुरुस्ती, ५० टक्क्याने आकडा वाढला

वुहानमध्ये मृतांच्या संख्येत दुरुस्ती, ५० टक्क्याने आकडा वाढला

कोरोना विषाणूने एकट्या वुहानमध्ये मरण पावलेल्या संख्येत चीनने शुक्रवारी दुरुस्ती केली. चीन सरकारने हा आकडा १,२९०ने वाढवला असून सद्य परिस्थितीत वुहानमध्ये ३२५ कोरोना बाधित रुग्ण असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. या अगोदर मृतांचा आकडा २,५७९ होता, आता या नव्या आकडेवारीने मृतांच्या संख्येत ५० टक्क्याने वाढ झाली आहे.

आता वुहानमध्ये कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या ५०,३३३ झाली असून मृतांचा एकूण आकडा ३,८६९ इतका झाला आहे. तर चीनच्या अन्य भागात मृतांचा आकडा ३,३४२ इतका झाला.

वुहानमध्ये जेव्हा कोरोना विषाणूची साथ सुरू झाली तेव्हा जे मृत्यू झाले त्यातील बहुसंख्य रुग्ण घरात असल्याने त्यांची मोजदाद झाली नव्हती असे चीनच्या आरोग्य खात्याने म्हटले आहे. कोरोना साथीच्या पहिल्या टप्प्यात मृतांच्या आकडेवारीकडे दुर्लक्ष होऊन ही साथ रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले होते, असा खुलासाही आरोग्य खात्याने केला आहे. आज मृतांच्या आकड्यात जी दुरुस्ती करण्यात आली आहे ती या महासाथीच्या संदर्भात पारदर्शकता राहावी व माहितीमध्ये अचूकता राहावी म्हणून बदल करण्यात आल्याचे चीनचे म्हणणे आहे.

मृतांच्या संख्येत बदल करण्याचा चीनचा हा पहिलाच प्रयत्न नाही तर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तीनवेळा अशा दुरुस्त्या चीनने केल्या आहेत.

४४ टक्के संक्रमित रुग्णांमध्ये लक्षणांचा अभाव

दरम्यान, ‘नेचर मेडिसीन’ या जर्नलने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये कोरोना विषाणू संक्रमित झालेल्या ४४ टक्के रुग्णांमध्ये या आजाराची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत, असे म्हटले आहे.

‘नेचर मेडिसीन’च्या १५ एप्रिलच्या अंकात गुवांग्झूमधील इस्पितळात कोरोनामुळे भरती झालेल्या ९४ रुग्णांमुळे ही माहिती मिळाली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये आजाराची लक्षणे दिसल्यानंतरच या साथीवर नियंत्रण आणता येते पण ४४ टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणेही दिसून आली नाहीत. कोरोनाच्या लक्षणात गळ्यात विषाणूचे संक्रमण झाल्याचे दिसून येते, असे या जर्नलमध्ये म्हटले आहे.

अशीच टक्केवारी सिंगापूरमध्ये (४८ टक्के) व तियानजीन (६२ टक्के) दिसून आली आहे. येथेही लक्षण दिसण्याअगोदर विषाणूचे संक्रमण सुरू झाले होते. लक्षणे दिसल्यानंतर विलगीकरणात रुग्णांना ठेवण्यात आल्यानंतर मग संक्रमणाचा धोका कमी होत गेला, असे या जर्नलचे म्हणणे आहे.

भारतामध्ये लक्षणे दिसल्यानंतर चाचण्या घेतल्या जात आहे. ज्या व्यक्ती परदेशातून भारतात आल्या आहेत त्यांच्याच चाचण्या घेतल्या जाऊन त्यांचे विलगीकरण केले गेले होते. नंतर संशयितांच्या चाचण्या घेतल्या जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल अखेर एमएआरआयने ५,९११ रुग्णांच्या चाचण्या घेतल्या, ज्यामध्ये २० राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ५२ जिल्ह्यांमध्ये १०४ जणांना कोरोनाची बाधा झाली होती.

आरोग्य खात्याच्या मते लक्षण नसलेल्यांकडून कोरोनाचे संक्रमण होण्याची टक्केवारी अत्यंत कमी असल्याने चाचण्यांबाबत सध्या जी रणनीती सरकारची आहे, त्यात बदल करण्याची गरज नाही.

‘नेचर मेडिसीन’नुसार कोरोनाला रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची अत्यंत गरज आहे. कारण जेव्हा एखाद्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतात तेव्हाच त्या विषाणूचे संक्रमण ३० टक्क्याहून अधिक झालेले असते. अशावेळी कोरोना रुग्णाची ९० टक्के कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. चीन व हाँगकाँगने गेल्या फेब्रुवारीत संक्रमणाची लक्षणे दिसण्याअगोदर दोन तीन दिवस आधीच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले होते, त्यामुळे तेथे साथीवर नियंत्रण आणता आले.

मूळ बातमी

COMMENTS