युवकांना स्थित्यंतरात समजून घेण्याचा ‘प्रयास’

युवकांना स्थित्यंतरात समजून घेण्याचा ‘प्रयास’

नातेसंबंध आणि लैंगिकता - ‘प्रयास’ आरोग्य गटातर्फे ‘युथ इन ट्रांझिशन’ (Youth in transition) हा नातेसंबंध आणि लैंगिकता यांविषयी १२४० तरुण मुलामुलींशी बोलून त्यावर नुकताच एक अभ्यास करण्यात आला. शहरी भागात रहाणार्‍या तरूण वर्गाच्या आयुष्यात, निर्णयात, नात्यांत आणि पर्यायाने लैंगिकतेमध्ये होणारे बदल समजून घेणे हा यामागील उद्देश होता. यामध्ये जाणवलेल्या मुद्यांवर आधारीत ही लेखमाला.

“या नात्याला नाव काय द्यावं, हे मला कळत नाही, मैत्रीच्या थोडं पलीकडे, पण प्रेमाच्या अलीकडे… असं काहीतरी.”

“माझ्या आईने मला एकटीने आणि इतक्या ताकदीने वाढवलं आहे की मला आयुष्यामध्ये पुरुषाची गरज आहे असंच वाटत नाही. आई-वडील वेगळे होण्यापूर्वी, वडिलांना आईला मारताना मात्र पाहिलं आहे. त्यानंतर जे जे पुरुष माझ्या आयुष्यात आले, ते सर्व अॅब्यूझिव्ह होते त्यामुळे कॅज्युअल नाती ठीक आहेत पण लग्नबिग्न करण्याची मला अजिबात इच्छा नाही.”

“कधीकधी लक्षात येतं, की गोष्टी इतक्या चिघळल्यात की मऊ झालेल्या टोमॅटोच्या ज्याप्रमाणे फोडी पडणार नाहीत त्याप्रमाणे आता या नात्याचंही पुढे काही होणार नाही. तिथे ते सोडून देणंच योग्य.”

“मला एकावेळी अनेकजण आवडतात. मी पॉलिअमरस आहे…  आणि काही डेटिंग ऍप्सवरून मला निव्वळ चांगले पार्टनर्सच नाहीत तर इतकी चांगली माणसं मित्र म्हणून भेटली आहेत  की सेक्स वगैरे गोष्टी अगदी दुय्यम ठरतात. मानसिक आणि शारीरिक आजारपणांतूनसुद्धा त्यांनी मला बाहेर काढलं आहे.”

हे आणि असे कितीतरी उदगार. त्यांच्याशी जोडलेल्या कितीतरी कहाण्या आणि त्यातून दिसणारं विविधरंगी जग. प्रयास आरोग्य गटातर्फे १२४० तरुण मुलामुलींशी बोलून युथ इन ट्रांझिशन (Youth in transition) हे संशोधन करताना समोर आलेल्या असंख्य गोष्टींची ही गोष्ट.

योग्य जागा आणि संधी मिळाल्यास नात्यांबद्दल तरुण मंडळी भरभरून बोलतात आणि त्यांत नव्यानं समोर येणाऱ्या, परत विचार करायला लावणाऱ्या, आणि मतं आणि पूर्वग्रह असतीलच तर तपासून पाहायला लावणाऱ्या असंख्य गोष्टी समोर येतात.

युथ इन ट्रान्झिशन या नावातलं हे स्थित्यंतर त्यांच्या मना-शरीरातल्या घडामोडींचं जसं होतं तसंच सामाजिक संदर्भांचं, आजूबाजूच्या जगामधील, विचार, जाणिवा, आयुष्याकडून असणाऱ्या अपेक्षा, आयुष्याकडे आणि अवतीभोवतीच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन याचंही होतं.

वयाच्या या स्थित्यंतरातली उठून दिसणारी बाब म्हणजे नातेसंबंध. जवळचे, नवनवे नातेसंबंध जुळणं, जपणं, जोपासणं, तुटणं, वेगवेगळ्या अंगांनी ते समजावून घेणं, स्वतःच्या आयुष्याच्या संदर्भांमध्ये ते पारखणं, त्यांचं विश्लेषण करणं, आजूबाजूचा समाज यासंदर्भात तोलणं आणि समाजाच्या निकषांवरती स्वतःला जोखणं हे सर्व करत असलेली ही आजची तरुण मंडळी आमच्याशी मोकळेपणाने बोलली. नातेसंबंध आणि लैंगिकतेसारख्या नेहमीच गुलदस्त्यात ठेवण्याच्या विषयावर बोलायचे असूनही बोलली.

या विषयाबाबत समाजामध्ये एकीकडे आश्चर्यजनक कुतूहल असते  मात्र आपली मते आपापल्या परिघातच उभारलेली असल्यानं  मर्यादितही असतात. आपला माहिती ऐकीव कुजबुजीतून निर्माण झालेला असू शकते आणि माहितीचे स्रोतही कधी पक्के कधी कच्चे. त्यामुळे ह्या विषयाचा  आवाका घेऊन आपलं सर्वांच्या आयुष्य  त्या  संदर्भात पडताळण्याची वेळ आल्यावर थबकायला होतं.

संशोधनाची पार्श्वभूमी:

‘प्रयास’ संस्थेचा आरोग्य गट  गेली पंचवीस वर्षे पुण्यामध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. संस्था सुरू झाली त्याकाळात  एचआयव्ही आणि लैंगिक संबंधातून पसरणार्‍या इतर आजारांसंबंधी औषधोपचाराचे काम करू लागल्यावर , त्याबद्दलची जाणीव जागृती व संशोधनाची निकड किती आहे हे जाणवू लागले होते त्यामुळे या विषयांवर अधिकाधिक समजून घेण्याची, नवे दृष्टिकोन निर्माण करण्याची आणि आपल्या कामाला  पूरक असा अभ्यासपूर्ण वैचारिक पाया हवासा वाटू लागला.  तेव्हापासून तसं काम सुरूही झालं.

युथ इन ट्रान्झिशन हे प्रयासआरोग्य गटाचं सर्वात अलीकडील संशोधन.

शहरी भागात रहाणार्‍या तरूण वर्गाच्या आयुष्यात, निर्णयात, नात्यांत आणि पर्यायाने लैंगिकतेमध्ये होणारे बदल समजून घेणे हा यामागील उद्देश होता.

खरे तर हा अभ्यास करावेसे वाटण्याचे कारण अगदी थेटपणे वैद्यकीय होते. प्रयास आरोग्य गटाच्या क्लीनिकमध्ये एचआयव्ही आणि संबंधांतून पसरणाऱ्या इतर आजारांवरचे उपचार दिले जातात. एचआयव्हीला आटोक्यात आणताना खरं म्हणजे इतर लिंगसांसर्गिक आजारही आटोक्यात आले होते. आता एचआयव्ही आटोक्यात येत असताना, हे इतर आजार पुन्हा उचल खाताना दिसू लागले आहेत असं लक्षात येऊ लागलं. त्यातून प्रश्न निर्माण झाला की आत्ता असे होण्यामागचे कारण काय असावे?

लैंगिक आजारांसंदर्भातली पुरेशी आणि योग्य माहिती उपलब्ध नाही की असलेली माहिती स्वतःच्या आयुष्याशी जोडली जात नाही की आणखी काही?

ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आत्ताच्या संदर्भाला- भोवतालाला आणि  झालेल्या फरकाला समजून घेणं आवश्यक वाटलं आणि त्यासाठी प्रयास आरोग्य गटाने विविध भागधारकांबरोबर (स्टेकहोल्डर्स) एक लहान गुणात्मक अभ्यासही केला. त्यातून पुन्हा हेच उमगले की आजमितीला तरुण, अविवाहित लोकांचे लैंगिक आयुष्याविषयीचे अनुभव समजून घेण्याच्या दृष्टीने व्यापक अभ्यासच झालेला नाही. इतकेच नव्हे तर ह्या ‘अविवाहित’ लोकसंख्येस लैगिक आरोग्यासंबंधी जवळपास गरजा नाहीतच किंबहुना त्यांचे लैंगिक आयुष्य अदृश्यच आहे असेच मानले जात आहे.

आरोग्याविषयी दिसणाऱ्या ह्या उदासीन परिस्थितीमध्ये जर काही बदल करायचा, तर माहितीची उपलब्धता, तरुणांचा आरोग्यसेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांची निर्णयक्षमता याविषयी अधिक खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल असे वाटले. आणि त्यातून अभ्यासाला सुरुवात झाली.

हा अभ्यास करावासा वाटण्यामागचे कारण जरी असे वैद्यकीय असले तरीदेखील लैंगिकतेचा विषय हा लैंगिक आजारांपुरता मर्यादित नाही. लैंगिकता हा सर्वच आयुष्याला व्यापणारा पैलू आहे. लिंग, लिंगभाव, लैंगिक कल, लैंगिक ओळख, लिंगभावाधारित भूमिका, कामभावना, आनंद, जवळीक, प्रजनन, विचार, स्वप्नरंजन, इच्छा, धारणा, दृष्टिकोन, मूल्ये, वर्तन, पद्धती, नातेसंबध, चांगले आणि वाईट अनुभव, तसेच अननुभूत आणि अव्यक्तदेखील अनेक परिमाणे लैंगिकतेच्या परिघात येतात.

अर्थातच बदलत्या जगाच्या बदलत्या संदर्भांनुसार ही परिमाणेदेखील बदलत आहेत.

ज्या शहरी भागातील तरुणांच्या आयुष्याचा अभ्यास आम्ही करू पहाणार होतो, तेथे तंत्रज्ञान, संपर्कांची साधनं, माध्यमं, सोशल मीडिया यामुळे आपल्याला हवी असलेली माहिती आपल्या हाताशी आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावणं आणि स्वतःचं आयुष्य हवं तसं सादर करणं अवघड राहिलेलं नाही, त्यामुळे मैत्री आणि नात्यांची स्वरूपंही बदललेली आहेत. एकमेकांच्या संपर्कात येण्याचे पूर्वीपेक्षा अधिक मार्ग उपलब्ध आहेत, नवनव्या पद्धतीची नाती तयार करणं, त्यांना नवी नावं देणं, पारंपरिक, साचेबद्ध प्रकारे त्यांकडे न पाहणं, ह्या गोष्टींना अधिक अवकाश निर्माण झाला आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे लग्नाचं वयही वाढलेलं आहे. लग्न न करता राहण्याचे इतर काही पर्याय निवडण्याचं प्रमाण आणि शक्यताही वाढत आहेत. लिंगभाव, स्वतःची लैंगिक ओळख आणि लैंगिक कल यांच्या अनेक श्रेण्यांविषयीचे अज्ञान पुसले जात आहे.

प्रत्येक वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले लैंगिकतेचे अनेक कंगोरे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा होती आणि त्याची जोडणी फक्त आरोग्यसेवा देण्यापुरती मर्यादित नसून, लैंगिकतेविषयीची निकोप भाषा, संवाद आणि अवकाश निर्माण करण्याशी, मानसिक उलाढालींशी, त्यांच्याशी भिडणाऱ्या यंत्रणा निर्माण करण्याशी,  शिक्षणाशी, धोरणवकिलीशी, परिपूर्ण दृष्टिकोनाकडे जाणारा रस्ता घडवण्याशीही आहे, हे आम्हाला जाणवले होते.

संशोधनाची रूपरेषा:

शिक्षण, करियर, राहण्याची जागा, नातेसंबंध, नात्यामध्ये येणारे विविध अनुभव, लैंगिक वर्तन, मानसिक स्वास्थ्य, व्यसने – सवयी, लैंगिक छळाचे अनुभव, घरातील वातावरण आणि आपल्याला असलेली माहिती, दृष्टीकोन आणि प्रश्न  ही सर्वच माहिती परस्परांशी निगडित असू शकते. परस्परांवर परिणाम करणारी असू शकते. आधी घडलेली घटना, त्यापुढील निर्णयांना कारणीभूत ठरू शकते, अशा अर्थी आयुष्यातील विविध घटनांची वीण एकमेकांशी असलेली दिसून यावी, त्यातील दुवे, त्यातील सूत्रे कळावीत यासाठी वयाच्या दहाव्या वर्षांपासून ते आजच्या घडीपर्यंतच्या आयुष्यात घडलेल्या वरील सर्व घटनांची कालरेषा  एका आख्ख्या कॅलेंडरवर मुलाखतकर्ता/कर्ती सहभागी व्यक्तीच्या मदतीने मांडत असे

आयुष्यामध्ये विविध पातळ्यांवर काय-काय घडले ह्याचे संपूर्ण चित्र एकत्रच पहाता येई. नातेसंबंधांमध्ये, प्रेमामध्ये तर आपले आधीचे अनुभव आपल्या पुढच्या अनुभवांची रूपरेषा ठरवत असतात.

बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितले की त्यांना या मुलाखतीच्या प्रक्रियेदरम्यान अनेक गोष्टी नव्याने लक्षात आल्या. कुठल्या क्षणी, कुठल्या वेळी आपल्याला काय वाटलं, आपण काय ठरवलं, याचं मूळ गुंतागुंतीच्या घटनाक्रमामध्ये सापडलं. कुणाशी कधीच बोलल्या न गेलेल्या गोष्टी पहिल्यांदाच बोलता आल्या, मोकळेपणाने मनातील प्रश्न विचारता आले,  इतकेच नाही तर बहुतेक सर्वाना आपल्या आयुष्याचा आढावा घेताना मजा आली. मुलाखतकर्ते संवेदनशील आणि कोणतेही मत न ठरवणारे होते

आपण बहुतेक सर्वचजण आपले आयुष्य मनापासून कुठल्याही मत-सल्ला-शेरा प्रदर्शनाविना मांडू शकू अश्या जागेच्या शोधात असतोच. अनेक जणांनी ती इथे मिळाल्याचं सांगितलं. बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर आणि प्रत्यक्षामध्ये आपल्या मित्रांना ह्या रिसर्चमध्ये भाग घेण्याची विनंती केली आणि आम्हाला संशोधनाच्या विश्लेषणासाठी आवश्यक आकड्यापर्यंत जाऊन पोचता आले. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कॉलेजेसमध्ये जाऊन ग्रुप सेशन्स घेतली, सोशल मीडियाचा वापर केला, आमच्या ओळखीच्या प्रसिध्द मित्रमैत्रिणींना याविषयी त्यांच्या फेसबुक व इन्स्टाग्राम अकाउंट्सवर प्रसिद्धी करण्याची विनंती केली, आमच्या ओळखीच्या, पात्रतेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या मित्रमैत्रिणींना आम्हीदेखील या अभ्यासामध्ये भाग घेण्याची विनंती केली.

अनेकजणांनी आम्हाला तोंडी आणि लेखी फिडबॅकसुद्धा दिला. मुलाखतीच्या प्रक्रियेतून निर्माण झालेला विश्वास, सुरक्षिततेची आणि गोपनीयतेची हमी, मुलाखतीचा झालेला वैयक्तिक फायदा, सहभागींच्या विचारप्रक्रियेत झालेली मदत यामुळे जवळपास दोन वर्षांमध्ये हे शक्य झाले.

आम्हाला प्रश्न होता की लोक लैंगिकतेच्या विषयावर बोलण्यास तयार होतील का? पण नातेसंबंधांचा अनुभव आहे अथवा नाही याच्याही पलीकडे जाऊन हा विषय प्रत्येक आयुष्याशी जोडलेला होता आणि त्यांना त्याविषयी बोलण्याची इच्छाही होती.

लैंगिक आरोग्याचा मानसिक आरोग्याशीही असलेला जवळून संबंध अनेकांनी मांडला. पण मानसिक आरोग्य तर दूरच, आपल्याकडे अनेकदा लैंगिक आरोग्य आणि प्रजनन आरोग्य याकडेही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्याद्वारे आज बघितलं जातं. प्रजनन आरोग्यविषयीचे कार्यक्रम हे माता व बालके यांच्या आरोग्यापुरते मर्यादित राहातात.

पण अविवाहित तरुण तरुणींना असलेल्या लैंगिक व प्रजनन आरोग्याविषयी असलेल्या प्रश्नांविषयी बोलण्यासाठी जागा जवळपास नाहीतच.

आपल्या प्रश्नांसकट सरकारी रुग्णालयांमध्ये जाणं त्यांना अवघड जात आहे आणि तटस्थ समुपदेशक, स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सेवा परवडतीलच असे नाही.

या संशोधनातून पुढे आलेल्या प्रश्नांमधून स्वतःमधील कौशल्ये आणि क्षमतांची वाढ करण्याच्या दिशेने ‘सेफ़ जर्नीज’ ह्या वेब सीरिजच्या निर्मितीस सुरवात झाली. त्यामध्ये तयार झालेल्या आठ शॉर्टफिल्म्स युट्युबवर उपलब्ध आहेत, अनेक लोकांपर्यंत त्या पोचल्या आहेत आणि विविध स्तरांमधून त्यांचे स्वागत आणि वापरही होते आहे.

ह्या रुंद चौकटीमध्ये काय काय दिसले, ठळकपणे समोर आले ते मुद्दे व अनुभव हे पुढील लेखमालेतून सविस्तरपणे आपल्यासमोर मांडले जातील.

मैत्रेयी, तरुण मुलामुलींसमवेत त्यांच्या लैंगिक व मानसिक स्वास्थ्यासाठीचे काम करतात.

COMMENTS