नॉटिंगहॅम कसोटी: भारताच्या पदरी निराशाच ….

नॉटिंगहॅम कसोटी: भारताच्या पदरी निराशाच ….

इंग्लंडमधे कसोटी मालिका खेळायची म्हणजे अकरा खेळाडू शिवाय वातावरण आणि पावसाचा वारंवार येणारा व्यत्यय या अतिरिक्त खेळाडूंशी सुद्धा तितक्याच तयारीने खेळा

आमच्याकडे अजूनही सरकारसाठी संख्याबळ – पवार
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचे विद्रोही संचलन?
सोमवारी (कथित) ‘विक्रम’, मंगळवारी लसीकरणात घसरण

इंग्लंडमधे कसोटी मालिका खेळायची म्हणजे अकरा खेळाडू शिवाय वातावरण आणि पावसाचा वारंवार येणारा व्यत्यय या अतिरिक्त खेळाडूंशी सुद्धा तितक्याच तयारीने खेळावं लागतं. ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम त्याला कसा अपवाद असणार. इंग्लंड आणि भारतातील पांच कसोटी सामन्यांची मालिका ट्रेंट ब्रीज मैदानावर चार ऑगस्ट पासून सुरू झाली. जो रुटने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी निवडली. भारताने विश्व कसोटी सामन्यात केलेली महत्त्वाची चूक सुधारली. एक फिरकी आणि चार द्रुतगती गोलंदाज घेऊन विराट मैदानात उतरला. भारताच्या चमूत सहा फलंदाज असून सुद्धा तळाचे खेळाडू निवडतांना त्यांच्याकडून फलंदाजीची अपेक्षा करत निवडावे लागणे ही फारशी चांगली बाब नाही. अलीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून अनेक कसोटी सामन्यात भारतीय चमुची शेपटी वळवळली आहे. ही जरी आनंदाची बाब असली तरी त्यामुळे फलंदाजीतील अपयश लपले आहे ह्याचा विचार नक्कीच व्हायला हवा. के. एल. राहुलला बऱ्याच दिवसांनी संधी मिळाली. इंग्लंडचा पहिला डाव चाचपडत सुरू झाला. बर्नला शून्यावर बाद करून बुमराहने इंग्लडच्या डावाची पडझड सुरू केली. भारताच्या द्रुतगती चौकडीने इंग्लंडचा पहिला डाव केवळ 183 धावात गुंडाळला. क्राॅली, बेस्ट्रो आणि करन तिशीच्या घरात पोहचले पण मोठा डाव खेळू शकले नाही. कर्णधार रूटने 64 धावांची संयमी खेळी केली. अन्यथा इंग्लंड 150 धावात बाद होऊ शकला असता. शमी, बुमराह, सिराज आणि शार्दुलच्या द्रुतगती गोलंदाजीला क्षेत्ररक्षकांनी उत्तम साथ दिली. बऱ्याच दिवसांनी भारताच्या द्रुतगती गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघ पूर्णपणे गारद केला. इंग्लंडच्या पहिल्या डावात रूट आणि बेस्ट्रो यांनी केलेली 72 धावांची भागीदारी सर्वश्रेष्ठ राहिली. इंग्लंडचा पहिला डाव केवळ 183 धावात पहिल्याच दिवशी आटोपून शेवटच्या तासात राहुल आणि रोहितने 21 धावा गोळा केल्या.

दुसऱ्या दिवशी भारताने सावध सुरुवात केली. रोहित आणि राहुलने 97 धावा जोडल्या. रोहितने 36 धावा काढून एक अवसानघातकी फटका मारला आणि बाद झाला. भारताची स्थिती बिनबाद 97 ते चार गडी बाद 112 करण्याचे सर्व श्रेय अँडरसनला द्यावे लागेल. पुजारा आणि कोहलीला लागोपाठ बाद करून अँडरसनने बाजी जिंकली. विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अँडरसनच्या मॅचमधील सर्वश्रेष्ठ चेंडूला विराटपाशी उत्तर नव्हते. विराटकडून भारताला मोठ्या डावांची अपेक्षा आहे. रहाणे धावबाद होणे फार दुर्दैवी होते. एका बाजूने राहुल खिंड लढवत होता. संकटमोचक जडेजाने अर्धशतक झळकावून भारताच्या बढतीला आकार दिला. पंत, बुमराहच्या फलंदाजीतील योगदानामुळे भारत 278 धावा फळ्यावर लावू शकला. राहुलने 84 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. 39 वर्षीय अँडरसन आणि नवीन जोमाचा रॉबिनसन या दोघांनीच भारताचा पहिला डाव संपविला. रॉबिनसनने पहिल्यांदाच एका डावात पांच गडी बाद केले. भारताला पहिल्या डावात 95 धावांची मौल्यवान बढत मिळाली. इंग्लंडचे क्षेत्र रक्षण फारच सुमार झाले.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात बर्न्स आणि सिब्लीने सावधगिरीने केली. आजचा दिवस बुमराहचा होता. सिब्ली, बेस्ट्रो, लाॅरेन्स आणि करन तिशीच्या आत बाद झाले. एका बाजूने कर्णधार रूट खंबीरपणे उभा राहिला. त्याने शतक झळकवले. रुटच्या 109 धावांमुळे इंग्लंड 208 धावांची बढत मिळवू शकला. भारतातर्फे बुमराहने पांच गडी बाद केले. उर्वरित गोलंदाजांनी त्याला योग्य साथ दिली.

भारताचा दुसरा डाव चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात सुरू झाला. भारताने खेळ संपला तेंव्हा एक गडी बाद 52 धावा फळ्यावर लावल्या. राहुल लवकर बाद झाला. पाचव्या दिवशी भारताला जिंकण्यासाठी 157 धावा काढणे जरुरी होते. इंग्लंडची द्रुतगती गोलंदाजी आणि लहरी हवामान लक्षात घेता लक्ष फारसे सोपे नव्हते. भारताच्या दृष्टीने सामन्याचा शेवट निराशाजनक झाला. पाचव्या दिवशी वरूणदेवतेने दोन्ही संघाचे मनसुबे धुळीस मिळवले. अर्थात भारताची सामन्यावरील पकड जास्त चांगली होती. पण अँडरसन, ब्रॉड, रॉबिनसन कंपनी कुणाचाही डाव गुंडाळू शकतात हे सुद्धा खरेच आहे. शेवटच्या दिवशीचा थरार पाहण्यास प्रेक्षक मात्र मुकलेत. दोन्ही डावातील खेळीमुळे कर्णधार रूट सामनावीर ठरला. खरंतर पूर्ण सामन्यात अँडरसन, रॉबिनसन आणि बुमराह यांनी डावात पांच गडी बाद करण्याची कामगिरी केली. तेही सामनावीर होण्याचे दावेदार नक्कीच होते. पहिला सामना अनिर्णीत राहिल्यामुळे मालिकेत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. पुढील सामन्यात पुजारा, कोहली आणि रहाणे यांना मोठे डाव खेळणे अनिवार्य राहील. भारतीय द्रुतगती गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. यष्टीमागे ऋषभ पंतची कामगिरी सुधारते आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0