पोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच

पोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच

संपूर्ण व्यवस्था विरोधात गेली, की सामान्य माणसाची ससेहोलपट कशी होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रियांका मोगरे!

इराणमधील २५५ भारतीयांना कोरोनाची लागण
उत्तराखंडमध्ये २०१ व्यक्ती संशयितः राज्याचा अहवाल
भाजपच्या टी. राजा सिंग यांना फेसबुकवर बंदी

ही कहाणी आहे, राग आणि अहंकाराची. पोलिसांच्या दमनव्यवस्थेची. सर्वसामान्यांचे हात किती ‘लांब’ असतात हे माहिती असणाऱ्या पोलिस दलाची व न्यायव्यवस्थेची.

वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्याने, एक वर्षापूर्वी अटक करण्यात आलेली सानपाडा येथील ‘झोमॅटो गर्ल’ प्रियांका मोगरे जामीन न मिळाल्याने एक वर्षापासून तुरुंगात आहे.

प्रियांकाने रागाच्या भरात पोलिसांना शिवीगाळ केली आणि पोलिसांचा ‘अहंकार’ दुखावल्याने, अतिशय किरकोळ, छोट्या गुन्ह्यासाठी तिला वर्षभर तुरुंगात राहावे लागले.

८ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता वाशी येथील सेक्टर १७ मध्ये नो पार्कींग झोनमध्ये दुचाकी लावल्यावरून २७ वर्षांच्या प्रियांका मोगरे हिचा वाहतूक पोलिसांशी वाद झाला होता. तिच्या विरोधात वाशी येथील वाहतूक पोलिस शिपाई मोहन सरगर यांनी वाशी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.

तिच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा आणि दरोड्याचा प्रयत्न, शांततेचा भंग, धमकी देणे, अशी ३५३, २९४, ३९३, ५०६, ५०४ या कलमान्वये गुन्हा दाखल करून केला आणि २० ऑगस्टला तिला अटक करण्यात आली होती.

प्रियांका ‘झोमॅटो’ कंपनीसाठी डिलिव्हरी देण्याचे काम करीत होती. तिचा पोलिसांशी वाद झाल्यानंतर पुढच्याच चौकामध्ये ४ पोलिसांनी तिला अडवून पोलिस ठाण्यात येण्याचे आदेश दिले. या सगळ्या प्रसंगाची व्हीडिओ क्लिप काढण्यात आली आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आली. या प्रकरणातील दोन व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते व्हीडिओ अजूनही इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

व्हीडिओमध्ये प्रियांका पोलिसांना शिव्या देताना दिसते. मात्र पोलिसांचे वर्तनही तिच्याशी सभ्यपणाचे दिसत नाही. वाहतूक पोलिसही तिला वाईट शब्द वापरताना दिसतात. तिने शिवीगाळ केल्याचा आणि वाहतूक पोलिसांशी उद्धटपणे वर्तन केल्याचा वाहतूक पोलिसांचा आरोप होता. तर आपण गाडीजवळ उभे असतानाही वाहतूक पोलिसांनी आपला आणि गाडीचा फोटो काढल्याचा प्रियांकाचा आरोप होता.

दुसऱ्या व्हीडिओमध्ये ४ वाहतूक पोलिस प्रियांकाला घेरून तिच्याशी हुज्जत घालताना आणि तिचा व्हीडिओ काढताना दिसतात. तीही त्यांना शिव्या देताना दिसते. पोलिस तिला पोलिस ठाण्यात येण्याचे सांगताना दिसतात. प्रियांकावर यांपूर्वी हेल्मेट न घातल्याचा आणि दारू पिऊन गाडी चालवल्याचा गुन्हा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या तरुणीला अगोदर पोलिस कस्टडी आणि नंतर न्यायालयीन कस्टडी मिळाली. तिला जामीन मिळण्यासाठीचा पहिला अर्ज फेटाळण्यात आला. नंतर तिला सप्टेंबर २०१९ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. मात्र तिच्या जामीनासाठी २ व्यक्तीही पुढे आल्या नाहीत. तेव्हापासून आजपर्यंत प्रियांका भायखळा येथील तुरुंगात आहे.

तीन वर्षांची लहान मुलगी असणाऱ्या, प्रियांकाची सोशल मीडियावर बदनामी झाली म्हणून तिच्या नजीकचे, जवळचे असे कोणीही तिच्या जामीनासाठी, अन्य मदतीसाठी पुढे आले नाहीत.

फेब्रुवारी महिन्यामध्ये ‘प्रयास’ ही संस्था प्रियांकाच्या मदतीसाठी पुढे आली. त्यांनी तिच्यावतीने न्यायालयात अर्ज करून तिला वैयक्तिक हमीवर सोडण्याची विनंती केली, पण तो अर्ज फेटाळण्यात आला.

अंडर ट्रायल कैद्यांसाठी ‘प्रयास’ ही संस्था मदत देण्याचे काम करते. ‘प्रयास’च्या कार्यकर्त्या रमा काळे यांनी प्रियांका बाहेर यावी यासाठी प्रयत्न सुरू केले. तिचे नातेवाईक शोधणे, त्यांना मदतीसाठी आवाहन करणे, असे काम त्यांनी सुरू केले. पण मध्येच कोरोनाची साथ आली आणि सगळ्याच गोष्टी बंद झाल्या.

दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांनी प्रियंका प्रकरणाची फाईलच न्यायालयात पाठवली नाही. वाशी येथील न्यायालय ते ठाण्याचे सत्र न्यायालय अशा अनेक चकरा रमा काळे यांना माराव्या लागल्या. आता पुन्हा रमा काळे यांनी प्रयत्न सुरू केले. ‘प्रयास’तर्फे अॅड. भुजंगराव मोरे यांनी जामिनाचे रूपांतर रोख रकमेच्या स्वरूपात करण्यासाठी ठाण्याच्या सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज केला आणि या सप्टेंबर महिन्यात २१ तारखेला न्यायालयाने अर्ज मंजूर केला. २५ हजार रु. रोख रक्कम न्यायालयात जमा करण्याच्या अटीवर प्रियांकाला जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र प्रियांकाला एक महिन्याच्या आत दोन जामीनदार मिळवावे लागणार आहेत.

अॅड. भुजंगराव मोरे यांनी सांगितले, की न्यायालयात लवकरच रोख रक्कम जमा करून प्रियांकाला जामीन मिळवून दिला जाईल.

आता प्रियांकासाठी रोख रक्कम मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

‘कायद्याने वागा लोकचळवळी’चे संस्थापक राज असरोंडकर रक्कम जमवण्यासाठी पुढे आले आहेत. ते त्यांच्या मित्र मंडळींकडून काही मदत जमवत आहेत.

राज असरोंडकर म्हणाले, की आपली संविधानिक व्यवस्था नामचीन गुन्हेगारांनाही सुधारण्याची संधी देते. पण इथे कायद्याचा वापर प्रियांकाला धडा शिकविण्यासाठी झाला. समुपदेशन करून तिला चूक सुधारण्याची संधी मिळायला हवी होती; ती मिळाली नाही. प्रियांका जामीनानंतरही वर्षभर तुरूंगात का राहिली, याची खरंतर शासनाने चौकशी करायला हवी. रागावर नियंत्रण नसल्याची आणि बोलताना तारतम्य न बाळगल्याची जरा जास्तच शिक्षा तिच्या वाट्याला आली.

राज असरोंडकर म्हणाले, ”खरं तर कायद्याच्या चौकटीत शक्य असेल, तर प्रियांकाविरोधातला गुन्हा शासनाने न्यायालयाला विनंती करून मागे घेतला पाहिजे. ‘कायद्याने वागा लोकचळवळी’ची तरी हीच भूमिका आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रियांकाला पुन्हा उभं करण्यात पालकत्वाची भूमिका निभावली पाहिजे. कधीतरी सरकारचा असाही पालकत्वाचा, मानवी चेहरा लोकांना दिसला पाहिजे, असे असरोंडकर म्हणतात.

खरे तर वाहतूक पोलिसांशी दररोज लोक हुज्जत घालतात. पोलिसांचा प्रयत्नही लोकांनी कायदे पाळावे, यासाठी असण्यापेक्षाही दंड वसूल करण्याकडे नेहमीच दिसतो. पण हुज्जत घातली म्हणून १ वर्ष तुरुंगात काढावी लागण्याचे हे उदाहरण सर्वसामान्यांमध्ये भय निर्माण करणारे आहेच पण व्यवस्था एखाद्या सर्वसामान्य माणसाचे दमन कोणत्या थराला जाऊन करू शकते हे सांगणारे आहे.

प्रियंकाच्या प्रकरणात दरोडा आणि सरकारी कामामध्ये अडथळा हे गुन्हे कसे लागू शकतात, हे न समजणारे कोडे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0