‘झुंडशाही थांबवा’-४९ मान्यवरांचे मोदींना पत्र

‘झुंडशाही थांबवा’-४९ मान्यवरांचे मोदींना पत्र

केवळ अल्पसंख्याक समुदायावर झुंडशाहीकडून जीवघेणे हल्ले होत असून सरकारने त्याची तत्परतेने दखल घ्यावी अशी विनंती देशातल्या ४९ विचारवंत, कलावंत, साहित्यिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. या पत्रात या मंडळींनी ‘जय श्रीराम’चा नारा एक प्रकारचा युद्धघोष वाटू लागला आहे याबाबतही चिंता व्यक्त केली आहे.

लोकशाहीत मतमतांतरे असतात व ती व्यक्त करणे अपरिहार्य व अपेक्षित आहेत पण या देशाचे नागरिक असून सुद्धा सरकारवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही, अर्बन नक्षल ठरवले जात आहे. प्रत्येक विरोध हा देशविरोधी भावनांशी जोडला जात असल्याच्या मुद्द्याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

या पत्रात प्रख्यात सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल, अपर्णा सेन, अनुराग कश्यप, मणिरत्नम, शास्त्रीय संगीत गायिका शुभा मुदगल, इतिहासकार रामचंद्र गुहा, बंगालमधील ज्येष्ठ सिनेकलाकार सौमित्र चटर्जी, दक्षिणेतल्या सिनेनिर्मात्या व अभिनेत्री रेवती, सामाजिक कार्यकर्ते विनायक सेन व विख्यात सामाजिक शास्त्रज्ञ आशिष नंदी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

भारतात दलित, मुस्लिम व अन्य अल्पसंख्याक समुदायावर सातत्याने हिंसक हल्ले होत आहेत. नॅशनल क्राइम रेकार्ड ब्युरोच्या अहवालानुसार एकट्या २०१६ या सालात झुंडशाहीकडून दलितांवर होणाऱ्या हिंसक हल्ल्याच्या ८४० घटनांची नोंद आहे. तर १ जानेवारी २००९पासून २९ ऑक्टोबर २०१९पर्यंत धर्माच्या आधारावर २५४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये ६२ टक्के मुस्लीम समाज, १४ टक्के ख्रिश्चन समाजाचे नागरिक बळी पडले आहेत. अशा परिस्थितीत असे हल्ले होणे ताबडतोब थांबले पाहिजे अशी मागणी या पत्रात केली गेली आहे. भारत हा शांतता प्रिय देश आहे आणि याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. तरीही अशा घटना घडत असल्याने सर्वांनी चिंता करण्याची बाब असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

झुंडशाहीकडून ‘जय श्री राम’ असे नारे लगावत हल्ले केले जात आहे. अशा प्रकारांनी बहुसंख्याकाचे श्रद्घास्थान असलेल्या रामाची प्रतिमा कलंकित केली जात आहे. ‘जय श्री राम’ ही घोषणा अगदी युद्धावर निघताना आरोळीसारखी वाटत आहे. पंतप्रधानांनी संसदेत झुंडशाहीच्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावर टीकाही केली होती. पण हा मार्ग पुरेसा नसून सरकारने अशा लोकांविरोधात काय कारवाई केली आहे, असा सवाल या पत्रात विचारण्यात आला आहे.

मंत्री म्हणतात, ‘अॅवॉर्ड वापसी-२’

दरम्यान, पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्राची केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी खिल्ली उडवली आहे. देशात दलित, मुस्लीम अल्पसंख्याक सुरक्षित असून ही पत्र पाठवणारी मंडळी नुकत्याच लोकसभा निवडणुकीतला पराभव पचवू शकलेली नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. २०१४मध्येच असाच प्रकार घडला. हे पत्र म्हणजे अॅवॉर्ड वापसीचा दुसरा भाग असल्याची प्रतिक्रिया मुख्यार अब्बास नकवी यांनी दिली आहे.

COMMENTS