नवी दिल्लीः पंजाब विधानसभा निवडणुकांत भाजप ६५ जागा लढवणार असून काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग
नवी दिल्लीः पंजाब विधानसभा निवडणुकांत भाजप ६५ जागा लढवणार असून काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष ३७ व माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंह ढिंढसा यांचा शिरोमणी अकाली दल (संयुक्त) १५ जागा लढवणार आहे.
सोमवारी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषदेत जागांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप पंजाबमध्ये परिवर्तन आणेल असा दावा केला. पंजाब हे पाकिस्तान लगत राज्य असून देशाची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी पंजाबमध्ये स्थिर व मजबूत सरकार येणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे पण काही देशविरोधी शक्ती त्यांचे प्रयत्न हाणून पाडत असल्याचे नड्डा म्हणाले.
पंजाबमध्ये ११७ विधानसभा जागा असून तेथे २० फेब्रुवारीला मतदान होत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपने शिरोमणी अकाली दलाशी युती केली होती. त्यावेळी भाजपने २३ उमेदवार रिंगणात उतरवले होते. पण त्यांना केवळ ३ जागांवर विजय मिळवता आला होता. सध्या त्यांचे दोनच आमदार असून एका उमेदवाराला पोटनिवडणुकांत पराभव पत्करावा लागला होता.
भाजपने शुक्रवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात शेतकरी कुटुंबातील १२ नेते, १३ शीख व ८ दलितांना तिकिटे देण्यात आली होती. अमरिंदर सिंग यांनी २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात भारतीय हॉकी संघाचे माजी कप्तान अजितपाल सिंह यांना उमेदवारी देण्यात आली होती. खुद्ध अमरिंदर सिंग पतियाला येथून निवडणूक लढवणार आहेत.
सिद्धू मंत्रि व्हावेत यासाठी पाकिस्तानकडून संदेश
काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना मंत्री करावे म्हणून पाकिस्तानातून संदेश आला होता, असा आरोप अमरिंदर सिंग यांनी सोमवारी केला. ते भाजप कार्यालयात उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांना कॅबिनेटमंत्री मिळावे म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या मार्फत एकाने संदेश पाठवला होता, असा दावा केला. सिद्धू यांना कॅबिनेटमध्ये घेतल्यास मी आपला आभारी राहीन. सिद्धू माझा जुना मित्र आहे तो काम करत नसेल तर त्याला काढून टाका असेही मला सांगण्यात आले होते, असे अमरिंदर सिंग म्हणाले. २०१७मध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्री झालो तेव्हा सिद्धू यांना कॅबिनेटमध्ये घेण्यात आले. त्यानंतर ते काहीच काम करत नव्हते. त्यामुळे त्यांना नंतर मंत्रिपदावरून हटवण्यात आले, असाही दावा अमरिंदर सिंग यांनी केला. सिद्धू अकार्यक्षम, कोणत्याही कामाचे नव्हते, ७० दिवसांत त्यांनी एकही फाइल पूर्ण केली नाही, असाही आरोप अमरिंदर सिंग यांनी केला.
COMMENTS