भारतात बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाल्यापासून बलात्कार करून पुरावे नष्ट कऱण्यासाठी त्या स्त्रीला किंवा मुलीला ठार करण्याचा काही घटना घडल्या आहेत. ही कृत्यं प्रत्यक्ष बलात्कारापेक्षाही भीषण आहेत. माणसांमध्ये इतकं क्रौर्य नेमकं येतं कुठून? इतका राग, इतकं नैराश्य का येत असेल? या सगळ्याची कारणं शोधून त्यावर काम करणं गरजेचं आहे.
हैदराबाद आणि झारखंड इथल्या बलात्काराच्या घटनांमुळे देश ढवळून निघाला आहे. पुन्हा एकदा निर्भया, आसिफा आणि इतर प्रकरणांची तीव्रतेने आठवण करून देत बलात्काऱ्यांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी असा आग्रह धरला जात आहे. सोशल मीडियावरून, वृत्तपत्र, टीव्ही माध्यमातून या घटनांवर वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त केले जात आहेत. बलात्काऱ्यांचे लिंग छाटून टाका, त्यांना भर रस्त्यात जाळून टाका, मुलांवर लक्ष ठेवा अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्याच वेळी बलात्काऱ्यांची मानसिकता समजून घेणे, बलात्कार का होतात याची कारणं शोधून त्यावर काम करणे आणि समाजाच्याच एकूण मानसिकतेमध्ये बदल घडवून आणणे या गोष्टी महत्त्वाच्या असल्याची मतं व्यक्त केली जात आहेत.
एकीकडे भारतात या घटना सुरू असताना जगभरातही अशाच अनेक घटना घडत आहेत आणि त्यांची दखल घेतली जात आहे. स्पेनमध्ये सप्टेंबर २०१९ मध्ये फेमिनिस्ट इमर्जन्सी म्हणजे स्त्रीवादी आणीबाणी जाहीर केली होती. २०१९ हे वर्ष स्पेनमध्ये स्त्रियांविरोधातल्या अत्याचारांबाबत काळं वर्ष मानलं जातं. या वर्षात स्पेनमध्ये ४२ महिलांची हत्या कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार अशा घटनांमध्ये झाली. पॅम्पलोनामध्ये बुल्स फेस्टिव्हलमध्ये एका १४ वर्षीय मुलीवर सातजणांनी केलेल्या बलात्कारावर प्रतिक्रिया म्हणून या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पेनसारख्या मानवी हक्कांबाबत जागरूक देशाच्या तुलनेत भारतात अशा घटनांचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. त्यातल्या नोंदवल्या जाणाऱ्या घटना आणि नोंदवण्यात न आलेल्या घटना यांत खूप मोठी तफावत असल्याचं जाणवतं.
मागच्या आठवड्यात फ्रान्समध्येही हजारो महिला आंदोलक रस्त्यांवर उतरल्या होत्या. कौटुंबिक अत्याचारांविरोधात त्यांनी आवाज उठवला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी या कौटुंबिक हिंसाचाराला “फ्रान्सस शेम’ असं म्हटलं. एकीकडे जगभरात फ्रान्स हा महिलांच्या हक्कांबाबत सर्वाधिक सजग देश असं गौरवण्यात येत असताना दुसरीकडे याच देशात युरोपातील कौटुंबिक हिंसाचार होतात असं अहवाल सांगतात. “फेमिसाइड’ संपवण्यासाठी अनेक लोक या वेळी सहभागी झाले होते आणि बलात्कारांविरोधात इथे खूप मोठं आंदोलन झालं. याचे पडसाद जर्मनी आणि इतर युरोपियन देशांमध्येही उठले आहेत.
याचाच अर्थ असा की जगातल्या प्रत्येक देशात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर बलात्काराविरोधात काही ना काही आंदोलन छेडलं जातं. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१४ मध्ये केलेल्या अहवालानुसार सुमारे ३० टक्के महिलांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपातल्या बलात्काराला बळी पडावं लागतं.
भारतात या घटनांचं प्रमाण खूप जास्त आहे. बलात्कार, विनयभंग अशा विविध स्वरूपात स्त्रियांना विविध प्रकारच्या अत्याचारांना बळी पडावं लागतं. त्यातल्या मोठ्या प्रमाणावरच्या घटना या माहितीतल्या पुरूषांकडून केल्या जातात. त्यात त्यांचे वडील, काका, मामा, भावंडं असे जवळचे, विश्वासू लोक असतात. बलात्कार फक्त समाजाच्या एका विशिष्ट वर्गात होतात असंही नाही. सर्व वर्गांमध्ये बलात्काराचं प्रमाण खूप मोठं आहे. पण त्यातले सगळेच जगासमोर येत नाहीत. पोलिसांकडे नोंदवल्या जाणाऱ्या आणि दखल घेऊन कारवाई होणाऱ्या बलात्कारांचं प्रमाण खूप कमी आहे. याला यंत्रणांबरोबरच लोकांची मनोवृत्तीही तितकीच जबाबदार आहे.
नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्ट २०१७ या ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार २०१६ च्या तुलनेत महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये ६ टक्क्यांची वाढ झाली होती. यातल्या अनेक घटना या नवरा किंवा त्याच्या नातेवाइकांकडून झाल्याची (२७.२ टक्के) नोंद होती तर त्यापाठोपाठ महिलेवर तिचा विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला (२१.७ टक्के), महिलेचे अपहरण किंवा त्यांना ताब्यात ठेवणे (२०.५ टक्के) आणि बलात्कार (७ टक्के) अशा प्रकारच्या घटना नोंदवण्यात आल्या होत्या. यातल्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशात ५६०११ घटना, त्यानंतर महाराष्ट्र (३१,९७९) आणि पश्चिम बंगाल (३०,००२ घटना) या पुरोगामी आणि स्त्री चळवळींशी संबंधित राज्यांमध्ये नोंदवल्या गेल्या. या वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या ३,५९,८४९ घटना नोंदवण्यात आल्या.
बलात्कार का करावासा वाटतो? बलात्कार होत असताना त्या पुरूषांच्या मनात नेमकं काय सुरू असतं? त्यांच्या सामाजिक, आर्थिक, भावनिक, मानसिक परिस्थितीचा या घटनांवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो? लैंगिक आनंद या पूर्णपणे नैसर्गिक शारीरिक गरजेचं रूपांतर हिंसाचारात आणि विकृतीत कसं होतं? या गोष्टींचा अभ्यास करण्याचा प्रयत्न जगभरातल्या संस्थांनी आणि संशोधकांनी केला आहे.
‘द कॉर्न्व्हसेशन’ने मांडलेल्या मतानुसार पुरूषांच्या तुलनेत पाचपट अधिक महिलांना बलात्काराचा धोका संभवतो. बलात्कार पीडितांवर आणि त्यांच्या समस्यांवर खूप अभ्यास करण्यात आलेला आहे आणि तितकाच अभ्यास बलात्कार करणाऱ्या पुरूषांवर करण्याची गरज आहे. अनेक अभ्यास हेच सुचवतात की महिलांनी अंगप्रदर्शन घालणारे कपडे घालू नयेत, एकट्याने असुरक्षित ठिकाणी प्रवास करू नये, पार्टीमध्ये मद्यपान करू नये. पण पुरूषांनी बलात्कार करण्याची कारणं ही अनेकदा वेगळीच असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे बलात्कार करण्याच्या पुरूषांच्या मानसिकता तपासून त्यांच्यावर काम करणं ही काळाची गरज बनली आहे असा निष्कर्ष या चर्चेतून काढण्यात आला आहे.
१९७६ साली क्लारमँट ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटीच्या सॅम्युअल डी. स्मिथमिन या साऊथ कॅरोलिनामध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असणाऱ्या आणि तेव्हा पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्याने वृत्तपत्रात जाहिरात दिली- “तुम्ही बलात्कारी आहात का? संशोधकांना तुमची ओळख न पटवता तुमचा अभ्यास करायचा आहे. फोन करा……..’ त्यांना या जाहिरातीनंतर प्रचंड प्रमाणात फोन आले. आपल्या गर्लफ्रेंडवर बलात्कार करणारे, आपल्या मित्राच्या बायकोवर बलात्कार करणारे, श्रीमंतांचा बदला घेण्यासाठी बलात्कार करणारे असे शेकडो फोन त्यांनी घेतले. त्यात त्यांना एक गोष्ट सामान्य आढळली की हे लोक अत्यंत शांतपणे आणि सभ्यपणाने त्यांच्याशी बोलत होते. अगदी “नॉर्मल’ वाटावे असे. दुसरी गोष्ट म्हणजे एकदा बलात्कार केला की तो पुन्हा करण्याची प्रवृत्ती या बलात्कारी लोकांमध्ये असते आणि ते अत्यंत लहान वयापासून हे सर्व करण्यास सुरूवात करतात. त्यातल्या अनेकांना संमतीशिवाय संभोग हा बलात्कार असू शकतो याची कल्पनाही नाही. त्यांच्या या संशोधनानंतर मागच्या अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन केलं गेलं आहे. मात्र पीडितांच्या अभ्यासाच्या तुलनेत बलात्कार करणाऱ्यांवरचा अभ्यास खूप नगण्य आहे.
सायकॉलॉजी ऑफ व्हायोलन्स या जर्नलच्या संपादक शेरी हॅम्बे म्हणतात की “तुम्ही तुमच्या शिकाऱ्याला समजून घेऊ शकला नाहीत तर तुम्ही लैंगिक हिंसाचार कधीही समजून घेऊ शकत नाही. बलात्कारी पुरूषावर एक प्रबंध येतो तेव्हा पीडितेवर दहा प्रबंध आलेले असतात,’ असं त्या सांगतात. याचे एक कारण म्हणजे बलात्कार हा पुरूषाने केलेला असला तरी मुख्यत्वे स्त्रीची समस्या आहे असं मानलं जातं.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनात बलात्काराच्या विविध प्रकारच्या थिअरीज मांडल्या आहेत. https://cyber.harvard.edu/vaw00/theories_of_rape.html
१. बायोलॉजिकल थिअरी
२. कमॉडिटिफिकेशन थिअरी
३. डेव्हलपमेंटल थिअरी
४. लिंगाधारित भेदभावाशी संबंधित गुन्ह्याच्या स्वरूपात बलात्कार
५. नियंत्रण संकल्पना
भारताच्या संदर्भातही या थिअरींमधील अनेक बाबी लागू होतात. भारतातली पुरूषप्रधान संस्कृती, वर्णवर्चस्ववाद, आर्थिक दरी, सामाजिक तसेच इतर ताणतणाव या गोष्टींचा बलात्कारावर खूप परिणाम होतो. शारीरिकदृष्ट्या मुळातच स्त्री कमी शक्तिशाली असल्यामुळे एका वेळी अनेक लोक आले तर ती त्याचा प्रतिकार करण्यात कमी पडते. नकार पचवता न येणं हेही बलात्काराचं एक कारण म्हणता येईल. ‘ती मुलगी नाही म्हणत होती,’, ‘तोकडे कपडे घातल्याबद्दल आम्हाला तिला अद्दल घडवायची होती,’ ‘ती श्रीमंत होती आणि मला श्रीमंतांचा तिटकारा आहे,’ अशी विविध कारणं बलात्काऱ्यांकडून सांगितली जातात. स्मिथमिन यांच्या मते बलात्काऱ्यांमध्ये पुन्हा पुन्हा बलात्कार करण्याची प्रवृत्ती असल्याचं दिसत असलं तरी एरवीच्या वेळी हे लोक अगदी सर्वसामान्य असतात. त्यामुळे नेमकी प्रक्रिया कशी घडते हे समजून घेणं आवश्यक असल्याचं मत आंतरराष्ट्रीय स्तरावरून व्यक्त केलं जात आहे.
लोकसत्ताच्या रविवार पुरवणीत लेखिका मंगला आठल्येकर यांनी लिहिलेल्या एका लेखानुसार, ‘स्त्रीच्या अवघ्या अस्तित्वाचा केंद्रबिंदू तिचं चारित्र्य आहे आणि तिच्या संदर्भात वापरल्या जाणाऱ्या ‘चारित्र्य’ या शब्दात दुर्दैवानं फक्त ‘योनिशुचिता’ एवढाच अर्थ सामावलेला आहे. लग्नसंबंधाखेरीज तिचा कुठल्याही पुरुषाशी शरीरसंबंध आला, मग तो स्वेच्छेनं असो वा तिच्यावर झालेला बलात्कार असो, तरी तीच चारित्र्यहीन ठरवली जाते. समाज पुरुषाकडे बोट दाखवत नाही, पण तिच्या चारित्र्याची चर्चा मात्र हिरिरीनं होत राहते.’ अशा वेळी आपल्या मनातला राग काढण्यासाठी, स्त्रीवर ताबा मिळवण्यासाठी तिचं चारित्र्यहनन करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तिच्यावर केलेला बलात्कार.
स्त्रीला नाही म्हणण्याचा अधिकार आहे आणि ‘नो मीन्स नो’ असं म्हणत असताना पुरूषांनी आपल्या लैंगिक भावनांचा अधिकार मिळवण्यासाठी काय करता येईल याबाबत काहीही भाष्य केलं जात नाही. नवऱ्याने बायकोची इच्छा नसताना केलेला संभोग हाही बलात्कारच मानला जावा, असं कायदा म्हणतो. स्त्रीला मोठं पद हवं असेल, आयुष्यात पुढे जायचं असेल तरीही तिच्या शरीराचा फायदा घेतला जातो. याला तडजोड म्हणत असतीलही पण आमिष दाखवून केलेला संभोग हा बलात्काराच्या व्याख्येतच आहे.
भारतात बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाल्यापासून बलात्कार करून पुरावे नष्ट कऱण्यासाठी त्या स्त्रीला किंवा मुलीला ठार करण्याचा काही घटना घडल्या आहेत. ही कृत्यं प्रत्यक्ष बलात्कारापेक्षाही भीषण आहेत. माणसांमध्ये इतकं क्रौर्य नेमकं येतं कुठून? इतका राग, इतकं नैराश्य का येत असेल? या सगळ्याची कारणं शोधून त्यावर काम करणं गरजेचं आहे.
बलात्काराच्या अनेक घटना हल्ली समोर येऊ लागल्या आहेत. पण एक समाज म्हणून त्यावर हळहळ व्यक्त करणं आणि कायदा आणखी कठोर करणं याच्या मागणीशिवाय आणि ही घटना आपल्यासोबत किंवा आपल्या घरातल्या इतर स्त्रियांसोबत घडलेली नाही याबद्दल समाधान व्यक्त करणं यापलीकडे फारसं काही केलं जात नाही. एकूणच समाज म्हणून नेमकं कुठे काय बिनसतं आहे आणि या घटना का घडून येतात, त्या टाळण्यासाठी काय करता येईल या गोष्टींचा अभ्यास केला तर अशा घटना कदाचित १०० टक्के बंद होणार नाहीत पण त्या कमी होण्यासाठी काम करता येईल.
COMMENTS