उ. प्रदेशात पुन्हा योगी, पंजाबात आप, भाजपची मणिपूर, उत्तराखंड, गोव्यात आगेकूच

उ. प्रदेशात पुन्हा योगी, पंजाबात आप, भाजपची मणिपूर, उत्तराखंड, गोव्यात आगेकूच

उ. प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर व गोवा या पाच राज्यात झालेल्या  विधानसभा निवडणुकांत भाजपने गोवा वगळता सर्वठिकाणी बहुमताच्या दिशेने आगेकूच केली असून पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेस व भाजप-अकाली दल आघाडीला धोबीपछाड देत सत्तेच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये आपल्या दुसऱ्या प्रयत्नात सत्तेवर येण्याची किमया दाखवली आहे. आप ९० जागांची आघाडी घेतली असून त्यांचा येथील विजय निर्भेळ समजला जात आहे. पंजाबच्या जनतेने पारंपरिक पक्षांना धुडकावून नव्या पक्षाकडे व नेतृत्वाकडे सत्तेची सूत्रे दिली आहेत. पक्षाचे नेते भगवंत मान हे पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील. काँग्रेसचे नेते व मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू पराभूत झाले आहेत. त्याच बरोबर अकाली दलाचे प्रमुख नेते प्रकाशसिंग बादल हेही पराभूत झाले आहेत.

तर उ. प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार पुन्हा सत्तेवर येत आहे. आदित्यनाथ यांचा हा दुसरा विजय ऐतिहासिक म्हणून नोंदला जाईल कारण १९८५ नंतर राज्यात पहिल्यांदाच सलग दोन वेळा सत्तेत येण्याची किमया भाजपने करून दाखवली आहे. भाजप २६६ जागांवर पुढे असून समाजवादी पार्टी १३०, काँग्रेस ३ व बसपा २ जागांवर आघाडी घेऊन आहे. काँग्रेसला या निवडणुकांत गेल्या विधानसभा निवडणुकांपेक्षाही चांगली कामगिरी करता आलेली नाही. प्रियंका गांधी यांच्या लडकी हूँ, लड सकती हूँ या मोहिमेला उ. प्रदेशच्या जनतेला साफ नाकारल्याचे दिसत आहेत.

उत्तराखंडमध्ये भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. तेथे भाजप ४६ जागांवर, काँग्रेस २० जागांवर पुढे आहे. आम आदमी पार्टीला या राज्यात सपशेल पराभव पत्करावा लागला आहे.

गोव्यातही भाजप पुन्हा सत्ता मिळवण्याच्या जवळ आहे. भाजप इथे १९ जागा, काँग्रेस १२ जागा, तृणमूल ३, आप ३ जागांवर आघाडीवर आहे.

मणिपूरमध्येही भाजप २८ जागांवर पुढे आहे. काँग्रेसची कामगिरी निराशाजनक झाली असून ते ९ जागांवर आघाडीवर आहेत. तर स्थानिक एनपीपी ९ जागांवर आघाडीवर आहे.

 

COMMENTS