हाडं बोलतात, सू ब्लॅकना ते ऐकू येतं

हाडं बोलतात, सू ब्लॅकना ते ऐकू येतं

काही तर खणत असताना समजा तुम्हाला एकादं हाड मिळालं. त्यावरुन तुम्हाला काय बोध होईल? मुळात हे हाड कोणत्या प्राण्याचं आणि प्राण्याच्या शरीरातलही कुठल्

भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले
ओमर अब्दुल्ला यांची अटक व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग
राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद

काही तर खणत असताना समजा तुम्हाला एकादं हाड मिळालं. त्यावरुन तुम्हाला काय बोध होईल?

मुळात हे हाड कोणत्या प्राण्याचं आणि प्राण्याच्या शरीरातलही कुठल्या भागाचं इथून सुरवात. तुम्ही खाटीक असाल तर कदाचित तुम्हाला समजेल किंवा अस्थीशास्त्र शिकवत असाल तरीही कदाचित समजेल. पण यातलं कोणही नसाल तर?

श्रीम सू ब्लॅक यांचं WRITTEN IN BONE : HIDDEN STORIES WE LEAVE BEHIND हे पुस्तक हाडांचा अभ्यास करता येतो आणि त्यातून काय काय कळू शकतं ते सांगतात.

सू ब्लॅक स्कॉटिश प्राध्यापक न्यायवैद्यक मानवशास्त्राच्या तज्ज्ञ आहेत. हाडं हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय आहे. तो विषय त्या शिकवतात आणि पोलिसांना गुन्हेगार शोधण्यास मदत करतात.

एकदा पोलिसांनी त्यांना माणसाची एक कवटी आणून दिली. कवटीवर समुद्रातले जलचर प्राणी चिकटलेले होते. एका कोळ्याच्या जाळ्यात ती आली. पोलिसांना कळलं तर ते पाठीमागं झंगट लावतील म्हणून कोळ्यानं ती कवटी एका भिंतीवर ठेवली होती. पोलिसांना ती सापडली.

ब्लॅकनी तपासणी केली आणि अहवाल दिला की ती कवटी सुमारे ६०० ते ८०० वर्षांपूर्वीची आहे. साताठ शतकांमागं मेलेला माणूस समुद्रात कां पडला, त्याला कोणी मारलं याचा शोध घेऊन काय उपयोग होता. पोलिसांनी कवटीचा नाद सोडला.

कवटीचं किंवा त्या मेलेल्या माणसाचा काळ ब्लॅकना कसा सापडला? काही वर्षांपूर्वी एकाद्या अभ्यासकाला ती कवटी मिळाली असती तर त्यावरून काळ शोधणं कदाचित त्याला जमलं नसतं. कारण कवटी, हाडं यांच्याभोवती असलेलं मांस नष्ट होतं, नुसत्या हाडावरून काहीच कळत नाही.पण कार्बन डेटिंगचं तंत्र सापडल्यानं आता कोणतीही वस्तू किती जुनी आहे ते शोधता येतं.

प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीरात तो जे खातो त्यामधुन रेडियोकार्बन गेलेला असतो. प्राणी मेल्यावर शरीरातला कार्बन हळू हळू नष्ट होत जातो. रेडियो कार्बन ५७५० वर्षांनी अर्धा नष्ट होत असतो. एकाद्या प्राण्याच्या शरीरात किती रेडियो कार्बन आहे ते शोधलं तर त्यावरून त्या प्राण्याचं वय, काळ समजतो.

अलीकडं आणखी एक नवं तंत्र अवगत झालं आहे. स्टॉंशियम नावाचं मूलद्रव्यं माणसाच्या शरीरात अलीकडल्या काळात तो जे खातो पितो त्यातून जातं, ते द्रव्यं माणसाच्या शरीरात जन्मतः नसतं. त्या मूलद्रव्याचं मापन केलं की पाच सहा वर्षाच्या काळाचं नेमकं निदान करता येतं.

ब्लॅक केवळ प्राण्याचं वय ठरवतात असं नाही. समजा त्यांना एकाद्या माणसाची कवटी सापडली.तर कवटीवरून गालाच्या हाडाची ठेवण, नाकाची आणि कानाची ठेवण, दातांची रचना आणि त्यानुसार जबड्याचं रूप समजतं. या खुणा एकत्र केल्यानंतर माणूस आशियन आहे, पूर्व आशियन आहे, आफ्रिकन आहे की युरोपियन आहे ते ब्लॅकना कळतं.

ब्लॅक यांच्यासमोर आलेल्या एका केसमधे मेलेला माणूस ट्रान्सजेंडर होता, म्हणजे लिंगबदल झालेला होता. हे त्यांनी कसं ओळखलं?

दोन हाडांच्या सांध्यामधे कूर्चा असतात. या कूर्चा हळूहळू कठीण होत जातात. पण कठीण होण्याची प्रक्रिया स्त्री आणि पुरुषांत वेगवेगळी होते. पुरुषांच्या कूर्च्या लवकर कठीण होतात. कठीण होण्याची प्रक्रिया हार्मोन्समुळं घडते.  प्रस्तुत माणसाच्या कूर्चा दोन वेगवेगळ्या टप्प्यात  कठीण झाल्याचं सापडलं. सुरवातीचा टप्पा पुरुष हार्मोनमुळं होता आणि नंतरचा टप्पा स्त्री हार्मोनमुळं होता.

स्त्रीच्या ओटीपोटाची हाडे तपासल्यानंतर त्या स्त्रीला किती मुलं झाली याचाही शोध लागतो.

माणसाच्या शरीरात घडणाऱ्या घटनांचे रासायनिक परिणाम हाडांवर होत असतात. हाडं सुरकुततात, लहान होतात वगैरे. माणसावर खूप मानसीक ताण असेल तर त्याचा परिणाम म्हणून हाडांची घनता वाढत जाते. घनता वाढत जाते त्या वेळी प्रत्येक टप्प्यावर हाडावर त्याच्या खुणा रेषांच्या रूपात हाडावर उमटतात. त्याना हॅरिस लाईन्स म्हणतात. एका मुलाची केस ब्लॅक यांच्यासमोर आली होती. त्यानं आत्महत्या केली होती. त्याच्या एक्सरे मधे खूप हॅरिस लाईन्स दिसल्या. याचा अर्थ तो मुलगा दीर्घ काळ मानसीक ताणाखाली जगत होता.

या मुद्द्यावर पोलिसांनी तपास केल्यावर सिद्ध झालं की त्याचा आजोबा  त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होता, त्या ताणातून आत्महत्या झाली होती.

ब्लॅक यांना एकदा कतारच्या सरकारनं बोलावलं.  ११ हजार मृत माणसांचे ५५ हजार फोटो कतारी सरकारनं ब्लॅक यांच्यासमोर ठेवले. सीरियन पोलिसांनी अत्याचार केल्यावर मेलेल्या कैद्यांचे फोटो एका पोलिस फोटोग्राफरनं काढले होते आणि ते फोटो पोचले होते.

केवळ फोटोवरूनही ब्लॅक यांनी निष्कर्ष काढले. कैद्यांच्या गळ्यावर आवळल्याचे आडव्या खुणा होत्या. ब्लँकनी सांगितलं की त्यांना टांगून फाशी दिली असेल तर रक्त साकळल्याच्या खुणा खालून वर अशा दिसतात. याचा अर्थ गळ्याभोवती काही तरी आवळूनच त्याना मारण्यात आलं होतं. एका फोटोवरून त्यांनी निष्कर्ष काढला की गळा आवळण्यासाठी कार मधील फॅन बेल्टचा वापर करण्यात आला होता. पाच टक्के फोटोमधे शरीरावर मारहाणीच्या समांतर रेषांच्या खुणा दिसत होत्या. या समांतर रेषांचं वर्णन ट्रॅमच्या रुळासारख्या खुणा असं त्यांनी केलं. कांबीनं प्रहार करण्यात आले होते असा निष्कर्ष ब्लॅक यांनी काढला.

सू यांना इराक, कोसोवो, थायलंड, जपान इत्यादी देशांनी तिथल्या आपत्तीमधील मृतांची खात्री करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. इंग्लंडमधले पोलिस गुन्हा शोधण्यासाठी त्यांची मदत वारंवर घेत असतात. गुन्हे हा विषय थरारक असल्यानं बीबीसीनं ब्लॅक यांची मदत घेऊन विशेष कार्यक्रम प्रसारित केले. ब्लॅक यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत, युनोनंही त्यांचं सहकार्य घेतलं आहे, त्यांचा सन्मान केला आहे.

सू ब्लॅक यांची अस्थीशास्त्र आणि न्यायवैद्यक शास्त्र या विषयांवर ७ पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.

सू ब्लॅक यांच्यावर त्या ७ वर्षाच्या होत्या त्यावेळी बलात्कार झाला होता. त्यांचे आईवडील एक हॉटेल चालवत असत. हॉटेलात आलेल्या एका तिऱ्हाईतांनं बलात्कार केला.

ब्लॅकना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला “ तुम्ही या न्यायवैद्यक मानवशास्त्राकडं सूड भावनेतून आलात?”

ब्लॅकनी उत्तर दिलं “ मी एक अभ्यासक या नात्यानं या शास्त्राकडं पहाते. मी त्यात मानसीक दृष्ट्या गुंतलेली नाही. गुन्हाच्या केसेस माझ्यासमोर सतत येत असतात. मला त्याचा त्रास होत नाही. मी अलिप्त असते. गुन्हा मी केलेला नाही, माझा त्याच्याशी संबंध नाही, मी त्याला जबाबदार नाही. मी जगण्याचे कप्पे केले आहेत. व्यावसायिक कप्पा आणि व्यक्तिगत कप्पा. मी हे कप्पे एकमेकात मिसळू देत नाही.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

WRITTEN IN BONE : HIDDEN STORIES WE LEAVE BEHIND
Sue Black.
Doubleday

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0