उ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू

उ. प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर दलित तरुणीचा मृत्यू

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी चारजणांनी बलात्कार केलेल्या १९ वर्षीय दलित मुलीचा मंगळवारी सकाळी दिल्लीतल्या सफदरजंग इ

‘पत्नीच्या इच्छेविरुद्ध, बळजबरीचे शारीरिक संबंध बलात्कार नाही’
उन्नाव प्रकरण : ९० टक्के भाजलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू
‘बिल्कीस बानोंना २ आठवड्यात आर्थिक मदत द्या’

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी चारजणांनी बलात्कार केलेल्या १९ वर्षीय दलित मुलीचा मंगळवारी सकाळी दिल्लीतल्या सफदरजंग इस्पितळात मृत्यू झाला. बलात्कार करणारे चारही जण उच्चवर्णिय आहेत.

मुलीच्या प्रकृतीत काहीच सुधारणा न झाल्याने तिला सोमवारी दिल्लीत एम्समध्ये हलवण्यात आले होते. पण तेथेही प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने तिला सफदरजंग मध्ये हलवण्यात आले. त्यापूर्वी तिला अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

आरोपींनी या मुलीला गळा दाबून मारायचा प्रयत्न केला होता, असे एनडीटीव्हीच्या बातमीत म्हटले आहे. तरुणीवर झालेल्या नृशंस हल्ल्यात तिला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर्स झाली होती, पाठीचा मणका मोडला होता, तर तिची जीभही छाटलेली होती. तिचे पाय अधू झालेले होते, तर हातही अंशत: अधू झालेले होते. मणका मोडल्याने तिचे शरीर अधू होत चालले होते व नंतर तिला श्वास घेताना त्रास होत होता, असे रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

या प्रकरणातील चारही संशयित सध्या तुरुंगात आहेत. त्यांची नावे संदीप, त्याचे काका रवि, मित्र लवकुश व राम अशी आहेत. या चौघांना सामूहिक बलात्कार, अनु. जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही चारही आरोपी उच्चवर्णिय आहेत.

या चारही जणांनी या पूर्वी पीडितेच्या कुटुंबियांना धमकावले होते व तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. या आरोपींकडून जातीवाचक शिव्याही दिल्या जायच्या असा आरोप पीडितांच्या कुटुंबियांनी केला आहे. या चौघांमधील संदीप याला दारुचे व्यसन असून त्याने पूर्वीही महिलांवर अत्याचार केल्याची काही प्रकरणे होती पण त्याच्याविरोधात कारवाई झाली नव्हती, असेही पीडित कुटुंबियांचे म्हणणे आहे.

ही घटना १४ सप्टेंबर रोजी दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावरील हाथरस येथे घडली होती. या तरुणीचे सर्व कुटुंबीय गवत कापण्यासाठी शेतावर गेले होते. त्याचा मोठा भाऊ लवकर घरी परतला, तर आई व बहीण (पीडित तरुणी) एकमेकींपासून बऱ्याच अंतरावर गवत कापत होत्या. त्यावेळी चार-पाच जणांनी या तरुणीला मागून येऊन येऊन पकडले. मुलगी दिसत नाही हे लक्षात आल्यानंतर आई तिला शोधू लागली असता, बेशुद्धावस्थेतील मुलगी तिला सापडली.

बेशुद्धावस्थेतील ही तरुणी नंतर ९ दिवसांनंतर २१ सप्टेंबरला शुद्धीवर आली. त्यानंतर तिने घडलेली घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली व २३ सप्टेंबरला पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला होता.  

दरम्यान, उत्तरप्रदेश पोलिसांनी सुरुवातीला काहीच मदत केली नाही, असा आरोप या तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे. तक्रार केल्यानंतर चार-पाच दिवसांनी पोलिसांनी कारवाई केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत.

स्त्रियांवरील अत्याचारांची आकडेवारी

नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) जानेवारीत प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात उत्तर प्रदेश हे राज्य स्त्रियांसाठी सर्वांत असुरक्षित आहे, तर त्या खालोखाल मध्य प्रदेशाचा क्रमांक लागतो. २०१८ मध्ये स्त्रियांविरोधात झालेल्या गुन्ह्यांचा आकडा ३,७८,२७७ होता, त्यातील ५९,४४५ गुन्हे एकट्या उत्तर प्रदेशात घडले होते. मध्य प्रदेशात सर्वाधिक बलात्कारांची नोंद झाली. राज्यात वर्षभरात ५,४५० म्हणजे सुमारे १५ दिवसांमागे एक बलात्काराची घटना झाली आहे. स्त्रियांविरोधात झालेल्या गुन्ह्यांची संख्या हळुहळू वाढत आहे. २०१६ मध्ये हा आकडा ३,२२,९२९ होता, २०१७ मध्ये ३,४२,९८९ होती, तर २०१८ मध्ये ३,७८,२७७ झाली.

संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान या घटनेची तीव्र प्रतिक्रिया देशभरात उमटताना दिसली. उ. प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारवर चोहोबाजूंनी टीका झाली. काँग्रेसच्या उ. प्रदेशमधील प्रभारी प्रियंका गांधी यांनी पीडित तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूवर शोक प्रकट करून राज्यात हाथरस, शाहजहांपूर, गोरखपूरमध्ये एकापाठोपाठ एक रेप घटनांनी राज्य हादरून गेले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हाथरसमधील घटना सैतानीवृत्तीची होती, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली असून महिलांच्या सुरक्षिततेचे नावनिशाणाही दिसत नाही, आरोपी खुलेआम गुन्हे करताना दिसतात, या तरुणीच्या हत्येप्रकरणात दोषींनी कडक शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बसपा अध्यक्ष मायावती यांनीही उ. प्रदेश महिला सुरक्षित नसल्याचा आरोप करत सरकारने या प्रकरणाचा लवकर निवाडा करावा अशी मागणी केली आहे.

चित्रपट अभिनेते अक्षय कुमार, फरहान अख्तर, रिचा चड्ढा आदींनी उत्तरप्रदेशातील बलात्कार पीडितेच्या मृत्यूबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि अशा हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी “गंभीर शिक्षेची” मागणी त्यांनी केली आहे.

पाशवी वृत्तीला मर्यादा नाही हेच या नृशंस बलात्कारातून दिसून येते, या शब्दांत अभिनेत्री स्वरा भास्करने संताप व्यक्त केला. “आपण रोगट, अमानुष समाज आहोत. लज्जास्पद आणि दु:खद आहे ,” असे ती म्हणाली.

स्त्रियांना एवढ्या भीषण अमानुषतेला तोंड द्यावे लागते हे संतापजनक आहे, असे अभिनेत्री यामी गौतम म्हणाली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0