आधीच अटी आणि शर्तीवर अवलंबून असणारा सलून कारागीर टाळेबंदीमुळे हवालदिल झाला आहे. घरात एकट्याच्या मिळकतीवर कुटुंब अवलंबून असल्याने पर्यायाने कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे शहरी आणि ग्रामीण भागात देखील सलून व्यवसायाची दुकानं बंद आहेत. त्याचे गंभीर परिणाम सलून व्यवसायावर देखील पडत आहेत. ताळेबंदीच्या जवळपास पाच-सहा आठवड्यांच्या कालावधीनंतर कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शहरी भागातल्या एका केश कर्तनालयात जवळपास तीन ते पाच कारागीरांची संख्या असते. आणि बहुतेकांची मिळकत ही दिवसभराच्या ऐकून व्यक्तिगत त्याने केलेल्या ग्राहकांकडून जी रक्कम मिळते त्यातली निम्मी रक्कम, पैसे कारागिरांना मिळते म्हणजेच समजा एका कारागिराने दिवसभरात ५०० रुपयांचे काम केलं असेल तर त्याला २५० रुपये दुकान मालकाकडून मिळतात. म्हणजेच कारागिरांची मिळकत ही त्याच्या दिवसभराच्या कामावर अवलंबून आहे. त्यातही त्याच्याकडे दिवसभरात फ़क्त दोनच ग्राहक आले आणि त्याने २०० रुपये मिळवले तर त्याचा त्यातला वाटा कटून त्याच्या हाती फ़क्त १०० रुपये पडतात. त्या अल्प मिळकतीवर घर कसे चालते त्यालाच ठावूक. म्हणजेच मिळकत ही ठराविक अशी नाही. अगोदर अल्प उत्पन्न आणि ते ही बेभरवशावर अशी केश कर्तनालयातल्या कारागिरांची वर्गवारी ही रोजंदारी या स्वरूपात मोडते.
सलून दुकान मालकाकडून कारागीर हे ठराविक रकमेत महिनाभरासाठी ठेवलेले नसतात. शिवाय कारागीर जराही कामात हयगय करत असणारा असेल तर त्याला केंव्हाही कामावरून काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच अटी आणि शर्तीवर अवलंबून असणारा सलून कारागीर टाळेबंदीमुळे हवालदिल झाला आहे. घरात एकट्याच्या मिळकतीवर कुटुंब अवलंबून असल्याने पर्यायाने कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाने अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने उघडण्यास परवानगी दिली असतांना. सलून व्यवसायाकरिता त्यात सूट दिली जाईल अशी आशा या कारागिरांना होती, मात्र दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या टाळेबंदीने अगोदरच बेभरवसा असलेल्या मिळकतीच्या कारागिरांनी गावाकडची वाट धरली तर नवल नाही. मात्र गावाकडेही सलून दुकाने बंद असल्याने त्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी नेमकं काय काम करावं? असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. दुकान मालकही अशा परिस्थितीत काही करू शकतील याची शक्यता कमीच. कारण या कारागिरांना त्यांनी महिनावारी कामावर न ठेवता दैनिक रोजंदारीवर ठेवलेले असते. म्हणजे रात्री सलून दुकान बंद झाली आणि कारागिरांची रोजंदारी दिली की मालक आणि कारागीर नाते तिथेच संपते. त्यामुळे दुकानदार कारागिरांची जबाबदारी घेणार तरी कशी?
औरंगाबादसारख्या एका शहरात सलून दुकानांची संख्या जवळपास पाचशेच्या आसपास आहेत. एका दुकानात कमीतकमी तीन तर जास्तीतजास्त सहा अशी कारागिरांची संख्या आहे म्हणजे एका शहरात जवळपास तीन हजार कारागीर हे सलून व्यवसायावर अवलंबून आहेत. फ़क्त महाराष्ट्रातली ऐकून कारागिरांची संख्या ही लाखाच्या घरात जाईल. मग एव्हढ्या कारागिरांवर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांची संख्या खूप पुढे जाईल.
औरंगाबादमधे अजय नावाच्या एका कारागिराशी बोललो असता. त्याने सांगितलं. “दोन महिन्यांपासून घरात बसून असल्याने आता खाण्यापिण्यासाठी पैसे नाहीत. दुकान मालकाकड़े काही शिल्लक होते तो ही ते देण्यास नाही म्हणतो. घराचं भाडंही दिलं नसून, आता काहीच सुचत नाही. वडील आणि आईला गावाकडे पाठवून देऊ असा विचार करतोय. या पुढे शहरात राहावं की नाही याची काळजी वाटते आहे.”
आणखी एका गजानन नावाच्या कारागिराशी बोललो असता तो म्हणाला, ” अनेक दिवसांच्या बेकरीने हवालदिल झालो असून, काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना सलूनची सेवा देत आहे. मात्र यात विषाणू लागण होण्याचा धोका आहे.”
विषाणू लागण होण्याच्या धोका पत्करून कशाला लोकांकडे जातो असं मी विचारले असता, ” लेकरे-बायकोची पोट भरण्यासाठी रिस्क घ्यावी लागते” असं तो म्हणाला.
उपासमारीला सामोरं जाण्याऐवजी ग्राहकाच्या घरी जाऊन सेवा देण्याचा मार्ग बरा आहे, मात्र धोका सुद्धा आहे. कारण ज्याच्याकडे आपण सेवा देण्यासाठी जात आहात, त्याला विषाणूची लागण झालेली असू शकते. तिथून कारागिराला लागण झाली तर कुटुंबिय देखील धोक्यात येऊ शकतात. अशा परिस्थितीत पुरेशी सुरक्षितता कुठून आणणार? विषाणूला रोखू शकेल अशी मास्क आणि सुरक्षेच्या किटसाठी पैसे कोण देणार? म्हणून धोका आहे.
दरम्यान, या कोरोनाच्या सगळ्या पार्श्वभूमीवर सलून व्यावसायिकांपुढेही अनेक आव्हाने आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आता सेवा देतांना स्वतःच्या आणि ग्राहकाच्या आरोग्याची पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे.
त्यासाठी अनेक साहित्य वापरावे लागणार असून सॅनिटायझर, मास्क, प्रत्येकाला स्वतंत्र टॉवेल, किंवा नॅपकिन वापरावी लागेल.
आणि कारागिरांच्याही आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तरच ग्राहकांना सलूनमधे येण्यास सुरक्षित वाटेल. यावर सलून व्यवसायाचे भविष्य अवलंबून आहे.
COMMENTS