कोई सरहद ना इन्हें रोके…

कोई सरहद ना इन्हें रोके…

मीडिया आणि सोशल मीडिया आता विखार-विद्वेषाचे उत्पादन करणाऱ्या फॅक्टऱ्या बनल्या आहेत. या फॅक्टऱ्यांना कच्चा माल पुरवणारे कोण आहेत आणि त्यावर मिळणाऱ्या निवडणुकीय परताव्यामुळे सत्तेत गब्बर होत जाणारे कोण आहेत, हे आता जगालाही ठावूक झालेले आहे. एक निवडणूक संपली की दुसरी लागते तसे मुस्लिमांना लक्ष्य करीत द्वेषाच्या फॅक्टऱ्या अव्याहत हिंसक झुंडींना दारूगोळा पुरवित राहतात. अशात सीमेच्या अलीकडची कोणी आणि सीमेच्या पलीकडचा कोणी सुरांचा अतूट धागा पकडून माणुसकीच्या आशा जागवते, तेव्हा त्यांची ती कृती आजच्या काळाच्या संदर्भाने अतिवास्तव भासू लागते...

काश्मीरमधील पर्यटनाचा बोजवारा, ८६ टक्के पर्यटन घसरले
जिथे पुस्तके जाळली जातात, तिथे माणसेही जाळली जातील
सर्वोच्च न्यायालयाकडून पायलट गटाला दिलासा

मीडिया आणि सोशल मीडिया आता विखार-विद्वेषाचे उत्पादन करणाऱ्या फॅक्टऱ्या बनल्या आहेत. या फॅक्टऱ्यांना कच्चा माल पुरवणारे कोण आहेत आणि त्यावर मिळणाऱ्या निवडणुकीय परताव्यामुळे सत्तेत गब्बर होत जाणारे कोण आहेत, हे आता जगालाही ठावूक झालेले आहे. एक निवडणूक संपली की दुसरी लागते तसे मुस्लिमांना लक्ष्य करीत द्वेषाच्या फॅक्टऱ्या अव्याहत हिंसक झुंडींना दारूगोळा पुरवित राहतात. अशात सीमेच्या अलीकडची कोणी आणि सीमेच्या पलीकडचा कोणी सुरांचा अतूट धागा पकडून माणुसकीच्या आशा जागवते, तेव्हा त्यांची ती कृती आजच्या काळाच्या संदर्भाने अतिवास्तव भासू लागते..

ती सीमेअलीकडची. तिचं नाव पौशाली साहू. कोलकाता इथे तिथं घरटं. कुरळे केस, प्रसन्न चेहरा आणि डोळ्यांत चमक. गाता गळा फुलू लागला की थेट ६०-७०च्या दशकातल्या गीता दत्तचाच चेहरा नजरेसमोर येतो. गीता दत्तसारखाच तिच्या आवाजाचा पोत, काहीसा पातळ, थोडा सानुनासिक आणि मादकही. त्यातला खट्याळपणा आणि खणखणीतपणासुद्धा अगदी हुबेहूब.

तो सीमेपलीकडचा. नाव फारुख जावेद. लाहोर हे त्याचं शहर. गोलसर लांबुळका चेहरा. चेहऱ्यावर कधी सीमलेस फ्रेमचा तर कधी चेहरा व्यापणारा जाडसर फ्रेमचा चश्मा. त्यांच्याकडे पाहून भासावे, महाशय कुठल्यातरी अकाउंटिंग फर्ममध्ये कामाला आहेत आणि समोर बसून बॅलन्सशीट सादर करणारेत. पण प्रत्यक्षात आहेत, मधूरमुलायम आवाजाचे धनी. गाणं कोणतंही असूद्या, असं हवेत तरंगणाऱ्या वनजविरहित पिसासारखा त्याचा स्वर आरोह-अवरोहात झुलत राहतो.

घडतं असं की, एकाच वेळी दोघे लाइव्ह असतात. पौशाली भारतातून, फारुख पाकिस्तानातून. तो एका फ्रेमध्ये ती दुसऱ्या फ्रेममध्ये. पार्श्वबाजूला ओरिजिनल साउंड ट्रॅक सुरू होतो आणि पाठोपाठ दोघांचं युगुल गीतही. यात अधिक भावोत्कट पौशाली. गाण्यातल्या एकेका शब्दांवर तिचा मुद्राभिनय सुरू असतो. शब्दांतून सांगितक महाल उभारताना तिचे डोळेही बोलत असतात. त्या तुलनेत फारुख स्थितप्रज्ञ भासतो. पण जेव्हा दोघे दीड-दोन मिनिटांसाठी सुरांच्या सफरीला निघतात, एकत्रित परिणाम निव्वळ जादूभरा असतो. ही जादू दोघांच्या ट्विटर अकाउंटवरून वा यूट्यूबवरून अनुभवता येते.

वस्तुतः गेली दीडेक वर्षं हे दोघेही जी गाणी गाताहेत, ती इथे-तिथे कुठेतरी कोणाच्या तरी मुखातून हजारदा ऐकलेली असतात, पण त्यांच्या एकत्र येण्याला असलेला काळाचा संदर्भ आणि दोघांतली जिंदादिली प्रेक्षकांचं मन मोहवून टाकते.

ही भारतातली. तो पाकिस्तानचा. त्यांचा युगुलगीतांचा सिलसिला अलीकडे कोविड काळातच सुरू झाल्याचं त्यांच्या टाइमलाइनवरून समजतं. त्यावरून असाही अंदाज सहज बांधता येतो की, दोघेही कदाचित एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेले दिसत नाहीत. अशा वेळी आवड एकच असली आणि गाण्यावरचं प्रेम दोघांमध्ये एकसारखंच ओतप्रोत असलं तरीही दोघे एकत्र आली कशी, सगळं जुळून आलं कसं, विशेषतः आजचा दोन्ही देशातला विद्वेषी माहोल पाहता, त्यांना अडखळायला नाही झालं का ? असे प्रश्न खरं तर फिजूलच म्हणायचे. कारण, त्यांच्या यूट्यूबवरच्या व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया वाचल्या की आपण कुठेतरी वेगळ्या स्वप्नवत जगात गेल्याचाच भास होत राहतो. बाहेर जाळपोळ, धर्मांध नेत्यांचा नंचानाच आणि सुप्रीम कोर्टाला न जुमानणारी बुलडोझरची दहशत वाढताना दिसते आणि या एका बाजूला या दोघांच्या जगात प्रेमाचा, आदराचा, सौहार्द आणि सन्मानाचा वर्षाव होत असतो. त्यात भारत आणि पाकिस्तानातले गाण्यांचे दर्दी कशाचीही पर्वा न करता अभिव्यक्त होत असतात.

या दुकलीचं गेल्या वर्षी गाजलेलं गाणं, दिल कि नजर सें… मूळ लता आणि मुकेश या दोघांनी गायिलेलं. या गाण्यांत पौशाली-फारूख हे दोघेही अशा काही जागा घेतात, तुमच्या तोंडून पुन्हःपुन्हा क्या बात है… बाहेर नाही पडलं, तर त्याचं नाव ते. याद किया दिल ने कहाँ हो तुम…हे या दुकलीचं आणखी एक कर्णोपकणी झालेलं गाणं. यात हेमंतकुमारच्या आवाजातली अधिरता आणि लताच्या आवाजातली सबुरी पौशाली-फारुख इतक्या बेमालुमपणे उचलतात, की मूळ गाणं कोणाचा असा क्षणभर मनात संभ्रम निर्माण व्हावा. हे गाणं ऐकून कोणी आशू वेंबा नावाने अकाउंट असलेला रसिक म्हणतो, यू टू (TWO) मेक मी लाँग फॉर ए डे व्हेन पीपल फ्रॉम इंडियन सबकाँटिनंट वूड बी एबल टु ट्रव्हल अँड मिट इच अदर विथाउट एनी रिस्ट्रिक्शन्स ऑर व्हिसा…हॅव लिटररी अँड आर्ट फेस्टिवल्स…कोलॅबरेट ऑन प्रोजेक्ट-आर्ट आणि सायन्स…अँड मेक दी वर्ड ए ब्युटिफूल प्लेस…

चारचार पोरं जन्माला घाला, दोन संघाला द्या, दोन देशाला द्या…मुल्लांना संपवून टाका…असा दिन-रात शाब्दिक आणि प्रत्यक्ष हिंसेचा मारा होत असताना कोणी एकाने हा उपखंड सुंदर होण्याचं स्वप्न पाहणंच आताच्या काळात किती मोठं. किती दुर्मीळ. वैश्विकतेचं परिमाण लाभलेल्या सुरांची जादूच म्हणायची ही.

अलीकडे लताबाई गेल्या. तेव्हा त्यांना श्रद्धांजली म्हणून पौशाली आणि फारुख जोडीने ‘वीर-झारा’ सिनेमांतलं मूळ मदनमोहनचं अविस्मरणीय ‘तेरे लिए’ हे आर्त युगुल गीत गायलं. यात लताबाईंबद्दलच्या दोघांच्या भावना अक्षरशः ओसंडून वाहात होत्या. इतकी आर्तता, इतकी सच्चाई त्यांच्या त्या गाण्यात झळकत होती…

किशोरकुमारच्या भारदस्त आवाजामुळे आणि अमिताभ बच्चन-मौसमी चॅटर्जीच्या अदाकारीने स्मरणात राहिलेले ‘रिमझिम गिरे सावन’ हे असंच रसिकांच्या मनात रुतून बसलेलं आणखी एक गाणं. ते गाताना पौशाली आणि फारुख दोघेही अपार आनंद घेताना दिसतात. फारुखला उद्देशून पौशाली तर म्हणते- टोटली एन्जॉइड धीस विथ यू, माय सुपर टॅलेंटेड फ्रेंड फ्रॉम अक्रॉस दी बॉर्डर. लॉट्स ऑफ लव्ह! कोणी डॉ. माधुरी अरोरा नावाची रसिक बाई, ‘थँक्स डिअर पौशाली अँड डिअर फारुख फॉर धीस मेस्मराइझिंग साँग’ अशी प्रतिक्रिया नोंदवते. ती निव्वळ प्रतिक्रिया नसते, धृवीकरण झालेल्या वातावरण माणुसकी, रसिकता आणि सभ्यता अजूनही थोडीफार शिल्लक असल्याची खूण असते. इतरवेळी पौशालीची एकल गीतंसुद्धा चाहत्याची दाद घेत असतात. तेच पाकिस्तानतल्या फारुखबद्दलही म्हणता येतं. हा गडी पाकिस्तानातल्या रसिकांमधल्या माणुसकीला साद घालत आपलं वर्तुळ विस्तारताना दिसतो.

ज्या सोशल मीडियावर शाब्दिक हिंसेचे पाट वाहाताना दिसतात, ज्या सोशल मीडियावर सात-आठ वर्षांच्या मुला-मुलींपासून ७०-८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंतच्या वर्गाकडून हिंसा फॉरवर्ड होत असते, त्याच सोशल मीडियाचा एक छोटासा कोपरा धरून कलाधर्म पाळणारे हे दोन कलावंत गायकीच्या माध्यमातून माणुसकीची पताका उंचावतात, दोन्ही देशातल्या रसिकांना अपूर्व आनंद देत असतात हेच किती थोर आहे. पण असे जे प्रयत्न होत असतात, त्याची जाण आणि आपण काय करतोय याचं भान जय श्री राम किंवा अल्लाहुअकबर म्हणत एकमेकांच्या वस्त्यांवर चाल करून जाणाऱ्या दंगेखोरांकडे आहे का. दंगेखोरांना रसद पुरवणाऱ्या धर्मद्वेषाची नशा चढलेल्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सत्ताधीशांमध्ये आहे का. दंगेखोरांना साथ देणाऱ्या पोलीस आणि तपास यंत्रणांमध्येही आणि न्यायाची मस्करी करणाऱ्या न्यायालयांमध्ये तरी आजघडीला उरलं आहे का ?आजकाल या सगळ्यांच्या नजरेत पौशाली-फारुखसारखे लोक देशद्रोही, दहशतवादी आहेत. गाणं, संगीत, साहित्य, कला हे सारंच यांच्यासाठी बिनमहत्त्वाचं बनलेलं आहे.

म्हणूनच पौशाली-फारुखचं एकत्र होऊन सुरांची दुनिया आकारास आणणं मोलाचं आहे. म्हणूनच पौशाली-फारुखचं सोशल मीडियाचा छोटासा का होईना कोपरा धरून असणं मोलाचं आहे.

नशीब एवढंच आहे, अजून तरी ऑन-लाइन, ऑफ लाइन दंगेखोरांची या सुरांच्या हळव्या कोपऱ्याकडे वाकडी नजर गेलेली नाही. ती जाऊच नये. हिंसक मोर्चा तिकडे वळूच नये.

उद्या समजा, हिंदू राष्ट्र आकारास आलंच आणि भारतातल्या २० कोटी मुस्लिमांना देशाबाहेर काढलं तरीही, कोणीतरी पौशाली-फारुख सुरांच्या ओढीने एकत्रच येतील. आज जशा देशांच्या सीमारेषा पौशाली-फारुखला रोखू शकलेल्या नाहीत, भविष्यातसुद्धा त्या रोखू शकणार नाहीत…

(मूळ लेख १ मे २०२२च्या ‘मुक्तसंवाद’च्या अंकातून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0