नेटीझन्सच्या दबावापुढे झुकरबर्गही झुकला

नेटीझन्सच्या दबावापुढे झुकरबर्गही झुकला

शेती आणि शेतकरी उद्धवस्त करणारे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी नवी दिल्लीच्या वेशीवर गेली २३ दिवस आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा देताना नेटीझन्सच्या दबावापुढे फेसबुकने झुकून किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज पुन्हा सुरू केले आहे.

लोकशाहीत हस्तक्षेपः काँग्रेसचे झुकरबर्गला पत्र
भाजपकडून फेसबुकला आठवड्याला ५३लाख रुपये बहाल
व्हॉट्सअपकडून २० लाखाहून अधिक खाती बंद

शेतकरी आंदोलनाला दिवसेंदिवस मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून हे आंदोलन समाज माध्यमातून आणखी पसरू नये यासाठी विविध क्लृप्त्या सरकारकडून करण्यात येत आहेत. यासाठी सुरुवातीला इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली होती. तसेच काही पोर्टल आणि संकेतस्थळावर बंदी घालण्यात आली. याचाच एक मोठा भाग म्हणून किसान एकता मोर्चाने सुरू केलेल्या फेसबुक पेजवर फेसबुकने बंदी घातली होती. ‘कम्युनिटी स्टँडर्ड व्हायोलेशन्स’चे कारण देत ही बंदी घालण्यात आली. पण याचा उलटा परिणाम पाहावयास मिळाला. त्यामुळे शेतकरी आंदोलनास पाठींबा देणाऱ्या समाजातील सर्वच स्तरातून नेटीजन्सनी फेसबुकने घेतलेल्या या निर्णयाचा जोरदार निषेध # shamefacebook या नावाने करत मार्क झुकरबर्ग यांनाही टॅग केले. अमेरिकेत असलेल्या काही शीख तरुणांनी याबाबत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना इमेल पाठविले. तसेच समाजमाध्यमातून त्याबाबत आवाज उठविण्यात आला.

किसान एकता मोर्चा या फेसबुकवर १ लाख फॉलोअर्स होते व या पेजवरून शेती आंदोलनाची इत्यंभूत बातमी लोकांपर्यंत जात होती. पण हे पेज एकदम बंद केले असे माझा किसान कमिटीचे उपाध्यक्ष व आयटी सेलचे प्रमुख बलजित सिंग संधू यांचे म्हणणे होते. रविवारी संध्याकाळी ७च्या सुमारास हे पेज बंद झाले व रात्री ९.३० हे पेज पुन्हा सुरू झाले. या काळात लाखो नेटिझन्सनी फेसबुककडे निषेध व तक्रारी नोंद केल्या.

नेटीजन्सच्या या वाढत्या दबावापुढे झुकत अखेर फेसबुकने किसान विकास मोर्चाचे बंद केलेले फेसबुक पेज अखेर सुरू केले.

दरम्यान या शेतकरी आंदोलनाने आता पंजाब आणि हरयाणा येथील गावागावात मोठा परिणाम करण्यास सुरुवात केली आहे. अनेक गावांत असलेले जिओचे मोबाईल टॉवर्स आता खाली उतरविण्यास सुरुवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी असलेले रिलायन्स मार्ट बंद करण्याचा दबाव वाढत आहे. रिलायन्सच्या बहिष्काराला आता गावागावात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0