कोविड लसीकरणाला मुंबईत अल्पप्रतिसाद

कोविड लसीकरणाला मुंबईत अल्पप्रतिसाद

मुळातच अत्यंत घाईघाईने आणलेल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात चाचणीमध्ये असलेल्या कोरोना लसीबाबत दस्तुरखुद्द आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही खात्री वाटत नसल्याने महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः महानगरी मुंबईत लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. मंगळवारी १०० जणांना जे. जे. रुग्णालयात लस देण्याचे निश्चित केले होते पण प्रत्यक्षात केवळ १३ जणांनी त्याला प्रतिसाद दिला.

सध्या सिरमची कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हाक्सिन या दोन लसीना केंद्राने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. पण यातील भारत बायोटेकची कोव्हाक्सिन ही लस दुसऱ्या टप्प्यात चाचणी करत असून तिसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष अजूनही आले नाहीत. तर कोव्हीशिल्ड ही तिसऱ्या टप्प्यात निष्कर्षासह आली आहे. लस घेणे ऐच्छिक असले तरी कोणती लस घेतली पाहिजे यावर बंधने आहेत. त्यामुळे जे. जे. रुग्णालयात कोव्हीशिल्ड ही लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. पण या लसीबाबत अनेकांच्या मनात भीती आणि नकारात्मक भावना आहेत. परिणामी ही लस घेण्यास कोणीही इच्छुक नाही. त्याचा परिणाम मंगळवारी दिसला. १०० पैकी केवळ १३ जण यासाठी तयार झाले. बाकीच्यांनी यापासून स्वतःला जाणीवपूर्वक दूर ठेवले.

आतापर्यंत एकट्या जेजे रुग्णालयात सुमारे हजार ७५० आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. पण कोव्हीशिल्ड की कोव्हाक्सिन या मध्ये ज्यावेळी कोव्हीशिल्ड ही लस मिळणार असे समजल्यावर ९० टक्के कर्मचाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. पहिल्या दिवशी खात्री पटावी म्हणून काही वरिष्ठ डॉक्टरांनी लस घेतली. त्यामुळे हा आकडा ३९ पर्यंत गेला होता. मात्र बुधवारी कोणीही या लसीकरण केंद्राकडे फिरकले नाही.

आम्ही लस निश्चितच घेऊ पण ती पूर्णपणे प्रमाणित आणि सर्व चाचण्या पूर्ण केलेली असावी. वुई आर नॉट पीग और रॅट.. आमच्यावर प्रयोग करू नका असे अनेक कर्मचाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले.

दरम्यान औरंगाबाद येथे ३५२ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. त्यांपैकी ९० जणांना त्याचा त्रास झाल्याचे समजते. यामधील अनेकांना ताप, मळमळ, तसेच अंगदुखीचा त्रास झाला आहे. दरम्यान नागपुरात सुद्धा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हाक्सिन लस घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे स्वदेशी बनावटीची ही लस स्वदेशात नाकारली जाऊ लागल्याचे चित्र आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS