विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू झाला. विजय वल्लभ रुग्णालयात एसीचा स्फोट झाल्याने आग लागल्
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू झाला.
विजय वल्लभ रुग्णालयात एसीचा स्फोट झाल्याने आग लागल्याची लागली माहिती डॉक्टर दिलीप शाह यांनी दिली. रुग्णालयात सेंट्रलाइज एसी असून दोनच मिनिटात आग सगळीकडे पसरली अशी माहिती त्यांनी दिली. रात्री ३ वाजता रुग्णालयात आग लागली तेंव्हा आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. यामधील चौघे जण जे चालू शकत होते त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली. मात्र इतर रुग्ण आपला जीव वाचवू शकले नाहीत आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर काही वेळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले.
रुग्णालयात एकूण ९० रुग्ण दाखल होते. आग लागल्यानंतर ऑक्सिजनवर असणाऱ्या आणि गंभीर प्रकृती असणाऱ्या २१ रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले. यामध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले.
या घटनेनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आपत्कालीन मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करून दिली. उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. “विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत,” असे त्यांनी ट्विट केले आहे.
“विरारमधील घटना दुर्दैवी आणि ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. मी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, स्थानिक आमदार आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर एसीचा स्फोट झाल्याचं सांगण्यात आले. एसीचा स्फोट झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटांत धूर झाला आणि आगीने घेरलं. दरवाजाच्या अगदी जवळ होते ते चार रुग्ण वाचू शकले. पण आयसीयूमध्ये असणारे इतर १३ रुग्ण वाचू शकले नाहीत,” असे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.
हे खासगी रुग्णालय असून माणिक मेहताच्या मालकीची इमारत आहे. दिलीप शाह आणि पाठक गेल्या पाच वर्षांपासून हे रुग्णालय चालवत आहेत. रुग्णालयाची तीन मजल्यांची इमारत असून दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. इतर कुठे ही आग पसरली नाही. शासकीय स्तरावरुन योग्य मदत केली जाईल. राज्य सरकार त्यांच्या दुखात सहभागी आहे. हा स्फोट कसा झाला? तो टाळता येऊ शकला असता का? याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे टोपे यांनी सांगितले.
COMMENTS