कलम ३७० आणि राष्ट्रवादाचा भासमान मुद्दा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घसा ताणून ओरडून ओरडून बोलणे, पंकजा मुडे यांचा इमोशनल ड्रामा, रोहित पवार यांची घडवून आणलेली चर्चा, शरद पवार यांचे पावसातील भाषण अशा काही घटनांमुळे यावेळची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक गाजली. महत्त्वाचे मुद्दे आपोआप मागे गेले.
शेतीचे प्रश्न, मराठवाड्यातील दुष्काळ, पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर आणि त्यामुळे झालेले नुकसान, पुण्यात पुरामुळे झालेले मृत्यू, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ‘आरे’मध्ये कापली गेलेली झाडे, जलयुक्त शिवाय योजनेमध्ये नेमके काय फायदे झाले, समृद्धी महामार्गाचे काय झाले, किती लोकांच्या जमिनी गेल्या, आदिवासींच्या वनजमिनीवरील हक्कांचे काय, मिहान प्रकल्प किती यशस्वी झाला, असे प्रश्न एकतर संपले तरी आहेत, किंवा ते सत्ताधारी भाजप आणि शिवसेना तसेच विरोधी पक्षांना महत्त्वाचे वाटत नाहीत. कारण असे कोणतेही प्रश्न या निवडणुकीत पुढे आले नाहीत.
पंकजा मुंडे यांना कशी भोवळ आली, त्यांना त्यांच्या भावाबद्दल काय वाटते, कोण रडले असे तद्दन इमोशनल ड्रामेबाजी या निवडणुकीत खूप चालली. काही मराठी संकेतस्थळे केवळ हे सगळे पसरविण्यात पुढे होती.
‘महाराष्ट्र टाईम्स’चे पत्रकार आणि राज्याच्या राजकारणाचा अभ्यास असणारे आशिष चांदोरकर म्हणाले, की चांगले असो, की वाईट, पण गेल्या ५ वर्षात, राज्यामध्ये जे काही झाले, त्यावरच ही निवडणूक व्हायला हवी होती. या सरकारच्या अनेक योजना अजूनही पहिल्याच टप्प्यावर आहेत. त्यावर चर्चा होणे गरजेचे होते. खड्डे, रस्त्यांची स्थिती, उद्योगधंदे, जलयुक्त शिवार या सगळ्यावर बोलणे गरजेचे होते. काही महापालिकांना जीएसटीमुळे पैसे मिळत नाहीत. त्याचा विकास कामांवर परिणाम होतो. या सगळ्यावर बोले गेले पाहिजे होते. मात्र असे झाले नाही. सगळी निवडणूक भावनिक मुद्द्यांवर लढवली गेली. आता आपल्याकडे सगळ्या निवडणुका अशाच भावनिक मुद्द्यांवर लढल्या जात आहेत. लोकसभा निवडणूक ही पुलवामा आणि बालाकोटवर लढविली गेली. भाजपने सर्जिकल हल्ल्याचा मुद्दा आणला आणि त्यात विरोधक अडकले. आत्ताही ३७० चा मुद्दा आला आणि त्यामध्ये विरोधक अडकले. शरद पवार यांची शेवटची निवडणूक, कोणीतरी गरोदर असल्यासारखे दिसते, असले मुद्दे आणण्यात आले. राज ठाकरे यांनीही लोकसभेप्रमाणे मुद्दे घेतले नाहीत. विरोधी पक्षान्माढले, जे लोक भाजपमध्ये गेले त्यावर विरोधकांनी रान उठवायला हवे होते.
रोहित पवार हे नाव या निवडणुकीत असेच पुढे आणण्यात आल्याचे दिसते. पूर्वी हर्षवर्धन पाटील यांचे नाव असेच जिल्हा पत्रकार पुढे आणायचे. रोहित पवार यांनी कशी पावसात सभा घेतली, हा माणूस कशी माणसांची माने जिंकत आहे, इत्यादी बातम्या आणि फोटो सोशल मिडीयातून पुढे आणण्यात आले.
शरद पवार आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदार आणि इतर लोकांच्या प्रश्नालाही एक भावनिक प्रत्युत्तर मिळाले. त्यांनी नेमके का पक्षांतरे केली आणि इतके दिवस ते लोक राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये का होते, याचे विश्लेषण राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी करणे आवश्यक होते. त्यानिमित्ताने मुळा-प्रवरा, फलटणचा पाणी प्रश्न असे स्थानिक मुद्दे पुढे आले असते, जे आलेच नाहीत.
शेतकरी आंदोलनामध्ये काम करणाऱ्या आयुषी मोहगांवकर म्हणाल्या, की भाजपने विरोधी पक्ष संपवून टाकला. ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी होत्या, त्यांच्या विरोधामध्ये भाजप सरकार काही कारवाई करेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना आपल्याच पक्षामध्ये घेऊन, पावन करण्यात आले. म्हणजे कोणतेच बदल झाले नाहीत. ज्यांच्या विरोधामध्ये भाजपची ओरड होती, की ज्यांनी भ्रष्ट व्यवस्था निर्माण केली, त्यांनाच बरोबर घेऊन व्यवस्थेमध्ये परिवर्तन कसे होणार आहे. निवडणुकीमध्ये या सगळ्यावर काही बोलले गेले नाही. निवडणूक हा केवळ, एक खेळ झाला. हे सगळेच निराशजनक आहे.
मुंबईतील ‘आरे’च्या जंगलातील झाडे कापण्याचा मुद्दा हा केवळ, काही कार्यकर्ते आणि सोशल मिडियापुरताच होता की काय असे वाटू लागले आहे. ३३ कोटी झाडे म्हणजे नेमकी किती झाडे, टी लावण्यासाठी किती जागा लागते, पुराच्या काळात झाडे वाहून गेली का, झाडे लावणे, हे झाडे तोडण्याला उत्तर आहे का, खारफुटीच्या भागाचे काय झाले, कोस्टल रोडचा प्रश्न नेमका काय आहे, असे एकूणच या सरकारच्या काळामध्ये पर्यावरणाचे नेमके काय झाले, हे विचारण्याची संधी विरोधी पक्षांनी वाया घालवली.
नाटक-सिनेमा क्षेत्रात काम करणारा अमोघ भोंगले प्रश्न विचारतो, की पर्यावरण हा मुद्दा कोणालाच कसा महत्त्वाचा वाटत नाही? तो म्हणाला, “आपल्या कोणत्याही निवडणुकीमध्ये पर्यावरण हा मुद्दाच नसतो, तसा तो या निवडणुकीतही आला नाही. खरे तर ‘अरे’तील झाडे तोडण्याचा प्रकार निवडणुकीच्या तोंडावरच झालं, पण हा मुद्दा पुढे आलाच नाही. महाराष्ट्रामध्ये शहरी आणि ग्रामीण, अशी स्पष्ट विभागणी आहे. या दोन भागांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. ग्रामीण भागाचे प्रश्न या निवडणुकीत दिसले नाहीत. नोकऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहेत, शिक्षण महाग होत आहे हे सगळे न येता, गडकिल्ले, काश्मीर, राष्ट्रवाद, असे मुद्दे उगाचच चर्चेला आणण्यात आले.”
पिंपरी आणि भोसरीमध्ये किती उद्योग बंद पडले आणि किती जणांचा रोजगार गेला. शेतकऱ्यांनी आता नेमके काय करायचे आहे, त्यांनी शेती करायची की नाही, कर्जमाफीचे काय गौडबंगाल आहे, कांदा आयातीचे काय प्रकरण आहे, असे प्रश्न कोणीही कोणाला विचारले नाहीत.
जालना भागातील शेतकरी भगवान पवार यांनी असा प्रश्न विचारला, की जीवनाशी निगडीत प्रश्न पुढे का आले नाहीत आणि याबद्दल कुणालाच काही कसे वाटत नाही. ते म्हणाले, की शेतकरी आत्महत्या, पीकविमा योजनेमध्ये झालेला गोंधळ, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न, पिकाचा भाव, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी, आणि दुष्काळ, हेच खरे तर महत्त्वाचे प्रश्न आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुराचा आणि पुनर्वसनाचा प्रश्न नव्याने निर्माण झाला. शहरी भागातील कचरा, ड्रेनेज असे प्रश्न महत्त्वाचे नाहेत का? कर्जमाफीतील घोळ आणि गोंधळ, छोटे उद्योग बंद पडत आहेत. बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी मंदी आली आहे, शेतकरी-शेतमजूर, दलित अशा सगळ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. याच प्रश्नांवर निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला हवी होती. मात्र पाकिस्तान, कलम ३७०, अतिरेकी असे मुद्दे उगाचच आणण्यात आले. सोशल मिडीयाने कलम ३७० च्या मुद्द्याला कलाटणी दिली पण विरोधी पक्ष ते पुढे नेण्यास असमर्थ ठरल्याचे चित्र दिसले. विरोधी पक्षांमध्ये टीमवर्क नाही, हे दिसले. विरोधी पक्ष झोपलेला आहे.
निसर्ग अभ्यासक सिद्धार्थ बिनीवाले म्हणाला, “ही निवडणूक तशी निराशाजनक होती. मी पुण्यात राहतो, त्यामुळे मला या निवडणुकीमध्ये पुण्याच्या प्रश्नांवर कोणी बोलेले, अशी अपेक्षा होती. पुण्यात आलेला पूर, पाणी, मेट्रो, अशा प्रश्नांवर कोणी बोलले नाही. महाराष्ट्राचेही प्रश्न पुढे आलेच नाहीत. काश्मीर आणि लडाखचे मुद्दे या निवडणुकीत का मांडत होते, हे कळत नव्हते. आमच्या घरी जो जाहीरनामा आला होता, त्यामध्ये राम मंदिराचा मुद्दा होता, पण तो पुण्याशी कुठे संबंधीत होता, हे काही समजले नाही. उजवे पक्ष फारच टोकाचे बोलत होते आणि त्यांना विरोधक विरोध करीत होत. स्तःनिक आणि राज्याचे प्रश्न नसल्याने मतदानाचा उत्साह नव्हता आणि त्यामुळेच मतदान कमी झाले, असे मला वाटते. मीही खरे तर मत देणार नव्हतो, पण मत देणे गरजेचे असल्याने दिले.”
शरद पवारांची पावसातील सभा गाजली. त्यांनी ‘इडी’ला कशी धोबी पछाड टाकली, अशी चर्चा खूप झाली. उगाचच राष्ट्रवादावर बोलणाऱ्या मोदी-शहा आणि फडणवीस यांच्या विरोधात कोणीतरी आहे, असे चित्र दिसणे गरजेचे होते, ते महाराष्ट्राला दिसले. पण बाकीचे नेते कुठे गायब होते. काँग्रेस कुठे होती, त्यांचे नेते कुठे होते.
चंद्रकांत पाटील बाहेरचे उमेदवार असण्याबद्दल खूप चर्चा झाली. चर्चा उगाचच जातीवर भरकटत नेण्यात आली. पण चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे प्रश्न किती माहिती आहेत, चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काय, त्यांनी कोल्हापूरच्या पुराच्या वेळी काय केले, पुण्यातील पुराच्या वेळी ते नेमके कुठे होते, पण्यात अचानक पाणी कसे साठू लागले असे प्रश्न मिडीयातही दिसले नाहीत. कदाचित त्यांनी उत्तम जनसंपर्क यंत्रणा उभारली असावी.
‘मी पुन्हा येईन’, ‘आमचं ठरलंय’, ‘आमचं सरकार आल्यावर आम्ही आरेला जंगल घोषित करू’, ‘अभिजित बिचकुले’, ‘उदयनराजे यांची स्टाईल आणि कॉलर उडवणे,’ देवेंद्र फडणवीस यांचे घसा ताणून बोलणे, असल्या लोकांशी संबंधीत नसलेल्या तद्दन विनोदी प्रकारांना या निवडणुकीत खूप प्रसिद्धी मिळाली. ज्याचा केवळ मनोरंजनापलीकडे काही एक उपयोग नाही.
अनेक प्रश्न होते पण आता महाराष्ट्र आणि काश्मीर यांच्यामध्ये एक पूल बांधला जाणार असून, त्याला कलम ३७० पूल असे नाव देण्यात येणार आहे. त्या पुलावरून राष्ट्रवाद नावाचा अंगरखा घालून गेले, की काश्मीर आणि महाराष्ट्राचे सगळे प्रश्न सुटणार आहेत, या एकच मुद्द्यावर ही निवडणूक पुढे गेली ज्यामध्ये विरोधी पक्षांसह मतदारही अडकून पडले.
COMMENTS