माजी पंतप्रधान आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी ‘हिंदू’ वृत्तपत्रामध्ये लिहिलेला लेख, म्हणजे परिवारातल्या एखाद्या ऋषितुल्य पण द
माजी पंतप्रधान आणि सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी सोमवारी ‘हिंदू’ वृत्तपत्रामध्ये लिहिलेला लेख, म्हणजे परिवारातल्या एखाद्या ऋषितुल्य पण दुर्लक्षित जाणत्या पुरुषाने, समोर वाढून ठेवलेला विध्वंस पाहून केलेली, शहाणपणाची आर्त विनवणी आहे. आपल्या सुमारे बारा-तेराशे शब्दांच्या लेखात त्यांनी सध्याची आर्थिक स्थिती, त्याच्या मागची कारणमीमांसा, भविष्यातले संभाव्य धोके आणि त्यातून काढायचे संभाव्यमार्ग, यांची अशी काही तर्कशुद्ध मांडणी केलेली आहे, की एखाद्याने नाही पटलं, तरी निव्वळ प्रगल्भ लेखन-कलेचा नमुना म्हणून ते जरूर वाचावं. काय म्हणतात ते या लेखात?
अडम स्मिथपासून अनेक अर्थतज्ज्ञांचा हवाला देत आधुनिक भारताचा हा अर्थमहर्षी सांगतो, की परस्पर विश्वास आणि समाजातल्या विविध घटकांचा समाजावरचा भरवसा, हे आर्थिक प्रगतीच्या मुळाशी असतात. समाजातल्या घटकांचा विश्वास आणि परस्परांच्या प्रामाणिकपणाची खात्री, समाजाची वीण आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी असते. न्यायव्यवस्थाही ‘गुन्हा सिद्ध होईपर्यंत निर्दोष’ या तत्वावर चालते. पण या सरकारचा सैद्घांतिक पायाच मुळी ‘दोषी सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार..’ हा आहे. त्यामुळे या सरकारला आर्थिक रचनेतले उद्योगपती, भांडवलदार, बँका, (आरबीआय किंवा सेबी) यांच्यासारखे प्रशासक, धोरणकर्ते, व्यावसायिक इ. सगळे घटक हे जणू फसवायलाच निघालेले आहेत, असा संशय आहे. त्यातून सरकारने स्वतःकडे ‘त्यांच्यापासून वाचवणारा एकमेव ‘नैतिक’ रक्षक’अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्या नजरेतून नवं-जुनं प्रत्येक धोरण, हे ‘चांगलं विरुद्ध वाईट सरकार’, याच चष्म्यातून पाहीलं जात आहे.
ही मांडणी, ते म्हणतात त्याप्रमाणे नोटबंदीसारख्या आत्मघातकी धोरणाचा उलगडा आहेच. पण इथे हेही नमूद करायला हवं, की एका मोठ्या मध्यमवर्गाला हीच मांडणी दुर्दैवाने योग्य वाटते आहे. आपल्या समाजवस्त्राला टरकावत जाणारी ही मांडणीच आजच्या आर्थिक समस्यांच्या मुळाशी आहे हे डॉक्टर साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. सरकारच्या या दांगटशाहीच्या पार्श्वभूमीवर माध्यमं, प्रशासन-यंत्रणा, तपाससंस्था, न्यायव्यवस्था या कोणाचाही विश्वास उरलेला नाही, अशी हळहळ ते व्यक्त करतात. आणि या संपूर्ण परिस्थितीचा परिणाम म्हणून आज समाजाच्या आर्थिक चक्राला कमालीचा अविश्वासाचं, सार्वत्रिक भय आणि हताश नैराश्यवाद यांनी ग्रासलेलं आहे, हे त्यांनी परखड शब्दात दाखवून दिलेलं आहे. यातूनच उद्योजकाला नवी गुंतवणूक करावीशी वाटत नाही. त्यामुळे नव्या नोकऱ्या तयार होत नाहीत. बँका कर्ज द्यायला कचरतात. त्यामुळेही धंद्याचा विस्तार कमी होतो. लोकांची उत्पन्नं एकतर घटलेली आहेत, किंवा तिथेच कुंठलेली आहेत. त्यामुळे बचतीत हात घालून खर्च करावा लागत आहे. यातून घरगुती खर्च घटतोय. त्यामुळे मागणी कमी झाली आहे. देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न-वाढ १५ वर्षात सगळ्यात कमी आहे. आणि होत आहे, तीही अतिश्रीमंतांच्या तिजोऱ्या भरत आहे.
या प्रत्येक घटनेमागची आकडेवारी आपल्याला परिचित आहे. सरकारने दाबायचा खूप प्रयत्न करूनही ती आपल्यापर्यंत आलेली आहे. डॉ. सिंग ती एका धाग्यात गुंफतात आणि धोरण ठरवण्यामागच्या ज्या प्रेरणा या परिस्थितीला कारणीभूत आहेत त्या उलगडून दाखवतात.
आरबीआय आणि जागतिक बँकेसारख्या यंत्रणात मानाची पदं भूषवूनही स्वतःला ‘अर्थशास्त्राचा विद्यार्थी’ म्हणवणारे डॉ. सिंग
त्यानंतर एक गंभीर इशारा देतात. एका बाजूला कुंठलेली मागणी आणि घसरणारा रोजगार आणि दुसरीकडे किरकोळ वस्तू, खास करून अन्नधान्यांच्या किंमती यांच्यात दिसायला लागलेली भाववाढ, यातून आपण Stagflation या अत्यंत धोकादायक आर्थिक परिस्थितीत जात आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. या स्थितीतून बाहेर येणं अर्थव्यवस्थेला कठीण जात असतं, याची ते आठवण करून देतात.
मात्र या देशाच्या आर्थिक धोरणांवर जवळपास चार दशकं प्रभाव टाकणाऱ्या या माणसाकडे फक्त टीका नाही, तर उपायही आहेत. त्यांच्या मते सरकारी खर्च वाढवून त्या योगे देशांतर्गत मागणी वाढवायला हवी. विश्वास आणि भरोश्याची ‘सामाजिक धोरणं’ लागू करून उद्योगांना गुंतवणूक वाढवायला प्रोत्साहन द्यायला हवं. खरं सांगायचं, तर सध्याच्या नेतृत्त्वाची मानसिकता पाहता हे शक्य दिसत नाही. मात्र राजकीय टीकेचा मोह टाळत डॉ. सिंग मात्र कळवळून आपल्या परीने मार्ग दाखवत राहतात.
चीनच्या अर्थव्यवस्थेची वाढ मंदावत आहे, त्यातून निर्यातीच्या संधी उपलब्ध होत आहेत, तेलाच्या किंमती घसरलेल्या आहेत, सरकारला राजकीय बहुमत आहे, या देशाकडे उत्साही तरुणाईची मोठी खाण आहे. या सगळ्या अनुकूल परिस्थितीत हाताशी आलेली संधी गमावण्याऐवजी वेळेत उपाययोजना करायला हवी, असे ते मांडतात. नेहमीच ‘चूप रहनेवाली’ अशी विनाकारण कुचेष्टा झालेल्या या माणसाने ‘जरा दिलकी सुनो’ म्हणून जे सांगितले आहे, त्यामागे अर्थशास्त्राचं सैद्धांतिक आणि व्यावहारिक ज्ञान आणि देशाच्या हिताची ओढ आहे, हे समजून घ्यायला हवे.
‘द हिंदू’मधील प्रसिद्ध झालेल्या लेखाची लिंक : https://www.thehindu.com/opinion/lead/the-fountainhead-of-indias-economic-malaise/article30000546.ece
COMMENTS