अरविंद केजरीवाल यांच्यासमोर टिकाव लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा जय श्रीरामची घोषणा सुरु केली आहे.
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर उभे राहणे अवघड असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करण्याचा जो खेळ सुरु केला होता, त्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदीही सामील झाले. मोदी यांनी आज लोकसभेमध्ये राम मंदीर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.
‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ विकसित करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी लोकसभेत दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही घोषणा झाल्याचे त्यांनी सांगितले. ही गोष्ट आपल्या हृदयाच्या जवळ असून, यावर बोलणे, हे आपले सौभाग्य असल्याचे मोदी म्हणाले. सकाळी मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये या ट्रस्टला मान्यता देण्यात आली आणि हे सांगताना आपल्याला आनंद होत असल्याचे ते म्हणाले. यासाठी एका बृहद योजनेला मण्यात देण्यात आली असून, हा ट्रस्ट स्वायत्त असेल आणि त्याकडे ६७ एकर जागा हस्तांतरीत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी, हेच वाक्य अनेकवेळा असलेल्या मोदी यांच्या भाषणामध्ये याशिवाय काहीच नव्हते. जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, तेच मोदी यांनी परत भाषणामध्ये सांगितले. ट्रस्टमध्ये कोण असणार, वगैरे तपशील नसलेले हे भाषण म्हणजे, केवळ आणि केवळ दिल्ली निवडणुकीचा प्रचार होता.
सीएए आणि एनआरसीवरून कोंडी झालेल्या मोदी सरकारला दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्या समोर कसे उभे राहायचे याचा प्रश्न पडला असून, त्याचमुळे शाहीनबाग आणि जामियामध्ये दररोज हिंसक घटना घडविल्या जात आहेत. गृहमंत्री अमित सहा आणि इतर मंत्री दररोज शाहीन बागला लक्ष्य करीत असून, त्याच हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाच्या तालावर आज मोदीही सामील झाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिरेकी असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकताच केला होता. केजरीवाल हे स्वतःला अराजकवादी म्हणवतात. त्यामध्ये आणि अतिरेक्यांमध्ये फरक नाही. ते शाहीन बागचे समर्थन करतात. शाहीन बाग मध्ये देशाला तोडण्याच्या घोषणा दिल्या जातात असे जावडेकर म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी जामिया मिलीय इस्लामिया विद्यापीठाच्या गेटजवळ कपिल गुज्जर या युवकाने गोळीबार केला होता. हा युवक आम आदमी पक्षाचा समर्थक असल्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले आहे. याच दिल्ली पोलिसांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये झालेला हिंसक हल्ला हा डाव्या विद्यार्थी संघटनांनीच घडविल्याचेही जाहीर केले होते. कपिलचे वडील गाजे सिंग यांनी मात्र कपिल हा आम आदमी पक्षाशी संबंधीत नसल्याचे एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.
COMMENTS