‘झेंगट’चा नायक अजिंक्य सद्सद्विवेक बाळगणारा, धार्मिक उन्मादाकडे पाहून खंतावणारा, सर्वसमावेशक समाजमनाचा प्रतिनिधी आहे. प्रत्येक विषयावर, प्रसंगावर त्याची स्वतःची अशी ठाम मते, विचार आहेत. आणि हे त्याचे विचार सामाजिक, सांस्कृतिक घुसळणीतून तयार झालेले आहेत.
कृषी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासूनच रस्त्याच्या दुतर्फा रेन ट्रीच्या घनगर्द सावल्या सोबत करतात… हंगामात रेन ट्रीच्या चिकट शेंगांचा सडा मुख्य रस्त्यावर पडायचा….. त्यातील काही शेंगा चपलेला चिकटून हॉस्टेल रूमपर्यंत सोबत करत… तर काही डांबरी रस्त्याशी एकरुप होत … जणू ‘जीवाश्म’ रूप धारण करत….
आज इतक्या वर्षांनी ‘झेंगट’च्या निमित्ताने हे भावविभोर ‘आठवणींचे जीवाश्मच’ जणू मूर्त रूप धारण करून…गात्रा गात्रांना पुन्हा खुणावताहेत…
‘नॉस्टॅल्जिया’ला कोणा अनामिक साहित्यिकाने ‘स्मरणरंजन’ सारखा गहिरा प्रतिशब्द योजला आहे. या अनामिकेला अनेकदा मनाच्या कप्प्यात जागवले आहे. असे अर्थगर्भ ‘स्मरणरंजन’ या धकाधकीत कधी आपल्या मनाला ताकदीने भिडेल का? असा विचारही अनेकदा येऊन गेला. पण परवा ज्येष्ठ कृषीबंधू आजिनाथ रायकर यांनी ‘झेंगट’ हातात ठेवली आनं…पुस्तकाच्या पानापानांतून आठवणींचा ओळखीचा मृद्गंध दरवळला.
हे स्मरणरंजन वाचकाला त्या-त्या स्थळ काळाची, याची देही याची डोळा, अनुभूती देऊन जाते. एकीकडे वारे प्यायलेल्या अवखळ, उच्छृंखल तरुणाईची संगत आणि दुसरीकडे विलक्षण समरसून जगलेले कॉलेज लाइफ आणि या विचक्षण अनुभव संपन्नतेला शब्दात पकडण्याची किमया वाचकाला संमोहित करून सोडते.
कादंबरीचा नायक अजिंक्य मोहिते हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला बारावीनंतर मेडिकलचं ऍडमिशन थोड्या गुणांनी हुकल्यामुळे आणि परिस्थितीच्या रेट्यामुळे ऍग्रीकल्चरला येऊन पडलेला. सुरुवातीला कॉलेज, होस्टेलच्या वातावरणाला काहीसा दबकणारा, बिचकणारा अजिंक्य, रुळल्यानंतर मात्र बिनधास्त, बेदरकार होत जातो. समविचारी मित्रांबरोबर त्याचे रुटिन लाइफ सुरू असते. पण या बेधुंद अजिंक्यच्या आत एक मनस्वी अंतर्मुख अन् तितकाच संवेदनशील नायकही दडलेला आहे. कादंबरीतील एकेका प्रसंगातून त्याचे व्यक्तिमत्व उलगडत जाते.
संवेदनशील, अंतर्मुख असला तरी हा नायक आत्ममग्न मात्र नक्कीच नाही. आजूबाजूच्या अवकाशाशी तो घट्ट भावबंधाने जोडला गेलेला आहे. प्रत्येक विषयावर, प्रसंगावर त्याची स्वतःची अशी ठाम मते, विचार आहेत. आणि हे त्याचे विचार सामाजिक, सांस्कृतिक घुसळणीतून तयार झालेले आहेत. त्यावरील त्याचे जळजळीत भाष्य वाचकाला वास्तवाची जाण तर करून देतेच पण खोलवर अस्वस्थही करून सोडते. शिक्षण व्यवस्थेतील पढीक पांडित्य, अनिष्ट पद्धती, पळवाटा, जातीय प्रादेशिक प्रांतिक अस्मिता, त्याचे उमटणारे पडसाद आणि या सर्वांशी नायकाने मांडलेला उभा दावा..त्याची बंडखोर वृत्तीच ठळकपणे अधोरेखित करतात आणि अजिंक्य हा नव्या युगाचा नायक ठरतो.
सर्वत्र निराशा दाटून आलेली असताना, एकही गोष्ट मनासारखी घडत नसताना, हा नायक परिस्थितीपुढे अगतिक, हतबल होत नाही की सार्वत्रिक सीनिसीझमचा बळीही होत नाही. आल्या प्रसंगाला तो आपल्या स्टाइलने ‘रिऍक्ट’ होतच राहतो. सद्सद्विवेक बाळगणारा, धार्मिक उन्मादाकडे पाहून खंतावणारा अजिंक्य सर्वसमावेशक समाजमनाचा प्रतिनिधीच ठरतो. आर्थिक- सामाजिक विषमता, मागासलेपणा, स्त्री-पुरुष समानता, प्रादेशिक असमतोल, अन्याय, असुरक्षिततेची भावना आणि त्या विषण्णतेतून, व्यवस्थेविरुद्ध जाण्यास उद्युक्त होणारे समाजमन याची हलकीफुलकी चिकित्साही यात आढळते.
कॉलेज कॅम्पस, मुलींवरील अश्लील शेरेबाजी, जीव मुठीत घेऊन वावरणाऱ्या महाराष्ट्रीय मुली तर काहीशा बोल्ड परप्रांतीय मुली, कँटिनवाला अण्णा, हॉस्टेलचा ‘ई’ ब्लॉकचा माहोल, परीक्षेतील पळवाटा, लेक्चर हॉलमधील इरसाल खोड्या, प्राध्यापकांच्या विविध स्वभावछटा.. तो ‘शॉकप्रूफ’ वायरमन जाधव आणि ‘my eyes have came…’ चे खास शेतकी कॉलेज स्टाइल भाषांतर वाचकाला थेट लेक्चर हॉल मध्येच घेऊन जाते.
विक्या, काक्या, जानकी, निऱ्या, मंग्या, संज्या, पश्या हे सारे जिवलग यार आपल्याही अवती-भोवती वेगवेगळ्या नावाने वावरल्याच्या स्मृती मेंदूच्या खोल तळाशी जाग्या होतात.
जानकी सोबत फुलत जाणाऱ्या उत्कट, अनावर तरल प्रेम भावनेची हुरहुर… वाचकाच्या हृदयाच्या तारा छेडल्याशिवाय राहत नाही.
कोणत्याही मोठ्या महाविद्यालय, विद्यापीठ कॅम्पस, वसतिगृहाच्या प्रातिनिधिक कॅनव्हासवर ही कादंबरी अवतरते. महाविद्यालयीन तरुणाईचा मनोवैज्ञानिक अंगाने घेतलेला वेध फार प्रातिनिधीक आहे. तरुणाईच्या अवखळपणाचे साहचर्याचे गुण-अवगुण अंगाखांद्यावर खेळवत मित्र-मैत्रिणींच्या सहवासातला नायक काहीसा खुल्या विचारांचा… वास्तवाला भिडणारा आहे.
सुरुवातीला हॉस्टेल, कॉलेज लाइफची दैनंदिनी वाटणारी ही साहित्यकृती, प्रवाहीपणात प्रादेशिक सीमा ओलांडून..आशयघनतेकडे कधी घेऊन जाते ते लक्षातही येत नाही. कादंबरीचा विस्तारणारा कॅनव्हास जेव्हा प्रादेशिक राष्ट्रीय समस्यांशी भिडतो अन् जळजळीत वास्तवाच्या भीषण दर्शनाने वाचक अक्षरशः सुन्न होतो.
कादंबरीची ही नशा वाचकाला अक्षरशः चढते. वाचतानाची झिंग आणि नंतरचा हँगओव्हर. या मध्ये मन बराच काळ घुटमळत राहते.
उच्छृंखलता, उथळपणा, थिल्लरपणा, उन्माद, विवेकहीनतेच्या पार्श्वभूमीवर बेदरकार बिनधास्त डॅशिंग, कधी रोमँटिक.. मोरपंखी तरल भावविश्वात रमणारा तर कधी घनगंभीर गूढरम्यतेत निमग्न होणाऱ्या नायकाचे हे व्यामिश्र भावविश्व, वाचकाशी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर ‘रिलेट’ होते. इतके की, त्यातील घनगंभीर गूढरम्यताही त्याला ‘ग्रेस’फूली भिडते. आणि वाचकालाही आपली कथा वाटते.
मध्येच काही ठिकाणी हे कादंबरी कथानक आत्मकथनाच्या “स्वगता”त गेल्यासारखे वाटते …पण येथेही ते ‘सत्याच्या प्रयोगा’ची उंची गाठते आणि त्यातील साहित्यमूल्य वृद्धिंगतच होते.
काही ठिकाणी प्रमाणभाषेशी फारकत घेतल्यामुळे नागर, पांढरपेशा वर्गालाही सैलसर, ढिसाळ शब्दरचना खटकण्याची शक्यता आहे. पण याच ‘ढिसाळ’ रचनेकडे ‘नामदेव ढसाळ’ दृष्टीने पाहिले की त्यातील सच्चेपणा आणि वास्तवाला भिडण्याची वृत्ती मनाला भावते. कारण हीच तर या हॉस्टेल संस्कृतीचे वास्तव आहे.
या बेधुंद तरुणाईच्या कथानकात विषमतेची तिडीक आहे, व्यवस्थेविरोधातला रोष आहे. सोबत उत्कट तरल प्रेमभावनेची हुरहूर आहे. कल्पना रम्यता आहे. तारुण्यातील अचाट साहसाचा थरार आहे. मानव्याचा हुंकार आहे. निर्व्याज मैत्रीचा सेतू आहे, विविध विचारधारांची ‘इझम’ची वेधक गुंफण आहे. भावनांनी ओथंबलेली हृदय आरपार चिरणारी गंभीर गूढरम्यता आहे. भावविवशतेच्या चरकात पिळून निघणारा ‘अहं ..ब्रह्मास्मी’चा अनाहत नाद आहे.
म्हणूनच रुढ प्रस्थापित वाड्मयीन मूल्यांचे मापदंड, निकष तोडून, अनुभवाशी आणि कथानकाशी प्रामाणिक राहणारी ही कलाकृती मनाला भावते.
मानवी आयुष्याला रिटेक नसतो हे तत्त्वज्ञान मिथक वाटावे. इतक्या सशक्त ताकदीचे हे ‘झेंगट’चे ‘टाइम मशीन’ प्रत्येकाने अनुभवावे असेच आहे.
सुजाण पालक, युवक आणि सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्राविषयी आस्था, रुची असणाऱ्या प्रत्येकाने ही कलाकृती जरूर अनुभवावी म्हणजे व्यवस्थेविषयीचा त्यांचा ‘शहामृगी पवित्रा’ गळून पडल्याशिवाय राहणार नाही.
‘राजहंसी’ डौल सांभाळत मुखपृष्ठापासूनच विलक्षण उत्सुकता चाळवणारी ही तुमची आमची कथा, शेवटाला मात्र वाचकाला एक अनामिक हुरहूर, चटका लावून जाते.
झेंगट
सुशील गायकवाड
राजहंस प्रकाशन
COMMENTS