पंतप्रधान तुरुंगाच्या वाटेवर…

पंतप्रधान तुरुंगाच्या वाटेवर…

भारताचे विद्यमान परदेशी मित्र एका मागोमाग एक न्यायालयं आणि चौकशीच्या फेऱ्यात सापडत आहेत. ट्रंप त्या वाटेवरचे आगेवान. आगेवान हा शब्द गुजराती भाषेतला. पुढे चालणारा, आघाडीवर असणारा तो आगेवान. ट्रंप यांच्या कोटाचा मागचा भाग धरून नेतान्याहूंची जोरदार वाटचाल चाललीय.

कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ
आनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे?
भीमा-कोरेगाव : ९ कार्यकर्त्यांवर स्पायवेअरचा हल्ला!

इस्रायलचे अॅटर्नी जनरल अविचाई मँडलब्लिट यांनी नेतान्याहू यांच्या विरोधातला भ्रष्टाचाराचा लोंबत पडलेला खटला चालवायला घेतला आहे.

नेतान्याहू यांच्यावर एक आरोप आहे तो हॉलीवूड मोगल अरनॉन मिलचन यांना अधिक काळ इस्रायलमधे रहाता यावं यासाठी इस्रायलचा व्हिसा  वाढवून देण्यासाठी अमेरिकन सरकारवर दबाव आणणं. तशी विनंती नेतान्याहू यांनी तत्कालीन अमेरिकन  परदेश मंत्री केरी यांना केली. दीर्घ काळ मिलचन इस्रायलमधे मुक्कामाला असत, दीर्घ काळ त्यांनी इस्रायलमधलं वास्तव्य वाढवण्यासाठी खटपट केली. त्या काळात  मिलचन नेतान्याहूंना बेश कीमती वाईन, सिगार आणि दागिने देत होते. कधी तरी वाढदिवस किंवा तत्सम प्रसंगी दिलेली भेटवस्तू असं या महाग किमतीच्या वस्तूंचं रूप नव्हतं. या वस्तू ठरवून, आखून, सतत दिल्या जात होत्या. तसंच मिलचन यांना त्यांनी इस्रायलमधे केलेल्या आर्थिक उद्योगांवरच्या करांतून सवलती देणं आणि त्या बदल्यात पैसे घेणं असाही आरोप आहे.

मिलचन यांची गुंचवणूतक टीव्ही वाहिन्यांमधे होती. त्यांची गुंतवणूक असलेल्या वाहिन्यांचं एकीकरण करण्यासाठी नेतान्याहू यांनी दबाव आणला. त्या बदल्यात नेतान्याहू यांनी त्यांच्या बाजूनं वाहिन्यांनी बातम्या द्याव्यात अशी मागणी केली. माझ्या बाजूनं बातम्या दिल्यात तर तुम्हाला फायदे देईन अशी ही रदबदली होती.

मिलचन यांनी रतन टाटा यांच्या सोबत एक मुक्त व्यापार विभाग उघडायचं ठरवलं होतं. हा विभाग जॉर्डन आणि इस्रायलच्या सीमेवर व्हायचा होता. टाटा आणि मिलचन यांना त्या प्रकल्पातून भरमसाठ फायदा मिळणार होता. हा प्रकल्प इस्रायलच्या सुरक्षेच्या हिशोबात धोक्याचा होता. तसंच हा प्रकल्प उभारला जावा यासाठी लागणारी सुरक्षा व्यवस्था इस्रायल सरकार करणार होतं आणि त्यावर कायच्या कायच खर्च होणार होता. थोडक्यात असं की मिलचनचा प्रकल्प होण्यासाठी सरकार पैसे खर्च करणार होतं. पोलीस आणि संरक्षण विभाग, दोघांनीही या प्रकल्पाला आक्षेप घेतला होता.

इस्रायलमधे येडियोथ आरोनोथ आणि इस्रायल हायोम या दोन पेपरांत स्पर्धा असते. नेतान्याहू आणि आरोनोथचा मालक मोझेस  यांनी केलेल्या चर्चांचं रेकॉर्डिंग पोलिसांकडं आहे. या बोलण्यामधे नेतान्याहू यानी मोझेस यांना वचन दिलं की नेतान्याहू प्रतिस्पर्धी पेपरची वाट लावायला मदत करतील त्या बदल्यात मोझेस यांनी नेतान्याहू यांच्या बाजूनं मजकूर प्रसिद्ध करायचा. इस्रायल हायोम हा पेपर लोकांना फुकट वाटला जात असे. नेतान्याहूनी संसदेत एक कायदा करून पेपरच्या मोफत वाटण्याला बंदी घातली. त्या पेपरची रविवार पुरवणी नेतान्याहू यांच्यावर टीका करत असे. नेतान्याहू यांनी त्या साप्ताहिक पुरवणीवर बंदी घातली.

इस्रायलमधे वाल्ला नावाचं एक न्यूज चॅनेल आहे. त्या चॅनेलचा मालक आहे बेझेक. बेझेकनं येस नावाचं एक सॅटेलाईट चॅनेल विकत घेतलं. नेतान्याहू यांनी त्या व्यवहाराला वाट वाकडी करून मदत केली. या मदतीची फळं नेतान्याहू याना मिळाली. बेझेकच्या कंपनीतले सर्वात मोठे भागधारक आणि पार्टनर एलोविच हे नेतान्याहू यांचे दोस्त. नेतान्याहू आणि एलोविच जवळ जवळ दररोज एकमेकांशी बोलत. वाल्ला चॅनेलवर कोणत्या आणि कोणाच्या बातम्या याव्यात, कोणत्या आणि कोणाच्या बातम्या येऊ नयेत या सूचना नेतान्याहू एलोविचला करत. वाल्ला वाहिनीवर कोणते बातमीदार, संपादक असावेत हेही नेतान्याहू ठरवत. थोडक्यात असं की वाल्ला हे चॅनल नेतान्याहू यांनी ताब्यातच घेतलं होतं.

वरील सर्व उद्योगात इस्रायलचे कम्युनिकेश डायरेक्टर जनरल श्लोमो फिल्बर आणि मिडिया सल्लागार नीर हेफेझ यांनी मदत केली होती. या दोघांनी आपण केलेल्या उद्योगांची कबुली पोलिसांना दिली. आरोपांची चौकशी पोलिस करू लागले, जाबजबाब घेऊ लागले, पुरावे गोळा करू लागले तेव्हां एलोविच आणि त्यांची पत्नी इरिस यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणला आणि त्यांना लाच दिली.

आणखी एक लाचबाजीचं प्रकरण. इस्रायलच्या नाविक दलासाठी पाणबुड्या खरेदी करायच्या होत्या. संरक्षण दलाची खरेदी पद्धत दूर सारून, टेंडर न काढता एका कंपनीला कंत्राट देण्यात आलं. या व्यवहारात नेतान्याहू यांच्या भावाला भरपूर कमीशन मिळालं. इस्रायलच्या संरक्षण खात्यानं या व्यवहाराला आक्षेप घेतला होता.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या आधीच नेतान्याहू यांच्यावर वरील आरोप आणि कोट्यावधींची लाच घेण्याचा आरोप पोलिसांनी केला होता. साक्षी आणि पुरावे पाहून कोर्टानं निकाल निश्चित केला होता. फक्त नेतान्याहू यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निकाल जाहीर व्हायचा होता. नेतान्याहू कोर्टासमोर गेले नाहीत, त्यांनी पोलिस आणि न्यायखात्यातर्फे  अटर्नी जनरलवर दबाव आणला.  निकाल लांबवावा  (नेतान्याहू यांना निर्दोष ठरवावं?) असा त्यांचा प्रयत्न होता. नेतान्याहू यांनी कोर्टावर आणि पोलिसांवरच आरोप केला की निवडणुकीत पराजय व्हावा यासाठी रचलेलं ते कारस्थान आहे. इतकी राळ उडवली की खटल्याचं काम रेंगाळलं.

आता निरंकुष सत्तेसाठी आवश्यक मतं न मिळाल्यानं नेतान्याहू आघाडी सरकार तयार करण्याच्या बेतात असताना त्यांच्यावरचा खटला चालवायचा निर्णय अॅटर्नी जनरलनी गांधी जयंतीच्या दिवशी, २ ऑक्टोबरला, घेतला.

गंमत अशी की सुनावणीची तारीख ज्यूंच्या मिच्छामी दुक्कडम सप्ताहात येते. रोश हाशना ते यॉम किप्पूर या सणांच्या मधला काळ हा ज्यू माणसानं आपण केलेल्या चुका-गुन्हे इत्यादींवर आत्मचिंतन करून माफी मागावी, पश्चात्ताप व्यक्त करावा यासाठी योजलेला आहे.

नेतान्याहूना पश्चात्ताप होईल, ते आत्मनिरीक्षण करतील याची शक्यता कमी आहे. कारण त्यांच्यावर झालेले आरोप आणि दाखल झालेला खटला याबद्दल त्यांनी जाहीर भूमिका घेतली आहे. टेलिविजनवर त्यांनी दिलेली जाहीर प्रतिक्रिया अशी ” माध्यमं, डावे यांच्या अमानुष दबावाखाली मँडलब्लिट वाकले आहेत.”

दाट शक्यता आहे की नेतान्याहू दोषी ठरतील, त्याना तुरुंगवासाची शिक्षा होईल.

न्यायालयावर दबाव आणणं, न्यायालयीन प्रक्रियेत अडथळे निर्माण करणं असही नेतान्याहू प्रकरणाचं स्वरूप आहे. अगदी तंतोतंत ट्रंप प्रकरणच आहे, फक्त ट्रंप यांच्या जागी नेतान्याहू यांचं नाव टाकायचं.

आपल्याला सत्ता मिळावी यासाठी काहीही. त्यासाठी लोकशाही संस्थाही मोडून टाकायच्या.

मँडलब्लिट यांचा निकाल बाहेर येईल. नंतर प्रकरण वरच्या कोर्टात जाईल. तिथं निकाल होईल त्यानंतरच नेतान्याहू यांना पद सोडावं लागेल. तो पर्यंत ते आरोपांचा चिखल कपड्यांवर बाळगत सत्तेवर राहू शकतात. इस्रायलच्या इतिहासात पदावर असलेल्या पंतप्रधानावर भ्रष्टाचाराचा खटला चालणं (कदाचित आरोप सिद्ध होणं ) पहिल्यांदाच घडणार आहे.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0