मोठ्या नैसर्गिक आपत्ती किंवा स्थित्यंतरांनंतर निसर्गातले घटक- झाडे, प्राणी, पक्षी पुन्हा नव्या जोमाने आयुष्य सुरू करतात, निसर्गचक्र चालू राहते. आपणही त्याच निसर्गचक्राचा भाग आहोत ही जाणीव “सर्व काही सुरळीत चालू आहे/ होईल” हा विश्वास देऊन जाते.
गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इतर अनेकांसारखेच माझेही आयुष्य बदलून गेले. निमित्त अर्थातच कोरोना विषाणूने जगभर केलेल्या हाहाकाराचे!
कोरोना हा कोण कुठला विषाणू, कसा पसरतो माहिती नाही, तो आपल्यापर्यंत पोचेल का, आपण सगळे घरात कोंडून घेऊन किती उपयोग होईल, किती दिवस घरात बसायचे, अजिबात बाहेर पडायचे नाही तर घरात पुरेसे धान्य, वस्तू यांचा साठा आहे का या आणि अशा असंख्य शंका, कल्पना, शक्यता, व्यवस्था, खरेदी यांच्या धामधुमीत २०२०च्या लॉकडाउनच्या आधीचा दिवस गेला. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरीही अजून खूप उलथापालथ घडणार आहे याची पुरेशी जाणीवही झाली नव्हती. झोप कधी लागली हे सांगता येणार नाही पण सकाळी डोळे उघडता उघडता पहिली जाणीव झाली ती बाहेरच्या शांततेची, मग पूर्वी कधीही न जाणवलेले पक्ष्यांचे आवाज- काही ओळखीचे काही अनोळखी. आपल्या घराच्या आजूबाजूला इतके पक्षी आहेत? आपल्या कधीच लक्षात कसे आले नाही? आज उठायची घाई नाही, आवरून धावतपळत काम गाठायचे नाही, मुलांच्या शाळा नाहीत या काहीशा सुखद जाणिवेनी मी उठायची घाई केली नाही. कदाचित पहिल्यांदाच खिडकीबाहेरच्या आवाजांकडे इतके लक्ष द्यायला वेळ मिळाला. एक अनोळखी पण अतिशय सुरेल शीळ कुठल्या पक्ष्याची असेल या उत्सुकतेने खिडकीबाहेरच्या झाडाकडे नजर गेली. नेहमी हिरव्या पानांनी झाकलेल्या त्या झाडाच्या कुठल्यातरी फांदीवर, पानाआड बसून गाणारा तो छोटा पक्षी काही मला दिसला नाही. पण दिवसाची इतकी सुंदर सुरुवात रोज होणार असेल तर घरात कोंडून बसणे फार अवघड जाणार नाही हा विचार मात्र नक्की मनात येऊन गेला. त्या दिवशी सकाळी मी घरातूनच फक्त चिमण्या, कावळे, कबुतरच नाही तर पोपट, साळुंक्या, बुलबुल, खारी सगळीकडे मुक्त संचार करताना पाहिल्या. त्या सुरेल शीळ घालणाऱ्या पक्ष्याचे नाव ‘दयाळ’ आहे हे ही शोधून काढले. अनेक नवीन पक्ष्याचे आवाज माझी उत्सुकता वाढवून गेले. बांधकामाची यंत्रे, ठाकठोक, गाड्यांचे आवाज, जोरजोरात लावलेले संगीत, गजरांचे, घरातल्या भांड्यांचे आवाज यांच्या गदारोळात एरवी लुप्त होणारे हे पशुपक्ष्यांचे आवाज मला घराच्या इतक्या जवळ नव्यानेच जाणवत होते.
मी संशोधनाच्या निमित्ताने गेली काही वर्ष, दर महिन्याला कमीतकमी ३-४ दिवस शहरी गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात जाते. त्यामुळे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आवाजातला फरक माझ्या चांगलाच परिचयाचा आहे. मानवनिर्मित आवाजांनी थोडी सुट्टी घेताच निसर्गातले आवाज शहरातही पुन्हा सहजपणे कानावर पडत होते. मी निसर्गाला भेटायला जाऊ शकत नाही म्हणून त्यानीच माझ्याकडे धाव घेतली होती. ग्रामीण आणि वन्य प्रदेशात जवळून अनुभवायला मिळणारे निसर्गाचे चक्र हा एक अनोखा अनुभव असतो. निदान महिन्यातून काही दिवस अनुभवायला मिळणारे हे निसर्गाचे सानिध्य लॉकडाऊनमध्ये गमवावे लागणार, संशोधनाचे कामही थांबणार या विचारांनी मी सुरुवातीला जरा चिंतेतच पडले होते. पण लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी सकाळी माझ्या कानावर पडलेल्या दयाळ पक्ष्याच्या शीळेनी मनाला एकदम तरतरी आली. शहरातल्या गजबजाटात आपण काय हरवून बसलो आहे याची लख्ख जाणीव एकदम त्या सकाळच्या पक्ष्यांच्या आवाजांनी करून दिली!
पुढच्या काही महिन्यात माझे लक्ष मी हळूहळू घरातल्या कामाबरोबरच घरातल्या आणि अवतीभोवतीच्या झाडांकडेही वळवले. या घरी राहायला आल्यापासून पहिल्यांदाच लक्षात आले की सकाळचे ऊन एका गॅलरीमध्ये दोनच तास टिकते, तर दुसऱ्या गॅलरीमध्ये दुपारी बारानंतर पोचते पण सूर्यास्तापर्यंत टिकते. मग कुंड्यांची योग्य तिथे हलवाहलवी केल्यावर माझी झाडे अजूनच छान तरारली. गॅलरीमधल्या झाडांची संख्याही वाढायला लागली. मग रोज सकाळी उठून आजूबाजूच्या झाडावर मुक्तपणे वावरणारे पक्षी, खारी बघणे, त्यांच्या मजेदार हालचाली, खाणे शोधण्यासाठी, मिळवण्यासाठी चालणारी भांडणे बघणे, समोरच्या झाडांवर, तारांवर सफाईने झोके घेणारे पण मधूनच कर्कश्श आवाज काढणारे पोपटांचे थवे मोजणे, पक्ष्यांच्या आवाजावरून त्यांच्या जाती ओळखणे, नोंदवून ठेवणे, गॅलरीमधल्या झाडांची काळजी घेणे, हा एक मोठा विरंगुळा आणि दिलासा होऊन बसला.
निसर्गाशी जोडलेले नाते मी घरबसल्या शक्य तितके जपायचा प्रयत्न करत होते आणि बाहेर मात्र–लॉकडाऊनचे दिवस उलटत गेले, स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलिस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी यांच्या प्रयत्नांना हुलकावणी देऊन रुग्णांची संख्या वाढत गेली, कोरोनाच्या विषाणूचे सावट अधिकाधिक गडद होऊ लागले. रोज कानावर येणारे रुग्णांचे वाढते आकडे, रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचे भीतीचे, काळजीचे सावट, घरात कोंडून राहिलेल्या किंवा आपापल्या गावी निघालेल्या कष्टकऱ्यांचे हाल, यांच्या बातम्या वाढत गेल्या तसे मनावरचे दडपणही वाढत गेले. मनात धास्ती घेऊन आठवड्यातून एकदा घराबाहेर पडायचे आणि भाजी, किराणा, जीवनावश्यक गोष्टी घेऊन आपल्याला संसर्ग होणार नाही ना या विचाराने जीव मुठीत धरून लगेच घरी परतायचे असे चित्र सगळीकडे दिसायला लागले. काही दिवसात लॉकडाऊन संपेल, सगळे पुन्हा जसेच्या तसे होईल ही शक्यता (की आशा?) हळूहळू मावळायला लागली.
प्रत्यक्ष निसर्ग सानिध्यात जाऊन करण्यासारखे संशोधनाचे काम बंद असल्याने मला फारच चुकल्याचुकल्या सारखे वाटत होते. आता अध्यापन, चर्चासत्रे, विविध कार्यक्रम, सगळेच आभासी पद्धतीने चालू होते. मग निसर्गाशी नाते जोडून ठेवण्यासाठी काही परिचितांनी अजून एक उत्तम युक्ती काढली. पुण्यात पर्यावरण विषयाबद्दल काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. त्यातील काही निसर्गप्रेमी व्यक्तींनी एकत्र येऊन (आभासी पद्धतीनेच हं) ‘निसर्ग भेट’ (Date with Nature) या नावाने एक सुंदर उपक्रम सुरू केला. यामध्ये ज्यांना निसर्गाची, साहित्याची आवड आहे अशांनी दर महिन्याला एक दिवस निसर्गाशी संबंधित एक विषय ठरवून त्याबद्दल वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेले निबंध, कथा, कविता, ब्लॉग, कादंबरीतील उतारे, तज्ज्ञांचे माहितीपूर्ण लेख असे अनेकविध साहित्य सादर करायचे. थोडक्यात निसर्गाची भेट दर्जेदार साहित्यातून घ्यायची. या उपक्रमातून भारतीय आणि अ-भारतीय भाषांमधल्या अनेक परिचित, अ-परिचित साहित्यिकांच्या कलाकृतींमधून आम्हाला निसर्ग भेटला. जंगल, वाळवंट, नद्या, समुद्र, पर्वत, निसर्ग आणि माणसांमधले अनेकरंगी संबंध असे विषय निवडून दर महिन्याला आम्ही आमच्या घरात बसूनच जगभर फेरफटका मारून येत होतो. हाती असणाऱ्या वेळात निसर्ग आणि माणसातले बहुपेडी नाते समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो.
या उपक्रमाच्या निमित्ताने निसर्गाबद्दल खूप वाचन आणि चिंतनही झाले. त्यात असे लक्षात आले की पृथ्वीवरच्या जीवसृष्टीने अनेक भयंकर संकटे, स्थित्यंतरे अनुभवली आहेत. मोठी वादळे, ज्वालामुखीचे उद्रेक, भूकंप, भयानक पूर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत इथले प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती लाखो वर्ष निसर्गाशी जुळवून घेत तगून राहिल्या आहेत. मनुष्यजातीनेही अत्यंत प्रतिकूल हवामान, महाभयंकर नैसर्गिक आपत्ती, रोगराई अशा संकटांचा सामना करत जगभर आपले पाय रोवले आहेत. केवळ नैसर्गिक आपत्तीच नव्हे तर जागतिक महायुद्धे, अणुविस्फोट, चेर्नोबिलच्या अणुभट्टीतून झालेला भयंकर किरणोत्सर्ग, भोपाळच्या वायू गळतीसारख्या दुर्घटना अशा मानवनिर्मित आपत्तींनासुद्धा अनेकदा स्थानिक आणि जागतिक पातळीवर माणसाने आणि निसर्गानेही तोंड दिले आहे. अशा आपत्तींमध्ये फक्त माणसांचीच हानी होते असे नाही तर तिथल्या निसर्गाचीही अपरिमित हानी होते. पण अशा प्रत्येक घटनेनंतर तिथे काही काळाने का होईना निसर्ग पुन्हा बहरतो. बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेत गवताची मुळे हळू हळू तग धरतात, कृमी-कीटक परत येतात, त्यांना खायला सरडे, पक्षी परततात, झाडांना पुन्हा पालवी फुटते, वेली वाढतात. निसर्गाचे चक्र हळूहळू पुन्हा मूळ पदावर येते. माणूस हा निसर्गचक्राचाच भाग आहे. यंत्रे, तंत्रज्ञान, भौतिक विकास हे मनुष्याच्या कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेचे फलित असले तरी भौतिक विकासाचा सगळा डोलारा नैसर्गिक संसाधनांवरच उभा आहे. निसर्ग आणि नैसर्गिक संसाधने आपण विवेकाने वापरली, जपून ठेवली तरच माणसांचे अस्तित्व सुरक्षित राहील. भौतिक प्रगतीमुळे, वेगवान जगण्यामुळे शब्दशः “दृष्टीआड सृष्टी” अशी माणसांची अवस्था आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे एकंदर दैनंदिन जगण्याचा पुनर्विचार करायला अनेकांना भाग पडले. मोठी घरे, गाड्या, पैसे, चैनीच्या वस्तू, दागिने, अद्ययावत तंत्रज्ञान, उपकरणे या प्रगतीच्या आणि यशाच्या मापदंडांपलीकडे जगण्याची समृद्धी, समाधान कशाने वाढते याचा विचार करायला लावला. अनेकांना उत्तम आरोग्य आणि मोकळा श्वास घेता येण्याची ‘चैन’ करता येईल का हे ‘कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे’ या चैनीपेक्षा महत्त्वाचे वाटू लागले. घरात बंद झालो आहे या जाणिवेने येणाऱ्या अस्वस्थतेमुळे म्हणा किंवा उपलब्ध असलेल्या थोड्या सवडीमुळे म्हणा-अनेकांनी पहिल्यांदाच आपापल्या घराच्या चौकटीतून का होईना बाहेरच्या निसर्गाकडे पाहिले. कुणाला पहिल्यांदाच आपल्या घराभोवती झाडे आहेत हे दिसले, त्यांना फुटणारी कोवळी पालवी लक्षात आली. अनेकांना पक्षी निरीक्षणाची गोडी लागली.
नव्या परिस्थितीशी ‘जुळवून घेण्यात’ एक वर्ष उलटले तरी अजून जगभर कोरोनामुळे होत असलेली उलथापालथ संपलीच नव्हती. म्हणता म्हणता फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊन थडकली. काय काय घडले नाही या वर्षात- लोक स्वेच्छेने, भीतीने, जबरदस्तीने कधी नाईलाज म्हणून घरी बसले, अनेकांच्या घराला या विषाणूने भेट दिली, आप्त – स्वकीयांना ओढून नेले, कोणाला थोडे घाबरवून मग बरे केले, कुणाचे नोकरी व्यवसाय बंद झाले, बुडाले, अपरिमित नुकसान झाले, कोणी कसेबसे तगून राहिले. सगळे परत घरात चिडीचूप बसले होते. खिडकीतून हिरवीगार दिसणाऱ्या झाडांची पाने मागच्या मे महिन्याप्रमाणेच एव्हाना गळून गेली. झाडांचे खराटे भकास दिसायला लागले. दिवस चांगलेच तापायला लागले. दुपारचे कडकडीत ऊन आणि चिडीचूप झालेला निसर्ग बघून मनावरही मरगळ चढायला लागली. धास्ती, काळजी, शंका, नैराश्य, चिडचिड, एकाकीपणा अशा अनेक नकारात्मक भावनांनी आजूबाजूची माणसे घेरली गेली आहेत हे जाणवायला लागले. आजारपण, आर्थिक अडचणी, भीती, नैराश्य अशा परिस्थितीने घेरलेल्या नातेवाईक, जिवलग, शेजारी यांना प्रत्यक्ष मदत करायला जाण्यावरही अनेक बंधने आली. अशा नैराश्यपूर्ण वातावरणात मी जवळ जवळ महिन्याभरानी खरेदीसाठी सज्ज होऊन घराबाहेर पडले. वाहने आणि माणसांअभावी अतिशय एकाकी वाटणाऱ्या रस्त्यावरून चालत जायला कसेसेच वाटत होते. मुखवस्त्र बाजूला करून मोकळी हवा श्वासात भरून घ्यावीशी वाटत होती. संशोधन प्रकल्पाच्या कामासाठी जाते त्या जागी आत्ता काय अवस्था असेल, तिथला परिचयाचा झालेला परिसर, पक्षी, झाडे कशी असतील, तिथे भेट देऊन एक वर्ष होते आले असे विचार मनात घोळवत एक एक पाऊल उचलत होते. भगभगीत ऊन आणि शुष्क झाडे डोळ्यांना खुपत होती. या तंद्रीत थोडे अंतर चालून गेल्यावर अचानक समोर आला तो संपूर्ण बहरलेला बहावा! झाडावर एकही पान शिल्लक नव्हते तरी त्याच्या प्रत्येक काठीवर झुलत होते भडक पिवळे – खरेतर सोनेरीच- फुलांचे घोस आणि झाडाखाली पडलेला नाजूक पाकळ्यांचा सडा! हे दृश्यच इतके विलोभनीय होते की मी सगळ्या चिंता, भीती, दडपण विसरून चक्क त्या झाडाच्या वैभवाकडे पाहात तिथेच उभी राहिले. कोरोनाने माणसांना लॉकडाऊन मध्ये अडकवले असले तरी निसर्गाला, या झाडाच्या बहराला अशा कडी-कुलुपात कोण ठेवू शकेल? फुलांचे घोस माळून, आलेल्या संकटांना न जुमानता आपल्याच मस्तीत बहरणाऱ्या त्या सोनेरी वैभवाने माझ्या मनातला अंधार एका क्षणात पुसून टाकला. आजूबाजूचा भकास वाटणारा परिसर एकदम उजळून टाकला. झाडावरून लटकणाऱ्या त्या सोनेरी पिवळ्या झुंबरांमध्ये निसर्गातली पुनर्निर्माणाची जादू साकार झाली होती.
मोठ्या नैसर्गिक आपत्ती किंवा स्थित्यंतरांनंतर निसर्गातले घटक- झाडे, प्राणी, पक्षी पुन्हा नव्या जोमाने आयुष्य सुरू करतात, निसर्ग चक्र चालू राहते. आपणही त्याच निसर्ग चक्राचा भाग आहोत. या कोरोनाच्या संकटाशी जुळवून घेत माणसांचे जगणेही पुन्हा सुरळीत चालू आहे/ होईल ही जाणीव, हा विश्वास तो बहरात आलेला बहावा देऊन गेला. माझ्या मनात नकळत सुधीर मोघे यांच्या प्रसिद्ध गाण्याचे शब्द उमटले-
एकाच या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी
डॉ. धनश्री परांजपे, निसर्ग अभ्यासक आहेत. वन्य जीव आणि माणसे यांच्यातले तणावपूर्ण तसेच मैत्रीपूर्ण संबंध आणि या संबंधांचे परस्परांवर होणारे परिणाम यांचा त्या अभ्यास करतात.
ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहिण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.
NatureNotes
COMMENTS