मर्यांदासह ‘भुरा’ मराठीतील महत्वाचं आत्मकथन

मर्यांदासह ‘भुरा’ मराठीतील महत्वाचं आत्मकथन

माणूस आत्मकथन आयुष्याचा बराच भाग वगळून सांगत असतो. किंवा एक विशिष्ट प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यातील एक विशिष्ट भाग उचलून सांगत असतो. आत्मकथनात त्या व्यक्तीचे समग्र आयुष्य क्वचितच प्रतिबिंबीत होत असेल. प्रा. शरद बाविस्कर यांच्या ‘भुरा’ या आत्मकथनावरचे टिपण.

३० उद्योजकांनी थकवले २.८६ लाख कोटी रु.चे कर्ज
दक्षिणेतील मुस्लिम राजवटींचे उदारत्व
लॉकडाऊनमध्ये देवेगौडांच्या नातवाचे लग्न

माझ्या मर्यादित वाचनात मी आत्मकथनं सुद्धा मोजकीच वाचली असतील. त्यामुळे कोणतं आत्मकथन श्रेष्ठ आणि कोणतं दुय्यम आहे या निष्कर्षापर्यंत मी आलेलो नाही. पण, माझी एक समजूत नक्की आहे की माणूस आत्मकथन आयुष्याचा बराच भाग वगळून सांगत असतो. किंवा एक विशिष्ट प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यातील एक विशिष्ट भाग उचलून सांगत असतो. आत्मकथनात त्या व्यक्तीचे समग्र आयुष्य क्वचितच प्रतिबिंबीत होत असेल. अर्थात आयुष्यातल्या सगळ्याच निरर्थक गोष्टीही आत्मकथनात आणायच्या असा माझ्या म्हणण्याचा हेतू नाही. तर आयुष्यात वेगवेगळ्या काळात, परिस्थितीत आपण जगलेल्या परस्परविरोधी किंवा सुसंगत भूमिकांचा आढावा घेणं असा त्याचा अर्थ आहे. पण ते शक्य असतेच असं नाही. त्यामुळे आहे त्या चौकटीत प्रामाणिक आणि प्रांजळपणे व्यक्त होणं गरजेचं असतं.

आपल्या जगण्यातलं दुःख, वाट्याला आलेला संघर्ष, त्यावर केलेली मात हे सगळं लोकांना सांगावं वाटणं, ते इतरांनी समजून घ्यावं आणि त्याचं कौतुक करावं असं वाटणं ही माणसाची नैसर्गिक भावना आहे. बरीच आत्मचरित्रं हेच सांगत असतात. काही आत्मकथनातून स्वतःला उकरण्याचा प्रयत्न असतो. काहींमधून इतर लोकांना, भवतालच्या परिस्थितीला समजून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न असतो. काही आत्मकथनं आपण केलेल्या अवाढव्य कामाचा पट लोकांसमोर मांडून ठेवतात. या सगळ्या प्रकारांचा वेगवेगळा परिणाम वाचणाऱ्याच्या मनावर होत असतो. लिहिणारी व्यक्ती जीवनाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहते, कुठल्या तत्वांचा पुरस्कार करते, स्वःला सोडून इतर माणसांविषयी ती किती संवेदनशील आहे हे पाहणं वाचकासाठी महत्वाचं असतं. आपलं आयुष्य त्याच्याशी ताडून पाहून वाचकाला प्रेरणा, दिलासा, आधार कदाचित मिळू शकतो. कधी वाचकाच्या मनात करुणा उत्पन्न होऊ शकते. अर्थात ते आत्मकथन कशा पद्धतीने लिहिलं गेलं आहे त्यावर ते अवलंबून आहे.

‘भुरा’ हे प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं आत्मकथन नुकतंच वाचलं. ते वाचून ठेवून देणं योग्य वाटलं नाही. त्याविषयी व्यक्त होणं गरजेचं वाटलं. म्हणून हा लिहिण्याचा प्रयत्न.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक शरद बाविस्कर यांचं आत्मकथन काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालं. त्याविषयी सोशल मीडियावर चर्चा वाचली. त्यानंतर डाव्या-आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांच्या बोलावण्यावरून ते औरंगाबादला विद्यापीठात आले. त्यांचं मनोगत नेहमीपेक्षा वेगळं वाटलं, त्यामुळे भुरा विकत घेऊन वाचलं.

भुरा हे शरद बाविस्करांचं लहानपणाचं टोपण नाव. एका अल्पभुधारक कुणबी कुटुंबात जन्मलेल्या भुराचा ‘जेएनयू’सारख्या ख्यातनाम विद्यापीठात प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास यात मांडलेला आहे. वर्गीय विषमेतमुळे साधनांची कमतरता, साधनांच्या कमतरतेमुळे संधीचा अभाव; पुढे जातीय विषमतेचा अनुभव, या सर्व उणीवांशी संघर्ष करत एक मध्यमवर्गीय, सुखवस्तू व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास यात आहे. भारत किंवा महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या वाट्याला हा संघर्ष थोड्याबहुत फरकाने येतोच. मोजकेच लोक असतील की ज्यांच्याकडे भौतिक, सांस्कृतिक संचित असतं. त्यामुळे महाराष्ट्रातील हे प्रातिनिधीक चित्र म्हणावं लागेल. अशा बऱ्याच यशोगाथा मराठीत प्रसिद्ध आहेत. त्या व्यक्तींच्या संघर्षाचं लोकांनी कौतुक केलं आहे. अनेक जण आदर्श म्हणून उभे राहिले आहेत. मग भुरामध्ये वेगळं काय आहे?  हे आत्मकथन एका तत्वज्ञानाच्या प्राध्यापकाचं आहे हेच याचं वेगळेपण आहे. यात घटना, प्रसंग आहेतच. पण, त्या घटनांचं तर्कशुद्ध पद्धतीने चिकित्सक विश्लेषण केलेलं आहे. त्याशिवाय सुद्धा लेखक आपली मतं, दृष्टीकोन वाचकांसमोर मांडतो. त्यामुळे वाचक केवळ घटनांची मालिका अनुभवत नाही, तर लेखक जे तत्वज्ञान सांगू पाहतो त्याचा परिणाम देखील वाचकाच्या मनावर होत राहतो. एकिकडे वाचक आपापल्या अनुभवविश्वानुसार बाविस्करांच्या संघर्षाशी तादात्म्य पावत असेल, दाद देत असेल किंवा हळहळत असेल; तर दुसरीकडे त्यांच्या तात्विक चर्चेशी सहमत होत किंवा प्रतिवाद करत असेल. पण एकूणच पुस्तक वाचताना वाचकाला आपण नेहमीपेक्षा वेगळं, काहीतरी विशेष अनुभवत आहोत असं वाटत राहील हे खरं. आणि हेच भुराचं वैशिष्ट्य आहे.

बाविस्करांनी जागोजाग वेगवेगळ्या तत्वज्ञांचा उल्लेख केला आहे. पण, त्यातही त्यांनी हे ठासून स्पष्ट केलं आहे की फुले – आंबेडकरांच्या विचारांचे ते पाईक आहेत. त्यांच्या विचारांचा दाखला देत धर्म, परंपरांची चिकित्सा ते करतात. समाजातील जातीय – वर्गीय उतरंडीची चिकित्सा करतात. आपल्या कुटुंबाच्या निमित्ताने एकूणच समाजातील शोषित घटकांशी स्वतःला आणि वाचकाला जोडून घेतात. प्रस्थापित मान्यतांना प्रश्न विचारतात. काही वेळा या मान्यतांना धुडकावून लावण्याचा प्रयत्न करतात. आपल्या स्थितीला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थेतील कारणांचा शोध घेतात. व्यवस्थेचं विश्लेषण करतात. त्यामुळे इतर यशोगाथांसारखी ही तितकी व्यक्तीनिष्ठ आत्मकथा नाही. केवळ कष्ट, संघर्ष, जिद्द वगैरेंचा प्रेरक डोस देऊन तरुणांना भुलवणारी ही कथा नाही. ती व्यवस्थेकडेही चिकित्सक पद्धतीने पाहायला लावते. बाविस्कर व्यवस्थेने लावून दिलेली स्पर्धा नाकारतात. ते म्हणतात,  ‘’तुलना आणि स्पर्धा माणसाला प्रयत्नवादी बनवू शकते; पण मला या युक्तीवादात व्यवस्थेची लबाडी दिसत होती, कारण व्यवस्था अशा गोष्टींभोवती स्पर्धा आयोजित करत असते ज्यांचा खऱ्या जीवनाशी दुरूनसुद्धा संबंध नसावा. मग क्षणभंगूर नशेसाठी का जीवाचा आटापीटा करावा?’’ त्यामुळे आत्मकथनातून स्वतःला एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणून उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न नसून, स्वतःच्या निमित्ताने व्यवस्थेसंबंधी मूलभूत प्रश्न उभे करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही.

लेखक जगाविषयी इतका चिकित्सक असल्यामुळे साहजिकच त्यांच्याबद्दल वाचक म्हणून अपेक्षा वाढतात आणि ज्या ठिकाणी हे दिसत नाही तिथला विरोधाभास उठून दिसतो. बऱ्याच ठिकाणी लेखक स्वतःची चिकित्सा करताना दिसत नाही. किंवा थोडक्यात सुटका करून घेताना दिसतो. आयुष्यात सहाय्यभूत होणाऱ्या काही व्यक्तींबद्दल लेखक कृतज्ञता व्यक्त करताना दिसतो. पण, अनेक व्यक्ती या लेखकाच्या अवतार कार्याला पाठिंबा देणाऱ्या दुय्यम व्यक्तीरेखा असल्यासारख्या अवतरतात. विशेषतः स्त्रिया. लेखकाची आई त्याच्या भावविश्वाचा भाग राहिली आहे असं दिसतं. ती सतत त्याला सकारात्मक सल्ले आणि पाठिंबा देत राहते. एका अर्थाने निराशादायक भवतालात लेखकाला आशावादी राहण्यासाठी प्रेरित करणारी ती व्यक्ती आहे. लेखकाला तिच्या कष्टाची जाणीव आहे. तिच्या निमित्ताने तो समाजातल्या सर्व कष्टकरी स्त्रियांच्या जीवनाबद्दल संवेदना व्यक्त करतो. तिच्या जगण्याचं, भावनांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. पण, हेच इतर स्त्रियांबाबत दिसत नाही.

सोनिया ही मुलगी लखनऊमध्ये लेखकाला आवडते. लखनऊ सोडताना ती तिच्या भावना मेसेजद्वारे व्यक्त करते आणि मेसेजद्वारेच त्यांच्यातील संवादाला सुरुवात होते. लेखक याला ऑनलाईन प्रेम म्हणतो. दोघांमध्ये बराच काळ चॅटिंगच्या माध्यमातून संवाद झाला असं लेखक सांगतो. पण, त्याच्या फार खोलात जात नाही. दोघांमधले संबंध कसे होते, कोणत्या प्रकारची देवाणघेवाण दोघांत व्हायची हे काहीही लेखक सांगत नाही. फुले – आंबेडकरांचा अनुयायी असणारा लेखक एका स्त्रीशी असणाऱ्या आपल्या संबंधांचं विश्लेषण करणं गरजेचं समजत नाही. लेखकाच्या म्हणण्यानुसार ते त्याचं पहिलं प्रेम (तेही ऑनलाईन) होतं. त्यामुळे याची चिकित्सा करणं गरजेचं होतं. सोनियासोबतचं प्रेम बराच काळ सुरू होतं असं लेखक म्हणतो हे विशेष. पण, त्या प्रेमातून त्याने काय अनुभवलं हे त्याला सांगावं वाटत नाही. ते गरजेचं वाटत नाही. ‘’लखनऊ ते दिल्ली प्रवास करत असताना माझ्या मनाच्या सर्वात मोठ्या भागात जीवनाच्या अगदी मूलभूत गोष्टींचा विचार चालू होता. त्यामुळे मी माझ्या इतर भावनांना जास्त अवकाश दिला नसावा. त्यामुळे कदाचित सोनियाचा विचार दुय्यम वाटत असावा.’’ असे म्हणून लेखक हा विषय इथेच संपवतो. म्हणजे प्रेम या गोष्टीचा अंतर्भाव जीवनाच्या मूलभूत गोष्टीत होत नाही असं लेखकाचं मत होतं असं म्हणायला हरकत नाही.

त्यानंतर दिल्लीत एका नाईके नावाच्या फ्रेंच मुलीच्या प्रेमात लेखक पडतो. देशाच्या, संस्कृतीच्या सर्व भिंती लंघून दोघे जवळ येतात. ही खंरतर किती सुंदर गोष्ट आहे. लेखक जेव्हा मास्टर्स करण्यासाठी फ्रान्सला जातो तेव्हा नाईके त्याला सर्वोतोपरी मदत करते. तिच्या कुटुंबाचा भाग बनून तो राहतो. लेखकाच्या पाठीचं दुखणं बळावतं, तेव्हा अतिशय प्रेमाने नाईके त्याची काळजी घेते. या प्रेमळ मैत्रिणीसोबतच्या नात्याचा शेवट करण्याचा निर्णय लेखक घेतो. अर्थात नातं संपण्याला आक्षेप नाही. पण, त्यासाठी तो जे कारण देतो ते पचण्यासारखं नाही. लेखक म्हणतो, ‘’मी फ्रेंच नागरिकत्व मिळविण्यासाठी नाईकेसोबत आहे असा अर्थ लोक काढायचे. या आणि अशा अनेक कारणांमुळे मला वाटलं की, पुढचा प्रवास मी एकट्यानेच करायला पाहिजे. आपली दुःखं एकट्याने जगायची असतात. कारण तसं जगणं जास्त सन्मानाचं असतं.’’ हा एकतर्फी निर्णय लेखक घेऊन टाकतो. अशा अनेक ‘ कारणांमध्ये कुठली कारणं आहेत ते सांगत नाही. आपली दुःखं एकट्यानेच जगायची असतात असं बोलून स्वतः धिरोदात्त आणि स्वाभिमानी असल्याचं लेखक भासवतो. म्हणजे याचा अर्थ असा की मैत्रिण फक्त स्वतःचा दुःखाचा गाडा ओढण्यासाठीच होती का? असा प्रश्न निर्माण होतो. तिला त्याच्याकडून सुख हवं असेल तर काय? याचा विचार लेखक करताना दिसत नाही. ती जबाबदारी तो घेत नाही.

तिसरी स्त्री आहे लेखकाची पत्नी सुरभी. जेव्हा आई लग्नासाठी तगादा लावते तेव्हा लेखक ३१६ व्या पानावर सुरभीचा उल्लेख करतो. अॅमिटी विद्यापीठात अध्यापनाचं काम करत असताना लेखकाला सुरभी भेटते. अॅमिटी विद्यापीठातील मुलाखतीचं, तेथील वातावरणाचं लेखकाने फार सविस्तर वर्णन केलं आहे. पण, त्या सगळ्या वर्णनात सुरभीचा उल्लेख कुठेही नाही. जेव्हा लेखक सुरभीविषयी सांगायला लागतो तेव्हा तिच्या सौंदर्याची तारीफ करतो. बाईविषयीचं ‘आकर्षण’ या एका शब्दाचं सविस्तर विश्लेषण करतो. पण, मैत्री – प्रेम याविषयी काहीही भाष्य करत नाही. सुरभीतील विशेष गुण सांगताना तो तिच्या विनोदबुद्धीचं कौतुक करतो. ज्या मुलीशी लेखक लग्न करण्याचा निर्णय घेतो तिच्याविषयी, तिच्यासोबतच्या नात्याविषयी फार शब्द खर्ची घालण्यास तो अनुत्सुक दिसतो. आपलं आत्मकथन आईच्याच वाक्याने संपवणारा लेखक पत्नीची व्यक्तिरेखा उभी करणं गरजेचं समजत नाही. लेखक फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे. पण, आयुष्यात आलेल्या स्त्रियांविषयी फार बोलण्यास उत्सूक नाही. लेखकाला प्रेम ही भावना मूलभूत वाटत नाही. बाकी सर्व गोष्टींची बारकाईने चिकित्सा करणारा लेखक या विषयांवर शॉर्ट कट मारतो. हा मोठा विरोधाभास खड्यासारखा रुततो.

लेखक समाजातील शोषण, विषमता याविषयी मतं नोंदवतो. पण, याविरुद्ध चालू असणाऱ्या कुठल्याही चळवळीपासून स्वतःला अलिप्त ठेवतो. ‘जेएनयू’सारख्या विद्यापीठात जाऊन सुद्धा लेखक चळवळींच्या प्रत्यक्ष घडामोडींपासून अंतर ठेवून राहतो. एका डाव्या विद्यार्थी संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अर्धवटपणाचा शिक्का मारतो. विशेष म्हणजे तेव्हा लेखक स्वतः शिकण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे समोरील कार्यकर्ता परिपूर्ण असेल अशी अपेक्षा लेखक कशी ठेवू शकतो?  लेखक म्हणतो, ‘’एका डाव्या विचारसरणीच्या उच्चभ्रू विद्यार्थ्याने शेतकऱ्यांचं शोषण काय असतं हे सांगताना त्याचं नेतेपण माझ्यावर लादण्याचा प्रयत्न केला होता. ज्या व्यक्तीने कधी शेती पाहिली नसेल अशी व्यक्ती मला शेतकऱ्यांची पिळवणूक काय असते ते स्टीफनीयन इंग्रजीत समजावून सांगत होती. तेव्हाच मला शंका आली की मार्क्सविषयी सुद्धा ज्याच्या विचाराभोवती तिथलं राजकारण चालतं ती ‘जेएनयू’मधील बहुसंख्य मंडळी शीघ्र मार्क्सवादी असावीत.’’ तो कार्यकर्ता शेतकऱ्याच्या विरोधात नाही शेतीच्या शोषणाविषयी सांगत होता. जर त्याचं आकलन चूकीचं होतं तर लेखक त्याला बरोबर करू शकला असता. पण, ज्याअर्थी त्याने शेती पाहिली नाही त्याअर्थी त्याला त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असा सोईस्कर अर्थ लेखकाने काढला आणि त्याला अर्धवट ठरवलं. याच न्यायाने मॅगसेसे पुरस्कारप्राप्त पत्रकार पी. साईनाथ यांनाही शेतीविषयी बोलण्याचा अधिकार पोहोचत नाही. तेव्हा लेखकाने ही टिप्पणी कोणत्या दृष्टीकोनातून केली हे समजत नाही. कदाचित लेखकाचा हा तुच्छतावादी दृष्टीकोन असावा जो आणखी काही पानांवर दिसतो.

विद्यार्थी दशेत लेखक राजकीय चळवळींपासून अलिप्तता बाळगतोच. पण, प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावरही कुठलीच भूमिका घेताना दिसत नाही. अर्थात कुण्या एका गटात जाऊन सामील होणं म्हणजेच भूमिका घेणं असं नाही. तसं नको असेल तर व्यक्ती म्हणून आपली स्वतंत्र भूमिका मांडणं गरजेचं असतं. आणि आपण जेव्हा एका संघर्षाचा वारसा सांगत असतो,  फुले – आंबेडकरांचं नाव घेत असतो तेव्हा ते जास्त गरजेचं असतं. ३२४ पानावर लेखक लिहितो, ‘’एका वरिष्ठ संघाच्या प्राध्यापकाने ज्याला माझी इंग्रजी आवडत असे, सुरवातीला सरळ सरळ सामील होण्याचा प्रस्ताव दिला. म्हणाला की आप तो हमारे मित्र है, आप हमारे मिटिंग में क्यो नही आते?  मी फक्त हसून विषय टाळत जाणीवपूर्वक संदिग्धता बाळगत असे.’’ म्हणजे आरएसएसच्या व्यक्तीला लेखक कुठल्या विचाराचा आहे हे न कळण्याइतपत तो निष्क्रिय राहत असे. या सर्व गोष्टींकडे लेखक चिकित्सक वृत्तीने पाहत नाही. तो स्वतःला सूट देतो. किंवा ते त्यांना तितकं महत्वाचं वाटत नसेल. अर्थात २०१६ मध्ये ‘जेएनयू’वरील हल्ल्यानंतर बाविस्कर कँपसमधील राजकारणात हस्तक्षेप करू लागले ही चांगली गोष्ट आहे.

या सर्व मर्यादा असतानाही भुरा मराठी साहित्यात महत्वाचं आत्मकथन ठरेल. भाषेचं, रचनेचं वेगळेपण शरद बाविस्करांनी जपलं आहे. अनेक प्रस्थापित मान्यतांना खोडलं आहे. आत्मगौरवाची अतिशयोक्ती टाळून व्यवस्थेची चिकित्सा केली आहे. एखाद्या वैयक्तिक डायरीसारखी याची भाषा आहे. सगळ्या क्षमता आणि मर्यादांसहीत भुराला वाचकांनी भेटलं पाहिजे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0