मनसेचा ‘राज’मार्ग : नवा झेंडा, नवा अजेंडा

मनसेचा ‘राज’मार्ग : नवा झेंडा, नवा अजेंडा

मनसेची 'व्होटबँक' ही अनेक पक्षांमध्ये विखुरलेली आहे. मुख्यतः भाजपच्या मतदाराला आपल्याकडे वळवणे ही तशी कठीण बाब आहे. त्यासाठीचं ‘सोशल इंजिनियरिंग' करण्याची तयारी राज ठाकरे दाखवतील का हा प्रश्न आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशात अभूतपूर्व अशी दुही माजली आहे. लोक त्याचा एकजुटीने तीव्र विरोध करत आहेत, पण त्याचबरोबर एक मोठा वर्ग तितक्याच जोरकसपणे याचे समर्थनही करतोय. अनेक लोक यावर मौन बाळगून आहेत. हे ध्रुवीकरण अधिक तीव्र आणि खोल आहे. अयोध्या किंवा कश्मीर आपल्यापासून दूर होते, मात्र नागरिकत्व कायदा हा थेट आपल्याला देशप्रेमी किंवा देशद्रोही या समूहांमध्ये विभागतो आहे. अशातच मराठी अस्मिता व अभिमान जपणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःचे राजकीय भवितव्य राखू पाहते आहे.

भारतीय समाजमनावर आज हिंदुत्वाचे वैचारिक गारुड आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याने त्याचे स्थान अधिक भक्कम केले आहे; आणि म्हणूनच मराठीच्या अस्मितेला बळकट करण्यासाठी हिंदुत्वाची जोड दिली जाते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकतेच स्वीकारलेले नवे धोरण हे त्याचेच द्योतक आहे.

पक्ष म्हणून मनसे पुन्हा नव्याने उभी राहू पाहते आहे असे म्हणता येईल. या पक्षाची निवडणुकांमधील कामगिरी जरी सुमार असली, तरी वातावरणनिर्मिती कशी करायची आणि ‘इव्हेंट’ कसा घडवून आणायचा हे त्यांना चांगले ठाऊक आहे. या पुनर्बांधणीच्या निमित्ताने त्यांनी नवा झेंडाही पुढे केलाय, ज्यात भगव्या झेंड्याच्या मध्यभागी शिवकालीन राजमुद्रा दिसते आहे. झेंड्याप्रमाणे सभेतही भगवीकरणाचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. महामेळाव्याची तारीखही नेमकी २३ जानेवारी. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवशीच मनसेने महामेळावा आयोजित करावा हा योगायोग नक्कीच नाही.

परंतु इथे खरा प्रश्न आहे तो बाळासाहेबांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचा. हा वारसा एकदा राज यांना नाकारला गेला आहे, आता मात्र पुन्हा नव्या उमेदीने तो परत मिळवण्याचा जोरकस प्रयत्न ते करत आहेत.

सभेच्या अवघ्या एक दिवस आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवर एक प्रतिक्रिया नोंदवली. या ट्विटमध्ये खोपकर यांनी शिवसेनेवर थेट भाष्य केले आहे. ‘पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडीपण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नकानिर्लज्जपणे असाच सुरू राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ, बाळासाहेबांच्या जयंतीलामन सेसामील व्हा‘, असे हे ट्विट होते.

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी केलेली युती हा केवळ सत्तेत येण्यासाठीचा प्रयोग नाही तर पक्ष म्हणून जगण्याची धडपड आहे. परंतु हे करत असताना पक्षाने संघटनेचा कितपत विचार केला, हा प्रश्न सतत पडतो. पक्ष वाचवण्याच्या धडपडीत संघटनेची पडझड होऊ शकते हे राजकीय सत्य नाकारता येणार नाही. आधी मराठी अस्मिता आणि नंतर प्रखर हिंदुत्व या तत्वांवर चाललेल्या या पक्षाला दोन्ही काँग्रेसचे धर्मनिरपेक्ष, मध्यममार्गी आणि जातीत रुतलेले राजकारण पचवणे सोपे नाही. अशा परिस्थितीत कार्यकर्ता आणि ओघाने संघटना भरडले जातात. या युतीमुळे अनेक ‘कडवे शिवसैनिक’ दुखावले गेले असतील. मनसेने अशा नाराज नेते व कार्यकर्त्यांसाठी निश्चितच वाट करून दिली आहे. हे विश्लेषण खरे असले तरी तोकडे आहे. आजघडीला महाराष्ट्राचे चित्र राजकीयदृष्ट्या खूपच इंटरेस्टिंग आहे. राष्ट्रीय पातळीवर सत्तेत असलेला भाजप राज्यात विरोधी पक्ष आहे. विरोधी बाकांवर जास्त सक्रिय असणारी शिवसेना आज सत्तेत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी चांगले विरोधक ठरत असतानाच पुन्हा सत्तेत गेले आहेत. म्हणूनच राज्यात ‘आक्रमक’ विरोधी पक्षाची ‘स्पेस’ उपलब्ध आहे. कदाचित हीच स्पेस राज ठाकरेंना खुणावत असावी.

भाजपशी मैत्री केल्यानंतर शिवसेनेच्या भाषिक अस्मितेच्या राजकारणावर मर्यादा पडल्या. मराठीचा मुद्दा केला की हिंदुत्व मागे पडते आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करताना उत्तर भारतीय व गुजरातींना जवळ करावे लागते, त्यामुळे मराठीची अडचण होते. आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असल्याने त्यांची वैचारिक कोंडी सुद्धा झाली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मुंबईत व महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत, परंतु सत्तेतील शिवसेना याकडे कानाडोळा करतेय. खरेतर बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतील बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न पहिल्यांदा राजकीय परिघात आणला, हे सोयीस्कररित्या विसरले जातेय.

परिस्थितीमुळे उदयास आलेल्या या विरोधाभासामुळे राज ठाकरे आता या मुद्द्याचे राजकारण करू पाहतायेत. त्यातूनच ‘मराठी-हिंदुत्व’ नावाचे लोप पावलेले राजकीय प्रारूप पुन्हा डोके वर काढू पहात आहे. भाषिक अस्मितेचे राजकारण परप्रांतीयांप्रतीच्या द्वेषावर आधारलेले असू असते, त्याचीच राष्ट्रीय (मॅक्रो) प्रतिकृती म्हणजे धार्मिक अस्मितेचे राजकारण. इथे मुस्लिम द्वेष गरजेचा घटक आहे. या दोहोंमध्ये दुसऱ्याबद्दलचा द्वेष आणि आपल्या अस्मितेबद्दलची आत्यंतिक तीव्र भावना ही साम्यस्थळे आढळतात.

अलीकडच्या काळात हिंदुत्वावर मांडणी करताना अनेकांनी ‘नव-हिंदुत्ववाद’ या संकल्पनेचे विवेचन केले आहे. नव-हिंदुत्ववादी वैचारिक चौकट तशी लवचिक असते. एक देश, एक धर्म, एक लोक, एक भाषा अशा चौकटीपासून दूर जाऊन नव-हिंदुत्व भाषिक, जातीय, किंवा स्थानिक अस्मिता व संदर्भ सामावून घेण्याचा प्रयत्न करते.

म्हणूनच भाषणात राज यांनी एकाच वाक्यात ‘मी मराठी आहे, मी हिंदूदेखील आहे, मी धर्मांतर केलेलं नाही’, असे म्हणत पुढे मराठी किंवा धर्माला धक्का बसला तर तो सहन केला जाणार नाही अशीही गर्जना केली. भयगंडाने ग्रासलेला समाज आणि त्यावर बेतलेला मतप्रचार हा बऱ्याचदा राजकारणात उपयुक्त ठरू शकतो. सतत शत्रूच्या शोधात असलेले आपले राजकारण उपरा, परका, काफिर, देशद्रोही, तुकडे-तुकडे गँग, शहरी नक्षल इत्यादी रचिते तयार करते. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय चर्चाविश्वात अशा रचितांना –‘कन्ट्रक्टस’ना उधाण आले आहे. राज यांनी भाषणात मशिदींवरच्या भोंग्यांवर टीका केली. परंतु पुढे जाऊन मोहल्ल्यांमध्ये देशविरोधी कारवायांचे कट शिजतात असे सरसकट विधानही केले.

पक्षाबाबत बोलायचे झाल्यास मनसे संघटनात्मक आणि वैचारिक पातळ्यांवर सपशेल अपयशी ठरली आहे. मनसेची विचारधारा संयत नाही, कार्यांमध्ये व आंदोलनामध्ये सातत्य नाही, संघटना बळकट नाही, संघटनेत बुद्धिजीवींचा दुष्काळ आहे आणि मनसेच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती आणि मार्गांची वानवा आहे. थोडक्यात, इथे सबकुछ ‘राज’ आहे आणि सगळे ‘राज’मार्गावर चालणारे आहे.

इटालियन कम्युनिस्ट तत्वज्ञ अंतोनियो ग्रामशीच्या पक्ष बांधणीबद्दलचे विचार उपयुक्त ठरतात. ग्रामशीच्या मांडणीत राजकीय पक्ष हा दोन आधारांवर उभा असतो, एक म्हणजे संघटनात्मक व्यवस्था आणि दुसरी म्हणजे कार्यकर्त्यांना सतत संघटनेशी जोडून ठेवणारी विचारप्रणाली. नव्या मनसेत पक्षशिस्तीवर विशेष भर आहे. राज यांनी गेल्या निवडणुकीत समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करून घेतला. मात्र त्याच समाजमाध्यमांनी पक्षाची शिस्त मोडली आणि ओघाने पक्षाचाच घात केला. पक्षाला शिस्त केवळ नेतृत्वच लावू शकते, त्यासाठी सक्षम नेते आणि बुद्धिजीवींचा एक वर्ग तुमच्या पक्षाशी बांधील असावा लागतो. राज यांनी म्हटल्याप्रमाणे, मनसेमध्ये कायमच संभ्रमावस्थेत असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते समाजमाध्यमांवर वैयक्तिक भूमिका मांडताना दिसतात. म्हणूनच संघटना बांधणीवर भर देत पक्षाने आता संघटनेतील कार्यकर्ते आणि निवडणुकीय राजकारण वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री आणि खात्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘शॅडो कॅबिनेट’ तयार केले जाईल. त्यामुळे पुढील काळात पक्षात मोठ्या प्रमाणात नेमणुका आणि भरती करावी लागेल. या मेगाभरतीत आपली विचारधारा टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान मनसेसमोर असणार आहे. हे काम हिंदुत्वाने करायचे आहे.

२००६ साली स्थापन झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजही आपल्या स्वतंत्र अवकाशाच्या शोधात आहे. त्यांनी अनेक आंदोलने केली, मुद्दे हाताळले पण सातत्य आणि चिकाटी अभावी पक्षाने सपाटून मार खाल्ला. अनेकदा पक्षनेतृत्वावर, त्यांच्या कार्यशैलीवरून व संघटन कौशल्यावर टीका झाली. याच अनुषंगाने मनसे नेतृत्वासमोर काही प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात.

पहिले म्हणजे, मनसेची ‘व्होटबँक’ ही अनेक पक्षांमध्ये विखुरलेली आहे. मुख्यतः भाजपच्या मतदाराला आपल्याकडे वळवणे ही तशी कठीण बाब आहे. त्यासाठीचं ‘सोशल इंजिनियरिंग’ करण्याची तयारी राज ठाकरे दाखवतील का हा प्रश्न आहे. ‘मी जात मानत नाही’ वगैरे विधानं राज यांनी अनेकदा केलेली आहेत. महाराष्ट्रात जातीपालिकडचे राजकारण इतक्यात तरी शक्य आहे का, याबद्दल शंका वाटते.

झेंड्यातील राजमुद्रा ही मरगळ झटकून अभिमान जागवण्यास व प्रेरणा देण्यास सक्षम आहे. परंतु मनसेच्या राजकारणातील शिवाजी महाराज हे काही इतिहासकारांनी संकुचित भूमिकेतून रंगवलेले इस्लामिक भारतातील केवळ एक हिंदू राजे आहेत की गोविंद पानसरेंनी उभे केलेले जाणते राजे आहेत हे ठरवण्याची नितांत गरज आहे.

जुन्या झेंड्यातील हिंदू, मुस्लिम आणि दलित हे सारे या नव्या मनसेत कुठे आणि कसे सामावले जाणार आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण हिंदू आणि मराठी अभिमानाचे कधीही उन्मादात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे दलित आणि मुस्लिम समूहांनी आपल्या अस्मिता बाजूला सारून मनसेत सामील व्हायचे आहे का, या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.

घुसखोरांची आणि देशद्रोह्यांची हकालपट्टी केल्याने मराठी तरुणाचा रोजगाराचा प्रश्न सुटेल का, यावरही प्रकाश टाकावा लागेल.

शिवसेनेने काँग्रेसशी संबंध तोडून हिंदुत्वाकडे वाटचाल केली, भाजपशी मैत्री केली आणि त्याचा त्यांना मोठ्या राजकीय फायदा झाला. हा योगायोग मुळीच नव्हता. मनसेचा झेंडाबदल, किंबहुना दिशाबदल हा राज म्हणतात तसा योगायोग आहे हे मान्य करणे कठीण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या नव्या रूपामुळे राज्यात नव्या राजकीय प्रवाहांची नांदी होते आहे की नाही, हे येणारा काळ ठरवेल.

अजिंक्य गायकवाड, एसआयइएस महाविद्यालय मुंबई येथे राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

COMMENTS