मुंबईबाग आंदोलन मोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न

मुंबईबाग आंदोलन मोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले असताना आणि आघाडीचा सीएएला विरोध असतानाही मुंबईबाग आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. राज्यात नेमके कोणाचे सरकार आहे?

कोरोनाविरुद्धचे जर्मन मॉडेल आणि नेतृत्त्वाचे महत्त्व
तियानमेन चौक… ३० वर्षांनी पुन्हा!
‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’

हसीना या स्त्रियांच्या चळवळीत काम करतात. रविवारी पहाटे साडेचार वाजता हसीना मुंबईबागेतून घरी जाण्यासाठी बाहेर पडल्या. त्यांच्याबरोबर त्यांची टाटा समाजविज्ञान संस्थेत शिकणारी मैत्रीण होती. ओजस नावाचा एक तरुणही त्यांच्याबरोबर होता. ते सगळे मुंबईबाग येथे चाललेल्या आंदोलनातून घरी जाण्यासाठी पहाटे बाहेर पडले.    

त्यांनी ऑनलाईन कार बुक केली. कार आली, पण चालकाने त्या तिघांना घ्यायला नकार दिला. मग त्यांनी बाजूलाच असणाऱ्या एका टॅक्सीला त्यांनी हात केला आणि ते तिघेही बसले. तेव्हड्यात तिथे नागपाडा पोलीस आले. महिला पोलीसही त्यात होत्या. त्यांनी हसीनाआणि तिच्या मैत्रिणीला खाली उतरायला सांगितले. तेवढ्यात दोन पोलीस आंत बसले आणि ते ओजसला घेऊन गेले.

महिला पोलिसांनी त्या दोघींची चौकशी सुरु केली. कुठून आला. पालक कोण आहेत. कुठे राहता. आता कुठे जाणार. इथे दररोज येतका. तुमची ओळखपत्रे दाखवा. दमदाटी सुरु झाली. नन्तर बऱ्याच वेळाने त्या दोघींना जाऊ देण्यात आले.

इकडे ओजसला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याला सकाळी वाजेपर्यंत तिथेच बसवून ठेवण्यात आले.

मुंबईबागमध्ये असे दररोज सुरु आहे.

नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) संसदेमध्ये मंजूर झाल्यानंतर दिल्लीत जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ते आंदोलन मोडून काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात, ग्रंथालयात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. त्यानंतर शाहीन परिसरामध्ये महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सीएएच्या विरोधामध्ये आंदोलन सुरु केले. हे आंदोलन शाहीनबाग म्हणून प्रसिद्ध झाले आहे. त्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मुंबईमध्ये नागपाडा परिसरात अरेबिया हॉटेल जवळ मोरलँड रस्त्यावर २६जानेवारीपासून महिलांनी आंदोलन सुरु केले. नव्याने तयार होणाऱ्या एका रस्त्यावर हे आंदोलन सुरु आहे. रस्त्याचे काम महिन्यांपासून बंदच होते. हे आंदोलन मुंबईबाग म्हणून प्रसिद्ध झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे फोटो आंदोलनात लावण्यात आले आहेत. इथे येणाऱ्या छोट्या मुलांसाठी फातिमा शेखसावित्रीबाई फुले ग्रंथालय सुरु करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. अतिशय छोट्या मुलामुलींपासून ते७६ वर्षांच्या आजीपर्यंत हजारो महिला या आंदोलनात दररोज सहभागी होतात.

एका मुलीने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले, की वेळेप्रमाणे महिलांची संख्या बदलत जाते. किमान २०० ते कमाल हजार महिला इथे उपस्थित असतात. इथे विद्रोही गाणी गायली जातात. कविता म्हंटल्या जातात. घोषणा दिल्या जातात. अनेक संघटना, कार्यकर्ते येऊन पाठींबा देतात आणि मदत देऊन जातात. ती मुलगी म्हणाली, की हे आंदोलन अनेकजणांच्या डोळ्यात खुपू लागले आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने आंदोलन संपविण्याचा प्रयत्न होत आहे. कधी कधी वाटते, की अजून इथे भाजपचेच सरकार आहे का?

गुड्डी श्यामला अलकाप्रसाद या मुंबईमधील अनेक सामाजिक कामांमध्ये सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्या मुंबईबागमध्ये सक्रीय आहेत. त्या म्हणाल्या, “३० जानेवारीला काही स्थानिक पुढाऱ्यांनी आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला. पोलीस दोन गाड्याघेऊन आले आणि रस्ता मोकळा करा असे सांगू लागले, पण महिला आंदोलनावर ठाम होत्या. रात्री दोन हजार महिला आणि इतर कार्यकर्ते आले. मग पोलीस परत गेले पण तेंव्हापासून पोलीस कोणालाही बोलवून नेतात. भारतीय दंड संहितेचे कलम 149 ची नोटीस देतात. या आंदोलनामध्ये अनेक महिला पहिल्यांदाच घराबाहेर पडत आहेत. त्यांना या नोटीस मिळाल्या की त्या घाबरतात. तोचपोलिसांचा उद्देश आहे.”

आंदोलन करणाऱ्या एका महिलेला एका केळी विकणाऱ्या माणसाने केळी आणून दिली, तर त्यालाही 149 ची नोटीस देण्यात आली. पाण्याची बाटली आणून देणाऱ्यांनाही अशी नोटीस देण्यात आली आहे. बेकायदेशीररीत्या जमणे यासाठी ही नोटीस देण्यात येते.

गुड्डी यांना काही दिवसांपूर्वी नागपाडा पोलीस ठाण्यामध्ये बोलवून घेण्यात आले. ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांना विचारले, की तुम्हाला निधी कुठून येतो, तुम्हाला परदेशातून पैसे येतात आम्हाला माहित आहे. गुड्डी म्हणाल्या, की असे अनेकांना बोलवून चौकशी सुरु आहे.

आंदोलन बेकायदेशीर आणि विनापरवाना सुरु असल्याच्या पोलिसांच्या आरोपावर गुड्डी म्हणाल्या, की महापालिकेमध्ये आणि पोलिसांकडे परवानगी मागणारा अर्ज पडून आहे. त्यावर त्यांनी अजूनही उत्तर दिलेले नाही.

पोलिसांनी आंदोलनामध्ये येणाऱ्या प्रत्येकालाच आता नोटीस द्यायला सुरुवात केली आहे. नोटीस घेतली नाही, तर फोटो काढला जातो. बहुतेक सगळ्यांचेच नाव आणि फोन नंबर घेतले जात आहे. गेल्या आठवड्यामध्ये महापालिकेच्या तक्रारीवरून रस्त्याचे कामथांबविल्याचा गुन्हा आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आला आहे. महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे.

सायरा शेख या ताडदेव येथे राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आपल्या घरचे काम करून त्या दररोज रात्री ११ वाजता मुंबईबागेमध्ये पोहोचतात. रात्रभर तिथे थांबतात आणि सकाळी वाजता पुन्हा घरी जातात. आपल्या मुलानाही त्या घेऊन येतात. त्याम्हणाल्या, की पोलीस मधून मधून येतात आणि उठा म्हणतात. नोटीस देतात. अनेकांना चोकशीसाठी नेतात. दिवसांपूर्वी असा प्रयत्न खूपवेळा झाला. आंदोलन संपविण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.

वायरच्या प्रतिनिधी सुकन्या शांता यांनाही त्यांची माहिती देण्यासाठी पोलिसांनी सांगितले. माहिती दिली नाही म्हणून त्यांचे फोटो काढण्यात आले. सुकन्या यांनी नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांना संपर्क करण्याचा आणि त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसशिवसेनाकॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेमध्ये आहे. या तीनही पक्षांचा सीएएला विरोध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे जाहीर केले आहे. मात्र तरीही मुंबईबाग आंदोलन मोडून काढण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न पोलीस स्वतःहून करीत आहेत, की त्यांच्यामागे अजून कोणाचा हात आहे?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0