आव्हानांना स्वीकारत काश्मीरचा १२वीचा निकाल ७६ टक्के

आव्हानांना स्वीकारत काश्मीरचा १२वीचा निकाल ७६ टक्के

गेली ३० वर्षे काश्मीरमधील शिक्षणाला तेथील राजकीय परिस्थितीचा मोठा तडाखा बसत आला आहे.

‘अम्मा वोदी’ – चेहरामोहरा बदलणारी शिक्षण व्यवस्था
जेएनयू : एक महान विद्यापीठ बरबाद झाले त्याची गोष्ट
या परीक्षेत सगळे नापास

श्रीनगर : ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर या राज्याचा देशाशी संपर्क तोडण्यात आला होता. राज्यातील दूरसंपर्क यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. इंटरनेट बंद होते. सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. ट्यूशन क्लास बंद ठेवण्याचे आदेश होते. मोर्चे, निदर्शनांवर बंदी होती, ती होऊ नये म्हणून अघोषित कर्फ्युच या राज्यावर होता. काश्मीरमधल्या मुलांचे हे शालेय वर्ष जवळपास वायाच गेले होते. इंटरनेट बंद असल्याने विद्यार्थ्यांचा माहिती-ज्ञानापासून पूर्ण संपर्क तुटला होता. हिंसाचार, दहशतवादी कारवाया अशा अनेक अडीअडचणी असतानाही काश्मीरमध्ये १२ वीच्या परीक्षा झाल्या. गेल्या २२ जानेवारी रोजी जम्मू व काश्मीर शिक्षण मंडळाने १२ वीचा निकाल जाहीर केला. तो ७६.०८ टक्के इतका विक्रमी लागला. या बोर्डाची ४६,५९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यात ३५,४५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल गेल्या वर्षापेक्षा २५ टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले आहे.

२०१६मध्ये ५३,१५९ विद्यार्थ्यांपैकी ४०,११९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ७५.४७ टक्के लागला होता, त्यापेक्षा अधिक निकाल यंदा लागला आहे. ८ जुलै २०१६मध्ये खोऱ्यात बुरहान वाणी या दहशतवाद्याची हत्या केल्याने संपूर्ण काश्मीर खोरे सहा महिने बंद होते, त्यावेळीही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. त्यापेक्षा यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी अधिक आहे, हे विशेष.

या निकालाबाबत शिक्षण मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, २००३ पासून निकाल चांगला लागण्यासाठी शिक्षण मंडळ प्रयत्नशील आहे. २००३मध्ये १२ वीचा निकाल केवळ ४८ टक्के होता. पण २०१६ वगळता अन्य वर्षांत हा निकाल ७० टक्क्यांच्या आसपास होता. मुलांना दहशतवादाच्या छायेत अभ्यास करावा लागतो, त्यांच्या मनावर मोठ्या प्रमाणात दडपण असते, पण १२वीत मुलांची कामगिरी सातत्याने उंचावत चालल्याचे या अधिकाऱ्याचे मत होते.

२०१८मध्ये काश्मीरमधील २९५ शाळांपैकी १५१ शाळांनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक निकाल दिला होता. यंदा केवळ १५ शाळा ५० टक्क्यांच्या आसपास जाऊ शकल्या आहेत.

बडगाम जिल्ह्यातील चादोरा गावातील समाजशास्त्र शिकवणारे मुझफ्फर हुसेन भट यांच्या मते, गेली ३० वर्षे काश्मीरमधील शिक्षणाला तेथील राजकीय परिस्थितीचा मोठा तडाखा बसत आला आहे. मुलांची शाळा केव्हाही बंद पडू शकते. त्यांच्या शिक्षणात खंड अनेक महिन्यांचा असतो. तरीही शिक्षण सोडून देण्याचे प्रमाण या राज्यात कमी आहे. मुलांमध्ये शिकण्याची जिद्द आहे, जिज्ञासा आहे व ते प्राप्त परिस्थितीशी जुळवून अभ्यास करतात असे भट यांचे म्हणणे आहे.

जिद्द सोडली नाही..

जम्मू व काश्मीरमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा, महाविद्यालये सुरू झाली. पण विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती अगदीच जेमतेम होती. पालक आपल्या मुलांना शाळा-महाविद्यालयात पाठवण्यास धजावत नसतं. आपली मुले निदर्शनात अडकतील, फसतील अशी भीती पालकांमध्ये कायम असे. त्यात काही पालकांनी आपली मुले शाळेत न पाठवून सरकारच्याविरोधात आपण आहोत अशी ठाम भूमिका घेतली.

ऑगस्टमध्ये सरकारने सर्व प्रकारच्या सार्वजनिक हालचालींवर बंदी घातल्याने या राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले व पुढे ठप्प झाले. त्याचा फटका शैक्षणिक क्षेत्रालाही बसला. त्यामुळे आम्हाला घरात राहून अभ्यास करावा लागला, अशी प्रतिक्रिया १२ वी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवलेल्या हुमेरा रशीदने दिली. हुमेराने ५०० पैकी ४९० गुण मिळवले आहेत. हुमेरा म्हणते, इंटरनेट बंद असल्याने अनेक शैक्षणिक संकल्पनांविषयी आम्हाला काहीच माहिती मिळत नव्हती. प्रत्येक विद्यार्थी शिक्षकाला घरी बोलावून त्यांच्याकडून संकल्पना समजून घेऊ शकत नव्हता. त्यामुळे आम्हाला स्वत:च अभ्यास करावा लागला. काही ठिकाणी सामुदायिक शाळा भरवल्या जात होत्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांना जावे लागत होते. माझ्या वयोगटातील मुलांनी २०१० व २०१६सालचे दिवस अनुभवले होते. त्यामुळे यावेळी काहीही करून जिद्द सोडायची नाही असे प्रत्येकाने ठरवल्याने ही कामगिरी चांगली झाली, असे हुमारा सांगते.

चांदपोरातील एक उपमुख्याध्यापक खुर्शीद अहमद मीर सांगतात, संपूर्ण काश्मीरच बंद असल्याने दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येणे अत्यंत कठीणप्राय झाले होते. मुलांना मिळणाऱ्या सर्व सोयी बंद झाल्या होत्या. पण केवळ जिद्दीमुळे त्यांनी या कठीण परिस्थितीवर मात केली.

अन्य अडचणी

गेल्या नोव्हेंबरमध्ये जम्मू व काश्मीर शिक्षण मंडळाने परीक्षांची घोषणा केली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम शिकवून झाला नसल्याने तो कमी करण्याची मागणी केली. यासाठी अनेक पालक व विद्यार्थ्यांनी सवलत मागितली होती. मोठा विरोधही केला होता. पण शिक्षण मंडळ आपल्या भूमिकेवर कायम होते व त्यांनी सर्व अभ्यासक्रमाची परीक्षा होईल असे जाहीर केले.

डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आल्या पण खोऱ्यात सार्वजनिक परिवहन सेवा पूर्ववत नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचवण्याचे आव्हान पालकांपुढे उपस्थित झाले. अनेक मुले कित्येक मैल अंतर चालून परीक्षा केंद्रावर पोहोचत होते. वेळेवर पोहोचण्यासाठी घरातून पहाटे थंडीत निघावे लागे. अशा अनेक कठीण परिस्थितीतून विद्यार्थ्यांनी बाजी मारली अशी प्रतिक्रिया शिक्षण मंडळाच्या संचालक वीणा पंडिता यांनी दिली.

हा निकाल मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची गरज असल्याचे सांगत वीणा पंडित यांनी या निकालाने शिक्षण मंडळातील सर्वच कर्मचारी सुखावले आहेत. आम्ही परीक्षा योग्यरितीने होण्यासाठी त्रिस्तरीय रचना ठेवली होती, त्याला यश आले. हा निकाल पारदर्शी राहावा म्हणून शिक्षण मंडळाने रँडम इव्हॅल्यूएशन पद्धत वापरली, त्यातही कोणताही गोंधळ वा घोटाळा दिसून आला नाही, असे त्या म्हणाल्या. जम्मू व काश्मीरचे विद्यार्थी अत्यंत वाईट परिस्थितीतही उत्तम कामगिरी करू शकतात, हा विश्वास निर्माण झाल्याचे पंडिता यांचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: