शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा झाली. अशा यात्रेतून त्यांचा महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेशी संवाद साधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शहरी समस्यांची जाण असलेले आदित्य ठाकरे या संवादातून ग्रामीण लोकसंख्येचे मुद्दे समजून घेऊ पाहात आहेत.
आपल्याकडे नागरी समस्या, सोयी सुविधा, पर्यावरण इत्यादी मुद्द्यांवर थेट बोलणारे नेते अभावानेच आढळतात. गेल्या महिन्यात प्लस्टिकच्या प्रादुर्भवबद्दलची आदित्य ठाकरेंची ट्विटरवर एक पोस्ट पहिली. आजवर भाषिक अस्मिता, भूमिपुत्र, हिंदुत्व या मुद्द्यांवर राजकारण करणारी शिवसेना आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात कल बदलते आहे का असे वाटून गेले.
आदित्य यांनी शिवसेनेच्या अधिपत्याखालील दोन संस्थांमार्फत काही धोरणात्मक बदलांची रुजवात करायचा प्रयत्न केला. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आणलेली प्लास्टिक बंदी व बेस्टच्या ताफ्यात सामील झालेल्या इलेक्ट्रिक बसेस ही दोन उदाहरणे इथे देता येतील. यानंतर मुंबईची नाईट लाईफ पुनरुज्जीवित करण्यासाठीचे प्रयत्न व ‘व्हॅलेंटाईन डे‘बद्दलची बदललेली भूमिका ही शिवसेनेच्या वाटचालीतील काही प्रमुख स्थित्यंतरे आहेत.
बरेचदा कट्टर किंवा धर्मांध हिंदुत्व आणि परंपरावादी सांस्कृतिक मूल्ये जपणारी शिवसेना आता कॉस्मोपोलिटन उदारमतवादी भूमिका मांडत आहे. पक्षाच्या मुख्य केडरसाठी हे बदल अंगीकारणे कठीण आहे, पण शिवसैनिकाच्या मनात आपल्या शीर्ष नेतृत्वाबद्दल प्रचंड आस्था व श्रद्धा असल्याने तो आदेशानुसार काम करतो असे सर्वसाधारणपणे दिसते.
२०१०मध्ये ‘युवा सेने’ची स्थापना करून आदित्य ठाकरेंच्या रूपाने ठाकरे घराण्याची चौथी पिढी सक्रीय राजकारणात उतरली. पक्षांतर्गत एक विद्यार्थी सेना असताना नव्या ‘युवा सेने’ची काय गरज असा सवाल करण्यात आला होता. परंतु १९६६ साली स्थापन झालेली शिवसेना नावाची चळवळ तिच्या पन्नाशीकडे वाटचाल करत होती आणि इतर पक्षांप्रमाणे तरुणांना जवळ करणे महत्त्वाचे आहे असाही एक युक्तिवाद जोरकसपणे मांडण्यात आला.
काहीशा संकोचलेल्या वातावरणात का होईना आदित्य ठाकरे औपचारिकरित्या नेते म्हणून लाँच झाले. मात्र त्यांच्या पक्षातील कामकाजाला २०१२ साली खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्याच्या सभेत आदित्य यांचा स्वीकार करण्याचे भावनिक आवाहन शिवसैनिकांना केले. दरम्यानच्या काळात आणि त्यानंतरसुद्धा आदित्य ठाकरेंचे शिवसेनेतील प्रस्थ वाढत गेले.
काही वेळा पक्षाची अधिकृत भूमिका किंवा आपला विचार मांडताना ते माध्यमांमध्ये दिसले. यातही ते प्रमुखतः इंग्रजी चॅनेल्सवर येत व त्यांच्या कॉफी टेबल मुलाखतीदेखील अनेकदा इंग्रजीतच होत्या. यात प्रामुख्याने शहरी लोकसंख्येशी निगडीत नागरी समस्यांचा भरणा होता. त्यांची छबी एका अभिजन राजकारण्याचीच आहे, त्यामुळे शहरी वर्गांपर्यंत ते पोहोचू शकलेले आहेत. पण शहरांपालिकडच्या महाराष्ट्राला ते अजूनही फारसे परिचित नाहीत. निवडणुकीच्या राजकारणात हे घातक ठरू शकते.
नेमक्या याच भावनेतून ‘जन आशीर्वाद यात्रे’चा घाट घालण्यात आला आहे. या यात्रेत जळगाव, धुळे, नाशिक आणि अहमदनगर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या यात्रेतून शिवसेना अनेक गोष्टी करू पाहत आहे–
महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेशी संवाद साधण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शहरी समस्यांची जाण असलेले आदित्य ठाकरे या संवादातून ग्रामीण लोकसंख्येचे मुद्दे समजून घेऊ पाहात आहेत.
शहर अथवा ग्रामीण पट्ट्यातील बहुतांश लोक कुठेतरी स्थिरावून मध्यमवर्गात प्रवेश मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. अनेक लोक मध्यमवर्गातून कूच करत उच्च मध्यमवर्गात किंवा श्रीमंत वर्गात जाऊन बसण्याच्या धडपडीत असतात. आजवर प्रामाणिक राहिलेले शिवसैनिक या प्रक्रियेला अपवाद नाहीत. म्हणूनच वाढत्या इच्छाआकांक्षा त्यांना भाजपकडे ओढू शकतील अशी शक्यता आहे. तूर्तास युतीमुळे हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही परंतु पुढे हाच प्रश्न शिवसेनेसाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो हे नाकारता येत नाही.
भाजपने काँग्रेस–राष्ट्रवादीची संघटना पार पोखरून टाकली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये ज्या गतीने काँग्रेस–राष्ट्रवादीचे नेते भाजप–सेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्याने महाराष्ट्रातली चौरंगी लढत आता प्रामुख्याने भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्येच आहे असे दिसते आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी लोकसभा व विधानसभेतील जागावाटपाचा तिढा ५०:५० हा फॉर्म्युला वापरून सोडवला गेला होता.
स्थानिक जातीय, राजकीय समीकरणे आणि बाळासाहेब ठाकरेंचा करिष्मा आणि युतीधर्मामुळे शिवसेनेला महाराष्ट्रात यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीतसुद्धा अशीच कामगिरी करता येईल अशी त्यांना खात्री आहे. आता मात्र परिस्थिती बरीच बदललेली आहे. इथे दोन प्रमुख कारणे नमूद करता येतील. पहिलं म्हणजे, भाजपला लोकसभा निवडणुकीत मिळालेले निर्भेळ यश. दुसरे म्हणजे, मराठा आरक्षणाच्या घोषणे सामाजिक गणिते काहीशी बदलतील.
मराठा आरक्षणाचे धोरण आणि ते न्यायालयात टिकवण्यासाठी भाजपने केलेले शर्थीचे प्रयत्न सर्वज्ञात आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्याकडचा मराठा मतदारदेखील भाजपकडे आकर्षित होईल असे चित्र सध्या तरी दिसते आहे. ग्रामीण भागांमध्ये काँग्रेस–राष्ट्रवादीपासून दुरावलेला मराठा हा शिवसेनेचा एक प्रमुख मतदार आहे. एकूणच लोकसभेतील कामगिरी पाहता आगामी निवडणुकीत भाजपचीच सरशी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
राज्यात युतीचे सूत्र ‘बरोबरी‘चे आहे असे जरी भासत असले तरी ते तसे नाही हे दोन्ही पक्षांना ठाऊक आहे. ही यात्रा सर्वतोपरी आपले राजकीय अस्तित्व टिकवून ते अजून बळकट करण्याकरिता केलेला एक प्रयोग आहे असे म्हणता येईल.
शिवसेनेतील अंतर्गत गट सक्रीय होऊन पक्षात अनेक सत्ताकेंद्र निर्माण होण्याची भीती नेतृत्वाला कायमच वाटते. या यात्रेतून बड्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना आवर घालून शिवसेनेत उद्धव यांच्यानंतर फक्त आदित्यच असतील असा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. कदाचित त्याचसाठी मुखमंत्रीपदासाठी आदित्य यांची दावेदारी सांगितली जाते आहे. माध्यमांना यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीला पाठिंबा दर्शवत महाराष्ट्राला सध्या तरुण आणि नव्या विचारांच्या मुख्यमंत्र्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. म्हणूनच ‘जन आशीर्वाद‘ यात्रा हे नाव सूचक वाटते.
भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना जोडणारा दुवा म्हणजे हिंदुत्व. भाषिक अस्मितेच्या राजकारणाला मर्यादा असतात हे लक्षात आल्याने शिवसेना हिंदुत्वाकडे वळली. त्यांच्या या हिंदुत्वाला वैचारिक अधिष्ठान कधीच नव्हते. याउलट भाजपचे हिंदुत्व हे त्यांच्या विचारधारेचे केंद्र आहे. हिंदू मठांवर, पीठांवर, मनावर व ओघाने जनमतावर भाजपचा कब्जा आहे. अशात शिवसेनेला केवळ हिंदू प्रेरणेच्या आधारे मते मिळवणे अवघड आहे. ठाकरे कुटुंबाच्या व नेत्यांच्या ‘अयोध्या वाऱ्यां‘नासुद्धा जाहिरातबाजीकरिता योजलेली युक्ती असेच संबोधता येईल.
काही विसंगती सोडल्या तर भारतीय लोकशाही विकसित होऊन ती अधिकाधिक खोल होत चालली आहे हे सत्य आहे. नेतृत्वाचे आयाम व वैशिष्ट्ये जरी फारसे बदलत नसले तरी आजच्या काळात ‘रिमोट–कंट्रोल्ड‘ सरकार किंवा मुख्यमंत्री हे तसे न रुचणारे मॉडेल आहे. शिवसेना नेतृत्वाचे पारंपरिक मॉडेल येणाऱ्या काळात कितपत टिकाव धरू शकेल हे सांगता येत नाही.
याचाच दुसरा भाग यूपीए–२ काळात ‘धोरण लकवा‘ हा शब्द माध्यमांनी वापरात आणला, भाजपने तो उचलला आणि जोरात प्रचार केला. लोकशाहीत धोरणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे हे पुन्हापुन्हा अधोरेखित करण्यात आले. आणि म्हणूनच जर तरुण नेत्यांनी स्वतः निवडणूक लढवून, धोरण आखणी व अंमलबजावणीच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला तर तो आजच्या मतदाराला अधिक आवडेल.
परंतु आदित्य यांच्या बाबतीत शिवसेना खूप घाई करते आहे असे वाटते. लोकांशी संवादातून ओळख, त्यांच्यात सततचा सहभाग यातून नेतृत्वाची कुवत ठरते आणि त्यातूनच लोकांचा पाठिंबा मिळवता येऊ शकतो हे साधारण राजकीय सूत्र आहे. या सूत्राला बगल देऊन थेट मुख्यमंत्रीपदावर दावा कितपत यशस्वी होईल हा प्रश्नच आहे. तरुण मुख्यमंत्र्याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही परंतु राजकीय परिपक्वता, अनुभव, कौशल्य आणि वक्तृत्व या कसोट्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला लागू का नसाव्यात?
आक्रमक बाळासाहेब ते मितभाषी उद्धव असे मोठे स्थित्यंतर शिवसेनेने पाहिले आहे. केवळ ‘सुप्रिमो‘ न राहता एक कुशल प्रशासक, समन्वयक, व्यवस्थापक व संघटक म्हणून उद्धव ठाकरे पुढे आले. पक्ष म्हणूनही शिवसेनेने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. अनेक धक्क्यांमधून सावरत त्यातून ते यशस्वीरीत्या मार्ग काढत आज महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. पक्षात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वचा उदय हे सुद्धा एक मोठे स्थित्यंतरच आहे. आदित्य यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता मिळवून देण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर असणार आहे.
अजिंक्य गायकवाड, SIES महाविद्यालय, मुंबई येथे राज्यशास्त्र विषयाचे साहाय्यक प्राध्यापक आहेत.
COMMENTS