ए लाव रे तो……!

ए लाव रे तो……!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ए लाव रे तो व्हिडीओ, लाव रे ती क्लीप, दाखव रे ते फोटो’, असे आवाज घुमत आहेत. राज ठाकरे यांच्या झंजावती सभांनी काल परवापर्यंत भक्कम दिसणारे बुरुज, डळमळीत केले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये भयानक अस्वस्थता पसरली आहे.

आत्ता गप्प रहाणे म्हणजे अपराधात सामील असणे
सह्याद्री आणि हिमालय…!
एनआरसीवरून गोंधळात गोंधळ
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

अमरावतीत असणाऱ्या हरिसाल या गावाची देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून प्रसिद्धी करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारची, राज ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या सभेमध्ये पोलखोल केली. राज यांनी गुढी पाडव्याला दादरमध्ये भर सभेत हरिसालचे व्हिडीओ दाखवले आणि भाजपची गोची झाली.
नेहमीच्या पद्धतीने भाजपने या हरिसाल गावावर बोलण्याऐवजी राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, की राज ठाकरेंनी इतकी मेहनत स्वतःच्या पक्षासाठी घेतली असती, तर दुसऱ्यासाठी सभा घेण्याची वेळ आज त्यांच्यावर आली नसती. राज ठाकरे यांचे इंजिन बंद पडलं आहे. ते आता दुसऱ्यां सोबत चालवायचा प्रयत्न करत आहेत.
भाजपचे टीव्हीवर सतत चमकणारे प्रवक्ते माधव भंडारी म्हणले, की राज ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. ज्या माणसाचे कार्यकर्ते टिकत नाहीत, नेते टिकत नाहीत त्या व्यक्तीच्या वक्तव्याला किती किंमत द्यायची. त्यांनी केलेल्या वल्गना, त्यांनी केलेले आरोप २०० टक्के खोटे असल्याचेही ते म्हणाले.
नांदेडमध्ये राज ठाकरे यांनी मोदींवर हिटलर झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “लोकांपर्यंत सत्य परिस्थिती पोहोचू दिली जात नाही. वृत्तपत्र स्वातंत्र्य नाही, पत्रकारांना धमकावलं जातं, प्रेसच्या मालकांना धमकावलं जात आहे. अॅडॉल्फ हिटलरनं देखील असंच केलं होतं.”
मुख्यमंत्री आणि तावडे यांनी मग हळूच मान्य केले की हरिसाल गावामध्ये काही अडचणी होत्या, पण आता त्या ठीक झाल्या आहेत आणि राज ठाकरे तिकडे गेलेच नाहीत.
राज यांनी सोलापूरला घेतलेल्या सभेमध्ये सरकारच्या डिजिटल गाव योजनेत लाभार्थी म्हणून सादर केलेल्या जाहिरातीतील मॉडेल म्हणून काम केलेल्या तरुणालाच व्यासपीठावर आणले. गावाला काही फायदा तर झालाच नाही, पण या तरुणालाच रोजगारासाठी फिरावे लागत असल्याचे राज यांनी सांगितले आणि भाजपची गोची झाली.
राज यांनी मुंबई, नांदेड आणि सोलापूर इथे घेतलेल्या सभेनंतर महाराष्ट्राचे निवडणुकीचे सगळे चित्र बदलायला सुरुवात झाली. भाजपच्या सगळ्या प्रचाराचा रोख आता राज यांच्याकडे वळला आहे. कालपर्यंत राज ठाकरे यांची चेष्ठा करणाऱ्या, स्टॅन्डींग कॉमेडी, बारामतीची स्क्रिप्ट वाचणारे म्हणून ठाकरे यांना हिणवणाऱ्या भाजप प्रवक्त्यांची आता पंचाईत झाली आहे.
इचलकरंजीच्या सभेमध्ये ठाकरे यांनी मोदींच्या शौचालय योजनेची पोलखोल केली. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विहिरी खोदण्याच्या योजनेवर हल्ला चढवला. हे झटके हल्ली इतके तीव्र आहेत की भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना ४४० व्होल्टचे झटके बसत आहेत.
राज यांच्या हल्ल्याचा रोख थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आहे. मधूनच ते देवेंद्र फडणवीस यांना टपल्या मारतात. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांना काहीही किंमत नाही आणि ज्यांना पत्रकारांनी मोठे केले आहे असे चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे, राज ठाकरे यांना बळेबळे उत्तर द्यायला जात आहेत.
राज ठाकरे यांचे शत्रू असलेले उद्धव ठाकरे आणि शिवसेना या सगळ्या प्रकारामध्ये दुर्लक्षित झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, राहुल गांधी यांच्यावर आरोप करून पहिले, पण त्याला प्रतिसाद मिळत नाहीये. त्यांना खरे तर राज ठाकरे यांना प्रत्युत्तर द्यायचे आहे, पण राज ती संधी अजून तरी त्यांना देत नाहीत.
राज ठाकरे आपल्या भाषणामध्ये कोणालाही मत द्या असे सांगत नाहीत. ते सांगतात, फक्त कोणाला पाडा. त्यांच्या सभेमध्ये व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून, इतर कोणत्याही पक्षाचे नेते नसतात. त्यामुळे त्यांच्या सभेला निवडणूक सभेमध्ये घ्यायचे की नाही याचा निवडणूक आयोगाला संभ्रम निर्माण झाला आहे.
एरव्ही राज आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी फटकून वागणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राज ठाकरे यांच्या सभेसाठी आतुर झाले आहेत. इचलकरंजी इथे सभा व्हावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी खास आग्रही होते. पुण्यातील नदीपात्रातील नेहमीचे स्थळ न ठरवता, वडगाव बुद्रुकमध्ये शिंदे मैदान येथे आजची सभा घेण्यामध्ये ही एक चतुर खेळी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पुणे शहर, मावळ आणि बारामती हे तीनही मतदार संघ जिथे एकत्र येतात, त्या हद्दीवर – सिंहगड रस्त्यावर – राज यांची सभा ठेवण्यात आली आहे.
राज ठाकरे म्हणजे भाजपसाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार झाला आहे. एक तर राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष ही लोकसभा निवडणूक लढवीत नाहीत. त्यांची कोणाशीही युती किंवा आघाडी नाही. पण राज यांच्या टीकेला तर उत्तर द्यावे लागत आहे. राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रावादीचे भाडोत्री प्रचारक आहेत, असा प्रचार भाजप आणि त्यांच्या समाज माध्यमांवर कार्यरत कार्यकर्त्यांनी करून बघितला, पण त्याचा उपयोग झाला नाही. उलट असा प्रचार करणाऱ्या लोकांना मनसैनिकांनी आपल्या खास पद्धतीने बुक्क्यांचा प्रसाद दिला. सर्व बाजूंनी होणाऱ्या सगळ्या भडीमारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये दहशत पसरली आहे.
त्यांच्या सभेचा एक वेगळाच दोन तासाचा साचा आहे. राज ठाकरे येण्यापूर्वी पक्षाचे स्थानिक लोक आणि एखादा राज्यस्तरीय नेता बोलतो. मग साधारणतः एका तासाने राज ठाकरे व्यासपीठावर येतात. मग एक विशिष्ट संगीत वाजते आणि ठाकरे व्यासपीठावर येतात. आल्याआल्या ते शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतात, त्याचे संदेश प्रेक्षकांमध्ये जातात. नंतर ते थेट माईकवर जाऊन बोलायला सुरुवात करतात. खरे तर ते संवाद साधतात. मध्ये थांबतात, अंदाज घेतात, मध्येच पत्रकारांशी बोलतात. आवाजामध्ये चढ उतार असतो, ज्याचा मोठा परिणाम होतो. लोकांना मुद्दे पटतात. प्रेक्षकांमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. मोदींच्या विरोधात घोषणाबाजी होते.
संपूर्ण भाषणामध्ये दृकश्राव्य माध्यमाचा ते पुरेपूर वापर करतात. असा उपयोग करणारे भारतीय राजकारणातील बहुदा ते पहिलेच नेते असावेत. पुरावे देण्यासाठी अगोदर आणि आत्ताची स्थिती दाखवणारे व्हिडीओ, छायाचित्रे, किंवा माणसे यांना ते व्यासपीठावरून सादर करतात. यांपुर्वी भारतीय राजकारणातील सभांमध्ये असा प्रयोग झाला नाही. कदाचित बदललेल्या तंत्रज्ञानाचा हा परिणाम असावा. पण अभ्यास करून आणि तो समोर मांडण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे.
त्यांचे आरोप पुराव्यांसकट असतात. त्यात आकडेवारी असते. वृत्तपत्रांची कात्रणे असतात. त्यामुळे त्यांचा नेहमीच्या ‘भाजप’ पद्धतीने प्रतिवाद करणे भाजप नेत्यांना अशक्य झाले आहे, नव्हे ते हैराण झाले आहेत. त्यामुळे ते राज यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा त्यांच्यावर थेट वैयक्तिक हल्ला करतात आणि निष्प्रभ होताना दिसत आहेत.
राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत आपल्या भाषणामध्ये नोटाबंदी, स्वच्छता गृहे, महाराष्ट्रात खोदलेल्या विहिरींची संख्या, राफेल, सर्जिकल हल्ल्याचा खोटेपणा, असे मुद्दे उपस्थित केले आहेत. खरे तर महाराष्ट्रातील वृत्तपत्रे आणि माध्यमांनी हे मुद्दे आणि सरकारी योजनांची पडताळणी करणे आवश्यक होते, पण ते काम त्यांनी न केल्याने राज ठाकरे जाहीरपणे करीत असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘मनसे’ने काही व्हिडीओ क्लिप तयार केल्या असून, त्यामध्ये मोदी यांच्यासाठी प्रसिद्धीवर झालेला खर्च आणि इतर योजनांचा फोलपणा आकडेवारीसकट सादर केला आहे.
राज ठाकरे यांचे भाषण साधारणतः संध्याकाळी साडेसात-आठ वाजता सुरु होते. यावेळी बहुतेक सर्व मराठी टेलिव्हिजन वृत्त वाहिन्या ही भाषणे लाईव्ह दाखवतात. नव्हे त्याना ते दाखवावे लागते. कारण त्यांनी दाखवले नाही तर सोशल मिडियावरून ते दाखवले जाणारच असते. युट्यूब आणि इतर मराठी फेसबुक वाहिन्या ही भाषणे लाईव्ह दाखवतात. प्रत्येक वाहिनीवर किमान २५ हजार ते काही लाख प्रेक्षक एकाचवेळी ही भाषणे थेट पाहतात. हजारोंनी कमेंट्स दिल्या जातात. विरोधी मतांचे प्रेक्षकही तिकडे मुख्यमंत्र्यांची सभा असताना, राज ठाकरे यांची सभा पाहत असल्याचे कमेंट्स वरून लक्षात येते. साधारणतः ५० हजार ते ७५ हजार लोक प्रत्यक्षपणे ही सभा पाहण्यासाठी येतात.
भाषण सुरु असताना राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्याला सांगतात, ‘ए लाव रे तो व्हिडीओ, लाव रे ती क्लीप, दाखव रे ते फोटो’ आणि मग पुरावे सादर होतात.  सध्या ही वाक्ये मोठ्या प्रमाणावर गाजत असून, त्याचा भाजपविरोधात वापर होत आहे. समाज माध्यमांवर आता भाजप-संघ वगळता इतरांचाही मोठा वावर झाल्याचे, पुढे येत आहे.
राज ठाकरे यांच्या प्रचाराचे सूत्र ‘खोटे बोलणारा पंतप्रधान’ आणि  ’लाज वाटते का?’, या सूत्रावर सुरु आहे. ते पंतप्रधान मोदी यांना लक्ष करून प्रश्न विचारतात ‘लाज वाटते का?’ ज्याचा थेट परिणाम होतो.
खरे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी भाजपवर जी टीका केली पाहिजे, ती त्याना करता येत नाही, किंवा त्यांचा परिणाम होत नाही. त्यांच्याकडे केवळ शरद पवार हेच एकमेव प्रचारक आहेत, पण त्यांच्या भाषाणाचाही तेवढा परिणाम होत नाही. त्यामुळे विरोधकांनाही आता राज यांचाच आधार आहे.
राज याना गमावण्यासारखे काही नाही. त्यांच्याकडे एकही आमदार नाही. फक्त काही नगरसेवक आहेत आणि काही निष्ठ्वान कार्यकर्ते आहेत. त्यांचे लक्ष निश्चितच विधानसभा हेच आहे. पण त्यासाठी त्यांनी सहा महिने अगोदरच प्रचार सुरु केला आहे. यामुळे विरोधकांना आत्ता फायदा होईल वा ना होईल, पण राज ठाकरे यांचा महाराष्ट्रात पाया पक्का होण्यासाठी मदत होणार आहे.
राज ठाकरे यांच्या आत्तापर्यंत एकूण पाच सभा झाल्या असून, अजून किमान ४ सभा होणार आहेत. राज यांच्या सभांचे रुपांतर मतांमध्ये किती होते, हे येणारा काळ सांगेल. पण कुंपणावर बसलेल्या आणि कोणाला मत द्यायचे हे अजून निश्चित न केलेल्या आणि नवीन मतदारांना राज ठाकरे यांची भाषणे नक्की विचार करायला लावणारी आहेत.
आत्ता महाराष्ट्रात तरी ही निवडणूक, आघाडी विरुद्ध युती अशी न राहता, भाजप विरुध्द राज ठाकरे अशी झाली आहे; किंबहुना मोदी-शहा विरुध्द राज ठाकरे अशी झाली असून, शिवसेना अदखलपात्र झाली आहे. आणि कालपर्यंत प्रचंड आत्मविश्वासाने लढणाऱ्या भाजपमध्ये अस्वस्थता आणि घबराट पसरली आहे.

नितीन ब्रह्मे ‘द वायर मराठीचे समन्वयक असून, त्यांनी मराठी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये राजकारण, स्थानिक प्रश्न आणि पर्यावरण क्षेत्रामध्ये शोध पत्रकारिता केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0