नवी दिल्लीः जुलै २०२१ ते ऑगस्ट २०२१ या एक महिन्यात देशात १५ लाख जणांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळल्याची आकडेवारी शुक्रवारी सेंटर फॉर मॉनिटेरिंग इंडियन इ
नवी दिल्लीः जुलै २०२१ ते ऑगस्ट २०२१ या एक महिन्यात देशात १५ लाख जणांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळल्याची आकडेवारी शुक्रवारी सेंटर फॉर मॉनिटेरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जाहीर केली आहे. जुलैमध्ये बेरोजगारीचा दर ६.९६ टक्के होता तो ऑगस्ट महिन्यात ८.३२ टक्के इतका वाढला असून कोरोना महासाथ व त्यानंतर आलेले लॉकडाऊन यामुळे बेकारी वाढली असल्याचे सीएमआयईचे प्रमुख प्रभाकर सिंह यांचे म्हणणे आहे.
सध्या शहराकडे पुन्हा रोजगारासाठी ग्रामीण भागातून स्थलांतर सुरू आहे. सीएमआयईनुसार शहरातील जुलैमधील बेरोजगारीची टक्केवारी ८.३ टक्के होती, ती ऑगस्टमध्ये वाढून ९.७८ टक्के इतकी झाली आहे. या एक महिन्यात सुमारे ४० लाखापेक्षा अधिक व्यक्ती रोजगार शोधण्यासाठी शहरांकडे धावले असल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे.
देशात कोविडची दुसरी महासाथ येण्याआधी मार्चमध्ये शहरातील बेरोजगारीची टक्केवारी ७.२७ टक्के इतकी होती. त्यात खरीप हंगामात पेरणीची कामे कमी झाल्याने जुलैमधील ग्रामीण भागातील बेरोजगारीची टक्केवारी ६.३४ होती ती ऑगस्टमध्ये ७.६४ इतकी वाढल्याचे सीएमआयईचे म्हणणे आहे.
राहुल गांधी यांची टीका
दरम्यान सीएमआयईच्या आकडेवारीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला. मोदी सरकार रोजगारनिर्मितीत अपयशी ठरले असून हे सरकार देशाला नुकसानदायक आहे. हे सरकार रोजगारवृद्धी करू शकलेले नाही. ज्यांच्या पाशी नोकर्या, रोजगार आहेत त्यांचे रोजगार सरकार काढून घेत आहे व आपल्या जवळच्या दोनएक मित्रांना मदत करत आहे. अशा काळात देशवासियांकडून आत्मनिर्भरतेची अपेक्षा सरकार करत असून हे ढोंग असल्याची टीका त्यांनी केली.
COMMENTS