१० सेकंदांची “शो केस रेस”

१० सेकंदांची “शो केस रेस”

इटलीचा मार्सेल जेकब व जमैकाची एलिन थॉम्सन टोकियो ऑलिम्पिकमधले सर्वात वेगवान धावपटू ठरले...

कोविड १९ लस आणि डब्ल्यूटीओ
राज्यातल्या १५ लाख शेतकऱ्यांकडे ई- पीक पाहणी ॲप
समलैंगिक विवाह प्रकरणात आंतरराष्ट्रीय कायद्यांचा संदर्भ का नाही?

युसेन बोल्टने गेली तीन ऑलिम्पिक्स तब्बल १२ वर्षे ज्या “दहा सेकंदा”वर अधिराज्य गाजविले, टोकियो ऑलिम्पिकच्या त्या ‘शोकेस’ शर्यतीचे विजेतेपद इटलीच्या मार्सेल जेकबने पटकाविले. १०.८० सेकंद या वेळेसह अनपेक्षितपणे जेतेपद पटकाविले. ज्या जमैकाने आणि युसेन बोल्टने गेले दशकभर पुरुषांच्या या शर्यतीवर वर्चस्व राखले, त्याच जमैकाचा एकही स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही हा दैवदुर्विलास. युसेन बोल्ट साम्राज्य खालसा झाल्यापाठोपाठ जमैकाही पुरुषांच्या या स्पर्धेतून बाद झाल्यासारखी आहे.

बोल्टच्या आगमनापूर्वी अमेरिकेने या ‘१० सेकंदा’वर अधिराज्य गाजविले होते. २८ पैकी १६ विजेतीपदे अमेरिकेकडे होती. जस्टिन गॅटलिन (२००४) हा त्यांचा (अमेरिका) अखेरचा योद्धा. त्यानंतर बोल्ट आणि जमैका असंच चित्र गेली १२ वर्षे दिसत होते. यंदाच्या वर्षातील जगातील सर्व प्रमुख शर्यतींमध्ये वेगवान मानवांच्या अंतिम शर्यतीच्या वेळचे ८ पैकी ७ पुरुष स्पर्धकांच्या सर्वोत्तम वेळा अमेरिकन धावपटूंनी दिल्या होत्या.

जमैकाने हिसकावून घेतलेले १० सेकंद शर्यतींचे साम्राज्य अमेरिका पुन्हा मिळविणार असेच वाटत होते. ट्रेव्हॉन ब्रोमेल याने फ्लोरिडामध्ये गेल्या महिन्यात नोंदविलेली ९.७७ सेकंद ही वेळ २०२१च्या वर्षातील सर्वात वेगवान वेळ होती. त्यामुळे रविवारच्या टोकियो ऑलिम्पिकच्या १०० मीटर्स शर्यतीसाठी तो संभाव्य विजेता म्हणून फेव्हरिट होता. यु.एस.ट्रायल गेममध्ये त्याने दिलेली ९.८० सेकंद वेळही सर्वोत्तम होती. मात्र ब्रोमेल हा ‘फेव्हरिट’ या लेबलच्या दडपणाखाली कायम येतो. रविवारी टोकियोलाही तेच घडलं. ब्रोमेलचा प्रमुख प्रतिस्पर्धी होता रॉनी बाकर. तो सहावा आला. या दोन आव्हानवीरानंतर क्रमांक होता अमेरिकेच्या फ्रेड केर्लीचा. ४०० मीटर्स शर्यतीचा २०१९च्या विश्व अजिंक्यपद शर्यतीचा हा कांस्यपदक विजेता. कॅनडाच्या आंद्रे द ग्रासीचे या तिघा अमेरिकन स्पर्धकांना आव्हान होते. रिओचा तो कांस्यपदक विजेताही होता. २०० मीटर्स शर्यतीच्या रौप्यपदक विजेता. हे ४-५ जण अलिकडच्या काळात एकमेकांच्या अगदी जवळपास होते. दक्षिण आफ्रिकेचा अकानी सिम्बाईन यानेही २०२१ मध्ये दुसऱ्या क्रमांकांची सर्वोत्तम वेळ दिली होती. मात्र या सर्वांच्या गोतावळ्यात मार्सेल जेकब कुठेही नव्हता.

आणि वर्षातील सर्वोत्तम धावपटूंमध्ये जमैकन स्पर्धक कुठेही नव्हते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये १०० मीटर्स शर्यतीची जमैकन मक्तेदारी संपुष्टात येणार असल्याचे संकेत आधीच मिळाले होते. २०१२च्या रौप्यपदक विजेता योहान ब्लेक हा एकमेव जमैकन आव्हानवीर उरला होता. दहा वर्षानंतर त्याच्याकडून पदकाची अपेक्षा करणे चुकीचे होते.

याउलट महिलांच्या १०० मीटर्स शर्यतीचे होते. बोल्टप्रमाणे एकेकाळी, म्हणजे ३३ वर्षांपूर्वी फ्लोरेन्स ग्रिफिथ जॉयनरने या शर्यंतीवर आपले साम्राज्य उभे केले होते. यंदा, म्हणजे टोकियो ऑलिम्पिकला जॉयनरचा तो उच्चांकही मोडला गेला. जॉयनरचे सर्वोत्तम वेळेचे ते साम्राज्य जमैकाच्याच एलिन थॉम्सनने संपविले, १०.६१ सेकंद ही वेळ नोंदवून जमैकाच्या महिला धावपटू तेवढ्यावर थांबल्या नाहीत. त्यांनी १०० मीटर्स शर्यतीचे रौप्य आणि कांस्य पदकही पटकाविले. शेली अॅन फ्रेझर पर्सी (१०.७४ सेकंद) दुसरी तर शेरीचका जॅकसन (१०.७६ सेकंद) तिसरी आली. फ्रेझर पर्सी २००८ व २०१२ च्या ऑलिम्पिकची विजेती होती. बोल्टप्रमाणे वेगवान महिला होण्याची तिची हॅटट्रीक तिच्याच सहकारी थॉम्सनने रिओ ऑलिम्पिकला हुकविली.

कोण ही थॉम्सन. किंग्स्टनच्या युनिव्हर्सिटीत कुकरीचा अभ्यासक्रम शिकणारी. फॅशनची आवड असलेली. शॉर्ट डिस्टंन्स शर्यतीत धावायची. पण २०१४ पासून दुखापतींनी पिच्छा पुरविला तो चक्क २०१९ पर्यंत. पायाचा दुखापतीमुळे कधीही ट्रॅकवर स्थिरावलीच नाही. रिओला १०० व २०० मीटर्स शर्यती जिंकूनही तिला दुखापतींमुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी विजेती होण्याची पसंती कुणीही दिली नव्हती. तरीही ती स्वत:वर विश्वास ठेवून होती. खरं तर त्याचे तिलाही आश्चर्य वाटत होते. अमेरिकेच्या शा कॅरी रिचर्डसनने यंदा अमेरिकन ट्रायल्समध्ये वेगवान वेळ नोंदविली होती. पण मारिज्वानाचे सेवन केल्याबद्दल तिला ३० दिवस बडतर्फीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे अंतिम रेषेवर होण्याऐवजी ती नशिबाला दोष देत बसली होती.

थॉम्सनचा प्रशिक्षक स्टिफन फ्रान्सिसवर अधिक विश्वास आहे. दुखापतींमुळे यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमधील तीचा सहभागच मुळात अनिश्चित होता. प्रशिक्षकाने तिला सरावावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. मूळ स्पर्धेचा विचारच करू नकोस. लोकांना काय म्हणतील म्हणून घाबरू नकोस. शर्यतीच्या वेळी फारशी गंभीरही होऊ नकोस. हसत रहा आणि मोकळेपणाने, दडपणाशिवाय, अपेक्षांचे ओझे न घेता धाव. थॉम्सनला स्वत:ला स्वत:मध्ये जे दिसले नाही ते प्रशिक्षकाला दिसले आणि त्यानंतर इतिहास घडला.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडापत्रकार असून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे त्यांनी वार्तांकन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0