नवी दिल्लीः अफगाणिस्तानातील ११० शीख नागरिक भारतात येण्याचा प्रयत्न करत असून त्या पैकी ६० जणांना भारतीय दुतावासाकडून ई-व्हीसा मिळाला नसल्याचे शिरोमणी ग
नवी दिल्लीः अफगाणिस्तानातील ११० शीख नागरिक भारतात येण्याचा प्रयत्न करत असून त्या पैकी ६० जणांना भारतीय दुतावासाकडून ई-व्हीसा मिळाला नसल्याचे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी)ने गुरुवारी सांगितले. बुधवारी अफगाणिस्तानातील शीख समुदायाचे २६ वृद्ध व दोन मुले भारतात आली. या सर्वांना एसजीपीसी, इंडियन वर्ल्ड फोरम व केंद्र सरकारच्या सहकार्याने अफगाणिस्तानातून भारतात आणले आहे. अफगाणिस्तानात वर्षानुवर्षे राहात असलेल्या अल्पसंख्य समुदायाच्या शीख व हिंदू नागरिकांना अफगाणिस्तानातील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहतात भारतात सुरक्षितरित्या आणण्याची एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत बुधवारी २८ शीख व्यक्ती भारतात आल्या.
गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानातून ६५ ते ७० शीख व्यक्तिंना भारतात आणण्यात आले आहे व त्यांची राहण्याची व्यवस्थाही भारत सरकारने केली आहे. पण अजून ११० अफगाण- शीख नागरिक तेथेच अडकले आहेत व त्यापैकी निम्म्याहून अधिक नागरिकांना ई-व्हीसा मिळालेला नाही.
अफगाणिस्तानाचे नागरिकत्व असलेले शीख तेथील राजकीय परिस्थिती पाहून भारतात येण्यास उत्सुक आहेत, त्यांचे पुनर्वसनही योग्य व्हावे अशी मागणी केली जात आहे. या समाजाला भारताव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशात जाण्याची उत्सुकता नाही. काही शीख नागरिकांनी अमेरिका, कॅनडा येथे शरणागती मागितली आहे. तेथील सरकारने काहींची नावे निर्वासितांच्या यादीतही दाखल करण्यात आली आहेत. अमेरिकेच्या निर्वासितांच्या यादीत अफगाणिस्तानातील शीख समुदायाचे नाव आहे.
मूळ बातमी
COMMENTS