रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ‘2-G मुक्त भारत’ करण्याची घोषणा केल्याने त्याचा मोठा फटका देशात 2G सेवा देणार्या व्होडाफोन-आयडिया या म
रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी ‘2-G मुक्त भारत’ करण्याची घोषणा केल्याने त्याचा मोठा फटका देशात 2G सेवा देणार्या व्होडाफोन-आयडिया या मोबाइल सेवा कंपनीला बसणार आहे. या कंपन्यांचे देशातील सर्वाधिक ग्राहक 2G सेवा घेणारे आहेत.
जिओने देशातील १० कोटी ग्राहकांना 4-G सेवा देऊ केली आहे. त्यात या कंपनीने नुकताच गूगलशी करार केला आहे. या करारानुसार जिओ गूगलबरोबर आपले स्मार्टफोन भारतीय बाजारात आणणार असून 2-G सेवा घेणारे सुमारे ३५ कोटी ग्राहक या कंपनीचे खरे लक्ष्य आहेत. काही बाजारपेठ तज्ज्ञांच्या मते सध्या जिओकडे भारतातील 4-G सेवा देणारी ५८ टक्के बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतला स्मार्टफोनचा हिस्सा त्यांना वाढवायचा आहे.
भारतीय एअरटेलचे २८ कोटी ३० लाख ग्राहक असून त्यापैकी १३ कोटी ५० लाख 2-G सेवा घेणारे आहेत. व्होडाफोन-आयडियाचे २९ कोटी १० लाख ग्राहक (मार्चअखेर) असून त्यातील १७ कोटी ४० लाख ग्राहकांकडे 2-G सेवा आहे.
विल्यम ओ’नील या इक्विटी रिसर्चचे प्रमुख मयुरेश जोशी यांच्या मते देशातील 2-G मोबाइल सेवा घेणारा सर्वाधिक ग्राहक हा व्होडाफोन आयडियाचा असून कंपनीची आर्थिक परिस्थिती सध्या वाईट आहे. कंपनीपुढे गुंतवणुकीच्याही समस्या असून या कंपनीचे वेगाने ग्राहक कमी होत आहेत. या परिस्थितीचा फायदा जिओ घेण्याच्या प्रयत्नात असून गूगलच्या मदतीने ते स्वस्त दरात स्मार्ट फोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत.
व्होडाफोन-आयडियाच्या तुलनेत भारतीय एअरटेलची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यांच्याकडे पर्याप्त भांडवल आहे. पण व्होडाफोन-आयडियाची बाजारपेठेतील परिस्थिती फारशी बरी नाही.
मोतीलाल ओस्वाल या वित्तीय कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्होडाफोन-आयडियाला २०२०-२१ या वित्तीय वर्षांत सुमारे ३० हजार कोटी रु.चा नफा मिळवणे गरजेचे आहे, तरच कंपनीची आर्थिक परिस्थिती ताळ्यावर येऊ शकते. कंपनीला केंद्र सरकारने लावलेला दंडही चुकवायचा आहे. पण कंपनी २०२२ या वित्तीय वर्षांत आपला नफा १३,२०० कोटी रु. इतकाच कमावू शकते. त्यामुळे कंपनीला आपली ग्राहक संख्या वाढवणे गरजेचे आहे, सध्या व्होडाफोनला प्रत्येक ग्राहकाकडून १२१ रु.चा महसूल मिळतो. तो त्यांना १९० रु. पर्यंत नेणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपनीला ग्रामीण भारतात आपला विस्तार करावा लागणार आहे.
ही परिस्थिती पाहता व्होडाफोन-आयडियापुढे मोठे आव्हान आहे.
एंजेल ब्रोकिंगनुसार आपले दर न वाढवता ग्राहकांची संख्या वाढवणे व त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दंड भरणे या पार्श्वभूमीवर व्होडाफोन-आयडिया कंपनी भारतीय टेलिकॉम बाजारपेठेत फार चांगली कामगिरी करेल याची खात्री वाटत नाही.
व्होडाफोनचा समभागही गेल्या दोन दिवसांत १६ टक्क्याने घसरला आहे.
COMMENTS