नाशिकमध्ये नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढ
नाशिकमध्ये नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसेच दुरुस्तीसाठी मदत पथक घटनास्थळी दाखल झाले मात्र रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.
झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले. ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु होते. एक दीड तासाने ही ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले.
टाकीतून येणाऱ्या ऑक्सिजनचे प्रेशर कमी झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. याविषयी महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. यासंदर्भात सरकारला देखील माहिती कळवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
“ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व लिकेज झाला होता. त्यामुळे ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे,” अशी माहिती स्थानिक प्रशानसनाने दिल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. रुग्णालयात १५० रुग्ण होते, यापैकी २३ रुग्ण व्हेंटिलेटर आणि इतर रुग्ण ऑक्सिजनवर आहेत असे त्यांनी सांगितले.
दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी झाली असून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.
COMMENTS