१०० कोटींवर १५ कोटी भारी पडतील : वारिस पठाणही बरळले

१०० कोटींवर १५ कोटी भारी पडतील : वारिस पठाणही बरळले

‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व भायखळातील आमदार वारिस पठाण यांनी गुरुवारी कर्नाटकमधील गुलबर्गा येथे १०० कोटींवर १५ कोटी भारी पडतील असे हिंदू-मुस्लिम धर्मात विद्वेषाची तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप व मनसेने आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वारिस पठाण यांच्या या वक्तव्याचा एक व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाला असून या व्हिडिओवर सर्वच थरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. वारिस पठाण यांनी मात्र आपण या विधानावर माफी मागणार नाही असे स्पष्ट केले आहे.

उपस्थित जमावापुढे केलेल्या आपल्या भाषणात वारिस पठाण यांनी सीएए, एनआरसीबाबत देशभर निघालेल्या मोर्चांचा उल्लेख करत, स्वातंत्र्य दिलं जात नसेल तर मिळवावं लागेल, असा इशारा दिला. ‘ईंट का जवाब पत्थर, हे आता आम्ही शिकलो आहोत. पण यासाठी एकत्र वाटचाल करावी लागेल. स्वातंत्र्य दिलं जाणार नसेल तर ते जबरदस्तीनं मिळवावे लागेल. ते म्हणतात, की आम्ही स्त्रियांना पुढे करतो. आता तर केवळ वाघिणी बाहेर पडल्या आहेत तर तुम्हाला घाम फुटलाय. मग, आम्ही सगळे एकत्र आलो तर तुमचं काय होईल, हे समजून जा. १५ कोटी आहेत पण १०० कोटींना वरचढ आहोत, हे ध्यानात ठेवा’ अशी विधाने वारिस पठाण यांनी केली आहेत.

भाजप व मनसे आक्रमक

वारिस पठाण यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजप व मनसेने आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘भाजपा महाराष्ट्र’ या ट्विटर हँडलवरून भाजपने, ‘अरे वारिस पठाण, कोणाला घाबरवताय? शिवसेनेचे महाराष्ट्र सरकार तुमच्या धमक्या शांतपणे सहन करेल, पण भाजप व महाराष्ट्रातील जनता तुम्हाला असा धडा शिकवेल की तुमची ही चिथावणीखोर भाषणे बंद होतील’, असा इशारा दिला.
तर मनसेने ‘आम्ही…’ ‘तुम्ही…’ असले भेद आम्हाला मान्य नाहीत. पण… ‘आम्ही’ इतके, ‘तुम्ही’ तितके… अशी भाषा करणाऱ्या वाचाळवीरांना ‘आम्ही’ इतकेच सांगतो की, जर शिवरायांचा तिसरा नेत्र उघडला तर ‘तुम्ही’ सगळेच भस्मसात व्हाल, असे प्रत्युत्तर दिले आहे.

COMMENTS