करोना विषाणू विश्वव्यापक आपत्ती आहे. पण आज या आपत्तीस विविध रंग व रूपे लाभली आहेत. कारण सर्व मानवजातीला ग्रासणारी आपत्ती प्रत्येकाला मात्र वेगवेगळी भासत आहे.
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी कोविड-१९ म्हणजेच करोना विषाणूच्या साथीस चीनला दोषी ठरवले असून, चीनने जगातील सर्व देशांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. ट्रंप यांनी स्वत:चे अपयश नजरेत येऊ नये म्हणून करोना हा विषाणू चीनमुळे निर्माण झाला असल्याचा आरोप केला आहे! पण प्रत्येक देशात करोनाची ओळख, रंग,रूप वेगवेगळे आहे!
करोना विषाणू विश्वव्यापक आपत्ती आहे. पण आज या आपत्तीस विविध रंग व रूपे लाभली आहेत. कारण सर्व मानवजातीला ग्रासणारी आपत्ती प्रत्येकाला मात्र वेगवेगळी भासत आहे.
महानुभावी म्हाईंभटाने श्री. चक्रधर स्वामीवर लिहिलेल्या लीळा चरित्रात चार आंधळे नि हत्तीची कथा रूपक आहे. कान हाती आलेल्या अंधास हत्ती सुपासारखा वाटतो, पायाशी असलेल्या अंधास तो खांबा सारखा, शेपटीपाशी असणा-यास हत्ती दोरीसारखा तर पाठीपाशी उभे असलेल्या अंधास तो हत्ती भिंतीसारखा वाटतो. वस्तुत: त्या चारही अंधांचे आकलन सत्य असते कारण त्यांच्या हाती जे लाभले त्यावरून ते हत्तीचे वर्णन करत होते, जे योग्य होते. मुळात ही रूपक कथा आहे ईश्वराच्या रूपाविषयीची!
महानुभावी रूपक कथेतील हत्ती तपासणारे लोक खरोखरच अंध होते त्यामुळे त्यांचे आकलन डोळस लोकांसारखे नसणे अगदी स्वाभाविक आहे. पण बुद्धीनेच अंध असणारे आणि आपली बुद्धी अशा लोकांकडे गहाण टाकणारे लोक आजही समाजात भरपूर प्रमाणात आहेत. याचा प्रत्यय ‘करोना कोण आहे’ याचा अंदाज बांधणा-या अशा लोकांवरून येऊ शकतो.
भारतातील करोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव दिल्लीतल्या तबलिगी मरकजमुळे वाढला असून करोना मुस्लिम असल्याचा साक्षात्कार भारतातील कांही न्यूज चॅनल्सना झाला. त्यांनी तो भारतभर पसरवला पुन्हा तर तो सरकारनेही सांगायला सुरूवात केली. न्यूज चॅनल्सची भाषा मोठी विचित्र होती. मशिदीत लोक लपवलेले असत तर मंदिर व गुरूद्वारातील लोक मात्र अडकलेले असायचे!
बांग्लादेशातून नुकतीच एक बातमी आली आहे. तिथल्या इस्कॉन मंदिरातील साधूंंना करोनाची लागण झाली आहे. पण अद्याप तरी बांग्लादेशातील कोणत्याही न्यूज चॅनल्सनी या बातमीस धार्मिक आधारावर द्वेष पसरवणारी मांडणी केलेली नाही. ही चांगली बाब आहे. बांग्लादेशातील न्यूज चॅनल्सनी याला धार्मिक आधार दिला तर त्याचा निषेधच करावा लागणार आहे. पण भारतीय उपखंडातीलच नव्हे तर एकून जगातील करोना राजकारणाचा बाज हा सरकारच्या अपयशाचे खापर फोडण्यास कोणाचा तरी माथा शोधणारा झाला आहे.
अमेरिकेतही ट्रंप यांनी अमेरिकन जनतेच्या समस्यांचे खापर स्थलांतरितांवर फोडत लोकांची मने व मते जिंकली. तीच बाब मोदींनी सर्व समस्यांचे खापर काँग्रेस व मुस्लिम यांच्यावर फोडून भारतात केली. असाच प्रयत्न श्रीलंकन
फ्रीडम पार्टीने तामिळांवर खापर फोडून श्रीलंकेत केला. अगदी पाकिस्तानातही इम्रानच्या तहरिक –ए- इन्साफने असाच प्रचार पाकिस्तानात केला आणि सत्ता मिळवली. राष्ट्रवाद, धर्मवाद, वंशवाद या आधारावर मते मागताना या प्रत्येक विजेत्या नेत्याने खापर फोडण्यासाठी माथा शोधला होता. कारण भावनिक राजकारण करणा-या पक्षास दोष देण्यासाठी एक शत्रू निर्माण करणं आवश्यक असतच!
भारतात करोनाला तबलिगीशी व इस्लामशी जोडलं गेलं पण भारतात मुस्लिम नसते तर करोना चीनमधून आला म्हणून तो बौद्ध असाही प्रचार झाला नसता असं कोणीही म्हणू शकणार नाही. आता पाकिस्तानातही करोना आहे मग तिथे करोना इस्लामी नसणार मग तो कोण असू शकेल? शिया असेल की सुफी? मुहाजीर आहे असेल की अहमदिया? की हिंदू, शीख, पारशी वा ख्रिस्ती असेल?
इटलीत करोना ख्रिस्ती सोडून कोणीही असू शकतो! अमेरिकेत करोना कृष्णवर्णीय किंवा मेक्सिकन असेल. आफ्रिकेत करोना श्वेतवर्णीय असेल का? मग इराणमध्ये तो सुन्नी असेल नि इराकमध्ये कुर्दिश किंवा शिया तर श्रीलंकेत तो तामिळ असू शकेल आणि एलटीटीईसारख्या संघटनांच्या अवशेषांनी करोना पसरवला असाही आरोप होईल. रशियामध्ये करोना बुर्झ्वा आणि क्रांतीचा शत्रू म्हणून ओळखला जाऊ शकतो. कॅनडावाले करोनाला कदाचित काळा ठरवतील. प्रत्यक्ष चीनमघे करोना तैवानचा असेल! उत्तर कोरियात तो करोना दक्षिण कोरियाचा वा अमेरिकन असू शकतो. लावोस, कंबोडिया, व्हिएतनाममध्येही तो विविध रंगरूपात आढळू शकतो.
हे सर्वत्र घडू शकतं, पण केव्हा? जेव्हा करोना हे मानव जातीसमोरील एक संकट म्हणून न पाहता, आपल्या राजकीय उद्दिष्टपूर्तीचे साधन म्हणून त्या त्या देशातील नेते याकडे पाहू लागतील तेव्हाच हे घडू शकते!
एकदा संकटाचा वापर राजकीय स्वार्थासाठी करायचा ठरला तर देशांतर्गतही यातून द्वेष वाढवला जाऊ शकतो. दलिताला करोनाची बाधा झाली तर करोना मनुवादी असणार, ब्राह्मणवादी असणार. ब्राह्मण-मराठ्यांसाठी करोना आरक्षण समर्थक असेल तर दलितांसाठी तो आरक्षण विरोधक, मुस्लिमांसाठी करोना हिंदुत्ववाद्यांचे षडयंत्र तर हिंदुत्ववाद्यासाठी करोना मुस्लिमांचे षडयंत्र असेल! मुंबईत करोना उत्तर भारतीय तर गुजरातमधे करोना मुस्लिम असेल किंवा सरदार सरोवरचा विरोधक असेल. दक्षिण भारतात करोना हिंदी भाषिक असेल तर यूपीत करोना बीफ खाणारा असू शकेल. कारवार वा बेळगावात करोना महाराष्ट्रवादीही असू शकतो!
एकंदर आपत्तीला राजकीय स्वार्थपूर्तीची संधी या स्वरूपात समाजाचे राष्ट्राचे नेते पाहू लागले तर करोनाची विविध रूपे जगभर पाहायला मिळू शकतात. अर्थात या लेखात करोना हा निव्वळ रूपक आहे.
भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, वादळ, महापूर वा अवकाशातून एखादी मोठी उल्का पृथ्वीवर पडणार असेल तरीही त्या उल्केला एखादा देश, धर्म वा वंश चिकटू शकतो हे आजचे भयाण वास्तव आहे.
अशा जगाचे भवितव्य काय असेल याची कल्पना केली तर कोणाही सुजाण माणसाचे मन दुःखी झाल्याशिवाय राहणार नाही.
COMMENTS