आजार शब्दांच्या खेळाचा

आजार शब्दांच्या खेळाचा

गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने COVID-19 संदर्भात प्रसिद्ध केलेल्या दोन पत्रकांमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. यातील पहिले पत्रक होते

अमेरिकेतील अनेक राज्यांत ‘लॉक-डाउन’; स्पेनमध्ये करोनामुळे हाहाकार
भाजप आमदाराच्या वाढदिवसाला २०० नागरिक
मुंबईत कोरोनाच्या रुग्णात वेगाने वाढ

गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने COVID-19 संदर्भात प्रसिद्ध केलेल्या दोन पत्रकांमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. यातील पहिले पत्रक होते एका ७६ वर्षीय पुरुष रुग्णाच्या मृत्यूबद्दलचे, तर दुसरे ६८ वर्षीय स्त्री रुग्णाच्या मृत्यूबद्दलचे. पुरुष रुग्ण नुकतेच सौदी अरेबियाहून परतले होते, परत आल्यानंतर ते आजारी पडले आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या रुग्णाचा मृत्यू ‘कोमोर्बिडिटी’ने (एकाहून अधिक आजारांचा परिणाम म्हणून) झाल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले. रुग्णाला अस्थमा आणि हायपरटेन्शन हे विकार पूर्वीपासून होते. दिल्लीतील ६८ वर्षीय स्त्री रुग्णाला तिच्या मुलाकडून संक्रमण झाले असावे अशी शक्यता आहे. या स्त्रीला मधुमेह आणि हायपरटेन्शन हे विकार होतेच. हा मृत्यूही “कोमोर्बिडिटी”मुळे झाल्याचा दावा प्रसिद्धी पत्रकात करण्यात आला होता.

करोना विषाणूची लागण झालेल्या दोन्ही भारतीय रुग्णांचा मृत्यू जगभरात हाहाकार उडवणाऱ्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नव्हे, तर त्यांना पूर्वीपासून असलेल्या विकारांमुळेच झाला, असा अर्थ या दोन्ही पत्रकांतून ध्वनित होतो. १३ मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेतही आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी हा मुद्दाच लावून धरला. दोन्ही रुग्णांचा मृत्यू ‘कोमोर्बिडिटी’मुळे झाल्याचे पत्रकारांनी लक्षात घ्यावे असे ते म्हणाले.

प्रसिद्धी पत्रकांतील भाषा अत्यंत संदिग्ध आहे. पहिला मुद्दा म्हणजे दोन्ही रुग्णांचा मृत्यू  COVID-19मुळे झाला असून, त्यांना पूर्वीपासून असलेल्या विकारांमुळे आजाराची तीव्रता आणखी वाढली, असा निष्कर्ष निघण्याजोग्या अनेक बाबी पत्रकांतच आहेत. दोन्ही रुग्णांमध्ये विषाणूच्या संभाव्य संपर्कानंतर १४ दिवसांच्या आत COVID-19ची लक्षणे दिसू लागली आणि १४ दिवस हा सार्स-सीओव्ही-टूचा (कारणीभूत विषाणू) कमाल इनक्युबेशन कालावधी आहे.

गाझियाबादच्या संतोष मेडिकल कॉलेजमधील असिस्टण्ट प्रोफेसर अनुपम सिंग यांच्या मते दोन्ही रुग्णांचा मृत्यू COVID-19मुळे झाला या निष्कर्षावर येण्यासाठी प्रसिद्धी पत्रकांमध्ये नमूद केलेली लक्षणेही पुरेशी आहेत. अस्थमा, मधुमेह आणि हायपरटेन्शन यांसारखे त्यांना पूर्वीपासून असलेल्या विकारांमुळे त्यांची परिस्थिती अधिक गंभीर झाली असेल. वुहानमध्ये झालेल्या अभ्यासातील आकडेवारीनुसार, रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासलेल्यांपैकी ५० टक्के रुग्णांना हायपरटेन्शन, मधुमेह किंवा कोरोनरी हृदयविकार होता तसेच वयस्कर रुग्णांमध्ये दगावण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, मधुमेहासारख्या विकारामुळे COVID-19 प्रादुर्भावाची तीव्रता वाढली याचा अर्थ रुग्णाचा मृत्यू मधुमेहामुळे झाला असा होत नाही.

“कोमॉर्बिडीटीजमुळे प्रादुर्भावजन्य आजारांची तीव्रता वाढू शकते. मात्र, कोमॉर्बिडिटीजना मृत्यूचे थेट कारण ठरवले जाऊ शकत नाही,” असे अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील तज्ज्ञ मर्लिन मोनी यांनी ‘वायर सायन्स’ला सांगितले.

असे असताना आरोग्य मंत्रालयाने ही दिशाभूल करणारी भाषा का निवडली? ही साथ आटोक्यात आहे असा भास निर्माण करण्याची राजकारणी खेळी यामागे असू शकते, असे मत अनेक डॉक्टरांनी व्यक्त केले. करोनाच्या साथीमुळे लोकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून सरकारला COVID-19 आणि मृत्यू यांमधील संबंध काहीसा धूसर करून दाखवायचा असेल, अशी शक्यता श्रीनगर येथील शेर-ए-कश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधील श्वसनविकार संशोधक परवेझ ए. कौल यांनी व्यक्त केली.

मात्र, कोमॉर्बिडीटीजचा आधार घेऊन COVID-19चे गांभीर्य कमी करणे मोठ्या समस्येला आमंत्रण ठरू शकते. कारण, कोमॉर्बिडिटीज हा या आजारांमधील निर्णायक घटक आहे. हा आजार कोणत्या रुग्णामध्ये तीव्र स्वरूप धारण करेल आणि कोणत्या रुग्णामध्ये सौम्य राहील हे कोमॉर्बिडिटीजच ठरवतात. हे सार्स, इन्फ्लुएंझा, मेर्स आणि डेंगी या प्रादुर्भावाने होणाऱ्या अनेक आजारांबाबत घडते. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी एक इटलीमध्ये या आजाराने मोठ्या संख्येने रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत यामागे हेच कारण आहे. इटलीतील एक चतुर्थांश लोकसंख्या (सुमारे १३ दशलक्ष) वयोवृद्ध आहे आणि कॅन्सर व मधुमेहासारख्या विकारांनी ग्रासलेली आहे.

या पार्श्वभूमीवर भारताने अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण, भारतात वयोवृद्धांची संख्या इटलीच्या तुलनेत अधिक आहे. २०११मधील जनगणनेनुसार, भारताची ५.३ टक्के लोकसंख्या (६४ दशलक्ष) ६५ वर्षांहून अधिक वयाची आहे. जगातील एकूण मधुमेहींपैकी ४९ टक्के भारतात आहेत. यातील १ टक्का लोकांना करोनाची लागण झाली, तरी त्यांच्यामध्ये हा आजार तीव्र स्वरूप घेऊ शकतो, असे नवी दिल्लीतील पब्लिक हेल्थ फाउंडेशनमधील एपिडेमिओलॉजिस्ट गिरीधर आर. बाबू म्हणाले. भारतात त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक तेवढे अतिदक्षता विभाग, मेकॅनिकल व्हेंटिलेटर्स आणि प्रशिक्षित आरोग्यसेवा कर्मचारी नाहीत हे सत्य आहे. वाढलेले वय आणि जुनाट आजारांमुळे लोक प्रादुर्भावजन्य विकारांना अनेक मार्गांनी बळी पडू शकतात. लॅन्सेटमध्ये अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, मधुमेह व हायपरटेन्शनवर उपचार म्हणून वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट औषधांमुळे मानवी पेशी एसीई-टू या प्रथिनाची अधिक निर्मिती करण्यासाठी उद्दिपित होऊ शकतात. हेच प्रथिन सार्स-सीओव्ही-टू या विषाणूद्वारे पेशींना प्रादुर्भाव करण्यासाठी वापरले जाते. म्हणूनच मधुमेह व हायपरटेन्शनच्या रुग्णांमध्ये COVID-19 तीव्र स्वरूप घेऊ शकतो.

शब्दांचा घातक खेळ

आरोग्य मंत्रालयाने केलेला हा शब्दांचा खेळ प्रसिद्धी पत्रकांपुरताच होता. मंत्रालयाच्या वेबसाइटवरील दुसऱ्या एका पेजवर हे दोन्ही मृत्यू COVID-19मुळे झाल्याचे स्पष्ट म्हटले आहे.

मात्र, साथीच्या आजारांची खरे प्रमाण लपवण्यासाठी भारतातील सरकारी यंत्रणांनी यापूर्वीही अनेक क्लृप्त्या लढवल्या आहेत. अल जझीराच्या एका अन्वेषणात असे आढळले होते की, ओडिशात २५ वर्षीय स्त्रीचा मलेरियामुळे मृत्यू झाला असताना तिच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण कार्डिओरेस्पिरेटरी फेल्युअर असे नमूद करण्यात आले. मलेरियाच्या केसेस दडवण्याचा हा भाग होता. नवी दिल्लीत डेंगीची साथ पसरलेली असताना सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर अनेकदा मृत्यूचे कारण पायरेक्झिया (ताप) असे लिहायचे. डेंगीमुळे झालेल्या मृत्यूंचा अधिकृत आकडा प्रत्यक्षातील आकड्याहून खूप कमी दाखवला गेला होता.

मृत्यूची खरी कारणे कशी लपवली जातात याची ही सर्व उदाहरणे आहेत. सामान्य परिस्थितीत डॉक्टरांनी प्रमाणित केलेले मृत्यूचे कारण हे राष्ट्राच्या आरोग्याचे निदर्शक असते. त्यांची नोंद काळजीपूर्वक केली जाणे म्हणूनच अत्यावश्यक आहे.

“मृत्यूचे कारण हे आजार, अपसामान्यता, दुखापत अथवा विषप्रयोग असू शकते. कार्डिअॅक किंवा रेस्पिरेटरी अरेस्ट किंवा हार्ट फेल्युअर ही मृत्यूमागील यंत्रणा आहे, मृत्यूचे कारण नव्हे, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट नमूद आहे. याचा अर्थ मृत्यूचे प्रमाणपत्र देणाऱ्या फिजिशिअनने मल्टि-ऑर्गन फेल्युअर कशामुळे झाले हे प्रथम नमूद केले पाहिजे.

कोमॉर्बिडिटीजचे मृत्यू होऊ शकतो?

अर्थातच आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात वर्णन केलेली स्थिती अशक्य नाहीच. मधुमेही रुग्णाला COVID-19ची लागण झाली आणि COVID19शी संबंध नसूनही त्याचा मधुमेह प्रचंड वाढून मृत्यू झाला. तर मधुमेह हे मृत्यूचे कारण होऊ शकेल. मात्र, अशा रुग्णांमध्ये लक्षणे वेगळी असतील, असे डॉक्टरांचे मत आहे.

मधुमेह न्युमोनिया किंवा श्वसनविकाराद्वारे प्राणघातक ठरत नाही, तर केटोअॅसिडोसिस किंवा किडनी फेल्युअरद्वारे रुग्णाचे प्राण घेतो. प्रसिद्धी पत्रकात या लक्षणांचा उल्लेख नाही, तर करोना प्रादुर्भावाच्या लक्षणांचा उल्लेख आहे. ऑटोप्सीने याबाबत अधिक स्पष्टता येऊ शकेल, असे कौल म्हणाले.

मात्र, ७६ वर्षीय रुग्णाची ऑटोप्सी करण्यात आलेली नाही, असे राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या एपिडेमिओलॉजी विभागाचे प्रमुख रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले. स्त्री रुग्णावर उपचार करणाऱ्या राममनोहर लोहिया रुग्णालयाच्या संचालकांनी यावर बोलण्यास नकार दिला.

२४ तासांहून कमी तास रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण सांगणे कठीण आहे, असे गंगाखेडकर म्हणाले. मात्र, प्रसिद्धी पत्रकांमध्ये दोन्ही मृत्यू कोमॉर्बिडिटीजमुळे झाल्याचे नमूद करून संभ्रम का निर्माण करण्यात आला हे त्यांच्या विधानातून स्पष्ट होऊ शकत नाही.

दोन्ही रुग्णांना श्वसनास त्रास होत असल्याचे प्रसिद्धी पत्रकांत म्हटले आहे. याचा अर्थ त्यांच्या रक्तात पुरेसा ऑक्सिजन नव्हता. श्वसनात अडथळा व COVID-19ची चाचणी पॉझिटिव ठरणे या दोन्ही बाबींचा अर्थ लावल्यास मृत्यूचे कारण COVID-19 ठरेल हे मात्र गंगाखेडकर यांनी मान्य केले.

भारतात अद्याप केवळ ११४ रुग्णांची नोंद झाली आहे आणि दोन मृत्यू झाले आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा संभ्रम शक्य आहे, असे मत बाबू यांनी व्यक्त केले.

शब्दांचे खेळ करणे हा जुना आजार भारतात आहे. रुग्णांची संख्या कमी आहे, तोवर हे शक्य आहे. एकदा का साथ पसरली की शब्दांचे हे खेळही थांबतील. शेवटी तुम्ही विषाणूला तर खूप काळ मूर्ख बनवू शकणार नाही.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0