कोरोना, टाळेबंदी आणि मानसिक आरोग्य

कोरोना, टाळेबंदी आणि मानसिक आरोग्य

साथीचे आजार जेव्हा येतात, तेव्हा ती फक्त शारीरिक आरोग्याची समस्या उरत नाही, तर मानसिक समस्याही होते. कारण साथीचे आजार हे जगण्यातील अनिश्चितता वाढवतात. पण साथीचा आजार जेव्हा महामारी (pandemic) असतो, तेव्हा ही अनिश्चितता कितीतरी पटींनी वाढते.

लॉकडाऊनमध्ये पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी
वुहानला मुंबईने मागे टाकले
कोरोनाचा हवेतून संसर्गः लॅन्सेटचा अहवाल

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला आढळला. त्यानंतर मार्चपर्यंत जगभरातून अनेक बातम्या येत होत्या आणि सगळ्यांचीच अस्वस्थता वाढत होती. मार्चच्या अखेरीस आपल्याकडे टाळेबंदीला सुरुवात झाली, पण मधल्या दोन महिन्यात सगळ्यांनी काय अनुभवलं? तर एका टोकाला होती बेफिकिरी, अतिविश्वास आणि अहंभाव तर दुसऱ्या टोकाला भीती, टोकाची चिंता आणि संताप.

आपल्याकडे कोणतीही समस्या येवो, शारीरिक आरोग्यालाही जिथे फारच कमी महत्व दिलं जातं, तिथे मानसिक आरोग्याची काय कथा? आपल्याकडे एकूण आरोग्यासाठी असलेले बजेट जीडीपी (GDP)च्या १.६% इतकंच म्हणजे फारच कमी आहे, त्यात मानसिक आरोग्यासाठी १ टक्क्यापेक्षाही कमी बजेट आहे. २०१९ च्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या अहवालानुसार भारतात २० कोटी लोकांना प्रत्यक्ष मानसिक आरोग्याच्या सुविधांची आवश्यकता आहे आणि भारताचा नैराश्यग्रस्त व्यक्ती असलेल्या देशांत सहावा क्रमांक लागतो. म्हणजे खरतर मानसिक आरोग्याला आपल्याकडे प्राधान्यक्रम असला पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. (WHO बद्दल मनात शंका असतील तरी या माहितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही)

जेव्हा कोणतीही आपत्ती किंवा साथीचे आजार येतात तेव्हा अचानक अशी यंत्रणा उभी करणं शक्यच नसतं. ती वेळ निभावून नेली जाते आणि होणाऱ्या परिणामांबरोबर अनेकांना अनेक वर्ष जगावं लागतं.

‘कोविड १९’ किंवा कोरोना हा आपल्यासाठी असाच शारीरिक आणि मानसिक समस्या घेऊन आला. यामध्ये ‘कोविड १९’ मुळे निर्माण झालेल्या मानसिक समस्या आणि टाळेबंदीमुळे (lockdown) मुळे निर्माण झालेल्या समस्यांमध्येही फरक करायला हवा. सुरुवातीच्या काळात दोन टोकाच्या प्रतिक्रिया दिसल्या. एकीकडे टोकाची बेफिकिरी आणि दुसरीकडे टोकाचा ताण. काही माणसे जणू काही घडतच नाहीये अशा प्रकारे वागत होती. गर्दी करणं, मास्क न वापरणं, गरबा खेळणं असे अनेक प्रकार त्यातून घडले.

सुरुवातीच्या काळात जेव्हा लोकांचा मानसिक ताण वाढायला लागला त्तेव्हां मला यासाठी हेल्प लाईन  सुरु करण्याची गरज वाटली आणि तसे आवाहन मी इतर समुपदेशकांना (counselors) सोशल मिडियावरून केले. या आवाहनाला महाराष्टातील विविध भागातून म्हणजे पुणे, मुंबई, नगर, कोल्हापूर येथील पन्नास समुपदेशकांनी प्रतिसाद दिला. प्रत्येक समुपदेशकाने दिवसातून दोन ते तीन तास याप्रमाणे वेळ दिला. त्यानुसार प्रत्येकाचा मोबाईल नंबर आणि वेळ असे एक पत्रक करून विविध माध्यमातून ते प्रसारित केलं. २४ मार्चपासून या गटाचे काम सुरु झाले. या आमच्या प्रयत्नाला आम्ही ‘मनोबल’ असे नाव दिले.

यातील आलेल्या फोन्सद्वारे विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण अजून बाकी आहे, परंतु साधारण दिसलेल्या समस्या इथे मांडत आहे.

‘कोविड १९’ मुळे निर्माण झालेला सुरुवातीचा ताण, हा या आजाराची एक तर नीट माहिती नव्हती किंवा अनेक गैरसमज होते, त्यामुळे वाढल्याचे जाणवले. नेमका संसर्ग कशाने होतो, हेच अनेकांना माहित नव्हते. हवेद्वारे विषाणू पसरतो का? मांसाहार केल्याने होतो का? गरम पाणी पिल्याने विषाणू मरतो का? नेमकी काय काळजी घेतली, तर संसर्ग होणार नाही. बाहेरून आणलेल्या वस्तू कशा वापरायच्या वगैरे. अशा एक ना अनेक प्रश्नांनी चिंता वाढलेली दिसली.

याचबरोबर अनेक अशास्त्रीय दावे या गोंधळामध्ये भर घालतच होते. उदा: गरम पाणी पिल्याने, वाफ घेतल्याने, गोमुत्र पिल्याने करोना मरतो. या अशास्त्रीय दाव्यांचे खंडन करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने भावनिक गोंधळ आणि मानसिक ताण दोन्ही गोष्टींमध्ये वाढ झालेली आढळली.

सगळ्याच मानसिक समस्यांचे मुळ अनिश्चिततेमध्ये आहे. जेंव्हा नेमकी माहिती मिळत नाही, भविष्यात काय होणार हे कळत नाही तेव्हा ताण जास्त वाढतो. ‘कोविड १९’ बद्दल योग्य माहिती देऊन लोकांना आश्वस्त करता आलं असतं पण तसं झालं नाही.

टाळेबंदीमुळे झालेला मानसिक त्रास: मुळातच लेखात आधी मांडल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा अचानक झालेला बदल किंवा अनिश्चितता मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते. टाळेबंदी काही लोकांसाठी आपत्ती म्हणून आली, काहींसाठी मानसिक ताण म्हणून तर काहींसाठी नित्यक्रमातील बदल म्हणून.

आपत्ती: समाजातील मोठा गट जो रोजंदारीवर जगतो त्यांच्यासाठी टाळेबंदी आपत्ती म्हणून आली. अचानक झालेल्या घोषणांनी कोणालाच कोणतेही नियोजन करता आले नाहीच, पण अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. काहींचे मृत्यू उपासमारीने झाले. या सगळ्या लोकांसाठी जिथे जगणं अवघड झालं तिथे मानसिक आरोग्याच्या सुविधा म्हणजे श्रीमंतीच (luxury) म्हणावी लागेल. मृत्यूमुखी पडलेल्या लोकांबरोबर जे होते, त्यांच्यासाठी मात्र हा आयुष्यभराचा मानसिक आघात होऊ शकतो. त्यांच्या मानसिक आरोग्याचं काय? जवळच्या व्यक्तींच्या मृत्यू पाहावा लागला तर ‘आघाता नंतरचा मानसिक परिणाम (post traumatic stress disorder) सारखे आजार होऊ शकतात. पण त्याची दखल घेण्यासाठी आणि उपचार करण्यासाठीची यंत्रणा आपल्याकडे नाही.

स्थलांतर कराव्या लागणाऱ्या मजूर वर्गाबरोबरच असे अनेक घटक आहेत, ज्यांच्यासाठी टाळेबंदी आपत्ती म्हणून आली आणि त्याबरोबर मानसिक आरोग्याच्या समस्याही आल्या. उदा वस्तीपातळीवर ‘कोविड १९’ चा झालेला प्रसार आणि त्याचा तिथे राहणाऱ्या लोकांवर झालेला परिणाम, सफाई कामगार, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, पोलीस खात्यात काम करणाऱ्या व्यक्ती ज्यांचा रोज रुग्णांशी संपर्क येतोय असे सगळेच.

आम्हाला आलेल्या कॉल्समध्ये अनेक कॉल्स हे माणसांना अन्नधान्य मिळत नव्हतं म्हणूनही आले. आमच्यातील काही जणांनी विविध संस्थाशी संपर्क साधून अशा व्यक्तींपर्यंत अन्न मिळेल यासाठीही काम केले.

‘कोरोना’ अजून काही लोकांच्या बाबतीत तीव्र मानसिक समस्या घेऊन आला. ज्यांना पूर्वीपासून मानसिक आजार होते त्यांची लक्षण पुन्हा सुरु झाल्याची किंवा तीव्र झाल्याची अनेक उदाहरणं पुढे आली. टाळेबंदीच्या पहिल्या दोन आठवड्यात मानसिक आजारांमध्ये ४० टक्के वाढ झाल्याचे निष्कर्ष आहेत. तसेच अनेक क्षेत्रातील व्यक्तींच्या आत्महत्या आपण पहिल्या. त्यासाठी पुढील काळात येणाऱ्या आर्थिक मंदीमध्ये आपल्याला वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील.

कौटुंबिक हिंसाचाराचे बळी आणि लैंगिक शोषणाला सामोरी गेलेली मुलं आणि स्त्रिया यांना कायदेशीर मदत मिळेलही पण मानसिक आघातांच काय? जगभरामध्ये लॉकडाऊनच्या काळात हिंसा वाढलेली दिसली आणि याचे बळी स्त्रिया आणि मुलं आहेत.

कोरोना आणि मानसिक ताण: समाजातील एक गट असा आहे ज्यांच्यासाठी हा काळ आपत्ती बनून आला नाही, पण त्यांचा मानसिक ताण निश्चितच वाढला होता. उदा : काही लोकांना कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना ‘रेड झोन’मध्ये सर्व्हेक्षणाची, आरोग्य तपासणीची कामं करावी लागली असे लोक. शिक्षक तसेच असे लोक ज्यांच्या नोकऱ्या गेल्या किंवा पुढे जातील. काहीच्या पगारामध्ये कपात झाली. जे एकटे राहत आहेत किंवा ज्यांचे नातेवाईक त्यांच्यापासून लांब आहेत.

असेही अनेक लोक होते, ज्यांची आर्थिक परिस्थिती तशी बरी आहे, पण कल्पनांनी ताण वाढला आहे. उदा : उद्या किराणा मिळालाच नाही तर? माझ्या जवळच्या माणसांना संसर्ग झाला तर? मला योग्य उपचार मिळालेच नाही तर? अशा अनेक विचारांनी माणसांना त्रास होत होता आणि अजूनही होत आहे. ज्यांचे काम पूर्णपणे घरून चालू आहे आणि घर आणि कामाचं ताळतंत्र सांभाळवं लागतंय. अशा लोकांना गंभीर मानसिक आजारांना सामोरे जावे लागले नाही, पण ताण वाढून त्याचा परिणाम आरोग्यावर निश्चितच झालेला दिसत आहे. विविध सरकारी खात्यांमध्ये एकवाक्यता नसणं हेही ताणाचं कारण दिसलं.

कोरोना आणि नित्यक्रमांमध्ये झालेला बदल: काही लोकांना खूप बदल जाणवला नाही. पण बाहेर फिरता येत नाहीये, जीमध्ये जाता येत नाहीये, बाहेर जेवायला जाता येत नाही यामुळे जो कंटाळा आला त्यानेही ताण वाढलेला दिसला. पण तिथे सहनशक्ती वाढवणे एवढा एकच उपाय दिसतो.

काय करता येईल?

मानसिक आरोग्याच्या सुविधा पुरवणे : जसे वैद्यकीय सेवा या अत्यावश्यक मानल्या जातात, तशाच मानसिक आरोग्याच्या सुविधाही असायला हव्यात. हे खरच शक्य आहे का? सरकारी पातळीवर अशा सुविधा सरकारला पुरवता येऊ शकतात का? तर त्याचं उत्तर केरळ सरकारने दिले आहे. तिथे जवळपास तीस हजार लोकांनी मानसिक आरोग्याच्या सेवांचा लाभ घेतला. सेवांना लागणारा वेळ व होणारा खर्च लक्षात घेता, आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने चालणारी मनोसोपचार पद्धती अवघड आहे. समुदाय मानसोपचार (community psychotherapy) सारख्या पर्यायाचा विचार नक्की होऊ शकतो. यासाठी सरकारी पातळीवर पुढाकार आवश्यक आहे.

किमान पातळीचं नियोजन आवश्यक : जेव्हा माणसांच्या आयुष्यावर परिणाम करणारे निर्णय होतात, तेव्हा किमान पातळीचं नियोजन आवश्यक आहे. टाळेबंदीसाठी तसाही उशीर झालाच होता. मग मजुरांना आपल्याला घरी जाऊ देऊन, योग्य आणि नेमक्या सुचना देऊन टाळेबंदी केली असती तर? पण आपल्याकडे सरप्राइज (surprises)ला कधी नव्हे इतक महत्व आलं आहे. नोटबंदीसारखा निर्णय झाला तेव्हा माणसांची चिंता कितीतरी वाढली होती. ज्यांना आधीपासून मानसिक समस्या होत्या त्यांच्या लक्षणांमध्ये वाढ झाली होती. कोणत्याही प्रकारची अनिस्चीतता मानसिक त्रासात भर घालते तर स्पष्ट सुचना आणि नियोजन, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असते.

माध्यमांसाठी किमान नियमावली व नियमांची अंमलबजावणी: कोरोना विषयीच्या बातम्यांचे विश्लेषण केले, तर लक्षात येईल अतिशय हिंसक भाषेतच बातमी दिली पाहिजे, अशी जणू प्रथाच पडली आहे. ‘कोरोनाचा हाहाकार’, ‘कोरोनाचे महासंकट’ असे शब्द वापरायलाच हवेत का? अशा प्रसारणांमुळे माणसांच्या मनात नकारात्मक भवनांमध्ये वाढ होतेच. लोकानी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी मात्र घ्यावी, असा विचार करून शब्दांची निवड करणं शक्य आहे.

एकूणच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटातून बाहेर पडायला आपण तयार आहोत का? मागच्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरात अनेकांना मदत मिळाली असेल, पण त्यांच्या मानसिक आरोग्याचं काय झालं असा प्रश्न राहतोच. ‘कोरोना’ आपल्याला पुढचे काही महिने पुरणार असे दिसते. आधी आपण गाफिल राहिलो पण पुढील महिने कमीत कमी मानसिक त्रास कसा होईल याबाबत उपाय योजना आवश्यक आहेत.

गौरी जानवेकर, या समुपदेशक असून, मानस शास्त्राच्या अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0