माझं काय चुकलं

माझं काय चुकलं

साधारण १५-२० वर्षांपूर्वी टीव्हीवर लागलेलं एक नाटक सहज म्हणून बघायला सुरवात केली आणि त्या नाटकाने अक्षरशः खिळवून ठेवलं आणि सुन्न करणारा परिणाम दिला. ह

रत्नाकर मतकरी यांची गूढकथा
अदृष्टाच्या वाटेवरील असामान्य लेखक
तपशीलावर मेहनत, परफेक्शनचा ध्यास असलेला लेखक

साधारण १५-२० वर्षांपूर्वी टीव्हीवर लागलेलं एक नाटक सहज म्हणून बघायला सुरवात केली आणि त्या नाटकाने अक्षरशः खिळवून ठेवलं आणि सुन्न करणारा परिणाम दिला. हे नाटक होतं, रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं ‘माझं काय चुकलं’. बघायला गेला तर सासू- सून हा विषय, पण त्यापलीकडे जाऊन खूप काही चांगलं देणार हे नाटक. नवऱ्याच्या निधनानंतर एका स्त्रीने एकट्याने आपल्या मुलाला वाढवलं आहे, तोच तिचं सर्वस्व आहे, तिच्या आयुष्यात त्याशिवाय काही नाही. मग मुलगा मोठा होतो, नोकरीला लागतो, साहाजिकच त्याचं लग्नही होतं आणि नंतर सगळे प्रश्न सुरू होतात. ही आई आपल्या मुलावरचा ताबाच सोडायला तयार नाही. घरात आलेल्या नवीन सुनेला हौसमौज करावी, नवऱ्याबरोबर राहावं वाटतं तर त्यात या सासूचे अडथळे. मग सासू- सून यांच्यात वाद सुरू होतात. हळूहळू रोजच, भांडणं, कटकटी आणि आई व बायको यांच्या कात्रीत सापडलेला तो मुलगा. रोज ऑफिसमधून घरी आलं की त्याला या भांडणांना सामोरं जावं लागतं. ती काही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. परिस्थिती शेवटी त्याला इतकी असह्य होते आणि काही मार्ग दिसत नाही. तो आईला दुखवू शकत नाही आणि बायकोला पण काही सांगू शकत नाही. मग तो एका अत्यंत निराशेच्या क्षणी अतिशय निर्धाराने बायकोला सांगतो, हे बघ, ही आपली सगळी ओळखपत्रं अशी बाजूला काढून ठेवायची, हे पाकीट, हा रेल्वेचा पास सगळं काही आणि पारसिकच्या बोगद्यात रेल्वेतून उडी मारून आत्महत्या करायची, सगळ संपवून टाकायचं. आत्महत्या शब्द मी वापरला, पण नाटकात बहुतेक तो वापरलेला नाहीच, न वापरताच ते आपल्याला कळतं. त्याची बायको म्हणते, तुम्ही काय म्हणताय ते बरोबर की चूक मला कळत नाही पण मी पण तुमच्याबरोबर आहे, मी पण येणार. हे ऐकताना आपली स्थिती अशी असते की तो जे सांगतोय आणि त्याची बायको त्याला साथ देणार म्हणतेय, ते आपल्याला पटते. कोणत्याही सूचना आपल्या मनात येत नाहीत, कोणतेही धीर देणारे शब्द आपल्या मनात येत नाहीत, तो असं का करतोय वगैरे विचार मनात येत नाहीत. आपण त्याच्याबरोबर असतो.

नंतरही ठरल्याप्रमाणे ते जीव देतात, पण तो मुलगा मरतो आणि बायको वाचते.  मरणानंतरही प्रश्न सुटत नाही, सासू-सूनेचं भांडण त्याच्या जाण्यानंतरही संपत नाही. माझं-तुझं यावरूनही वाद होतो. अगदी शेवटी मात्र आईला उपरती होते, ती म्हणते सगळंच संपल्यावर जे किडूकमिडूक राहीलं आहे त्याला धरून ठेवायचं म्हणून ते भांडण होतं. यात मुलीच्या वडिलांची व्यक्तिरेखाही इतकी सुंदर रंगवली होती. ते शास्त्री आहेत. जावई गेला आहे, मुलीच्या नशिबी आता दुःखच दुःख आहे, पण तरीही ते धीर दाखवत आहेत, पुनरपि जनमं, पुनरपि मरणं असं काही म्हणत आहेत.

यात मुलाचं काम केलं होतं शेखर नवरे यांनी आणि मुलीचं सुप्रिया विनोद यांनी. दोघांचीही कामं फार सुरेख. शेखर नवरे यांचं नावही पहिल्यांदाच ऐकलं व कामही पहिल्यांदाच बघितलं, पण ते कायमचं लक्षात राहणार. ते अंडरप्लेबद्दल प्रसिद्ध होते.

तन-मन  हे रत्नाकर मतकरींचं एड्स ह्या विषयावरच नाटक, कमिशन्ड नाटक.  एड्स या समस्यावर नाटक लिहून पाहिजे असं कोणत्या संस्थेने सांगितलं आणि त्यांनी लिहून दिलं. सहसा प्रस्थापित साहित्यिक असं योग्य मानत नाहीत, पण एड्स ही तेव्हा अशी समस्या होती, अपवाद करून लिहिणे आवश्यक होते. ह्या समस्येवर काही लेखकांनी ठरवून काही कथा लिहिलेल्या आहेत व त्याचा संग्रह प्रसिद्ध झाला आहे, तो तेवढा अपवाद. रत्नाकर मतकरींनी ‘तन मन’ हे नाटक इतकं छान लिहिलं होतं, समस्येवरच असूनही कुठेही प्रचारकी, ढोबळ नाही. उत्तम बांधणी. नाटक बघितल्यावर न राहवून त्यांना फोन केला होता आणि सांगितलं होतं, या नाटकात उत्तम आर्ग्युमेंट्स आहेत, तेव्हा ते म्हणाले होते, हो हे नाटक आर्ग्युमेंटबद्दलच आहे.

त्यांचं ‘घर तिघांचं हवं’ हेही नाटक प्रभावी होतं आणि ते एका सामाजिक कार्य करणाऱ्या प्रसिद्ध स्त्रीवर होतं. त्यांची अनेक गाजलेली नाटके आहेत.

त्यांची आणखी एक आठवण आहे. चेतन दातार यांनी ‘जंगल मे मंगल’ नाटक केलं होतं, त्यात स्त्री कॅरेक्टर्सची कामं पुरुषांनी केली होती, तर पुरुष कॅरेक्टरची कामं स्त्रियांनी केली होती. हे नाटक मी बघितलं, नंतर दुसऱ्या कशासाठी तरी मी रत्नाकर मतकरी यांना फोन केला, तेव्हा या नाटकाचा विषय निघाला आणि मी म्हटलं, पुरुष कलाकार जेवढे लाफ्टर घेतात, तेवढे या स्त्री कलाकार घेत नाहीत, त्यांची कामं चांगली आहेत पण तरीही लाफ्टर येत नाही. तेव्हा ते म्हणाले होते, पुरुषांनी स्त्रियांची काम करायची हे अनेक वर्षे चालू आहे आणि त्यांनी लाफ्टर कसे काढायचे याचे आडाखे ठरलेले आहेत, विशिष्ट प्रकारे हात करणं, चालणं वगैरे, परंतु स्त्री कलाकारांनी पुरुषाची भूमिका करणं फारच दुर्मीळ आहे, त्यामुळे असं होतं. माझा काही त्यांच्याबरोबर ओळख नव्हती, फोनही अगदी चार-पाचवेळा केला असेल, पण ते माझ्याबरोबर बोलले, इतकं सांगितलं हेच विशेष.

रत्नाक्षरं हा त्यांच्या साहित्याचा एक ग्रंथराज नवचैतन्य प्रकाशित केला आहे, त्याचं प्रकाशनही मोठ्या दिमाखात झालं होतं.

आपली अध्ययावत वेबसाईट काहीच साहित्यिक बनवतात. रत्नाकर मतकरी यांनी त्यांची एक परिपूर्ण साईट बनवलेली आहे. ह्या वेबसाईटवर त्यांचे नाटकासहीत सर्व साहित्य, त्यांचे कार्य, त्यांना मिळालेले पुरस्कार याची माहिती आहे. यातूनही नियोजनपुर्वक काम करण्याची त्यांची पद्धत दिसते.

त्यांच्या वेबसाईटची लिंक :

http://ratnakarmatkari.com/homepage.html

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0