बहुतांश मराठी लघुकथेत एखादं नाटकीय वळण किंवा काव्यात्मक न्याय यांची बांधणी केली असते. मात्र मतकरी आपला विचारसरणीतील वेगळेपणा अधोरेखित करतात. एखाद्याच्या मृत्यूची बातमी आणि मृत्यूची कथा यात जितका फरक असेल, तितका फरक इतर कथा आणि मतकरींची कथा यांत दिसतो.
मराठी साहित्यात लघुकथांचं स्वतःचं महत्त्व आहे. कादंबरी लिखाणापेक्षा लघुकथालेखन अधिक आव्हानात्मक मानलं जातं. कारण कमीत कमी शब्दांमध्ये अधिकाधिक आशय मांडणं हे त्याचं सर्वांत मोठं आव्हान. पात्रांची रचना (कॅरेक्टरायझेशन) कथेची मांडणी, त्यातील नाट्य या सर्वांना न्याय देत आशय कमीत कमी लिखाणात वाचकांना पूर्ण कथेची अनुभुती देणं हे लघुकथेचं वैशिष्ट्य. कथेमध्ये जसा लघुकथा हा प्रकार आहे, तसा लघुकथेमध्येही प्रकार आहे का? खरंतर नसावा. लघुकथा ही लघुकथा असते. त्यात विविध प्रकार असणं अपरिहार्य आहे. मात्र त्यात जातीभेद नसावा. गूढकथा हा लघुकथेतील एक प्रकार आहे. वेगळा कथाप्रकार नव्हे. मात्र गूढकथेच्या अद्भुततेवर, रंजकतेवर वाचक, समीक्षक इतके भारावून जातात, की गूढकथा म्हणजे लघुकथाच असल्याचा त्यांना विसर पडतो.
मराठी साहित्यातला एक महत्त्वाचा तरीही तितकाच दुर्लक्षित कथाप्रकार म्हणजे गूढकथा. गूढकथेचा बाज हा भयकथेपेक्षा सर्वस्वी वेगळा असतो. भयकथेमध्ये भयकारी वर्णन, अघोरी प्रकार, तितकीच भयावह व्यक्तिमत्व यांची रेलचेल असते. आणि या वातावरणनिर्मितीत आणि व्यक्तिरेखांच्या अघोरीपणात कथा तितकीशी खुलून येत नाही. याउलट गूढकथेमध्ये कथा हिच प्रधानस्वरूप असते. गूढत्व ही केवळ त्या कथेच्या प्रभावी मांडणीसाठी वापरली जाणारी शैली असते. गुढत्वाचा बाज नाकारूनही कथा तितकीच अर्थपूर्ण ठरत असते. मात्र त्याला गुढतेचं वलय प्राप्त झाल्यामुळे त्याचा वाचकावर पडणारा प्रभाव जास्त गहिरा ठरतो. या कथा इतर कथांपेक्षा वेगळ्या असतात का? आशयाच्या दृष्टीने विचार केला तर मुळीच नाही. विषयाच्या दृष्टीने विचार केला तरीही नाही. पण त्या कथांचं वेगळेपण हे की त्या कथांमागच्या तर्कशास्त्रात एक अद्भुताचं चिंतन असतं. सामान्य समीकरणांच्या उत्तरांपेक्षा वेगळ्या पायऱ्या वापरून या गणितांची उत्तरं मांडली गेली असता. वातावरणनिर्मिती हे त्यातील एक महत्त्वाचं आयुध असू शकतं. पण याचा डोलारा हा विषयाच्या प्रगल्भतेवरच अवलंबून असतो. अन्यथा गूढकथा आणि भयकथेत कुठलाही फरक राहणार नाही.
पाश्चात्य साहित्यात गूढकथा हा कथाप्रकार अत्यंत मुबलक प्रमाणात अस्तित्वात आहे. या कथाप्रकाराबाबत वाचकांच्या आणि समीक्षकांच्या मनात तितकाच आदरभाव आहे. मात्र मराठीत तशी परिस्थिती दिसून येत नाही. मराठीमध्ये गूढकथा हा विषय म्हटला की पहिलं आणि महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे अर्थातच रत्नाकर मतकरी यांचं. ‘नवल’सारख्या दिवाळी अंकांत अनेक गूढकथा वाचायला मिळतात. पण त्यातल्या original कथा किती असतात? बहुतांश कथा या अनुवादित स्वरुपाच्या असतात. मात्र जी कथा original असते, ती रत्नाकर मतकरींचीच असते. त्यातही ती कादंबरीप्रमाणे वर्णनांच्या प्रवाहात भरकटत नाही. अत्यंत चोख, गोळीबंद रचनेत या कथेची जादू असते. एखादी लघुकथा लिहिणे आणि गूढकथा लिहिणे, यांत खूप फरक आहे. एखादी कथा लिहिताना चक्षुर्वैसत्यम घटनेचा आधार घेत त्या भोवती काल्पनिक पात्रांची मांडणी करत कथा लिहिणं हे कठीण असलं, तरी अद्भूत ठरत नाही. मात्र, एखाद्या सामान्य घटनेचा वेध घेताना त्याला गुढतेची किनार देणं, त्याच्या अंतापर्यंत त्याच्या शेवटाचा अंदाज येऊ न देता, एखादी चकमक घडावी, तद्वत शेवट अंगावर येईल आणि दीर्घकाळ स्मरणात राहील, अशा प्रकारे त्याची रचना करणं, हे गूढकथेचं सामर्थ्य आहे आणि तेच त्याचं वैशिष्ट्य. दुर्दैवाने मराठीत कथेचा या दृष्टिकोनातून विचार कऱण्याची हिंमत कुणी करत नाही आणि समीक्षकही ठराविक समीकरणाबाहेरची शैली मानत गूढकथेचं अभिजातपण मान्य करत नाही. गुढतेच्या या गर्भात एक नात्यांची वीण असणारी लघुकथाच असल्याचं विसरणं चूक आहे.
मतकरींच्या गूढकथा वाचल्यावर या कथेच्या शैलीमध्ये असणारं वेगळेपण नजरेत भरतं. गुढतेची झाक आली, की कथा आपोआप पुढे सरकताना वाचकाला ओढू लागते. गूढकथेचं विश्व वेगळं असेल, तर वाचकाला कथा आवडू शकते. पण ती त्याला आपलीशी वाटत नाही. मतकरींच्या कथेशी वाचक अधिक समरस होऊ लागतो. कथा अर्ध्यातच सोडून देण्याची शक्यताच नष्ट होऊन जाते. कारण मतकरींच्या बऱ्याचशा कथेतील पात्रं मुळात प्रथम पुरुषी असतात. आत्मकथन करत आपला अनुभव मांडतात. हे त्यांच्या कथांचं ठळक वैशिष्ट्य. एखादा माणूस स्वतःचा अनुभव सांगू लागतो, तेव्हा दुसरा त्यात समरस होण्याची शक्यता वाढते. दुसऱ्याच्या आयुष्यातील असामान्य आणि अतार्किक घटनेची माहिती मिळत असेल, तर त्यात जास्त रस घेणं, हा माणसाचा गूणच आहे. त्यामुळे अशा प्रथम पुरुषी पद्धतीने कथेची मांडणी करणं, हे मतकरींच्या कथांना जास्त जिवंत करतं. हे वैशिष्ट्य केवळ गूढकथा असल्यामुळेच अधोरेखित होतं असं नव्हे, कथा गूढ नसली तरीही प्रथम पुरुषी वक्तव्यांमुऴे ती रंजक होते. कथेमध्ये नाट्य असणं, ही कथेच्या रसाळपणाची पहिली अट असते. ती बहुतांश उत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या लघुकथा पूर्ण करतच असतात. मात्र त्याला वेगळा आयाम देण्याचं काम मतकरींच्या लघुकथा करतात. आणि यासाठी लघुकथनाची शैली अधिक प्रभावी आणि धारदार असावी लागते. गूढत्व ही ती शैली आहे.
बहुतांश लघुकथा या लेखकाने ऐकलेले अनुभव किंवा त्यातून त्याला सुचलेलं पुढील काल्पनिक नाट्य यावर आधारित असतात. मात्र त्यातून लेखकाची विचार करण्याची शैली प्रतीत होत जाते. एखाद्या माणसाच्या आयुष्याची गोष्ट मांडताना तो कशाप्रकारे जगला, त्याने आयुष्यात काय केलं याचा ताळेबंद असतो. लघुकथेत आयुष्यातील एखादा प्रसंगच लिहिलेला असतो. आणि त्याच्या अंताशी एखादं नाटकीय वळण किंवा काव्यात्मक न्याय यांची बांधणी केली असते. बहुतांश मराठी लघुकथांचा आकृतीबंध याच स्वरूपाचा असतो. मात्र इथेच मतकऱींच्या विचारसरणीतील वेगळेपण अधोरेखित होताना दिसतं. एखाद्याच्या मृत्यूची बातमी आणि मृत्यूची कथा यात जितका फरक असेल, तितका फरक इतर कथा आणि मतकरींची कथा यांत दिसतो.
उदा. भुतांच्या गोष्टी बहुतेक सर्वच गावात ऐकायला मिळतात. कुठल्या तरी घरात, विहिरीत कुणीतरी आत्महत्या केल्याची घटना घडलेली असते. त्याला अनुसरून भुताची सुरस कथाही ऐकायला मिळू लागतात. पण इथे दुसरा लेखक जर केवळ माणसाच्या आत्महत्येतलं कारुण्य शोधत असेल, तर मतकरी त्याचा मनोव्यापार शोधतात. आत्महत्या करण्याची वेळ का आली, याबद्दल एखादा लेखक काल्पनिक कथा रंगवत असेल, तर मतकरी आत्महत्येनंतर त्याची काय अवस्था होत असेल, याचा विचार करत व्यक्तिचित्रण करतात. त्यामुळे त्या व्यक्तिची मानसिकता अधिक प्रखरपणे जाणवते. कथेची सूत्रं वेगळ्या बाजूने फिरवली गेल्याचं जाणवू लागतं. कुठलाही माणूस हा थोड्या फार प्रमाणात विकृत असतोच. हे मानसोपचारतज्ज्ञांचंच विधान आहे. फक्त त्याच्या विकृती किती प्रमाणात आहेत, यावर त्याचं मानसिक स्वास्थ्य अवलंबून असतं. मतकरींच्या कथा नेमक्या या वास्तवाच्याच डोहातून वर येतात. प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात एक असं रहस्य असतं, जे त्याला कधीही उघड व्हावं असं वाटत नसतं. ते फारसं भयानक नसतं, खरंतर. पण ते असतं. अशा रहस्यमय घटनांमध्ये बहुतांशवेळा अपराधगंड असतो. आपल्याच एखाद्या निर्णयाचा पश्चात्ताप असतो. आपल्या गुन्ह्याचं दडपण असतं. अशा माणूस आडकाठीविना सुटल्याचं तर उदाहरण आपण अनेकवेळा पाहिलं असतं, पण अशा भावनांना अपराधाची टोचणी लावून पश्चात्तापदग्धतेची वेगळी अवस्था मतकरी आपल्या कथेतून उलगडतात. आता सामान्य माणूस, त्याचं दैनंदिन आयुष्य त्याची चूक, त्याचं प्रेम या सर्व गोष्टी इतरही लेखक दर्शवतात. मतकरीही तेच करतात. त्यामुळे मूळात मतकरींच्या लघुकथा या लघुकथाच असतात. त्यांना गूढकथा म्हणण्याची तशी आवश्यकता नाही. मात्र त्यांचं तंत्र मात्र विलक्षण असतं. वातावरणनिर्मिती, माणसाचं वागणं यातून ते एक गारूड वाचकांच्या मनावर घालतात.
लघुकथांमध्ये असणारी सर्व वैशिष्ट्यं गूढकथांमध्ये असतात. त्यामुळे गूढकथा या लघुकथांचाच एक प्रकार आहे, हे निश्चित. जेम तेम ५- ६ पानांमध्ये मावणारं पण दीर्घकाळ ठसा उमटवणारं कथानक, मानवी संबंधांमधील गुंतागुंत, अनोखी व्यक्तिमत्व आणि त्यांच्यासोबत आपल्याला एकरूप करणारी वातावरणनिर्मिती या सर्व गोष्टी लघुकथांचं अविभाज्य अंग असतात. मतकरींच्या गूढकथा या सर्व नियमांत बसतात. पण वाचकांना गुंतवून ठेवत शेवटी काहीतरी धक्कातंत्र वापरून अद्भुताचा आनंद देणं, करमणूक करणं एवढ्यावरच मतकरींच्या गूढकथा थांबत नाहीत. त्यामुळेच त्या लौकिकार्थाने लघुकथा एवढीच ओळख राखत नाहीत. या लघुकथा मनोरंजनाची पातळी ओलांडून तात्विक पातळी गाठतात. आध्यात्मिक विचार, सामाजिक प्रश्न, माणुसकी, अगतिकता यांसारखे विषय मतकरींच्या गूढकथांची खरी बलस्थानं आहेत. सामाजिक समस्या मांडणारी एखादी लघुकथा साधारण ज्या रेषेत जाईल, त्या रेषेला खोडून मतकरींना एक वेगळं स्वरूप लघुकथेला दिलं. त्यासाठी गूढ हे माध्यम बनवलं. यामुळे रोजच्या व्यवहारिक पातळीवरील गोष्टींना नवी डूब मिळाली. अज्ञाताशी नातं जोडल्यामुळे ज्ञात गोष्टींकडे पाहाण्याची वेगळी दृष्टी या कथांमुळे मिळते. त्या अर्थाने या कथा मराठी साहित्यातील अत्यंत महत्वाच्या आहेत.
मानवी जीवन, त्यातील चढ उतार, भूतकाळ भविष्यकाळ या सर्वांची साखळी गूढतेच्या धातूने बनली असते. भविष्यात काय होणार आहे हे जसं गूढ असतं, तसंच भूतकाळही गूढरम्यच असतो. त्यामुळे अशा अज्ञाताची रंजक लघुकथा म्हणजे गूढकथा. गूढकथांवर असणारा एक आरोप म्हणजे त्या वास्तवदर्शी नसतात. पण हा आरोपही मतकरींच्या कथा खोडून काढतात. कारण या कथांमध्ये असणारे नातेसंबंध काहीवेळा मृत्यूनंतरचेही अस्तित्व हे माणूसपण सोडत नाहीत. विकृती असली तरी ती स्वाभाविक असते. अघोरीपणा असला तरी तो अमानुष नसतो. नात्यांमधील भावबंधच मतकरींच्या कथा अधोरेखित करत असतात. आई- मुलामधील नातं, वडील- मुलामधील संबंध, पती-पत्नी, मैत्री, प्रेम, माया, ममता या सर्व नात्यांचा ओलावा मतकरींच्या कथांमध्ये असतो. भय ही संवेदनामात्र असते. नात्यांमधील संबंधांचा होणारा अतिरेक बहुतेक वेळा विकृती बनत जातो. आणि विकृत ओढ एखादं चौकटीबाहेरचं पाऊल उचलते. मुद्दा असा आहे, की ढोबळपणे वाचणाऱ्यांना केवळ हे चौकटीबाहेरचं पाऊल दिसतं आणि ही कथा अतिमानुष, वास्तवापलिकडची वाटू लागते.
पण जसं चार्ली चाप्लिनच्या चित्रपटांमध्ये विनोदाच्या शेवटी येणारं कारूण्य हे जरी सुरूवातीपासून सिनेमात असलं, तरी जाणवतं शेवटी. तशीच अवस्था मतकरींच्या कथांच्या बाबतीत होते. त्यांच्या लघुकथांमधला सामाजिक आशय गूढकथांमुळे सोईस्करपणे दृष्टीआड केला जातो. हे मराठी साहित्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. एकीकडे सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या कथांना भरभरून दाद मिळते. पुरस्कार मिळतात. मात्र गूढकथांच्या कोंदणातल्या सामाजिक कथांमधील आशय समीक्षक दुर्लक्षित करतात.
पाश्चात्य लघुकथांवरून अनेक मराठी लघुकथा प्रेरित झालेल्या दिसतात. मात्र गूढकथांमध्ये दाटणाऱ्या भीतीच्या छटा या पाश्चिमी साहित्यातून प्रेरित होऊ शकत नाहीत. आणि झाल्या तरी त्याचं मराठीकरण करताना इथल्या मानसिकतेचा विचार त्यात आभावानेच आढळतो. मात्र सामाजिक संदर्भ विचारात घेऊन गूढकथेची बांधणी करणं हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण लेखक गूढकथा लिहितानाही सामाजिक भान सोडत नाही. त्यामुळे मतकरींच्या गूढकथा वेगळ्या अमानवी जगातल्या ठरत नाहीत. त्या याच जगातल्या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या असतात. एका लेखकासाठी समाजमनाची माहिती असणं हे सर्वांत जास्त महत्त्वाचं असतं. मानवी स्वभावाच्या सूक्ष्मछटा हेरून त्याभोवती कथेची बांधणी करणं आणि त्याला अनुसरून गूढतेचं तंत्र आवश्यकतेपुरतं अवलंबलेलं असतं. मात्र त्याचा प्रभाव इतका गहिरा असतो, की लोक त्यातच गुंतून जातात. एकदा कथेतील गूढ उकललं की त्या पुन्हा वाचणं होत नाही. मात्र, त्या पुनःपुन्हा वाचून बघितल्या तर लक्षात येतं, गूढतेच्या पलिकडे बरंच काही ढळून येतं. निसर्गाचं उत्कृष्ट चित्रण, कलाकाराची दृष्टी, मानसशास्त्राचा अभ्यास आणि सामाजिक प्रश्नांची जाण अशा कितीतरी गोष्टी मतकरींच्या कथांमध्ये अंतर्भूत असतात.
‘रंगाधळा’ कथा वाचली तर त्यातलं रंगांचं तेज गूढतेच्या अंतराळात फिरताना दिसतं. पण तो अनुभव घेण्यासाठी मूळात असणारी चित्रकाराची दृष्टी, त्याची विचारसरणी ही गूढतेच्या पलिकडची आहे. एका मनस्वी चित्रकाराला केवळ अमूर्त स्वरूपात समोरच्या गोष्टी दिसत जातात. त्याला फक्त रंगांची सरमिसळ दिसत राहाते. कुठलीही रेषा दिसत नाही. कुठलाही आकार दिसत नाही. असा उत्तुंग दर्जाची कल्पना सुचणं हे आश्चर्यकारक नाही का? याला गूढतेचं लेबल लावणं म्हणजे महत्त्वाची गोष्ट समजलीच नाही. हे कबूल करण्यासारखं आहे. कलेची अनुभूती रंगांधळाच देते, असं नाही. हेडस्टडी कथेमध्येही मूर्तीकाराची शिल्पकला वेधक ठरते. त्याचा इतरांवर होणारा परिणाम हा भाग मानसशास्त्राचा झाला. पण कलेची जाण आणि त्याचा परिणाम याचा अभ्यास कथेमधून दिसतो.
एकटेपणाचं दुःख कधी मतकरींच्या कथांमधून भळभलत असतं. ते जीएंच्या कथांधल्या एकटेपणाइतकं विदारक नसतं. पण त्याचा एक वेगळा पदर मतकरी उलगडून दाखवत असतात. ‘तळ्याकाठची हिरवळ’ असो वा ‘वशीकरण’ सारखी कथा असो. मनाचे खेळ सुरू होतात, तेच एकटेपणाच्या जाणिवेतून.
अशीच आणखी एक त्यांची कथा म्हणजे ‘शेवटची कादंबरी’. या कथेतील रचनाकौशल्य अत्यंत उच्च पातळीवरील मानलं जायला हवं. अतिशय गुंतागुंतीचं, विविध पातळ्यांवर सुरू असणारं कथानक एकाच वेळी जेमतेम पाच ते सहा पानांमध्ये मांडणं यासाठी तंत्रावर प्रचंड हुकुमत असणं आवश्यक आहे. या कथेमध्ये गूढ असं काहीच नाही. ती एक लघुकथाच आहे. पण त्या कथेतील असामान्यत्व तिच्या विविध रूपांमध्ये आहे. एका लेखकाचा भूतकाळ त्याच्या शेवटच्या कादंबरीतील पात्रांच्या रूपातून पुन्हा आकार घेऊ लागतो. त्यात ज्या जागेत ही शेवटची कादंबरी लिहिली जात असते, त्या जागेतील पात्रं उदा. घरमालकीण, घरमालकिणीची मुलगी ही पात्रंदेखील मिसळून जातात. मात्र याचा शेवट होताना तो एकच आणि शोकान्ताच्याच वाटेवर जातो. शोकान्तिका हा तर साहित्याच्या सर्वश्रेष्ठत्वाचं रूप मानलं जातं. मात्र मतकरींच्या कथा गूढत्वाने भारल्यामुळे त्यांचा शोकान्त दुय्यम मानला जातो.
नोकरीचा प्रश्न, संपत्तीचा प्रश्न, महत्त्वाकांक्षा या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातल्या गोष्टीच मतकरींच्या गूढकथेत आहेत. फक्त त्यांना वेगळ्या बाजूने पाहिलं गेलं आहे इतकंच.
महिलांचे प्रश्न मतकरींच्या गूढकथांमध्ये प्रकर्षाने मांडले गेले आहेत. ‘शनचरी’मध्ये चेटकिणीचं रूपक महिला सबलीकरणाच्या हेतूने वापरलं आहे. ‘झोपाळा’सारख्या कथेत लग्न मोडलेल्या मुलीचा प्रश्न मांडला जातो. आपत्यहीन वृद्ध दाम्पत्याची कथा मांडणाऱ्या ‘जळमटं’ या कथेतील वेदना त्या वृद्ध दाम्पत्याला पिशाच्च योनीतील दाखवल्यामुळे अधिक परिणामकारक होते. मृत्यूनंतरही त्यांच्या मनातील शल्य जिवंत राहाणं हे इतरवेळी नुसतंच निरपत्य म्हाताऱ्या दाम्पत्याची करूण कहाणी मांडून पोहोचलं नसतं.
माणसाचं इतर पशूंशी असणारं नातंही मतकरींच्या गूढकथांमध्ये असतं आणि पशूंच्या नजरेतून मानवीपणही अधोरेखित केलं जातं. कधी पाळीव कुत्रा आणि मालकाचं नातं, कधी मेलेल्या मांजरीशी जोडलं गेलेलं एकाकी म्हाताऱ्याचं मरण. अशीच एक कथा ज्यातून मतकरींच्या कल्पनाशक्तीची भरारी आणि लेखनशैलीतील वेगळा विचार काळ्या मांजराचं स्वप्न या कथेत आढळून येतं. माणसाच्या स्वभावाचा वात्सल्यपूर्ण पैलू जनावराच्या दृष्टिकोनातून दाखवणं असा विचार, असा प्रयोग इतर कुठेही वाचायला मिळणार नाही. मांजरीचे विचार अनेक ठिकाणी गमतीदारपणे मांडलेले वाचायला मिळतात. पण मांजरातील पशुत्व, नरबळीच्या अंधश्रद्धाळू प्रथा ज्यातून माणसातलं पशुत्व दिसून येतं, मांजरीच्या विचारशैलीतील तोकडेपणा, मांजरीने माणसाच्या वागण्याचे अर्थ शोधण्याचे प्रयत्न केले, तर त्याच्या नजरेत माणसाची नात्यांवर असणारी अगम्य श्रद्धा ही कल्पनेपलिकडची गोष्ट ठरते. मात्र अशी गोष्ट मांडण्यासाठी लेखनतंत्रावर प्रचंड हुकुमत असणं आवश्यक असतं. कारण नातेसंबंधांचं दळण दळणाऱ्या अनेक लघुकथा मराठीत आहेत. पण काळ्या मांजरीच्या नजरेतून माणसाच्या नात्यांवरील प्रेमाचा वेध घेतलेली ही पहिलीच कथा आहे. या कथेतून एक मुद्दा स्पष्ट व्हायला मदत होईल, ती म्हणजे माणसाची नात्यावर असणारी श्रद्धा हे देखील गूढच आहे. कुठल्याही नात्यामध्ये निर्माण होणारे बंध हेदेखील एक मोठं गूढ आहे. कुठल्याच जनावरांचे आपापसांत इतके दाट नाते संबंध नसतात. पण माणसांमध्ये तो गूण आहे. आदिम काळापासून. त्यावर कित्येक शतकांचे थर चढवले तरी ते आकर्षण संपत नाही. नाती अधिक दाट होत जातात. पाळलेली जनावरंही माणसांशी तितकीच श्रद्धा ठेवून जगतात. या बंधांचं गमक काय? कुणालाही त्याचं उत्तर मिळालेलं नाही. हे ही एक गूढच आहे. पण नात्यांवर लिहिल्या जाणाऱ्या इतर कथांवर गूढतेचा शिक्का मारला जात नाही. कारण त्यात तंत्र लक्षात येण्याइतकं कथेवर हावी झालेलं नसतं. मतकरींच्या कथेत तंत्र वाचकाच्या मनावर गारूड घालतं. त्यामुळे त्यातल्या सामाजिक आशयाकडे दुर्लक्ष होतं. पण याकडे लक्ष वेढणं आवश्यक आहे.
आदित्य निमकर, हे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाचे कंटेंट हेड आहेत.
COMMENTS