एकनाथ खडसे राष्ट्रवादीत

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शुक्रवारी, २३ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी

नोबेल पुरस्कार – मर्यादा आणि शक्यता
नेणिवेतील जातवास्तव व समलैंगिकतेवरचे भाष्य
शेती कायद्यावर सरकार मवाळ, पण पेच कायमच
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शुक्रवारी, २३ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
एकनाथ खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश निश्चित झाला असून आम्ही त्यांचे पक्षात स्वागत करत आहोत, असेही जयंत पाटील म्हणाले.
खडसे यांचे अनेक समर्थकही पक्षप्रवेश करण्यास इच्छुक असून लवकरच त्यांनाही प्रवेश दिला जाईल, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला पक्ष पक्षातून बाहेर ढकलण्यात आल्याचे सांगितले. आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याच्या आरोप खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

अंजली दमानिया यांच्याद्वारे विनयभंगाचा खोटा आरोप लावण्यासाठी फडणवीस यांनी पोलिसांना फोन केला. तसेच भ्रष्टाचरचे आरोप उगाच करण्यात आल्याचे खडसे यांनी सांगितले.

खडसेंचा राजकीय प्रवास

ग्रामीण भागात भाजप वाढविण्यासाठी खडसेंनी मोठे कष्ट घेतले होते. खान्देशातल्या घरा-घरात त्यांनी भाजप पोहचवली होती व रुजवली होती.

बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतलेल्या खडसेंनी आपल्या राजकारणाची सुरूवात सरपंचपदापासून केली. १९८४ ते १९८७ या काळात त्यांनी त्यांच्या कोथळी गावाचे सरपंचपद भूषवले होते. पुढे १९९० मध्ये मुक्ताई नगर मतदारसंघात विजय मिळवत त्यांनी पहिल्यांदा विधानसभा गाठली व २०१४पर्यंत सलग सहाव्यांदा ते येथून निवडून येत होते.

१९९५ साली युतीच्या सरकारमध्ये त्यांनी उच्च तंत्रशिक्षणमंत्री, पाटबंधारे, अर्थ व नियोजन अशी महत्त्वाची खाते सांभाळताना आपल्या प्रशासकीय कौशल्याची छाप पाडली. पाटबंधारे मंत्री असताना पाडळसरे सारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची खान्देशात पायाभरणी केली. सोबतच पक्षाच्या विस्ताराची जबाबदारी देखील त्यांनी सक्षमपणे सांभाळली.

पुढे पक्षाच्या प्रतोद, उपनेता व २००९साली विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडली. विरोधी पक्षनेतेपदी असतांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर त्यांनी जोरदार आसूड आढले. अभ्यासू वृत्तीने सरकारची  विधिमंडळात त्यांनी दाणादाण उडविली. प्रशासकीय कामातल्या खाचाखोच्या, शासकीय निर्णयामागचे राजकारण व सत्ताधारी पक्षांची राजकीय गणिते यांचा चौफेर समाचार घेणारी त्यांची भाषणे विधानसभेने ऐकली आहेत.
२०१४ साली भाजप-शिवसेना युतीला विधानसभेत बहुमत मिळाल्याने त्यात भाजपला अधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे म्हणून खडसे आग्रही होते. त्यावेळी खडसेंनी मुख्यमंत्रीपदाची मनिषा लपवून ठेवली नव्हती. पण भाजपच्या अंतर्गत राजकीय कुरघोडीत देवेंद्र फडणवीस यांच्या मागे मोदी-शहा यांची ताकद लागल्याने खडसेंनी चार पावले मागे घेतली पण त्यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात त्यांनी महत्त्वाची १२ खाती आपल्या पदरात पाडून घेतली. सोबतीला जळगावचे पालकमंत्रीपद देखील होते.
सत्ता स्थापन झाल्यानंतर काही दिवस देवेंद्र फडणवीस व खडसेंमधील द्वंद्व मात्र शमत नव्हते. फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्याकडे मंत्री मंडळातील महत्त्वाची खाती सोपवत खडसेंना शह दिला. खडसेंना खिंडीत गाठत जळगावमध्येच अडकवून ठेवायचे असा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न होता. त्याने मात्र खडसे अधिकच आक्रमक होत होते. खडसे-फडणवीस यांच्यातील कोल्ड वॉर सुरूच होते.
पुढे खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. आपण स्वतःहून राजीनामा देत असल्याचे पक्षाने त्यावेळी त्यांच्याकडून वदवून घेतले. आता मात्र पक्षाने सांगितले म्हणून आपण राजीनामा दिल्याचे खडसे सांगतात.

दिल्लीत गॉडफादर नसल्याने अडचण
तात्कालिक महाराष्ट्राच्या राजकारणातील मुंडे व गडकरी गटापैकी खडसे मुंडे गटाचे मानले जात. मुंडेच्या निधनाने त्यांचा केंद्रीय नेतृत्वातील गॉडफादर हरपला. केंद्रातील गॉडफादरची उणीण त्यांचे तिकीट रद्द होईपर्यंत त्यांना भासली.

खडसेंचे मंत्रीपद गेल्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणाऱ्यांनी महाजन यांच्याशी घरोबा केला. जळगाव विधान परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या समर्थकांना डावलण्यात आले. एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीत त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारली जाऊन गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. शेवटी मात्र रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाली.

खडसे यांना घराणेशाही भोवल्याचेही बोलले जाते. खडसे यांच्या घरातील सर्व सदस्य महत्त्वाच्या पदावर विराजमान आहेत. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या महाराष्ट्र दूध संघाच्या अध्यक्ष, मुलगी रोहिणी खडसे-खेवलकर या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष तर स्नुषा रक्षा खडसे रावेर मतदारसंघाच्या खासदार आहेत. विविध महत्त्वाच्या पदांवर घरातील व्यक्तींनाच स्थान दिल्यामुळे पक्षात त्यांच्याबद्दल नाराजी होती.

आजपर्यंत झालेल्या विविध निवडणुकीत उमेदवारी वाटपात खडसे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या विधानसभा उमेदवारीसाठी खडसे शेवटपर्यत आग्रही होते. मात्र, “तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही तुम्ही जे नाव सुचवाल त्यांना उमेदवारी देऊ’ असे सांगत त्यांना स्पष्ट नकार देण्यात आला होता. खडसे यांनी अनेकांना उमेदवारी देत आमदार, खासदार केले आज मात्र त्यांना स्वतःलाच उमेदवारी मिळालेली नव्हती.

रावेर लोकसभा मतदारसंघातून २०१४ साली त्यावेळचे खासदार हरीभाऊ जावळे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली होती. तेव्हा हरीभाऊ जावळे यांना जाहीर झालेली उमेदवारी रद्द करीत त्यांनी त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या साठी तिकीट आणले होते व विद्यमान खासदार असलेल्या हरीभाऊ जावळेंना घरी बसावे लागले होते.

खडसे विरोधकांपेक्षाही जहरी टीका आपल्याच सरकारवर करायचे , सभागृह दणाणून सोडायचे मात्र त्यांना फडणवीस यांनी त्यांना उमेदवारी नाकारली होती. भविष्यात खडसेंच्या बंडखोरीला मार्ग मोकळा केला होता.

आता खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या राजकीय आयुष्याचा एक नवा उत्तरार्ध सुरू झाला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0