इम्रान खान सरकारविरोधात हजारोंचे मोर्चे

इम्रान खान सरकारविरोधात हजारोंचे मोर्चे

कराचीः गेल्या रविवारी शहरात पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्याविरोधात हजारोंचा मोर्चा रस्त्यावर उतरला. लष्कराशी संगनमत करून इम्रान खान सत्तेवर आले

शांघाय कॉर्पोरेशन बैठकीसाठी इम्रान खानला निमंत्रण
इम्रान खान सरकार पडण्याची शक्यता; मित्र पक्षांनी साथ सोडली
काश्मीर प्रश्नी मध्यस्थी : ट्रम्प यांचे विधान भारताने फेटाळले

कराचीः गेल्या रविवारी शहरात पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्याविरोधात हजारोंचा मोर्चा रस्त्यावर उतरला. लष्कराशी संगनमत करून इम्रान खान सत्तेवर आले असून ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. हा मोर्चा पाकिस्तान डेमोक्रेटिक मुव्हमेंट (पीडीएम) पुरस्कृत केला होता व सर्व विरोधी पक्षांचे नेते व कार्यकर्ते सरकारविरोधात एकत्र आले होते. गेल्या महिन्यात एक विशाल मोर्चा विरोधकांनी काढला होता त्यानंतरचा हा दुसरा मोर्चा होता.

इम्रान खान सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रसार माध्यमांवर अंकुश आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून विरोधकांचा आवाजही दाबण्याचा प्रयत्न सुरू असून राजकारणात विरोधी पक्षांची ताकद राहू नये म्हणून अनेक नेत्यांच्या विरोधात पोलिस कारवाई व न्यायालयीन खटले सरकारकडून दाखल केले जात आहेत. या विरोधात सर्व पक्ष उतरले आहेत. देशात बेरोजगारी वाढत असून कोविड-१९चे परिणाम अर्थव्यवस्थेला आणखी गर्तेत नेत असल्याने पाकिस्तानातील राजकारण तप्त झाले आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरयम नवाझ या इम्रान खान यांच्याविरोधात उतरल्या आहेत. त्या नवाझ शरीफ यांच्या वारसदार म्हणून पुढे आल्या आहेत.

सोमवारी पोलिसांनी मरयम यांचे पती मुहम्मद सफदर यांना शहरातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. सफदर यांनी पाकिस्तानचे जनक महम्मद अली जिना यांच्याविरोधात घोषणा दिल्या असा आरोप तहरीक इ इन्साफ या सत्ताधारी पक्षाने केला होता. त्यानंतर सफदर यांना ताब्यात घेण्यात आले.

रविवारच्या मोर्चात मरयम या बिलावल भुत्तो झरदारी यांच्यासमवेत मंचावर होत्या. या वेळी झरदारी यांनी देशातले शेतकरी भूकबळीचा सामना करत असून रोजगार नसल्याने तरुण दिशाहीन झाल्याचा आरोप केला.

पाकिस्तान महागाईचाही सामना करत असून तेथे दुहेरी आकड्यात महागाईचा दर पोहचला आला. शिवाय आर्थिक विकासदरही उणे झाला आहे.

शुक्रवारी गुजरानवाला येथे पाकिस्तान मुस्लिम लीगने हजारोंचा मोर्चा काढला होता. या मोर्चाला लंडनहून व्हिडिओ लिंकद्वारे संबोधित करताना नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकांत हेराफेरी करून इम्रान खान यांना सत्तेवर आणले होते, असा खळबळजनक आरोप केला होता. २०१७मध्ये आपल्याला सत्तेवरून हटवण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कार्यरत होते व आपल्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावण्यात आले, अशीही टीका त्यांनी केली.

दरम्यान, शरीफ यांच्या आरोपांवर पाकिस्तानच्या लष्कराने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इम्रान खान यांनी शरीफ यांचा आरोप फेटाळत लष्कराचे समर्थन केले आहे. त्याचबरोबर विरोधकांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0