२००१ साली गुजरातचे मुख्यमंत्रीपद मिळाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी गुजरात भाजपमधील आपल्या प्रमुख आणि संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना ज्या पद्धतीने बेदखल केले तीच रणनीती एकनाथ खडसे यांच्याबाबत फडणवीस यांच्याकडून राबविल्याचे प्रतीत होते.
“देवेंद्र फडणवीस यांनी माझे राजकीय आयुष्य उध्वस्त केल्यामुळेच मला भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला.” – एकनाथ खडसे २१ऑक्टोबर २०२०
महाराष्ट्रातील भाजपचे गेली ४० वर्षे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे यांनी बुधवारी अखेर आपला भारतीय जनता पक्षाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून दिला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासूनच्या असणाऱ्या मोजक्या निष्ठावंत नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. खानदेशात पक्ष वाढीसाठी गावोगावी संपर्क निर्माण करून अपार कष्ट घेतलेल्या नेत्याला आपला पक्ष या पद्धतीने सोडावा लागणे क्लेशकारक आहे. पक्ष सोडताना खडसे यांनी आपली नाराजी पक्षावर नसून आपण पक्ष अथवा पक्षाची विचारधारा यासाठी पक्ष सोडत नसून देवेंद्र फडणवीस यांनी आपली राजकीय मुस्कटदाबी करून राजकीय आयुष्य उध्वस्त केल्यामुळेच मला भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे थेट सांगितले.
तात्पर्य खडसे यांनी भारतीय जनता पक्ष हा विचारधारा किंवा राजकीय धोरण यासाठी सोडला नसून त्यांनी भाजपचा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांच्यावरील नाराजीतून दिला आहे.
२१ ऑक्टोबर २०१९ म्हणजे गेल्या वर्षी आजच्याच दिवशी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका संपन्न होऊन भाजप – शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले होते. महाराष्ट्रात १९८५ नंतर प्रथमच निवडणूक पूर्व युतीला स्पष्ट बहुमत मिळालेले होते. भाजप – शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादात शिवसेनेने भाजपची पूर्ण साथ सोडून शेवटी विरोधी गोटात जाऊन काँग्रेस – राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले होते. निवडणुकीपूर्वी भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता आणि चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गजांना विधानसभा तिकीट नाकारत धक्का दिला होता.
एकनाथ खडसे यांच्या मुलीला उमेदवारी दिली तरी एकनाथ खडसे यांना कोणत्या कारणाने डावलेले गेले आहे हे भाजपने आजतागायत स्पष्ट केलेले नाही. पंकजा मुंडे या फडणवीस यांच्या आणखी एक प्रतिस्पर्धी निवडणुकीतच पराभूत झाल्या. महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत अडीच -अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मागत होती तरीही भाजपने त्यास नकार दिला, शेवटी शिवसेनेला विरोधात जावे लागले. तोच भाजपा आता बिहारमध्ये जनता दल संयुक्त बरोबर निवडणुका लढविताना भाजपला जादा जागा मिळाल्या तरी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री होतील असे जाहीरपणे सांगत आहे, तेही देवेंद्र फडणवीस तेथील भाजपचे निवडणूक प्रभारी असताना हे विशेष आहे.
भाजपने मुख्यमंत्री पद आणि सत्तेचे समसमान वाटपाचे आश्वासन दिले होते अशी शिवसेनेची भूमिका आजही आहे. शिवसेना विरोधात गेल्या पासून महाराष्ट्रात भाजपच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी म्हणून असताना एकनाथ खडसे यांनी पक्षत्याग करणे भाजपला झोंबणारे आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना, अकाली दल भाजपपासून दुरावले आहेत. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर रामदास आठवले हे एकमेव मोदी मंत्रिमंडळातील मंत्री भाजप शिवाय आहेत. रामदास आठवले हे सुद्धा भाजपच्या मदतीने राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांना निवडून येण्यासाठी त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य महाराष्ट्र विधानसभेत नाही. पासवान यांचा पक्ष बिहारमध्ये भाजपसोबत नाही, तर नितीशकुमार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात न सामील होता भाजपपासून पुरेसे अंतर ठेवले आहे. बिहार निवडणुकीनंतर त्यांची दिशा कशी राहील हे सांगता येत नाही. अशावेळी पक्ष स्थापनेपासून निष्ठावंत असलेल्या एकनाथ खडसे यांचे पक्ष सोडणे बरेच संकेत देत आहे.
४० वर्षे इतक्या दीर्घ काळानंतर निष्ठावंत मानल्या गेलेल्या नेत्याला पक्ष का सोडावा वाटत आहे? त्यांनी पक्षांतर केल्याने त्यांना नवीन पक्षात (राष्ट्रवादीत) भाजपमध्ये पूर्वी मिळत होता इतका आदर सन्मान किंवा सत्तापद मिळेल का? सत्तेच्या पदासाठीच ४० वर्षानंतर ज्येष्ठ नेत्याला पक्षांतर करावेसे का वाटते? वरील प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील मात्र एकनाथ खडसे यांचे पक्षांतर हा भाजपच्या राजकारणातील वेगळाच पॅटर्न आहे. जो मुळात गुजरात भाजपमधून महाराष्ट्रात आला आहे.
२००१ साली गुजरातचे मुख्यमंत्रीपद मिळाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी गुजरात भाजपमधील आपल्या प्रमुख आणि संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना ज्या पद्धतीने बेदखल केले तीच रणनीती एकनाथ खडसे यांच्याबाबत फडणवीस यांच्याकडून राबविल्याचे प्रतीत होते. हरेन पंड्या, केशुभाई पटेल, काशीराम राणा, गोवर्धन झडाफिया, हरेन पारेख या गुजरात भाजपमधील दिग्गज नेत्यांना ज्या पद्धतीने भाजपपासून दुरावण्यात आले, तशीच काहीशी रणनीती एकनाथ खडसे यांच्या बाबत महाराष्ट्रात झाल्याचे दिसून येते.
विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संजय जोशी यांनाही केवळ व्यक्तिगत आकसातून दूर केले गेले. आज भाजप बरोबर असणारे एकेकाळचे शिवसेना आणि अकाली दल हे मुख्यत: नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या राजकीय रणनीतीमुळे भाजपपासून दुरावले आहेत. प्रवीण तोगडिया, संजय जोशी, यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांचा भाजपला विरोध नसून मुख्यत: मोदी, शहा यांना आहे. तसाच एकनाथ खडसे यांचा विरोध भाजपला नसून देवेंद्र फडणवीस यांना आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आल्या आल्या केवळ वर्षभरातच एकनाथ खडसे यांना मंत्रिपद सोडावे लागले. तेव्हापासूनचा हा व्यक्तिगत आकस आता राजकीय प्रतिस्पर्धी बनून समोर येत आहे. याचा निश्तितच फायदा राष्ट्रवादी काँग्रेससह महाआघाडीच्या सरकारला होईल.
COMMENTS