शीतयुद्ध संपले तरीही जगाच्या खलनायकांशी दोन हात करण्याचा त्यांचा जोश कमी झाला नव्हता.
१९८९ मध्ये बर्लिनची भिंत ढासळली, शीतयुद्ध समाप्त झाले तेव्हा जॉन ल कॅरी (खरे नाव डेव्हिड कॉर्नवेल) आता या नवीन वास्तवाला कसे सामोरे जातील असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला – शेवटी त्यांच्या कादंबऱ्या, त्यांची संपूर्ण साहित्यिक कारकीर्द ही पश्चिम आणि सोविएत युनियन यांच्यातील संघर्षाबद्दलच्या लेखनावर आधारलेली होती.
त्या ऐतिहासिक घटनेनंतरच्या त्यांच्या काही पुस्तकांमुळे या शंकेला पुष्टी मिळाली. त्याच वर्षी आलेले द रशिया हाऊस साधारण दर्जाचे म्हणावे असे होते. अर्थात ल कॅरी यांचा साधारण दर्जासुद्धा इतर गुप्तहेर कथा लिहिणाऱ्या लेखकांपेक्षा कितीतरी उच्चच होता. त्यानंतर लगेचच आलेले द सीक्रेट पिलग्रिम हा एक गुप्तहेर नवीन भरती झालेल्या उमेदवारांना देत असलेल्या भाषणांचा संग्रह होता. तोही शीतयुद्धाबद्दल नव्याने माहिती मिळवू पाहणाऱ्यांसाठीच होता.
परंतु द नाईट मॅनेजर (१९९३) या पुस्तकातून ल कॅरी यांनी पुन्हा एकदा झेप घेतली. हे पुस्तक म्हणजे मृत्यूच्या व्यापारामध्ये अफाट पैसा मिळवणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या डीलरची घृणास्पद कथा होती. नेहमीच एक नाविन्यपूर्ण कथा घेऊन येणाऱ्या जॉन ल कॅरी यांना नवीन विषय आणि नवीन खलनायक मिळाले होते.
त्यानंतरच्या पुस्तकांमध्ये मोठ्या औषध कंपन्या (अतिशय उत्कृष्ट असे द कॉन्स्टंट गार्डनर), दहशतवाद (अ मोस्ट वाँटेड मॅन) आणि पश्चिमी राष्ट्रांचा आफ्रिकेतील हस्तक्षेप (द मिशन साँग), अशा विविध विषयांची हाताळणी आहे आणि त्यापैकी बहुतेक पश्चिमी ढोंगीपणाबद्दलचा राग व्यक्त करणारी आहेत. मात्र बहुतांश वेळा त्यांचा कडवटपणा अमेरिकेसाठी राखून ठेवलेला दिसतो. अमेरिका इतर देशांमध्ये करत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल ते नेहमीच अत्यंत तीव्र टीका करत असत. त्यांची शेवटची प्रकाशित कादंबरी एजन्ट रनिंग इन द फील्ड ही वरवर पाहता ब्रेक्झिटबद्दल होती पण त्यातही त्यांनी मोठ्या राजकारण्यांवर कोरडे ओढले आहेत. आणि त्यात ते फक्त बोरिस जॉन्सन आणि युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या बाजूने मोहीम राबवणाऱ्या ब्रिटिश नागरिकांवरच नाही तर अमेरिका आणि ट्रम्प यांच्यावरही टीका करतात.
खऱ्याखुऱ्या ल कॅरी चाहत्याला ते कशाबद्दल लिहीत आहेत याने फरक पडत नाही. ते त्यांची सर्व पुस्तके वाचतात, त्यावर प्रेम करतात, त्यातल्या प्रत्येक ओळीचा, प्रत्येक शब्दाचा आस्वाद घेतात. त्यांची शीतयुद्धासंबंधीची पुस्तके आणि स्मायली ट्रायोलॉजी अर्थातच सर्वांची लाडकी आहेत, पण द स्पाय हू केम इन फ्रॉम कोल्ड आणि अ परफेक्ट स्पाय यांच्यावरही लोक तितकेच प्रेम करतात, आणि अ स्मॉल टाऊन इन जर्मनी आणि द नेव्ह अँड सेंटिमेंटल लव्हर वरही!
ल कॅरी यांचे स्वतःचे आयुष्य हे त्यांनी ज्या जगाबद्दल लिहिले त्याच्याइतकेच वैविध्यपूर्ण होते. त्यांचे बालपण वादळी होते. त्यांचे वडील बड्या आणि फसव्या योजना आणून लोकांना लुबाडत आणि सतत तुरुंगाच्या आतबाहेर असत. ते पाच वर्षांचे असताना त्यांची आईही त्यांना टाकून गेली. त्यांचे शिक्षण शेरबोर्न कॉलेज या सरकारी शाळेत झाले जी त्यांना अजिबात आवडत नसे आणि नंतर ते युनिव्हर्सिटी ऑफ बर्न, स्वित्झर्लंड येथे शिक्षणासाठी गेले. तिथे त्यांना जर्मन भाषेविषयी आयुष्यभरासाठी प्रेम निर्माण झाले – स्मायलीच्या जर्मन साहित्याबद्दलच्या प्रेमाचे मूळ येथे होते. त्यानंतर ते ऑक्सफर्डमध्ये शिकण्यासाठी गेले.
सुरुवातीला ते ब्रिटिश गुप्तहेर खाते एमआय५ मध्ये भरती झाले आणि नंतर त्यांची बदली एमआय६ मध्ये झाली. तिथे त्यांनी हेरगिरीचे धडे घेतले – फोन टॅप करणे, चौकशी तंत्रे, एजंटकडून माहिती मिळवणे. या सगळ्या गोष्टींचा त्यांना त्यांच्या हेरगिरीवर आधारित कादंबऱ्या लिहिताना उपयोग झाला. ल कॅरी यांनी हेरगिरीमधले अनेक असे शब्द लोकप्रिय केले, जे आज अगदी सामान्यपणे वापरले जातात. जसे की मोल्स (moles), लँपलायटर्स (lamplighters) आणि कझिन्स (Cousins) – आपल्या सीआयए सहकाऱ्यांसाठी ब्रिटिश गुप्तहेर वापरत असलेला शब्द.
त्यांनी उभे केलेले जग राखाडी होते, त्यात फाईल्स होत्या, कार्यालयीन राजकारण होते. जेम्स बाँडच्या चमकदार विश्वापेक्षा खूपच वेगळे. प्रणयप्रसंग आणि कॉकटेल्सना त्यात फारशी जागा नव्हती. बंदुका आणि अनोख्या परदेशभेटी तर त्याहूनही कमी. ग्रॅहॅम ग्रीन त्यांचा आवडता लेखक होता. त्यांनीही गुप्तहेर खात्यात काम केले होते आणि त्यांच्या लिखाणात भेदक उपहास आणि जळजळीत निरीक्षणे दिसतात. ल कॅरी हेसुद्धा तितकेच तिखट लिहीत, पण त्यांच्या लिखाणात सहानुभूतीही आहे. त्यांची पात्रे वास्तव आहेत, आपले काम जास्तीत जास्त चोख करतात आणि आपल्या कामाविषयीचा एक ध्येयवादही बाळगून असतात. त्यांच्या मोहिमेचे ध्येयवादी उद्दिष्ट आणि ते साध्य करण्यासाठी ते वापरत असलेले मार्ग या दोन्हींची सांगड घालणे त्यांना कठीण जाते. मात्र पाश्चिमात्य लोकशाहीच सोविएत साम्यवादापेक्षा अधिक चांगली, अगदी नैतिकदृष्ट्याही श्रेष्ठ आहे याबाबत मात्र त्यांच्या मनात शंका नाही.
स्मायली हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध पात्र फारसे नजरेत न भरणारे परंतु अत्यंत हुशार आहे. त्याचा बॉस एकदा त्याचे वर्णन सैतानापेक्षा धूर्त आणि कुमारिकेसारखा पारखी असे वर्णन करतो. त्याला मागे मागे, त्याची पुस्तके आणि कवितांच्या संगतीत राहायला आवडते. वैयक्तिक आयुष्यात तो व्यभिचारी पत्नीचा पती आहे, पण व्यावसायिक आयुष्यात गद्दारी करणाऱ्या हेरांना शोधून काढणे आणि शत्रूशी लढण्यासाठी सविस्तर योजना बनवणे यातल्या त्याच्या हातखंड्यामुळे त्याला मोठा मान आहे. या त्रयीमध्ये तो डबल एजन्टचा बुरखा फाडतो आणि त्याचा दीर्घकाळचा शत्रू कार्ला यालाही धडा शिकवतो.
अलेक गिनीस यांनी दोन टेलिव्हिजन मालिकांमध्ये स्मायलीचे पात्र रंगवले, टिंकर टेलर सोल्जर स्पाय आणि स्मायलीज पीपल. द ऑनरेबल स्कूलबॉय या माझ्या मते त्याच्या सर्वोत्कृष्ट कामाचे चित्रीकरण झाले नाही. गिनीस यांनी हे पात्र इतके चांगले रंगवले होते की आता यानंतर कोणीच ती पातळी गाठू शकणार नाही असे वाटत होते. परंतु चित्रपटरूपात, गॅरी ओल्डमनने, स्वतःचा वेगळा स्मायली उभा केला, त्याच्यामध्ये एक थंड, निर्दयी छटा मिसळली.
ल कॅरीच्या पुस्तकांवर अनेक चित्रपट निघाले, ते सर्वच चांगले नव्हते – द रशिया हाऊस ठीकठाक होता आणि द टेलर ऑफ पनामा अगदीच वाईट, पण द कॉन्स्टंट गार्डनर, ज्यामध्ये राल्फ फाईन्स आणि रेचेल वीझने काम केले होते, एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट होता. फिलिप सेमूर हॉफमनचा शेवटचा चित्रपट अ मोस्ट वाँटेड मॅन, बघायलाच हवा असा आहे. आज ५० हून अधिक वर्षांनंतरही, द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड हा अतिशय पकड घेणारा थ्रिलर आहे. या चित्रपटामध्ये रिचर्ड बर्टनने अलेक्स लीमास या थकल्या भागल्या हेराची परिपूर्ण भूमिका साकारली आहे आणि शीतयुद्धातील ताणतणाव आणि बर्लिनमधील चेकपॉइंट चार्लीचे अप्रतिम चित्रण आहे.
शीतयुद्ध संपल्यानंतर ब्रिटन आणि इतर पाश्चिमात्य देशांची वाटचाल ज्या प्रकारे चालू होती त्यामुळे ल कॅरी अधिकाधिक संतप्त होत होते. हळूहळू ते अधिकाधिक डाव्या विचारांचे आणि अमेरिकाविरोधी होत गेले आणि आपल्या स्वतःच्या देशाच्या राजकारण्यांचा अधिकाधिक तिरस्कार करू लागले.
पण आपल्या कथा उत्तमच असल्या पाहिजेत याबाबतीत त्यांची जाणीव तीव्र होती. आणि खरोखरच त्या काय कथा होत्या, आणि प्रत्येक वाक्य पुन्हा पुन्हा वाचावे अशा शैलीत लिहिलेल्या! ते एक कलात्मक लेखक होते, केवळ एका साहित्यप्रकाराचे लेखक नव्हते. त्यांची पुस्तके जरी गुप्तहेर आणि हेरगिरीच्या जगावर बेतलेल्या असल्या तरी त्या मुख्यतः अनेक दोष असलेल्या माणसांबद्दलच्या, अनपेक्षित हीरोंबद्दलच्या आणि मोठ्या, स्वार्थी खेळांमध्ये छोटा माणूस कसे प्यादे बनतो त्याबद्दलच्या होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या विश्वासघाताबद्दलच्या होत्या – मित्रांचा, देशाचा, प्रियजनांचा विश्वासघात. “प्रेम म्हणजे अशी गोष्ट जिचा तुम्ही विश्वासघात करू शकता,” त्यांनी एकदा लिहिले होते. त्यांच्या असंख्य चाहत्यांना त्यांच्या वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्याकडून नवीन पुस्तकांची भेट सातत्याने मिळत होती ती आता यापुढे नाही मिळणार, पण त्यांची जुनी पुस्तके पुन्हा पुन्हा वाचण्याचा आनंद मात्र त्यांना कायम घेता येईल.
मूळ लेख
(लेखाचे छायाचित्र – ‘Tinker Tailor Soldier Spy’ चित्रपटातील एक दृश्य. )
COMMENTS